Primary tabs

अंबरनाथचा नाथ

share on:

 

काळया पाषाणात कोरलेले अंबरनाथचे हे पश्चिमाभिमुख मंदिर भूमिज पध्दतीने बांधलेल्या मंदिराचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रातील भूमिज मंदिरांच्या यादीतील हे बहुधा आद्य मंदिर आहे. यादव साम्राज्याच्या कालखंडात ज्याला हेमाडपंथी शैली या नावाने ओळखले गेले, ती शुष्कसांधी - म्हणजेच dry masonary पध्दत वापरून या मंदिराची रचना केली गेली आहे. लिंगोद्भव शिव, शरभेश, दक्षाचे मस्तक छेदलेला उग्र वीरभद्र, अंधकासुर वधमूर्ती, त्रिपुरासुराचा वध केलेला अष्टभुज शिव अशा नाना आविष्कारातील शिवदर्शन अंबरनाथच्या देवालयात सहजच घडून जाते.

वैदिक परंपरेतून उभ्या राहिलेल्या आजच्या देवताविषयक संकल्पनेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवता प्रामुख्याने दृग्गोचर होतात. चिंतकांनी अन् तत्त्वज्ञान्यांनी त्यांना रज, सत्त्व व तम या तीन स्थायी गुणांचे कारकत्व बहाल केले आहे. ब्रह्मा ही रजोगुणाची, विष्णू ही सत्त्वगुणाची अन् शिव ही तमोगुणाची देवता असे प्रतिनिधित्वही या देवतांना बहाल केले गेले आहे. चराचर सृष्टीचा जन्म, तिचे पालनपोषण अन् तिचा विध्वंस अशी या देवतांची प्रमुख कार्ये अशी विचारधाराही यामुळे रूढ झालेली आहे. या चराचर विश्वाचा साराच पसारा या त्रिकूटाने सांभाळावा, अशी संकल्पनाही जनमानसाने स्वीकारली आहे. वेदांमधून निर्माण झालेले जे काही देवतासंघ आहेत, त्यांचा बहुधा साराच डोलारा या तीन खांबांवर उभा राहिलेला दिसतो. आज ब्रह्मदेवाचे स्थान तितकेसे बळकट राहिलेले दिसत नाही. त्याची जागा आता देवी, गणपती, अन् सूर्य या देवतांनी घेतलेली आहे. हीच ती पंचदेवोपासना. यांचेच वैष्णव, शैव, सौर, गाणपत्य अन् शाक्त असे संप्रदाय उभे ठाकले. प्रत्येकाची उपासना पध्दती वेगळी. प्रत्येकाचे वाङ्मय वेगळे. त्या त्या देवतेचा पुरस्कार करणारे साहित्य वेगळे. पुराणे, आगमसाहित्य, कथा, स्तुती अशा या साऱ्यातून या देवता त्यांच्या सगुण रूपात आपल्या सामोऱ्या उभ्या ठाकतात. या अवघ्या वाङ्मयातून वर्णन करण्यात आलेल्या लक्षणांतूनच या देवतांच्या मूर्त रूपाचा जन्म झाला आहे, असे आपल्या ध्यानी येऊ  लागते.

एक सत्य कुणीही सहज नाकारू शकत नाही की, भारताचा आणि भारतीयांचा मूळ पिंड समन्वयवादी आहे. आपले लौकिक व पारलौकिक तत्त्वज्ञान याच वेदीवर उभे राहून, 'उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत' असा संदेश मुमुक्षूंना अन सर्वसामान्यांना देत असते. आज प्रचलित असलेल्या शैव संप्रदायात अनेक मतमतांतरांचे अन् संप्रदायांचे एकत्रीकरण झालेले आपल्या नजरेस पडते. शिव आणि शक्ती हे या भौतिक जगाचे मूलाधार आहेत. याच दोहोंच्या संयोगातून आपली ही सृष्टी जन्म पावली. या शक्तीचे नियंत्रण शिवाकडून होते. पूर्णपणे विकसित झालेल्या या बेफाम शक्तीचे नियंत्रण सामर्थ्यवंत अशा शिवाकडूनच होऊ  शकते अशांसारखी मते शैव संप्रदायात लौकिकार्थाने रूढ आहेत. अर्धनारीश्वर शिव, शाळुंका व त्यात बसवलेले लिंग, हरिहर यांसारख्या प्रतिमा हे या शिव-शक्तीचे अन्योन्य संबंधच अधोरेखित करतात. सारी सृष्टी केवळ या दोन प्रतीकांभोवतीच फिरते असा जो मूलभूत शैवसिध्दान्त, त्याला पूरक अशी अनेक प्रतिपादने साहित्याच्या अन् कलेच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न इतिहासपूर्व काळापासून झालेला आपल्या दृष्टोत्पत्तीस येतो.

लिंगपूजेचे मूळ आपल्याला सिंधुसंस्कृतीच्या काळापासून शोधता येते. या काळातले शिवाचे अग्निरूप, शिखी हे त्याचे नाव, प्रजननक्षमता दर्शविणारी त्याची ऊर्ध्वमेढ अवस्था, त्याचा तिसरा डोळा, मदनाचे दहन अशा अनेक गुणसमुच्चयाची प्रस्थापना होऊन शैवसंप्रदाय कालौघात अतिशय लक्षणसंपन्न झाला. मात्र हे होण्यासही शतकानुशतकांचा कालावधी लागला असावा. लिंगपूजा ही वैदिक आर्यांसाठी निषिध्द होती. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडात लिंगपूजेची हेटाळणी झाली. शिस्नदेव असे म्हणून पूजकांना हिणविले गेले. तरीही हे दैवत वैदिक धर्मात नुसतेच शिरले नाही, तर अगदी अग्रभागी जाऊन स्थिरावले. हे होण्यासाठी शतकानुशतकांचा कालखंड लागला असेल - किंबहुना सहस्रकेही उलटली असतील. याचा दृष्य परिणाम लिंगस्वरूपाच्या बदलात परिवर्तित झालेला दिसतो. मूलत: शिवलिंग नेमके मानवलिंगासारखे घडवीत. त्यानंतर त्यास एखाद्या खांबासारखे रूप मिळाले. टोकाच्या लिंगाग्रास दर्शविणारी रेष पुष्पमालेच्या रूपात बदलली. त्या रेखेला ब्रह्मसूत्र असे नामाभिधान मिळाले. त्यानंतर लिंगाचे आकार बदलत गेले. त्यावर निरनिराळया प्रतिमा दिसू लागल्या. कधी मुख, कधी शंकर, सूर्य-गणेशादी देवांचे मुखवटे त्यावर आकार धरू लागले. कलेतिहासकारांच्या मते या संक्रमणास साधारणपणे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंतचा सुमारे चौदाशे वर्षांचा कालखंड लागला. त्याही अगोदर लिंगपूजेने समाजमनात स्थान पटकावले होते. यावरून या दैवताच्या संकल्पनेपासून ते हे दैवत पूजाधिष्ठित होईपर्यंत किती काळ लागला असेल याची कल्पना कुणीही करावी.

शंकराच्या मानवाकार प्रतिमेचा आरंभही सिंधुसंस्कृतीच्या वेळेपासून झाला, असा एक मतप्रवाह आहे. सिंधुसंस्कृतीच्या एका मातीच्या मुद्रेवर पशुपती शिवरूपाची प्रतिमा आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे, तर काही अभ्यासकांच्या मते ही बैलाचे मुख असलेली देवता आहे. त्यानंतरच्या कालखंडात रचलेल्या वेदांमध्येही शिवाचे गुणवर्णन आढळते. त्यात शत्रूंना रडविणारा रुद्र, पर्वतांचा स्वामी गिरीश, निळया गळयाचा नीलग्रीव, रक्तवर्णी विलोहित, शरचापधारी इषुधिमान, भयानक स्वर करणारा उच्चैर्घोषायाक्रम दयते, चोरांचा स्वामी स्तेतानां पती, रात्री भटकणारा नक्तंचर, पशुरूप धारण करणारा शिपिविष्ट, कवचधारी कवचिन अशा विशेषणांनी शिवाला संबोधित केलेले आढळते. वेदांच्या दृष्टीने हा शिव नितांत पराक्रमी रणवीर आहे अन त्याच वेळी तो मंगलमूर्तीही आहे. पौराणिक काळाच्या सुरुवातीपर्यंत महादेव असे नाव लाभलेले हे दैवत धर्माच्या मांदियाळीत बरेच वरचे स्थान पटकावून बसलेले होते. याच कालखंडात हरी आणि हर यांचे ऐक्य सूचित करणाऱ्या कथा रचल्या गेल्या. दक्षयज्ञानंतर बदरिकाश्रमात झालेल्या घनघोर युध्दात श्रीहरीने गळा दाबल्यामुळे शिवाला 'शितिकण्ठ' असे नाव मिळाले, तर शिवाचे त्रिशूललांछन स्वत:च्या वक्षस्थळावर मिरविण्यास श्रीहरी तयार झाला!

नाना परींची शिवप्रतीके व शिवप्रतिमा आपल्याला आढळतात. यात शिवलिंगे आहेत. निरनिराळया प्रकारच्या शिवमूर्ती आहेत.  निरनिराळया कालखंडात होऊन गेलेल्या राजवंशांनी अन् त्यामधील विख्यात सम्राटांनी जी नाणी पाडली, त्यात या साऱ्या प्रतीकांचे अन प्रतिमांचे अंकन झालेले आपणास आढळते. अगदी कुषाणांपासून सुरू झालेल्या या प्रथेचे सूत्र पंधराव्या शतकापर्यंत संबंध भारतभर पसरलेले दिसून येते. अफगाणिस्तानापासून बंगालपर्यंत अन काश्मीरपासून ते थेट रामेश्वरापर्यंत शिवरूपाची नाना परींची अंकने प्रतीकरूपात वा प्रतिमारूपात भारतभर विपुल प्रमाणात आढळलेली आहेत. सिंधुसंस्कृतीमध्ये एका लहानशा मातीच्या मुद्रेवर आढळलेले हे शिवरूप सतराव्या शतकात रामेश्वरमच्या विशाल मंदिरात परिवर्तित झालेले आपल्याला आढळून येते. जवळजवळ साडेपाच हजार वर्षांच्या प्रचंड अशा कालखंडात झालेले हे परिवर्तन विस्मयचकित करावे असे तर आहेच, त्याहीपेक्षा सार्वकालिक भारतीय समाजाच्या प्रगतिशील आणि सर्वसमावेशक अशा वृत्तीचेही ते नितांतसुंदर असे प्रतीक आहे.

त्या दिवशी अंबरनाथच्या वाटेवर असताना हे असे विचार मनी उभे राहत होते. एका कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून अंबरनाथमार्गे पुढे जायचे होते. मंदिराचे दर्शन पहिल्यांदाच होणार होतो. मंदिराविषयीची कोणतीच कल्पनाचित्रे मनात नव्हती. निखळ कोरी पाटी घेऊन मंदिराच्या प्राकारात पाऊल टाकले. निंबाच्या अन पिंपळाच्या सळसळत्या फांदोऱ्यांआडून डोकावत असलेल्या त्या मंदिराने मला हळूच खुणावले अन अपार कुतूहलाने मी त्या फरसबंदी प्राकारात पाऊल टाकले. पाहताक्षणी डोळे खिळून राहावेत असे कृष्णपाषाणात रचलेले ते देखणे मंदिर, भाद्रपदाच्या मऊ  उन्हात झळाळून उठले होते. ऐकले होते, वाचले होते त्याहीपेक्षा प्रत्यक्ष दर्शन अधिक लोभसवाणे होते. मुग्ध करणारे होते.

भूमिज शैलीत इ.स. 1060 या वर्षी बांधून पूर्ण झालेल्या या मंदिराच्या सभामंडपाच्या उत्तर द्वाराच्या आतील बाजूस माथेपट्टीवर एक शिलालेख आहे. आहे म्हणण्यापेक्षा होता, कारण आता तो शिलालेख दिसेनासा झाला आहे. पहिल्यांदा भाऊ  दाजी लाड यांनी व नंतर भगवानलाल इंद्रजी यांनी या शिलालेखाचे वाचन केले होते. सहाच ओळी या शिलालेखात आहेत. मात्र त्यात मंदिराचा आरंभकाल, हे मंदिर बांधणाऱ्या व पूर्णत्वास नेणाऱ्या राजाचे नाव, ती धुरा सांभाळणाऱ्या मंत्रिगणाची नावे, त्यांचे हुद्दे, गावाचे नाव, देवळाचे नाव हे सारेच दिलेले आहे. त्यात म्हटले आहे -

शकसंवत 982 श्रावण शुध्द 9 शुक्रे समधिगताशेषपञ्चमहाशब्द महामण्डलेश्वराधिप रिपुदैत्यदलनदामोदर शरणागतवज्रपंजरात्यादि समस्तराजावलिविराजमान महामण्डलेश्वर श्रीमाम्वणिराजदेव:... श्रीअम्वरनाथदेवकुला भगलसमुध्दरितपाटपल्यां महामण्डलेश्वर श्रीमछित्तराजदेवस्य भवनं सपादितम.

उपरोक्त ओळींचा साधारण अर्थ असा की, शके 982 या वर्षी श्रावण शुध्द नवमी, शुक्रवारी ज्याला पाच महावाद्यांचा मान आहे असा, साऱ्या महामंडलेश्वरांचा अधिपती, शत्रुरूपी दैत्यांचे दमन करणारा साक्षात दामोदरच जणू, शरणागताला सदैव वज्रासारखे संरक्षण देणारा, समस्त राजवर्गामध्ये विराजमान असणारा महामण्डलेश्वर माम्वणीराजदेव याच्या कारकिर्दीत... पाटपल्लीमधील महामण्डलेश्वर श्रीछित्तराजदेव यांचे आम्रनाथ देवाचे संकुल पूर्ण केले. मंदिराच्या निर्माणासंबंधी इतका लख्ख उल्लेख असलेले निदान महाराष्ट्रातील तरी हे एकुलते प्राचीन मंदिर असावे. अपवाद आहे केवळ रामटेकच्या केवलनरसिंह मंदिरातील प्रभावतीगुप्तच्या सहाव्या शतकातील शिलालेखाचा.

गेली अनेक वर्षे सह्याद्रीच्या कुशीतला महाराष्ट्र भटकतो आहे. दुर्ग पाहता पाहता दिसणारी, तर कधी आडवाटेवर असणारी अनेक मंदिरे पाहिली आहेत. त्यांच्या प्राचीनतेच्या वणखुणा निरखून पहिल्या आहेत. त्यांच्या रूपाशी एकतान होऊन मंतरलेले अनेक क्षण मन भरून अनुभवले आहेत. मात्र आज डोळयांसमोर जे उभे ठाकले होते, ते केवळ अद्भुत होते. कधी न पाहिलेले, न देखलेले, जणू देवस्पर्श झालेले ते मंदिर साक्षात माझ्यासमोर होते. नितळ गंभीरपणा हा शिवालयाचा एक मूलभूत गुण असतो. तपश्चर्येचे स्थळ कसे असावे याचे वर्णन करताना ज्ञानोबांनी म्हटलेय - 'होआवा निगूढ मठ अथवा शिवालयो...' तपाला आवश्यक असणारी मनाची एकंकारता शिवालयाच्या वास्तूमध्येच साधली जाते, असेच माउलींना बहुधा यातून सुचवायचे असावे. मात्र हा अनुभव आजही कुण्याही शिवालयामध्ये साधारण श्रध्दावंत मनाला येतोच येतो. बाहेरल्या कलागतींनी सैरभैर झालेले आपले मन एखाद्या निवांत क्षणी शिवमंदिरात येताच नकळतच स्थिरावते.

काळया पाषाणात कोरलेले अंबरनाथचे हे पश्चिमाभिमुख मंदिर भूमिज पध्दतीने बांधलेल्या मंदिराचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रातील भूमिज मंदिरांच्या यादीतील हे बहुधा आद्य मंदिर आहे. यादव साम्राज्याच्या कालखंडात ज्याला हेमाडपंथी शैली या नावाने ओळखले गेले, ती शुष्कसांधी - म्हणजेच dry masonary पध्दत वापरून या मंदिराची रचना केली गेली आहे.

शिल्पशास्त्राने मंदिराच्या रचनेचे अनेक भाग पाडले आहेत. मंदिराच्या बैठकीला पीठ, अधिष्ठान, वेदीबंध वा जगती अशा नावांनी ओळखले जाते. या जगतीचे ग्रासपट्टी, गजथर व नरथर असे खालून एकावर एक असलेले थर असतात. ग्रासपट्टी ही कधी अलंकृत असते, तर कधी अनलंकृत. गजथरांमध्ये मंदिराचा भार पाठीवर तोलणाऱ्या, नाना क्रीडा करणाऱ्या सालंकृत हत्तींच्या रांगा कोरलेल्या असतात. त्यावर असणारा जो नरथर, त्या शिल्पपट्टामध्ये बहुधा तत्कालीन समाजजीवनाचे शिल्पांकन झालेले असते. त्यावर स्त्री-पुरुषांच्या, प्राणी-पक्ष्यांच्या आकृतींचे मुद्रांकन असते. इष्टदेवतेच्या अस्तित्वाचा भार जनसामान्य सोसत असतात, ही बहुधा या रचनेमागची कल्पना असावी.

गजथर व नरथर यांच्यावर मंदिराची भिंत सुरू होते. त्याला म्हणायचे मंडोवर. मंडोवर ही शिल्पांकनाची मुख्य जागा. ज्या देवतेचे मंदिर, त्या देवतेच्या लीलाचरित्राचे वा पंथाच्या तत्त्वज्ञानाचे शिल्पांकन या मंडोवरावर केलेले असते. किंबहुना मंडोवर म्हणजे मंदिरांच्या रचनाकारांसाठी एक आव्हान असते. स्वत:ची शैली, स्वत:चे शिल्पकलेतील प्रावीण्य दाखविण्यासाठी मंडोवर हा जणू एक कॅनव्हास असतो.

हे मंडोवर जिथे संपते, तेथे शिखर सुरू होते. शिखर हा तर जणू मंदिराचा आत्मा. अज्ञात आराध्याच्या दिशेने झेप घेणारी मानवी मनाची अवस्थाच या शिखराच्या रूपाने आपल्या डोळयांसमोर साक्षात असते. शिखराच्या कळसाच्या रूपाने, अज्ञातात विलीन होऊ पाहणारी, ऐहिकापासून निवृत्त होऊ पाहणारी मानवी वृत्तीच अंकित झालेली दिसते. शिल्पशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर कुण्याही मंदिराची शिखररचना हा त्या मंदिराच्या बांधकामात योजलेल्या शिल्पशैलीचा अर्कच असतो. मंदिर शिल्पशास्त्रात पंचभूम म्हणजे पाच मजली किंवा सप्तभूम म्हणजे सात मजली शिखररचनेचे उल्लेख आहेत. त्या प्रकारे बांधलेली अनेक मंदिरे महाराष्ट्रभर दृष्टीस पडतात. अंबरनाथचे मंदिर सप्तभूम या प्रकारचे आहे. आज या मंदिराचे शिखर जरी कोसळलेले असले, तरी त्याचा शिल्लक असलेला भाग गतवैभवाची ओळख द्यायला पुरेसा आहे.

मंदिरात शिरण्यापूर्वी ध्वजमंडप असतो. त्यापुढे वाहनमंडप. मग मुखमंडप. त्यातून आत शिरले की मग रंगमंडप. त्यापुढे सभामंडप. मग अंतराळ आणि शेवटी कळसाखाली असलेले गर्भगृह व मंदिराच्या इष्टदेवतेचे स्थान. ही अशी रचना क्लासिकल म्हटल्या जाणाऱ्या मंदिरांची असते. अंबरनाथच्या मंदिरात यापैकी मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व  गर्भगृह अशी रचना आहे. उत्तर, पश्चिम व दक्षिण अशी द्वाररचना आहे.

अंबरनाथचे मंदिर देखण्या शिल्पकृतींनी अंतर्बाह्य नटलेले आहे. हे मंदिर रचणाऱ्या अभिजात शिल्पकारांनी अवघे शैव तत्त्वज्ञान मंडोवराच्या तिन्ही भिंतींवर काळया पाषाणात शिल्पबध्द केलेय. मंदिरांच्या अंगोपांगावर असलेल्या मूर्तींचे प्रयोजन प्रतीकात्मक असते. त्यामागे एक निश्चित अशी योजना असते. धार्मिकतेच्या पायावर उभा असलेला सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीकोन असतो. यामध्ये साधारणपणे तीन निश्चित पातळया असतात. त्यामध्ये इष्टदेवता, तिच्या परिवारातील देवता व इतर देवता यांचे अंकन केलेले असते. या साऱ्या मूर्तींना एक विशिष्ट क्रम असतो व त्या इष्टदैवतांच्या पंथाच्या तत्त्वज्ञानावर तो क्रम आधारित असतो. अंबरनाथच्या मंदिरात हे सारे नेटकेपणाने शिल्पांकित झालेले आपल्याला दिसते.

गर्भगृह, अंतराळ व सभामंडप यांच्या मंडोवरावर मिळून एकूण एक्काहत्तर मूर्ती आहेत. या साऱ्या मुख्य देवता परिवारातील मूर्ती आहेत. या वेगळया सलिलांतरात असलेल्या सुरसुंदरींच्या, मुनींच्या देखण्या मूर्ती वेगळयाच. या रचनेतही काही एक प्रकारची योजना आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. या पूर्व-पश्चिम अक्षावर मंदिराचे दोन भाग केले, तर उत्तर व दक्षिणेकडे ज्या मूर्ती आहेत, त्या एकमेकांना पूरक म्हणाव्या अशाच आहेत. जणू आपल्या गुणांनी त्यांनी मंदिराचा तोल सावरून धरला आहे. एका बाजूला शिव त्याच्या रौद्र रूपात अवतरला आहे, तर नेमक्या विरुध्द बाजूला देवी त्याच रूपात दसते आहे. सौम्य रूपांचेही तसेच आहे. गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मधल्या भागाला अंतराळ असे म्हणतात. त्या अंतराळाच्या उत्तरेस नृत्यमग्न गणेशमूर्ती आहे, तर विरुध्द बाजूस देवसेनापती कार्तिकेय देखण्या रूपात उभा ठाकला आहे. दिक्पालांच्या बाबतीतही असाच तोल साधलेला आहे. हे अवघे पाहिले की ही मंदिर संकल्पना मनोमन उभी करणारे आचार्य व ती प्रत्यक्षात उतरविणारा स्थपती या दोघांनाही दंडवत घालावासा वाटतो.

नाना देखण्या मूतींर्नी हे मंदिर वेढलेले आहे. गर्भगृहाचे भद्र, कर्ण, उपरथ, रथ, कपिली, शुकन्यास, या साऱ्यांच भागांवर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. यामध्ये ऐरावतासह इंद्र आहे. पितामह ब्रह्मदेव आहे. श्रीधर विष्णू आहे. नरसिंह आहे. हरिहर आहे. दुर्मीळ असणारी ब्रह्मा-विष्णू-महेश-सूर्य यांची संयुक्त प्रतिमा अंबरनाथच्या मंदिराच्या मंडोवरावर आढळून येते. येथे गणेश-कार्तिकेय हे बंधुद्वय आहेत. वागीश्वरी आहे. ब्रह्माणी आहे. क्षेमंकरी आहे. चामुंडा आहे. पार्वती आहे. गौराई आहे. इशान, कुबेर, अग्नी, वायू, यम, एकादश रुद्र, भैरव, शृंगी-भृंगीची जोडगोळी अशी ही सारीच मंडळी आपापल्या नेमल्या स्थानी जागा धरून आहेत. मंदिराची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आचार्य व त्यांची शक्ती, मंदिराचा स्थपती यांची शिल्पेही मानाच्या जागी आहेत.

शिवरूप तर ठायी ठायी आहे, किंबहुना हे त्याचेच तर घर आहे. यात त्याची रौद्र रूपे अन सौम्य रूपेही आहेत. शिवाच्या येथल्या सोळा रूपांमध्ये जटामुकुटावर रुंडमाळा धारण केलेला, दात विचकणारा रौद्र गजान्तक पाहून अंगी थरार उमटतो. मंदिराच्या उत्तर भद्रावर शिवाची अतिशय दुर्मीळ अशी नग्न भिक्षाटनमूर्ती आहे. मार्कंडेय अनुग्रहाची कथा अद्भुत शिल्परूप घेऊन इथे प्रकट झाली आहे. दहाही हातांनी यमावर तुटून पडलेल्या शिवाच्या उजव्या पायाचा आडोसा घेऊन यमाचा अंत कौतुकाने न्याहाळणारा मार्कंडेय... हा शिल्पपट केवळ अद्वितीय आहे. पार्वतीपरिणयाचे दृश्यही अतिसुबक आहे. लिंगोद्भव शिव, शरभेश, दक्षाचे मस्तक छेदलेला उग्र वीरभद्र, अंधकासुर वधमूर्ती, त्रिपुरासुराचा वध केलेला अष्टभुज शिव अशा नाना आविष्कारातील शिवदर्शन अंबरनाथच्या देवालयात सहजच घडून जाते.

हे मंदिराचे बाह्यांग झाले. अंतरंगातही शिल्पपटांची अशीच रेलचेल आहे. सभामंडपाच्या चारही खांबांवर संपूर्ण उंचीच्या चारही बाजूना शिवलीलेचे उत्कट प्रसंग कोरलेले आहेत. येथेही गरुडवाहन विष्णूसकट सहासात निरनिराळी विष्णुरूपे आहेत. ब्रह्मा आहे. ढेरपोटया कुबेर आहे. जरासंध वधप्रसंग आहे. वाली-सुग्रीव युध्दप्रसंग आहे. मंदिराचे छतसुध्दा असेच शिल्पपटांनी नटलेले आहे. किंबहुना हे सारेच मंदिर अद्भुताच्या रंगांनी न्हाऊन निघाले आहे.

सकाळी दहाच्या सुमारास पोहोचलो होतो. भानावर आलो, तेव्हा सूर्य क्षितिजाला लगटू निघाला होता. हे अवघे पाहत आठ-नऊ तास कसे उलगले, हे कळलेच नव्हते. ही शिल्पे न्याहाळता न्याहाळता मंदिराभोवती किती प्रदक्षिणा झाल्या याची जाणीवही जणू हरपली होती. भटके मन तृप्तावले होते. खरे तर त्या दिवशी पुढे जाऊन लोनाडचे शिवमंदिर अन लेणी पाहायचा मानस होता. ते राहूनच गेले. मात्र त्याची टोचणी जाणवत नव्हती. देवाचे दर्शन अंतर्बाह्य जाणवले होते. अंबरनाथच्या नाथाने पोटाशी धरून ऐहिकाचा विसर पाडला होता..!

- मिलिंद पराडकर

लेखक: 

No comment

Leave a Response