साऱ्या कळ्या फुलांना आजन्म कैद द्यावी
त्यांची सुगंध वार्ता कोणास ना कळावी !
रस, रूप, रंग त्यांचे पडदानशीन व्हावे
फुलत्या कळ्यांवरी या पहारे असे बसावे !
जितुके असे जरूरी तितुकेच ऊन द्यावे
आभाळ ही जरासे खिडकीतुनी दिसावे !
इतुके असून त्यांची बहरेल सर्व बाग
फांदीवरी विखारी डुलतील मत्त नाग !
हा दोष त्या कळ्यांचा फुलतात ज्या अपार
मोहामध्ये तयांची होणार ना शिकार !
अभिशप्त जन्म ऐसा फुलणे सजा ठरावी
चुरतात ते जे कळ्यांना त्यांचीच जीत व्हावी ?
म्हणूनी आता फुलांनो खुडणे करा स्वीकार
वा पाकळीस तुमच्या चढू देत वज्रधार !
मृणालिनी कानिटकर - जोशी
लेखक:
No comment