Primary tabs

जगण्याची इंद्रधनू स्फटिकं

share on:

पाऊस, आठवक्षण आणि बरंच काही...

जगण्याची इंद्रधनू स्फटिकं

                                  

 "पावसाच्या वेड्यांना काय हवं असतं गं?" 

"अरे,पाऊस आणि मन!" 

"हूं, राणी मेघांनी वर्दी दिलीय चल आज मस्त स्वागत करू या आपल्या सख्याचं!" 

"हूं...!" आजवर आपण कित्येकदा पाऊसधारा अंगावर घेत निमूट भिजत राहिलोय, कधी खळखळून हसलोय तर कधी पापण शिंपल्यातून अवचित ओघळणारे थेंबमोती एकमेकांना दिसू नयेत म्हणून पावसासंगे निथळत राहिलोय हे तुला अन मलाही चांगलं माहीत आहे; पण आजवर कधीच विचारणं झालं नाही, खरं तर तशी गरजच वाटली नाही कधी. 'एकदा रितं व्हायचं ठरवलं नं की हातचं राखू नये माणसाने अन पुढच्यानेही कारणं विचारत बसू नये. मग बघ कसं निरभ्र मोकळं वाटतं. असं तूच म्हणत असतोस ना! असो...

किरणांचे उन्ह दान

मृत्तिकेच्या ओंजळीत

धुपावून ती गाताना

मेघ येती आभाळात

 वादळवेणा सोसलेली सृष्टी तिची अधिर तृष्णा नाहीच लपवत कधी. पर्णवल्कलांचे अडसरसुद्धा तिने अशा वेळी दूर सारलेले असतात. त्याने उन्हासोबत पाठवलेल्या पितवर्णी भेटी तिने अंगभर माखून मिरवलेल्या असतात. त्या सोनसळी संदेशातून ती तावून सुलाखून अंतर्बाह्य नवी होत पुढे अखंड ऋतुमतीचं वाण जपणार असते; कारण तिला माहितीये तिचा सखा तिच्यात सृजनाचे अमृत पेरणार आहे अन ते पेलण्यासाठी त्याच्या सखीला तेजाळ अग्निशिखा असावं लागेल, तसंच सर्वशक्तीनिशी अंधारमाती भेदून योगिनीच्या धीरगंभीर उदात्ततेने बाहेरही यावं लागेल. तो असेलच सोबतीला, तिच्या सगळ्या वेणा सोसायला. पण तरीही त्याला तिचं संपूर्णा हे रूपच खूप भावतं. त्याला तिच्या स्वयंभू स्वामित्वाला तसंच अबाधित राखायचं असत. तिला मात्र हळवं होऊन त्याच्याशी कितीतरी गुजगोष्टी करायच्या असतात. सगळे ऋतुसोहळे सांगायचे असतात. पण तो, 'अगं वेडे मी तर कायम तुझ्यातच असतो ना!' असं तुझ्यासारखंच हसत म्हणत असावा का रे? 

वेदना 'त्या' उरातील

पोळ जराशी म्हणालो

तू माती होऊन आली

पाऊस तुझा मी झालो

नेहमीसारखीच तुझी अनिमिष समाधी लागली होती जणू.

"बोल गं राणी मी ऐकतोय, आपल्या ओढाळ जगण्याची ही इंद्रधनू स्फटिकं कुठल्या कुपीत ठेवावीत गं, हवी तेव्हा जराशा हाकेनेही मनाला उजळून टाकतील अशी. "मना,अरे आपल्या या तृण दंवी नात्याचं हे पारदर्शीपण मला अलवार हरीतपात करून जातं. अन तू हळवी मृग स्पंदनं जपत येत असतोस.

रानवाटांचे वळण

जीवा लावतसे वेड

मृदगंधाच्या भेटीची

मन रोवतसे मेढ

 आपण रानातल्या एका पुरातन मंदिराजवळ थांबलो होतो. 

"ए ऐक, वाहत्या पाण्यासारखा आवाज येतोय का रे, आपण तिथे जाऊ या का?" माझी उत्सुकता चाळवताच तू हसलास, "बयो, इथे कुठे पाणी? अगं या रानवाऱ्याने चकवलं तुला, या निलगिरीच्या मागे बांबूच्या रांजी आहेत ना, त्यात वारा लपाछुपी खेळतोय ऐक, कधी पाण्याचा खळखळाट भासेल तर कधी बासरीची मधुरधून सुद्धा चकवून जाईल!"  

"खरंच रे! तुला कसं कळलं?" तू उत्तर न देताच पुन्हा ऋतुमग्न झाला होतास.  

इतक्यात सृष्टीची उत्कट विरहिणी तिच्या सख्यापर्यंत पोहोचली होती. ती तपस्विनी झुळुका शोषून घेत अरधोन्मीलीत ठेवून सुम्म होऊन त्याच्या भेटीच्या आर्जवात एकाकार होत शांत होती. अन तो आला, सूर्याचे डोळे झाकत सावळ्या मेघमालेत बसून प्रियेला डोळे भरून बघताना ओथंबला अन आर्ततेने धाव घेतली त्याने. सृष्टीची सारी गात्रे कणाकणातून मोहरली.

मृदगंधातून त्याला बिलगत चिंब चिंब होत ती सुखावली. इंद्रधनूच्या सप्तरंगी कमानीतून त्याने नभालाही प्रेमळ निरोप धाडला आणि सगळे रंग प्रियेच्या हवाली केले.

आपण खुळावल्यागत नुसतेच भिजत राहिलो प्रेमातील तादात्म्य अनुभवत राहिलो. त्या पुरातन मंदिरावरून ओघळणाऱ्या धारा आणि गाभाऱ्यातून येणारा फुलापानांचा, तेलवातीचा ओशट उबदार उन्हाळ गंध कुणाचीतरी चाहूल देऊन गेला म्हणून त्या दिशेला हलकेच नजर वळवली तर कोवळ उन्हाच्या कोमट तिरीपेत बेलाच्या झाडाखाली एक काळ्याभोर आर्त नयनांची चंदनी हरिणी उत्सुकतेनं कान टवकारून एकटक आपल्याचकडे बघत उभी होती.

तिच्या तिथे असण्याचे कुठलेच संदर्भ किंवा अर्थ न लावता तिच्या डोळ्यातला भवताल काळजात साठवत आपण सरी अंगावर झेलत चिंब मनानं परतीला निघालो.

- वर्षा विद्याधर चोबे

लेखक: 

No comment

Leave a Response