गणेशा आणि तरुणाई
मित्र-मैत्रिणींनो भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांची रेलचेल आहे. चैत्र या पहिल्या मराठी महिन्यापासून फाल्गुन या बाराव्या म्हणजे शेवटच्या मराठी महिन्यापर्यंतचे हे सण व उत्सव चालूच असतात. अगदी प्रत्येक मराठी महिन्याची पौर्णिमा आणि अमावस्यासुद्धा काही विशेष नावांनी, विशेष महत्त्वाने ओळखले जातात. यासाठी इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे तुमची मराठी दिनदर्शिकेचीही ओळख असली पाहिजे. म्हणजे बारा मराठी महिने, तिथी, नक्षत्रे यांची सहज ओळख होईल.
सर्वात जास्त सण व उत्सव हे श्रावण महिन्यात येतात. त्यानंतर भाद्रपद महिना हा भादवा म्हणूनही ओळखला जातो. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण पण हे तीन महिने चांगला पाऊस झालेला असतो आणि भाद्रपदात तो स्थिरावलेला असतो. शेतीभाती, रानेवने हिरवीगार झालेली असतात. नद्यानाले, विहिरी तुडुंब होतात अशा चाहूल लागते. गणेश चतुर्थीची विघ्नहर्ता, बुद्धिदाता, श्रीगणेश हा गणेश आहे. तो प्रत्येक कार्याचा आरंभी पूजिला जातो. म्हणून एखाद्या कामाची सुरुवात करणे म्हणजे श्रीगणेशा करणे असा वाक्प्रचार रूढ आहे. संपूर्ण भारतभर आणि आता परदेशातही गणेश चतुर्थी उत्साहाने साजरी केली जाते. या प्रत्येक ठिकाणी प्रथा-परंपरा चालीरीती नैवेद्य, पूजाविधी हे वेगवेगळे असतात. पण गणेशाप्रती असणारी भक्तिभावना सारखीच असते.
महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय लोकप्रिय आहे. त्यातही कोकणातला गणेशोत्सव खूपच वेगळा साधा पण सुंदर असतो. आज-काल शहरांमध्ये हा गणेशोत्सव नेत्रदीपक असा केलेला दिसतो, त्यामुळे त्याचे साधे स्वरूप पालटून सवंग रूप येत चालले आहे. श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका हे व्रत केले जाते. गणपतीची आई पार्वती व मैत्रिणी यांनी मिळून ते कशासाठी तर शंकरासारखा पती मिळावा यासाठी. बघा, मित्र-मैत्रिणींनो त्या पौराणिक काळातही पार्वतीने आपल्या वडिलांना आपल्याला शंकर हाच पती पाहिजे हे ठणकावून सांगितले होते. कारण तो तिच्यासाठी योग्य होता हे तिला माहीत होते.
दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेशचतुर्थी यांच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा व आख्यायिका सांगितल्या जातात.
गणेश तू गुणेश तू
येई आमच्या घरी
बुद्धी आणि शक्ती दे
हीच प्रार्थना खरी
आरती तुला करू
खाई गोड मोदका
तुला बघून वाटते
प्रसन्न हे विनायका
असा हा गणेश असुर शक्तींशी लढण्याच्या त्याच्या पराक्रमाच्या खूप कथा पुराणात आहेत. गणासुर नावाच्या एका असुराचा नाश करणारा तो गणपती आणि हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणून गणेशचतुर्थी साजरी करतात अशी एक आख्यायिका आहे. दुसऱ्या एका कथेनुसार त्रिपुरासूर उन्मत झाला होता. ज्याच्याकडून वर मिळाला तो शंकराला त्याने युद्धाचे आव्हान दिले. गणपती व शंकर यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि विजय मिळवून तो आपल्या आईला पार्वतीला भेटायला आला तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते त्याचे आगमन होते. त्यासाठी श्री गणेशचतुर्थी साजरी केली जाते असेही सांगतात.
मित्र-मैत्रिणींनो, या दिवशी श्रीगणेशाची जी पूजा केली जाते, त्यात वापरली जाणारी पत्री म्हणजे पाने आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाची असतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती योजनेने या औषधी पानांचा, फुलांचा पूजेत अंतर्भाव केला आहे पहा. श्रीगणेशाला वाहिली जाणारी खास फुले जास्वंद, कमळ, केवडा आणि त्या काळात येणारी काही रानफुले हीसुद्धा आयुर्वेदात उपयुक्त मानली गेली आहेत.
श्रीगणेशाचे वर्णन करणारे अथर्वशीर्ष हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. त्यात सांगितलेले श्रीगणेशाचे वर्णन हे केवळ धार्मिक, पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या ही महत्त्वाचे आहे. हे अथर्वशीर्ष पठण आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते. श्रीगणेशाला आवडता असणारा नैवेद्य म्हणजे उकडीचा मोदक. करायला थोडा कठीण पण चवीला व आहार दृष्टीने सकस पौष्टिक असा हा गुळ-खोबरेयुक्त मोदक हा सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ. श्रीगणेशाला आळविण्यासाठी म्हटल्या जाणाऱ्या आरत्या हा संगीत, नाद, लय, उच्चार यांचा एक उत्कृष्ट नमुना. या आरत्या पाठ असणे, त्या तालासुरावर म्हणणे हा एक संगीत व पाठांतराचा अभ्यासच आहे. कोकणात भजन मंडळे, मृदुंग, टाळ, पेटी यांच्या तालावर अनेक आरत्या म्हणतात. किती सुंदर आणि नादमधुर या आरत्यांच्या शेवटी त्या ज्याने रचल्या त्याची नाममुद्रा असते. म्हणजे सर्वात सुप्रसिद्ध आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची अशी फोड करून बघा! ही आरती समर्थ रामदास यांनी रचली आहे. आरतीच्या शेवटी दास रामाचा वाट पाहे सदना अशी नाममुद्रा आहे इतर त्यांच्या शेवटच्या या नाममुद्रांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. श्री गणेश मूर्तीचे भव्यस्वरूप, मोठे पोट, हत्तीची सोंड, सुपासारखे कान, बारीक डोळे, पायाशी उंदीर, हातात परशु हीसुद्धा प्रतीके आहेत.
म्हणजेच काय एकूण श्रीगणपती ही बुद्धीची पराक्रमाची, सतप्रवृत्तीची, कलांची देवता आहे. यानिमित्ताने आपण बुद्धीजीवी होऊ या. पण शरीर व मन बळकट करून आसुरी शक्तीवर विजय मिळवू या. विविध कलांचा अभ्यास करू या; कारण कला, छंद आपल्याला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतात. या सणांमुळे आपल्या मनात सात्विक शुद्ध भाव जागृत होतात. अलीकडे या सणाला बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण वाहतुकीला अडथळा थिल्लर नाच-गाणी असे सगळे फोफावत चालले आहे. लोकमान्य टिळकांनी संघटित होण्यासाठी सुरू केलेला हा सार्वजनिक उत्सव आज काहीसा बटबटीत स्वरूपात पुढे येतो आहे. तुम्ही युवकांनी पुढाकार घेऊन या उत्सवातील विधायक हेतू लक्षात घ्या आणि साधेपणाने तो हेतू साजरा करा. अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होते.
भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे साजरी होते. आपले पूर्वज असलेले जुने, विद्वान ऋषी त्यांचे ज्ञान त्यांची साधी राहणी त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान यासाठी ऋषी पंचमी साजरी करतात. या दिवशी कृषी संस्कृतीमधील बैल या महत्त्वाच्या प्राण्याच्या श्रमाचे काही खात नाही. म्हणजेच स्वावलंबनाचे महत्त्व, स्वतः पिकवलेले, हाताने रुजवलेल्या, तयार केलेल्या भाज्या, धान्य यांचे सेवन करावे असे सांगतात कालौघात ते मागे पडले. हेतू बाजूला राहतो आणि प्रथा सुरू राहते. या दिवशी आपण ऋषीतुल्य व्यक्ती, विचारवंत, शास्त्रज्ञ, लेखक, समाजधुरीण यांचे योग्य प्रकारे पूजन करावे आणि त्यांनी घालून दिलेल्या योग्य आदर्श मार्गावर चालावे. त्यांच्यासारखे आदर्श आचरण करावे हा या ऋषीपंचमीचा अर्थ जाणावा.
अशा प्रकारे सणांमागचा मूळ हेतू, त्याचा विधायक अर्थ सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन सण साजरे करणे महत्वाचे आहे. योग्य त्या प्रथा घ्याव्यात. कालोचित बदल करावे सणांच्या निमित्ताने या प्रथा परंपरांचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य अर्थ लावावा हे तुमचे कर्तव्य आहे. असे सामाजिकदृष्ट्या विधायक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे आणि ते तुम्हा युवा पिढीच्या हातात आहे.
कोरोना वैश्विक आपत्ती टाळून जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी आपण आरतीच्या चालीत म्हणू या..
संकट टळू दे आता नको निराशा ही
मंगल व्हावे सारे नित्य कामना ही
यासाठी विघ्नेशा आळवणी करतो
तिमिर सरूनी सुंदर प्रकाश हा भरतो
तू गणेश, तू गुणेश सर्व कलादाता
सुफलित व्हावे जीवन आस हीच आता.
- चारूता प्रभुदेसाई, पुणे
No comment