Primary tabs

सेवायज्ञातली समिधा...

share on:

सेवा है यज्ञकुन्ड समिधा सम हम जलें
ध्येय महासागर में सरिता रूप हम मिलें ।
लोक योगक्षेम ही राष्ट्र अभय गान है
सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य का ही प्राण है ॥

राष्ट्रीय विचारांच्या विविध संस्था-संघटनांमध्ये म्हटले जाणारे हे गीत. अशा गीतांमधून प्रकट होणारे भाव आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. पण केवळ शब्दांमधून समर्पणाची, समाजासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती निर्माण होत नाही. त्यासाठी या शब्दांप्रमाणे समाजासाठी अविरत झटणारी माणसे आपल्यासमोर दिसावी लागतात. अशी माणसे असली की, संघटना जिवंत व चैतन्यशाली बनते. राष्ट्रीय विचारांचे जागरण करणाऱ्या अशा असंख्य देवदुर्लभ कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे ज्ञानेश नारायण पुरंदरे. 

ज्ञापु हीच त्यांची सर्वसामान्यांमध्ये ओळख असलेले ज्ञानेश पुरंदरे पुण्याच्या स्व-रूपवर्धिनी संस्थेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि कार्यवाह. विविध पेठा आणि वस्त्यांमधून गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिनी निवडून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी ही संस्था १३ मे १९७९ रोजी स्व. कृष्णाजी लक्ष्मण तथा किशाभाऊ पटवर्धन यांच्या पुढाकारातून सुरू झाली. त्याच्या सुरवातीच्या तुकड्यांमधले ते विद्यार्थी. 

कसबा पेठेतल्या पोस्टासमोरच्या वाड्यात एका खोलीच्या घरात पुरंदरे कुटुंब राहत होते. वडील अण्णा फोटोझिंको या शासकीय छापखान्यात कामगार होते. आई सर्वसामान्य गृहिणी. महेश हा धाकटा भाऊ. घर लहान असले, तरी या सर्वांचे मन मोठे होते. त्यामुळे वर्धिनीचे आम्ही सारे सवंगडी या कुटुंबाचेच एक भाग होतो. 

ज्ञानेशचे सातवीपर्यंतचे शिक्षण पुणे महापालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेत झाले. या शाळेतच संध्याकाळी वर्धिनीची रामकृष्ण शाखा भरायची. तिथल्या पायऱ्यांवर बसून किशाभाऊंबरोबरच्या आमच्या गप्पा रंगायच्या. त्यातूनच समाजाबद्दलच्या बांधिलकीचा भाव आमच्या मनामध्ये उतरला. ज्ञानेश आठवीनंतर जंगली महाराज रस्त्यावरच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये जायला लागला. त्याच सुमारास वर्धिनीची आणखी एक शाखा विद्यापीठाच्या गणेशखिंड चौकातील मॉडर्न शाळेत सुरू झाली. मोठं मैदान आणि पोलिसांच्या बराकीवजा इमारतीतल्या वर्गखोल्या अशा ठिकाणी किशाभाऊंनी सांगितले म्हणून मी आणि ज्ञानेश शाखा घेण्यासाठी जाऊ लागलो. तिथल्या चव्हाणनगर पोलिस लायनीपासून ते औंध, पाषाण आणि वडारवाडीपर्यंतच्या मुलांच्या घरी आमचा संपर्क सुरू झाला. त्यातून हे काम आपण पुढेही करत राहण्याची प्रेरणा मनात रुजत गेली. आणि आम्ही स्व-रूपवर्धिनीच्या शाखा, सहली, शिबिरांच्या कामामध्ये रममाण झालो. 

दहावीनंतर ज्ञानेश साताऱ्यातल्या शासकीय तंत्रनिकेतनला शिकण्यासाठी गेला. वाहन अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. तिथेही अद्वैत कुलकर्णी, नारायण धनावडे यांच्यासारखे नवे मित्र त्याने वर्धिनीसाठी जोडले. पुढे अण्णांच्या निवृत्तीनंतर नोकरी करणे भाग होते म्हणून ज्ञानेश बजाज ऑटो कंपनीच्या संशोधन विभागात जायला लागला. परंतु नोकरीचा वेळ वगळता, उरलेला सर्व वेळ वर्धिनीच्या कामासाठी, असाच त्याचा दिनक्रम होता. वर्धिनीच्या अनेक शिबिरांमध्ये निवासी राहूनच ज्ञानेश कामावर जायचा.  

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी स्व-रूपवर्धिनीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. त्यावेळी ज्ञानेशची मला पूर्ण साथ होती. अनेक उत्सव, कार्यक्रमांचे नियोजन आणि सहली-शिबिरांना आम्ही एकत्रच असायचो. आमची ही घट्ट मैत्री इतरांनाही ठाऊक होती. त्यावेळी आमच्या दोघांचीही दाढी नेहमी वाढलेलीच असायची. त्यामुळे वर्धिनीचे दोघे दाढीवाले अशीच आमची टिंगल व्हायची. बाबू आणि ज्ञापु नेहमी बरोबरच असणार याची इतरांना खात्री असायची. 

पुढे मी काही अडचणींमुळे वर्धिनीचे पूर्ण वेळ काम करण्याचे थांबवले आणि साप्ताहिक विवेकमध्ये कामास सुरुवात केली. किशाभाऊ आणि ज्ञानेशला हा निर्णय फारसा पटला नाही. त्यामुळे तो किशाभाऊंना घेऊन विवेकच्या प्रभादेवीच्या कार्यालयात घेऊन आला. सिद्धीविनायक मंदिराच्या आवारातच उभे राहून आमची दिवसभर चर्चा झाली. पण मला पुन्हा पूर्ण वेळ काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे ज्ञानेशने १९९६मध्ये बजाज ऑटोची चांगल्या पगाराची नोकरी सोडून वर्धिनीचे पूर्ण वेळ काम सुरू केले ते अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होते.

कोणतीही संस्था ज्ञानेशसारख्या अशा सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच उभ्या राहतात आणि वाढतात. वर्धिनीचे पुण्याच्या विविध वस्त्यांमध्ये काम विस्तारले ते ज्ञानेशसारख्या समर्पित कार्यकर्त्यांमुळेच. किशाभाऊ आम्हाला नेहमी सांगत की, 'माझ्या सेवेतून सेवेकरी निर्माण झाले पाहिजेत'. ज्ञानेश हा असा सेवेकरी होता. पुढच्या काळात किशाभाऊ थकले. त्यांच्या शरीर-मनाची ऊर्जा कमी होत गेली. पण ज्ञानेश स्व-रूपवर्धिनीतल्या सर्व मुलामुलींसाठी, युवकयुवतींसाठी, त्यांच्या पालकांसाठी- आम्हा सर्वांसाठी किशाभाऊ बनून उभा राहिला. पुण्याच्या विविध वस्त्यांमधल्या हजारो कुटुंबांसाठी तो आधारवड बनून राहिला. याची प्रचीती कोरोनाच्या संसर्गामुळे ज्ञानेशच्या अकाली व दुर्दैवी निधनानंतर आम्हा सर्वांना प्रकर्षाने झाली.

'मी आईच्या पोटात असतानाच वडील आम्हाला सोडून देवाघरी गेले. मी वडिलांना पाहिले नाही. पण ज्ञापु आमच्यासाठी जणू वडीलच होते'.
'ज्ञापु आता १४ एप्रिलला माझ्या घरी जेवायला येणार नाहीत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करायला आम्हाला एकत्र जाता येणार नाही'.
'माझ्या लग्नात मंगलाष्टकांच्या वेळी मामा म्हणून ज्ञापु उभे राहिले. त्यांचे आमच्यावरचे प्रेम आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही'.
'ज्ञापु आमच्यावर रागवायचे. आम्हाला झापायचे. पण त्यांचे आमच्यावर उत्कट प्रेम होते. त्यामुळे ते थोडा वेळ रागावले, तरी पुन्हा फोन करून आपली प्रेमाने विचारपूस करतील, असा विश्वास आम्हाला वाटत असे'.

उभरत्या वयातल्या असंख्य महाविद्यालयीन व व्यावसायिक युवकयुवतींनी व्यक्त केलेल्या या भावना ज्ञापुंनी किती आयुष्ये उभी केली, किती कुटुंबांना आपलेसे केले, याची प्रकर्षाने जाणीव करून देतात. 

ज्ञापुंचे हे प्रेम फक्त वर्धिनीच्या घरांपुरते मर्यादित नव्हते. अनेक संस्था-संघटना आणि तरुण कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणेचा स्रोत होते. आपल्या गप्पागोष्टींमधून, व्याख्यानांमधून त्यांनी सामाजिक बांधिलकी भाव असंख्य हृदयांमध्ये उतरवला. 

ज्ञापु लहानपणापासूनच गोष्टीवेल्हाळ होते. गडकिल्ल्यांवरील भटकंती आणि शिवचरित्र हा त्यांच्या आत्यंतिक आवडीचा विषय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 'जाणता राजा' या महानाट्याचे प्रयोग सुरू केले, तेव्हा सुरुवातीच्या संचामध्ये ज्ञापुंचा समावेश होता. या शाहीरांच्या मेळ्यामध्ये काम करता करता ज्ञापु पुढे गावोगावी शिवचरित्रावर व्याख्याने देऊ लागले. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांहून त्यांना व्याख्यानांसाठी निमंत्रणे येत. स्व-रूपवर्धिनीच्या कामाचे काटेकोर नियोजन करत ते अशा शक्य तितक्या कार्यक्रमांना जात. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. त्यावेळी तिथे असलेल्या मराठा पलटणीसमोर ज्ञापुंनी अतिशय जोषपूर्ण शिवचरित्र सादर केले.

केवळ शिवचरित्रच नव्हे, तर सहज-सोप्या भाषेत समोरच्या श्रोत्यांचा ठाव घेण्याची कला ज्ञापुंना साधली होती. रोजच्या जगण्यातली उदाहरणे देत ते एखादा प्रसंग खुलवत नेत. आपणच जणू या प्रसंगांचे साक्षीदार आहोत, अशी भावना ते श्रोत्यांमध्ये निर्माण करत. किशाभाऊंच्या समवेत अमेरिकेतल्या दौऱ्यात अनिवासी भारतीयांसमोर ज्ञापुंनी दिलेली व्याख्याने असोत किंवा मागच्याच वर्षी अरुणाचलातल्या विवेकानंद केंद्रातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी त्यांनी हिंदीतून साधलेला संवाद असो, ती अतिशय जिव्हाळ्याचा व परिणामकारक असे. 

देशाविषयी, समाजाविषयी उत्कट प्रेम हे ज्ञापुंच्या रोमारोमात भिनले होते. मला आठवते, १९९३च्या सप्टेंबरमध्ये नेहमीप्रमाणे आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत होतो. सकाळी सहा-साडेसहाला ही मिरवणूक संपण्याच्या बेतात असतानाच लातूर-किल्लारी परिसरात मोठा भूकंप झाल्याची बातमी वेगाने पसरली. मिरवणुकीनंतरची व्यवस्था इतर युवकांकडे सोपवून ज्ञापु आणि आम्ही काही कार्यकर्ते बाहेर पडलो. आपण लगोलग जायला पाहिजे, याची जाणीव झाली. कार्यकर्त्यांना निरोप पाठवले, मदतसाहित्याची जमवाजमव झाली आणि साडेदहा-अकरा वाजता हे सर्व घेऊन जाणारा ट्रक वर्धिनीतून रवानाही झाला. या टीमचे नेतृत्व ज्ञापुंनी केले. तात्पुरते निवारे उभे करताना, जीवनावश्यक वस्तूंची मदत करताना लहानग्या मुलांना एकत्र करून त्यांना खेळ-गोष्टी-गाणीत रिझवण्याचे कामही ज्ञापुंनी केले. त्यानंतर सलग तीन वर्षे लातूरच्या जनकल्याण निवासी विद्यालयात मुलांचे शिबीर घ्यायला ज्ञापु जात असत. गिरीशराव प्रभुणे यांनी यमगरवाडीत सुरू केलेल्या एकलव्य आणि शबरीमाता वसतिगृहातल्या भटक्या-विमुक्त समाजातल्या मुलामुलींनाही ज्ञापुंनी असाच लळा लावला. नगर जिल्ह्यातल्या कोठेवाडीमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानेही ज्ञापु अस्वस्थ झाले. वर्धिनीच्या पुष्पाताई नडे व अन्य महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या महिलांना मानसिक व सर्व प्रकारचा आधार देण्यासाठी ज्ञापुंनी तिथे धाव घेतली.  

आपला देश जरा हिंडून पहावा, वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेले विविध सामाजिक प्रकल्प अभ्यासावेत, तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, या हेतूने ज्ञापुंनी २०१८मध्ये उत्तर भारताचा सलग चार महिने दौरा केला. जम्मू-काश्मीर, हिमाचल, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातल्या असंख्य संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. तिथले कार्यकर्ते वर्धिनीच्या कामाशी जोडले. या दौऱ्याहून परतल्यानंतर भारताच्या आंतरिक एकतेचे व सेवाभावाचे रसरशीत अनुभव त्यांनी वर्धिनीच्या मुलामुलींपर्यंत पोहचवले. 

वर्धिनीशी संबंधित हजारो कुटुंबांशी ज्ञापुंचा असलेला नियमित संपर्क विलक्षण होता. कुटुंबातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ज्ञापु हवेहवेसे वाटत, त्यांनी आपल्याशी बोलावे, असे त्यांना वाटत असे. 'मी आज जेवायला/न्याहारीला तुमच्याकडे येणार आहे', असा ज्ञापुंचा केव्हाही फोन येईल, असे अजूनही अनेकांना वाटते. 

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या वर्धिनीतल्या शेकडो मुलामुलींच्या घरची चूल पेटेल का, त्यांच्या घरात अन्न शिजेल का, या विचारांनी ज्ञापु अस्वस्थ झाले होते. त्यांच्यापर्यंत महिना-दोन महिन्याचा शिधा पोहचावा, यासाठी त्यांनी नियोजन केले. युवक कार्यकर्त्यांच्या मार्फत अशी मदत प्रत्यक्ष घरोघरी पोचेल, यासाठी त्याचा पाठपुरावा केला. भवानी पेठ, मंगळवार पेठ, वडारवाडीसारख्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या वर्धिनीच्या काही मुलामुलींच्या घरांपर्यंत हा संसर्ग पोचल्यानंतर संबंधितांना तातडीने क्वारंटाइन करणे, त्यांच्या उपचारांच्या व्यवस्था लावणे, या गोष्टींचा ज्ञापु शेवटपर्यंत पाठपुरावा करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत विविध वस्त्यांमध्ये सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या तपासणीच्या कामात वर्धिनीच्या युवकांची रसद पोहचावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. 

दुर्दैवाने ज्ञापुंनाही एखाद्या बेसावध क्षणी कोरोनाने गाठले. हा संसर्ग लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते बरे होतील अशी आम्हा सर्वांना आशा होती. त्यांची इच्छाशक्तीही जबरदस्त होती. दवाखान्यात असताना त्यांचा मोबाईलवर आलेला एक संदेश त्याची प्रचीतीही देतो. त्यांनी लिहिले,
'सुप्रभात. 
फ्रेश दिवस.
झोप छान झाली. ताप आणि खोकलाही कमी आहे. औषधे मात्र भरपूर आहेत. 
आतापर्यंत कोरोना माझ्या शरीराच्या माध्यमातून डॉक्टरी विद्येला आव्हान देत होता. आता डॉक्टर्स अचूक क्षेपणास्त्रांचा मारा करून कोरोनाचे तळ समूळ उद्ध्वस्त करत आहेत. 
बाजी पलटने लगी है...'
परंतु, दुर्दैवाने ही बाजी पुन्हा उलटली आणि ज्ञापुंचे दुःखद निधन झाले.
ज्ञानेश पुरंदरे हे राष्ट्रीय विचारांच्या मुशीतून तयार झालेले समर्पित व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले आयुष्यच समाजाच्या सेवेसाठी झोकून दिले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना समाजाच्याच कामाचा ध्यास होता आणि आपल्या समाजबांधवांचे दुःख हलके करण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. या सेवायज्ञात त्यांची पडलेली समिधा यापुढेही हजारो युवकयुवतींना निरलस, निस्वार्थ समाजसेवेची प्रेरणा देत राहील. त्यांच्या पावन व प्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन.

डॉ. संजय विष्णू तांबट, 
सहकार्याध्यक्ष, स्व-रूपवर्धिनी

लेखक: 

No comment

Leave a Response