Primary tabs

द रियुनियन

share on:

'तुम्ही इतक्यात कधी आपल्या शाळेच्या मित्रमैत्रिणींना भेटला होतात?' उत्तर 'नुकतेच भेटलो होतो' असे असेल तर तुम्ही सुखी आहात, उत्तर 'बरेच दिवस झाले भेटून' असं असेल तर तुम्ही लगेच वेळ काढून मित्रमैत्रिणींना भेटायला हवंय आणि उत्तर 'भेटलोच नाही शाळा संपल्यावर' असं असेल तर खूप मोठ्या आनंदाला तुम्ही मुकत आहात... वेळ काढा, कारणं देणं सोडा आणि मित्रमैत्रिणींना लगेच भेटा आणि आनंदाचा पेटारा उघडा. हल्ली सोशल मीडियाचा खूप मोठ्ठा फायदा म्हणजे असे हरवलेले मित्रमैत्रिणी जोडले जात आहेत. आपण फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून निरनिराळे ग्रुप बनवू शकतो,त्या ग्रुपच्या माध्यमातून  स्नेहसंमेलन भरवली जातात. यातून हरवलेलं मैत्र नव्याने जागतं, नवीन मैत्र मिळतं. मैत्रीचं नातं प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय स्पेशल असतं आणि द रियुनियन ही अशीच गोष्ट आहे मैत्रीच्या नात्याची. नावातच सगळं आलंय. हे रियुनियन थोडं वेगळं आहे. बोर्डिंग स्कूलमधून पास आउट झालेली मुलं चक्क १० वर्षानंतर भेटत आहे. मधल्या काळात अर्थातच खूप काही बदललं आहे.कुणी दुसऱ्या शहरात शिफ्ट झालंय, कुणाचं लग्न झालंय, संसार सुरू झालाय, कुणी दुसऱ्या देशातच राहय. पण शाळा ही सर्वाना बांधून ठेवणारा समान आणि घट्ट धागा आहे. याचमुळे गेट टूगेदर अर्थात शाळेचं रियुनियन ठरतं आणि मग सगळ्यांच्या आनंदाला उधाण येतं. आता इथपर्यंत दिसायला सगळं कसं नेहमीसारखं वाटतंय. 

काही लोकं अशी आहेत जी या रियुनियनला जावं की नाही अशा पेचात पडली आहेत. का बरं असेल असं? शाळा संपते तसं शालेय जीवन  मागे पडतं. पुढे प्रत्येकजण उच्च शिक्षण, मग नोकरी किंवा व्यवसाय, मग लग्न, संसार अशा व्यापात प्रत्येकजण अडकतो, नाही म्हंटल तरी मैत्री कुठेतरी मागे पडते, रोजच्या धावपळीत ते मखमली क्षण कुठेतरी हरवून जातात. शाळेतले आपण आणि शाळेनंतरचे आपण यात कमालीचा फरक असतो एक व्यक्ती म्हणून आपण बदलतो, अनुभवातून शिकत जातो आणि अशा वेळी अचानक काही वर्षे मागे शाळेतल्या मित्रमैत्रिणींसमोर घेऊन गेलं तर?? कुठेतरी परत शालेय जीवनाला, त्या मित्रमैत्रिणींना फेस कसं करायचं असा प्रश्न पडतोच. बरोबर नं?

या कथेत देव, देवा (देवांशी), आर्या आणि गौरव अशी चार महत्त्वाची पात्रं आहेत . शालेय जीवनात देव, देवा यांची मैत्री केवळ मैत्री या शब्दापलीकडची होती त्याचं रूपांतर पुढे प्रेमात होतं. सध्या देव आणि देवा लग्न करून परदेशात स्थायिक आहेत. त्यांची प्रेमकहाणी एखाद्या राजपुत्र राजकुमारीसारखी दिसत असली तरी त्यामागे काही रिऍलिटी चेक्स दडले आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद, गैरसमज , ताणतणाव आहेत. थोडक्यात त्यांचं फारसं बरं चाललेलं नाहीये. आर्या ही एका नावाजलेल्या संस्थेत फॅशन डिझायनर म्हणून काम करतेय. स्वतःच्या कामाच्या बाबतीत अतिशय दक्ष, जागरूक असणारी, स्वतःच्या कामावर मनापासून प्रेम करणारी आर्या करिअरच्या प्रगतीपथावर जोरदार घोडदौड करतेय. देवा आणि आर्या शाळेत असताना अतिशय जिवलग मैत्रिणी होत्या. होत्या!!!!!! हो कारण आता त्यांची मैत्री पूर्वीसारखी राहिली नाहीये. शालेय जीवनात देवा-आर्या सावलीसारख्या एकमेकींसोबत असायच्या.आपण एकत्र करिअर करू, एकत्र आयुष्याची वाटचाल करू अशी अनेक स्वप्नं त्यांनी एकमेकींसोबत पाहिली होती.नववीत असताना आर्या शाळा सोडून पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात निघून गेली, आणि देवा एकटी पडली. अशा प्रकारे गैरसमज निर्माण झाला आणि पुढे देवा आर्याशी बोलली नाही. काळ सरला पण मनावरच्या जखमा तशाच राहिल्या, अजूनही देवांशीच्या मनात आर्याविषयी राग आहेच, आर्यालाही याची जाणीव आहे त्यामुळे या रियुनियनला जावं की नाही अशा संभ्रमात दोघी आहेत. आता शेवटचं महत्त्वाचं पात्र म्हणजे गौरव अर्थात जी. गौरव एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि शाळेपासूनच त्याचा स्वभाव विनोदी आहे, गौरवला गंभीर झालेलं कुणीही कधीच पाहिलं नाही. सर्वाना गरज लागेल तेव्हा मदतीसाठी धावून जाणारा गौरव आर्याला रियुनियनला येण्यासाठी तयार करतो. 

तर अशा प्रकारे रियुनियनचा दिवस उजाडतो, हे चार मित्र शिवाय शाळेतले इतर मित्रमैत्रिणी रियुनियनच्या ठिकाणी एकत्र येतात. चार पाच दिवसांचं रियुनियन, काय काय घडतं त्या चार पाच दिवसांत? अर्थातच जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो, इतकी वर्षे काही समज, गैरसमज जे मनातच ठेवले गेलेले असतात त्यांचे खुलासे, काही धक्के दिले घेतले जातात, धुक्यात हरवलेलं मैत्र परत येतं.

या रियुनियनच्या काळात आर्या आणि देवांशी यांच्यातले गैरसमज दूर होऊन त्यांची मैत्री पूर्वीसारखी होते का? देव आणि देवा यांच्यात खूप मतभेद आहेत..ते इतके टोकाचे आहेत की एकमेकांपासून विभक्त होण्यापासून आता तरणोपाय नाही असं दोघांचं मत आहे... मग या प्रेमकहाणीत कोणता ट्विस्ट येतो? देव आणि देवा आपल्या वैवाहिक आयुष्याविषयी काय निर्णय घेतात? अतिशय विनोदी स्वभाव असणारा गौरव रियुनियनच्या शेवटच्या दिवशी गंभीर होऊन आपलं वेगळंच रूप सर्वाना दाखवतो.. गौरव अशा कोणत्या संकटातून जात आहे? रियुनियनच्या काळात आर्याला एक सिनिअर भेटतो, जो आर्याच्या प्रेमात पडतो..आर्या त्याला होकार देते का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं या वेबसिरीजमध्ये दडलेली आहेत.

एकुणच ही वेबसिरीज हलकीफुलकी या प्रकारात मोडते. चौथ्या पाचव्या एपिसोडला काहीशी कंटाळवाणीही वाटते. या वेबसिरीज मध्ये धक्कातंत्र फारसं वापरलं नाहीये, प्रेक्षक सहज अंदाज बांधू शकतात अशी ही वेबसिरीज आहे पण तरीही विषय चांगला असल्यामुळे लक्षात राहते. १० एपिसोडस असलेली ही वेबसिरीज शेवटच्या ३-४ भागात चांगला वेग पकडते.

मुख्य कलाकार म्हणजेच अनुज सचदेवा (देव), श्रेया धनवंतरी (देवा) , सपना पब्बी (आर्या), वीर राजवंत सिंग (गौरव) यांनी छान कामे केली आहेतच याव्यतिरिक्त शाळेतली इतर मित्रमैत्रिणी यांनीही चांगली काम केली आहेत. कथा दिग्दर्शित केली आहे करिश्मा कोहली यांनी. 

तुम्हाला शाळेच्या दिवसांचा अनुभव पुन्हा घ्यायचा असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटाच पण ही वेबसिरीजदेखील नक्की पहा

 

No comment

Leave a Response