Primary tabs

सुखाची कल्पना

share on:

सुख म्हणजे काय? तरं प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असते. कुणाच्या सुखाच्या कल्पना विस्तारलेल्या असतात, तर कुणाला अगदी छोटया-छोटया गोष्टीतही सुखाचा आनंद घेता येतो. म्हणजे सुख म्हणजे माणसाला येणारा व्यक्तिगत आणि त्याच्या पात्रतेनुसार येणारा अनुभव. या लेखातही लेखकाने सुखाची साधी सोप्पी कल्पना मांडली आहे.

तसं मला सणांचं कौतुक पहिल्यापासून कमीच आहे. त्यामुळे मी हिरिरीने होळीची तयारी, गुढी उभारणं, संध्याकाळी ती काढणं, दसऱ्याला गाडी धुऊन हार घालणं, दिवाळीत पणत्या लावणं वगैरे कामं करत नाही. अगदीच टोमणे जास्त झाले, तर मी नाइलाजाने करतोही, पण शक्यतो ती कामं उरकली जाण्याची वाट बघतो. आळशी माणसाकडे पेशन्स असतोच, पण कुणाला त्याचं कौतुक नसतं. काम करावसं वाटतंय, पण ती ऊर्मी दाबून पडून राहणं हा पेशन्सचा भाग आहे. पण होळी जरा वेगळाच प्रकार आहे. लहान असताना आग लावण्याची सामाजिक परवानगी यामुळे तो जास्त आवडायचा. ती टिमकी दिवसरात्र वाजवायची, सारखी होळीत गोलगोल फिरवून कडक करायची आणि नुसती बडवायची, या पलीकडे उद्योग नसायचा. त्यावर तोडगा म्हणून त्या बदल्यात आम्हाला पिक्चर बघायला मिळायचा. वर्षभरात दोघांच्या वाढदिवसाचे दोन आणि होळीचा एक असा बीपीएल कार्डधारक शिधा मिळायचा. एका वर्षी आम्ही 'एक बार मुस्कुरा दो' पाहिलेला. हिंदी अफाट होतं, पाचवी-सहावीत असू. भाऊ म्हणाला, ''सिनेमाच्या नावाचा अर्थ काय?'' लाज कुठे काढून घ्या माहीत नाही सांगून, म्हटलं, ''बार एक आणि मुस्कुरा दोन.'' (तनुजा एक, देव आणि जॉय मुखर्जी दोन). मोठा झाल्यावर त्याने माझ्याबरोबर सिनेमे बघायचं सोडलं.

तर होळी. आई सकाळीच पोळया करायची. ते नैवेद्य वगैरे नाटक काही वर्षं होतं. मग 'घरातल्या पोराला दूध नाही आणि पिंडीवर अभिषेक' वाचण्यात आलं आणि प्रथा मोडली गेली. पुरण खाल्लेलं चालतं, मग पोळी खाल्ली आधी तर काय होतं? याचं समर्पक उत्तर तिच्याकडे नसल्यामुळे झाल्याझाल्या एका ताटलीत घ्यायची, त्यावर तुपाचा गोळा टाकायचा, छोटया वाटीत दूध, त्याच्या कडेने पाण्याचा गोल फिरवला की चेपायचं. गावभर वाटून चार-पाच दिवस पुरतील एवढया करायची पध्दत आईपासून आहे, ती आजतागायत. माझ्या नशिबाने बायको गुळाची आणि पुरणाची पोळी आणि एकूणच सगळं अप्रतिम करते. तूरडाळ आणि गूळ रटरट शिजत असताना जो एक आवाज येतो, घरभर वास सुटतो ना, त्याला तोड नाही. ते त्या मिक्सरमधून काढायचं काम मात्र फार चिकट, किचकट आहे. भांडयात खाली तो पिवळसर, स्पर्शाला समुद्रावरच्या मऊ  रेतीसारखा ढीग गोळा होतो, तो बघत राहावं. लाटताना फ्लेक्झिबल कणकेत तो पिवळसर गोळा सावल्या पसराव्यात तसा पोळीभर पसरतो ना, त्याचं वर्णन कसं करावं?

सरकारी योजना जशा शेवटपर्यंत पोहोचत नाहीत, त्याप्रमाणे बऱ्याच जणींच्या पोळीत पुरण कडेपर्यंत येतच नाही, तिथे त्या वातड लागतात आणि मजा जाते. काहींच्या मी खाकऱ्यासारख्या पातळ पोळया पाहिल्यात. तिथे कशाला हवीये करीना फिगर? कणकेत हळद टाकून पिवळया झालेल्या पोळयांना मी हातही लावत नाही. लोक पोळी अगोड करून गुळवणीत बुडवून का खातात, हे मला कोडं आहे. पोळी कशी नरमसूत, फरीदा जलालच्या गालासारखी गुबगुबीत हवी. कणिक अशी तिंबलेली असावी की तिच्या फिलामेंटसारख्या जाडीतून पुरणाचा पिवळा रंग दिसावा. पिवळसर, तांबूस, चटका जास्त बसलेल्या ठिकाणी काळपट तांबडया रंगाचे ब्युटीस्पॉट असावेत. या पोळीच्याही स्टेजेस असतात. तव्यावरून काढल्या काढल्या गरम पोळी खायला फार आवडत नाही मला. एक तर तूप चटकन विरघळतं आणि चव समजत नाही. केलेला दिवस आणि पुढचे निदान दोन दिवस चव, रंग, अवस्था बदलत जाते, ते टिपण्यातही मजा आहे.

पहिल्या दिवशी ती मुमताजसारखी गच्च आणि फुगीर असते. दुसऱ्या दिवशी तिची स्किन जरा लूज पडते. तिसऱ्या दिवशी मात्र ती मोडकळीला येते. मोहमायेतून सुटावं तसं पुरण वेगळं होतं. पिंजरामध्ये संध्या 'अटकर बांधा, गोरा गोरा खांदा' म्हणताना जसा तो गोरा खांदा बाहेर काढते, तसं घडी घातली की पुरण बाहेर येतं. अर्थात चवीत कमतरता येत नाही, तर वाढ होते. केमिकली चेंजेस होत असतील का तीन दिवस झाल्यामुळे? अज्ञानात सुख असतं हेच खरं. कारण माहीत झालं, तरी चवीत काय फरक पडणार आहे म्हणा.

तर बाहेर ऊन तापलंय. दुपारचा दीडेक वाजलाय. मस्त वाडगा घ्यावा. त्यात किमान दोन-अडीच पोळया घ्याव्यात. वरती घट्ट तुपाचे दोन पिवळेधम्मक स्कूप टाकावेत, साय ओतावी, दूध घालावं, सोबतीला मिरचीचा खार किंवा लोणच्याची फोड असावी. मग मांडी घालून चावण्याचे फार कष्ट नसलेला तो ऐवज तोंडात भरत राहावं. अशा वेळी कुणीही काही बोललं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नं केला, तरी तोंडातून अनाकलनीय आवाज यावेत इतका तोबरा भरलेला हवा. शेवटचे चारेक घास राहिल्यावर अत्यंत दु:खं व्हावं आणि मग उर्वरित भाग मायेने खावा. तुपाचा ओशटपणा, सायीचा तुकडा, त्यात अडकलेलं पुरण यापेक्षा जगात सुळसुळीत, मऊ काहीही नाही, याची खात्री पटावी. वर पाउणेक तांब्या थंडगार पाणी प्यावं आणि वाट काढत ढेकर स्प्रिंगसारखी वर यावी. उगाच एवढं पाणी प्यायलो, आणखी अर्धी गेली असती या विचाराने तीव्र की काय ते दु:खं व्हावं. वर बनारस एकसोबीस-तीनसो, नवरतन, पक्का सुपारी भुगा दाढेखाली घेऊन पंख्याखाली दहाएक मिनिटं बसावं. ग्लानी येऊ  लागली की बेडरूमात जाऊन पडदे लावून अंधार करावा, पंखा फुलस्पीडला लावून पात्तळ चादर अंगावर घेऊन झोपावं. उठल्यावर आज वार काय, आत्ता सकाळचे उठलोय की संध्याकाळचे? असा प्रश्न पडेल अशी झोप लागावी. रात्र व्हायची वाट बघत आळसात वेळ काढावा आणि दुपारच्या निदान निम्मा तरी ऐवज फस्त करावा आणि परत सुखेनैव झोपावं! निदान माझी तरी सुखाची कल्पना इतकी साधी सोप्पी आहे.

पण वय वाढत गेलं की या अशा रग्गड पुरणपोळया चेपण्यात खरी मजा नाही. कुणीतरी आपल्यासाठी बाजूला काढून ठेवलेली, शेवटची अर्धीमुर्धी, गलितगात्र, मोडकळीला आलेली पोळी खाण्यात जास्त मजा असते. त्याच्याबरोबर खार लागत नाही चवीला. थोडासा खारटपणा प्रत्येक घासाला चवीसाठी मिसळला जातो आपोआप. कुणाच्या तरी आठवणीने घास अडकावा आणि आपण तो पाण्याच्या घोटाबरोबर खाली सरकवावा, यात त्या पोळीचा दोष नसतो. त्या आठवणीतल्या सुखाची कल्पना गोड नसते मात्र.

- जयंत विध्वंस 

लेखक: 

No comment

Leave a Response