Primary tabs

सोशल मिडिया आणि लग्न

share on:

 सोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे, 'आपल्याला बरंच माहीत आहे' हा आभास आणि त्याचा दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट 'अहं'ला जन्माला घालते आणि दुसरी अप्रामाणिकपणाला. नातेसंबंध टिकवताना-फुलवताना अहं आणि अप्रामाणिकपणा हे दोन सर्वात मोठे अडथळे असतात. त्याच गोष्टींना आपल्या सवयी खतपाणी घालणार असतील, तर यांना वेळीच पायबंद घालणं आवश्यक आहे, नाही का? कारण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे...

 

ध्यंतरी पेपरात एक बातमी होती. मोबाइलवर सेल्फी काढता काढता दोघी जणी समुद्रात पडल्या. त्यांना वाचवायला गेलेला एक जण आणि त्या दोघींपैकी एक असे दोघे बुडून दगावले. म्हणावं तर हास्यास्पद, म्हणावं तर चिंतास्पद अशी घटना ही. या सेल्फीचं फुटलेलं पेव इतकं आहे की लग्नातही यामुळे बेबनाव व्हायला लागलेत. सोशल मीडियाने आपलं विश्व एवढं वेगात एवढया पातळीवर व्यापलं असेल, याची कल्पनाही काही वर्षांपूर्वी आपल्याला करता आली नसती.

दरम्यान, मी एका लग्नाला गेले होते. तिथे वधू-वर, त्यांचे आई-वडील, लग्न सांगणारे गुरुजी या सर्वांपेक्षा फोटोग्राफरची जास्त हुकमत चालत होती. एखाद्या विधीच्या वेळी तो फोटोच्या दृष्टीने पोझ घ्यायला लावी. या सगळयात प्रचंड वेळ तर जात होताच, तसंच त्या मंगल कार्याचं मांगल्य संपून जात होतं. फेसबुकवर लग्नाचे चांगले फोटो टाकायचेत, त्यासाठी हा अट्टाहास चालला होता. दुसऱ्या एका लग्नात एक नवरा मुलगा सातत्याने मोबाइलवर फोटो काढून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया वेबसाइटवर टाकत होता. ते फोटो टाकण्याकडे आणि त्याला किती लाइक्स आले ते पाहण्याकडेच त्यांचं निम्मं लक्ष होतं.

स्वरूप आणि आभा यांचा किस्साही असाच. दोघे हनिमूनला गेले छान मॉरिशसला, तर तिथे दोघांनीच मस्त वेळ द्यावा एकमेकांना.. तर ते नाहीच. खाण्याची कोणतीही डिश समोर आली की आभा त्याचा फोटो फेसबुकवर अपलोड करणार. समुद्रकाठी मस्त सूर्यास्त बघत एकमेकांचा सहवास अनुभवण्याऐवजी फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची आभाची गडबड चालू होती. मग व्हायचं तेच झालं. दोघांमध्ये जोरदार भांडण झालं.

नेहा आणि तेजस मला भेटायला आले होते. या दोघांचंही भांडण झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. खरं तर त्यांच्या भांडणाचा विषय अगदीच हास्यास्पद होता. पण हसण्यावारी नेण्यासारखा मुळीच नाही. तर प्रसंग असा घडला होता की, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तेजसने नेहाला अतिशय रोमँटिक डिनरला नेलं होतं. साहजिकच नेहा अतिशय खुशीत होती. दुसऱ्या दिवशी ती ऑॅफिसमध्ये गेल्या गेल्या तिच्या मैत्रिणीने - आसावरीने ''कसं झालं डिनर?'' असं विचारलं. वास्तविक पाहता नेहाने या डिनरबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. तिला वाटत होतं, ही गोष्ट अगदी फक्त आपल्या दोघांची असावी. आणि मग तिला आसावरीकडूनच समजलं की काल हॉटेलमध्ये असताना तेजसने थेट फेसबुकवर 'डिनर डेट'विषयी लिहिलं होतं. ज्या गोष्टीला ती अगदी दोघांचंच स्पेशल असं समजत होती, त्याच गोष्टीला तेजसने चक्क ग्लोबल मंचावर जाहीर केलं होतं. झालं. मग यावरून त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं. 'माझे फोटो तू फेसबुकवर कधीच लाइक करत नाहीस. इतरांचे मात्र करतोस...' अगदी या पातळीपर्यंत त्यांचं भांडण झालं. त्या दिवशी ते दोघे एकमेकांशी बोलले नाहीत. मध्ये दोन-तीन दिवस गेले आणि मग एका सकाळी पुन्हा भडका उडाला. ''तो फोन आधी बाजूला ठेव पाहू. मी बसले आहे ना इथे...'' नेहा कडाडली. सकाळी सगळया कुटुंबाने एकत्र चहा प्यायला बसले असताना छान गप्पा मारायची तिची लहानपणापासूनची सवय. पण उठल्या उठल्या नवऱ्याने आपला मोबाइल उघडून फेसबुक आणि टि्वटर बघावं हे तिला साफ नामंजूर होतं. सतत मोबाइलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेला आपला नवरा बघून नेहाला राग येऊ लागला होता. अखेर आपली भांडणं खूपच होत आहेत असं जाणवून दोघे माझ्याकडे समुपदेशनासाठी आले होते.

दोघांनीही हे मान्य केलं की आपण एकमेकांना अधिक वेळ द्यायला हवा. मग यातून काहीतरी मार्ग काढायचं त्यांनी ठरवलं. अधिक चर्चा केल्यावर एकमेकांसाठीच्या वेळात दोघांनीही आपल्या मोबाइलला हात लावायचा नाही असा अलिखित करारच केला त्यांनी. गोष्ट वाटते तितकी सोपी नव्हती. सुरुवातीला केवळ तेजसच नाही, तर नेहालाही जड गेलं. कारण ती अगदी सतत मोबाइलमध्ये डोकं खुपसून सोशल मीडिया बघत बसणारी नसली, तरी अनेकदा ते दोघे एकत्र असताना तिच्या आईचा किंवा एखाद्या मैत्रिणीचा फोन हमखास यायचा. आता दोघांनी मिळून केलेला नियम लागू असल्याने दोघांनाही फोन घ्यायला मनाईच होती ना! त्या दोघांचं कौतुक असं की दोघांनीही हा केलेला करार कसोशीने पाळला. आता त्यांच्यातली भांडणंही कमी झाली आहेत. एकमेकांची स्पेस जपत, पण तरीही, आभासी दुनियेमधल्या व्यक्तींपेक्षा प्रत्यक्ष समोर असणाऱ्या जोडीदाराला अधिक महत्त्व देण्याची सवय दोघांनी लावून घेतली आहे.

गेल्या आठ-दहा वर्षांत इंटरनेटचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा झपाटा एवढा वाढला आहे की माझ्या पिढीतली कित्येक मंडळी चक्रावून जातात. अगदी आत्ताआत्ताची आठवण ताजी आहे, जेव्हा महिनोन्महिने नंबर लावल्यावर घरी फोन यायचा. पाच-पंचवीस घरांच्या बिल्डिंगमध्ये एकूण चार-पाचच फोन होते. पण हळूहळू मोबाइल फोन्स, इंटरनेट यांनी आपलं विश्व व्यापून टाकलं. आधी ऑॅर्कुट, मग हळूहळू ऑॅर्कुट बाद ठरून फेसबुक आणि टि्वटर यांनी त्यांची जागा घेतली. सोशल मीडियामधली ही स्थित्यंतरंही अगदी अलीकडची. प्रचंड वेगात घडणारी. मोबाइल फोन रंगीत स्क्रीनचा असणं आणि त्यावर एखादं गाणं रिंगटोन म्हणून ठेवणं ही मोबाइलमधली क़्रांती आहे असं वाटेपर्यंत टच स्क्रीन मोबाइल आलेदेखील आणि मग हाताहातात स्मार्ट फोन दिसायला लागले. इंटरनेट मोबाइलवरच आलं. हातातल्या मोबाइलवरून ईमेल्स बघता येऊ लागले, फेसबुकवर वेळ घालवता येऊ लागला, लिखाण करता येऊ लागलं, खेळता येऊ लागलं आणि अशा असंख्य गोष्टी... ज्यासाठी पूर्वी कॉम्प्युटर, वर्तमानपत्र, टीव्ही, वही-पेन या गोष्टींची गरज पडत होती, त्या सगळयाला मिळून एकच यंत्र हातात आलं - मोबाइल! आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर भरपूर वेळ घालवलात की मग त्या व्यक्तीची सवय होते, तसंच मोबाइलचं! हातात मावणाऱ्या या खेळण्याने आपल्या आयुष्याला अक्षरश: व्यापून टाकलं आहे.

मोबाइलची सवय ही व्यसनात कधी बदलते कळतही नाही. मी कित्येकांना उगीचच हातातला मोबाइल उघडून परत बंद करताना बघते. फोन किंवा मेसेज आला तर तो वाजणार असतोच. पण तरीही अस्वस्थपणे 'काही आलंय का?' असं बघणारे असंख्य आहेत. गंमतीचा भाग म्हणजे त्यांना स्वत:लाही कळत नाही की ते असं करत असतात. हा अस्वस्थपणा म्हणजे व्यसनच आहे एक प्रकारचं. शिवाय मोबाइल उघडून बघतात याचा अर्थ अनेकदा फेसबुक-टि्वटर उघडून बघतात. कारण सोशल मीडियाचीही सवय लागते, जी पटकन व्यसनात बदलू शकते. दिवसभरात फेसबुक उघडलं नाही, तर अस्वस्थपणा येणारे माझ्या ओळखीत आहेत. देशी दारू पिणाऱ्या माणसाने उंची परदेशी दारू घ्यायला सुरुवात केली, तर त्याचं दारूचं व्यसन सुटलं असं म्हटलं जात नाही, तसंच कालचं ऑॅर्कुटचं व्यसन आज फेसबुकमध्ये बदललं, आजचं फेसबुकचं व्यसन परवा टि्वटरमध्ये बदलेल, तेरवा आणखी काहीतरी आलं म्हणून व्यसन सुटलं.. असं होत नाही.

नात्यांच्या सदर्भाने हे सगळं विस्ताराने मांडायचा उद्देश हा की, सोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे, 'आपल्याला बरंच माहीत आहे' हा आभास आणि त्याचा दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट 'अहं'ला जन्माला घालते आणि दुसरी अप्रामाणिकपणाला. नातेसंबंध टिकवताना-फुलवताना अहं आणि अप्रामाणिकपणा हे दोन सर्वात मोठे अडथळे असतात. त्याच गोष्टींना आपल्या सवयी खतपाणी घालणार असतील, तर यांना वेळीच पायबंद घालणं आवश्यक आहे, नाही का? कारण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे... त्याच्या/तिच्यासोबतच तुम्हाला सुखी संसार करायचा आहे. फेसबुकवर 'लाइक' करणाऱ्यांसोबत नव्हे! या सगळया आधुनिक गोष्टींचा रेटा एवढा जबरदस्त आहे की व्यक्ती-व्यक्तीमधलं नातं फुलवण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्याला स्वत:लाच सातत्याने भानावर आणावं लागतं. अन्यथा आपण वाहवत इतके दूर जाऊ, की कदाचित त्या वेळी परतीचा मार्ग अधिकच कठीण बनलेला असेल. आणि म्हणूनच सातत्याने, दर थोडया कालावधीने या विषयावर वेगवेगळया मंचांवर चर्चा व्हायला हव्यात, मंथन व्हायला हवं. सोशल मीडिया आणि लग्न यामध्ये लग्नाला प्राधान्य द्यायला हवं, नाही का?

 

- गौरी कानिटकर

 

लेखक: 

No comment

Leave a Response