Primary tabs

पाऊस, आठवक्षण आणि बरंच काही...'पाऊस'...

share on:

लोक हो, 
डोळे उघडून पाहू या, 
चला, पाऊस समजून घेऊ या ।

कधी येतो रिमझिमत, कधी कोसळतो धुवांधार
कधी होतो आल्हाददायक, कधी भयाण, टोकदार ।
खोड्या करत येतो कधी, कधी होतो सखा, प्रियकर
दुष्काळाच्या बसता झळा, शिव्या खातो खूप भयंकर ।
कुठून येतो, का येतो, कुणात मिसळतो... जाणू या
या, जरा पाहू या, पाऊस समजून घेऊ या ।

    
अगम्य, अफाट दुनिया ही, कोण त्याचा निर्माता?
कोण फिरवी हजार हाते, गाडा हा न कळता?
ऊन, वारा, थंडी, पाऊस, ऋतू येती, ऋतू जाती
फिरत असते चक्र, सरकते वेगाने ही काळ-रेती ।
जगणे म्हणजे काय, काय प्रयोजन जीवनाचे?
संसार, नाती, जन्म-मरण कुठून येते, कुठे जाते?
माता म्हणून नदीला काय कारण पुजण्याचे?
ब्रीदवाक्य परोपकाराचे काय म्हणून झाडांचे?
ऊन, वारा, हवा, पाणी ... कोण यांचा कर्ता-त्राता ?
माती, आकाश, सूर्य, चंद्र ... कसा यांचा अथक राबता?
जीवन रहस्य शोधू या, दश इंद्रियांनी जाणू या,
चला, पाऊस समजून घेऊ या ।

 
विज्ञानाचा हात घेऊन विकास केला, केली प्रगती
लाड पुरवता देहाचे, उजाड-अनाथ झाली धरती ।
ओरबाडतो, कत्तल करतो, नासून का टाकतो माणूस?
रूप देखणे पोषितेचे, विद्रुप का करतो माणूस?
रागावतात, पेटून उठतात, उत्पात घडवतात महाभुते
करीत थयथयाट बेभानपणे तुटून पडतात महाभुते ।
दोषी नसतात पाऊस, वारा, आपण दोष वारू या
काय करणे योग्य जाणून.... झाडे, राने जगवू या ।
मुलांसाठी, पुढल्यांसाठी निसर्ग-दौलत राखू या
या, दूरचे पाहू या, पाऊस समजून घेऊ या ।

 
पाऊस म्हणजे काय ? पाऊस म्हणजे नक्की काय?
पाऊस म्हणजे गारवा, मेघाळलेला सांध्य-मारवा ।
पोळलेल्या चराचराला एक दिलासा हवा-हवा ।
निजलेल्या बीज-बाळाची पाऊस असतो हिरवी जाग,
अंग-भरल्या नदीचा उफाळलेला शृंगार-साज ।
पाऊस म्हणजे शुभ्र थेंब.. शिंपलीतला मौक्तिकमणी,
तरारलेल्या तरुवेलींची पाऊस होतो रूप-पल्लवी ।
तो असतो धुंद गंध अन्नदेचा, तृप्तीचा हुंकार मंद,
राबणार्‍यांचे प्रसन्न मुख, तुमचे-आमचे अन्न-सुख ।
पाऊस म्‍हणजे मुक्त गाणे, ढगापार झेपावणारे
पाऊस असतो निसर्गाच्या अस्सलतेचे हुकमी नाणे ।
पाऊस म्हणजे खुला श्वास, मृत्तिकेचा मत्त वास,
उद्याच्या समृद्धीचा पहिलावहिला सत्य आभास ।
पाऊस देतो प्रेम-शहारा, सोबतीचा अभंग-करार ।
धूसर दु:ख, स्वच्छ कोपरे, झुळझुळणारी खळखळ धार ।

पाऊस होतो अभंग दिंडी, मेघमंडळी, अथांग वारी,
टाळ खणाखण, माळ विजेची, अमृत-झारी ।
सजल पालखी वाहू या, तहान अवघी तोषवू या ।
गजर सावळा करु या, जीवनारती गाऊ या ।
चिंब चिंब होऊ या, डोळे उघडून नाचू या
पाऊस देऊ- घेऊ या, 
चला,  पाऊस होऊ या,
सारे पाऊस होऊ या !!
 - सुखेशा (स्वाती दाढे).

लेखक: 

No comment

Leave a Response