Primary tabs

प्रवास..."बाई"चा

share on:

मराठवाडा विद्यापीठाने वासनिक कपूरचंद ह्यांच्या "बृह्नमहाराष्ट्रातील मराठी कविता" ह्या काव्य संकलनाचा समावेश नुकताच अभ्यासक्रमात केला आहे. ह्या संकलनात आपली बेळगावची मराठी कवयित्री हर्षदा सुंठणकर हिची बाई कविताही समाविष्ट आहे. अलीकडच्या काळातील स्त्रीजाणिवेतील कवितांमधील काही अधोरेखित कवितांमध्ये ह्या "बाई" कवितेची गणना झाली आहे. स्त्रीच्या रोजच्या कामातील नेटकेपणात, तिच्या संसारातील नियोजनात तिने आपली निष्ठा ओतलेली असते. अगदी सहज होणाऱ्या कृतीमध्येही कुटुंबाचा बारीकसारीक विचार केलेला दिसतो, पण तिच्या ह्या "विचार करण्याचा" विचार कधी कुणाकडून का घेतला जात नाही? हा प्रश्न अगदी नेमकेपणाने ही कविता समोर आणते. बाई ही स्त्रीवाद न मांडता, फक्त जाणिवांचा नेमका प्रवास उलगडते. स्वातंत्र्याचा वाद न घालता अस्तित्वाची दखल घ्यायला हवी हे ठामपणे सांगते. तिच्या कर्तृत्वाचा ढोल पिटण्याऐवजी नेमके विश्लेषण करते. प्रत्यक्ष न दिसणाऱ्या पण जगण्यात रुजलेल्या प्रगल्भ जाणिवा उलगडून स्पष्ट करते. म्हणूनच वाचक स्त्री असो वा पुरुष वाचताना ती कविता वाचकाला पटत जाते.. कारण ही कवितेतली बाई वास्तवात अशीच कृतीतून उतरताना नेहमी दिसत राहते. 'बाई' ही कविता २०१६ साली साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कालिदास कविता स्पर्धेत पहिली आली. त्याच वर्षी साहित्यप्रेमी दिवाळी अंकात छापून आली. सदानंद बोरसे सरांनी दिवाळी अंक प्रकाशनाच्या वेळी त्या कवितेचा विशेष उल्लेख करून कौतुक केलं. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ही कविता साहित्यदीपच्या कार्यक्रमात ऐकली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता वाचन आणि मुलाखत या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. बुकगंगाने त्या कवितेची ऑडिओ क्लिप त्यांच्या ऑडिओ दिवाळी अंकात घेतली. नंतर इंदूरच्या अलकनंदा साने ताई आणि त्यांच्या मायमावशी या समूहातील काही सदस्यांनी उपक्रम म्हणून या कवितेचा हिंदीत अनुवाद केला. कविता रसिक मंडळी समुहानेसुद्धा या कवितेवरून उपक्रम घेतला. अनेकांनी ती वेगवेगळ्या कार्यक्रमात सादर केली. दामोदर खडसे सरांनी 'नवनीत' या हिंदी मासिकासाठी या कवितेचा अनुवाद केला. कपूर वासनिक सरांनी ती बृहन्महाराष्ट्रातील मराठी कविता या पुस्तकात समाविष्ट केली. ते पुस्तक आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे एम. ए. द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. मनविसे पुणेतर्फे आयोजित केलेल्या काव्यवाचन व्हिडिओ स्पर्धेत पाचशे एकोणऐशी स्पर्धकातून ही कविता पहिली आलेली आहे. युवा विवेक मंचावरही कवयित्री स्वाती यादव यांनी ही कविता सादर केली आहे आणि आता तर मराठवाडा विद्यापीठ एम. ए.मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. अभ्यासक्रमात दखल घेण्याइतपत यशस्वी झालेल्या कवितेने आजच्या युगातीलच नव्हे तर मागच्या पिढीतलं स्त्रीचेही बाईपण नेमके मांडले आहे. बाईच्या यशाचा चढत्या आलेखाला कौतुकाचे तोरण बांधण्याचा ह्या लेखाद्वारे अल्पसा प्रयत्न आणि कवयित्री मैत्रीण हर्षदा सुंठणकर हिला ह्या यशाबद्दल खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..

- नूतन योगेश शेटे

 

लेखक: 

No comment

Leave a Response