Primary tabs

तुझसे नाराज नहीं जिन्दगी

share on:

कुणाचेही आयुष्य सरळ नसतेच. असंख्य वळणावळणांचा रस्ता असतो तो. नको असलेले खड्डे, चढ-उतार, मनाची दमछाक करतात. मन गोंधळून जाते, रागावते, थकते, पण कुठेतरी मनाला मुरड घालून, कधी मदतीचा हात देऊन, कधी घेऊन वाट सरळ करत चालावी लागते. गुलजार लिखित हे गीत आपल्या सर्वांच्या मनाचेच प्रतिबिंब आहे.

लग्नानंतरचे दिवस म्हणजे स्वप्नझुल्यावरील हिंदोळा. परंपरेचा पगडा एवढा आहे की ठरवून केलेले लग्न असो किंवा प्रेमविवाह, अगदी अनोळखी व्यक्ती असेल, तरीही तो आता जन्माचा सोबती हे केवळ सात पावलांच्या सोबतीतच मन मानू लागते. जसजसे दिवस सरतात, तसे केवळ शरीर नाही, मन गुंतत जाते. वर्षे उलटतात, चार हाताचे सहा हात होतात. लग्न मानवते.

कधीतरी काहीतरी खटकते. संशयाचा जंतू वळवळतो. छे, असे शक्यच नाही असे म्हणून आपण उडवून लावतो. शरीराला आणि मनाला स्थिरतेची सवय झालेली असते. तरीही मनावर आलेली काळोखी जाता जात नाही. शेवटी धाडस करून, तळ दिसू नये असे मनातून वाटत असतानाही आपण तो गाठायचा प्रयत्न करतो आणि नको ते नजरेसमोर येते. प्रथम अविश्वास वाटावे असे ते, जेव्हा सत्याचे रूप घेऊन समोर उभे राहते, तेव्हा मात्र आतून पोखरून गेलेल्या खांबागत अवस्था होते. जोडीदाराची प्रतारणा आयुष्य उलटे पालटे करते.

लग्नानंतरची प्रतारणा हा नवीन विषय नाही. भारतीय संस्कृती निरपेक्ष प्रेम, विश्वास, प्रामाणिकता, एकनिष्ठा अशा मूल्यांवर जोर देते. त्यामुळे व्यभिचार हा दुर्दैवाने सामान्यांच्यासुध्दा कक्षेत आलेला विषय असूनही त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही.

हिंदी चित्रपटातसुध्दा ज्या संवेदनशील पध्दतीने हा विषय हाताळायला हवा, तसा हाताळला जात नाही. शेखर कपूर यांचा 'मासूम' हा चित्रपट मात्र सुखद अपवाद होता.

मासूम ह्या चित्रपटात एक सुखवस्तू, सुसंस्कृत, चौकोनी कुटुंब आहे. नवरा, डी.के. वास्तुशास्त्रज्ञ. दोन गुणी मुली, सुशिक्षित, सुसंस्कृत पत्नी इंदू आणि एक कुत्र्याचे गोंडस पिल्लू या घराची चौकट पूर्ण करतात. सुबत्तेच्या सोपानावर असलेल्या या घरात ट्रंक कॉल येतो आणि स्वप्नाचा इमला कोसळायला सुरुवात होते.

भावनाचे - डीकेच्या वर्गमैत्रिणीचे निधन झालेले असते आणि त्यांच्या मुलाची जबाबदारी आता डीकेने घ्यावी, असा फोनचा एकूण मथितार्थ असतो. कात्रीत सापडलेला डीके इंदूला एक असे सत्य सांगतो, जे दहा वर्षांपासून त्याने लपवलेले असते.

शाळेच्या रीयुनिअनमध्ये डीके भावनाला भेटतो. ती एकटी असते.. एका क्षणी मनावरचा ताबा सुटतो. एका रात्रीसाठी दोघे एकत्र येतात. त्यानंतर त्यांचा संपर्क नसतो. या रात्रीची आठवण असते डीके आणि भावना दोघांचा मुलगा राहुल. तिचे निधन झाल्याने मात्र सत्य असे उघडे पडते.

दहा वर्षांचा हसरा खेळता संसार भातुकलीच्या संसारासारखा खोटा ठरतो. त्यात तो मुलगा आणि डीके दोघांची जवळीक डीकेच्या पत्नीला नकोशी वाटते. तिला स्वत:ला मुलगा नाही हे शल्य आता जास्त जाणवायला लागते. मुलाचा दोष नाही हे कळण्याइतपत ती संवेदनशील आहे, पण त्याच्यात तिला त्याच्या आईचा चेहरा दिसतो आणि मग नवऱ्याचा व्यभिचार खुपतो. हा सर्व वांझोटा राग नवऱ्यावर आणि पर्यायाने मुलावर निघतो.

आतापर्यंत नवऱ्याने जे सांगितले, जे दर्शवले ते तरी खरे होते? त्याचे प्रेम, त्याने दाखवलेली स्वप्ने, त्याचा अंश असलेली दोन मुले, ती जर खरी असतील, तर मग ह्या मुलाचे त्याच्या आयुष्यातील स्थान काय?

 

तुझसे नाराज नहीं जिन्दगी, हैरान हूँ मैं

तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं।

 

त्या निरागस जिवाचा यात काहीही दोष नाही, हे जाणून आहे ती... 'तुझसे नाराज नही जिंदगी' हे त्याला उद्देशून नाहीच. तिच्या आयुष्याला आहे. सरळ रस्त्यावर चालताना आलेले हे वळण. घ्यायचे का? हा प्रश्न तितका साधा नाही. त्याने आयुष्यात जे बदल घडणार आहेत, त्याला तोंड द्यायची तिची तयारी नाही.

 

जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे

मुस्कुराये तो, मुस्कुराने के, कर्ज उतारने होंगे

मुस्कुराऊं  कभी तो लगता है, जैसे होठों पे कर्ज रखा है

 

स्वत:ची वेदना लपवून, अपमान पचवून माणसे जगतात. अगदी स्वत:पासूनसुध्दा ती लपवावीच लागतात, तरच आयुष्य सुसह्य होते. कोणत्याही गोष्टीची - अगदी ओठावरल्या हास्याची किंमतसुध्दा आयुष्य वसूल करते. हसण्याचीही किंमत चुकवावी लागत असेल, तर गोतावळयात असूनही माणूस एकाकी पडतो.

 

जिन्दगी तेरे गम ने हमें, रिश्ते नए समझाए

मिले जो हमें धूप में मिले, छाँव के ठण्डे साये

 

नात्यांची खरी ओळख दु:खातच होते. आपले कोण, परके कोण हेसुध्दा स्पष्ट उमजून येते. सुखाच्या प्रकाशात दडलेल्या अनेक गोष्टी दु:खाच्या अंधारात निरखता येतात.

गुलजारजींच्या 'पुखराज' या काव्यसंग्रहात एक नज्म आहे,

'अजीब है दर्द और तस्कीन का साँझा रिश्ता,

मिलेगी छाँव तो बस कहीं धूप में मिलेगी'

 

उन्हाच्या काहिलीत होरपळून निघतानाच सावलीचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.

माणसे आभासात जगतात. स्वप्नांत रमतात. त्यांची स्वत:ची छोटीशी चौकट असते. त्यात सुरक्षितता शोधतात.

ह्या समजुतीला लागलेला धक्का ही चौकट मोडतो आणि आयुष्याची गाडी रुळावरून घसरते. विश्वासघाताचा धक्का ही कोवळीक संपवून टाकतो. भावना मरतात, अश्रू आटतात.

 

आज अगर भर आई है, बूंदे बरस जाएगी

कल क्या पता किनके लिए, ऑंखें तरस जाएगी

ओ जाने कब गुम हुआ, कहाँ खोया,

इक आंसू छुपा के रखा था।

 

मासूम ह्या चित्रपटात हे गीत दोनदा येते. राहुलच्या निरागस प्रश्नांनी डीके अस्वस्थ होतो. त्या अबोध मुलाला त्याचे कारण समजत नाही. हा आपल्यावर तर रागावला नसेल ना? ही भीती त्याच्या मनात दाटून येते. त्याचे उत्तर म्हणून हे गीत पार्श्वभूमीवर वाजते.

डीकेकडून चूक तर झाली आहे, पण त्याची त्याला जाणीव आहे. स्वत:च्या कृत्याची लाजही आहे आणि तरीही एक वडील म्हणून या मुलावर त्याचे प्रेम आहे. पत्नी - संसार की आपला मुलगा याच्या कात्रीत सापडल्याने तो हताश झाला आहे.

खरे तर हे गीत फक्त इंदू आणि डीके यांचे नाही.

कुणाचेही आयुष्य सरळ नसतेच. असंख्य वळणावळणांचा रस्ता असतो तो. नको असलेले खड्डे, चढ-उतार, मनाची दमछाक करतात. मन गोंधळून जाते, रागावते, थकते, पण कुठेतरी मनाला मुरड घालून, कधी मदतीचा हात देऊन, कधी घेऊन वाट सरळ करत चालावी लागते. गुलजार लिखित हे गीत आपल्या सर्वांच्या मनाचेच प्रतिबिंब आहे.

- प्रिया प्रभुदेसाई

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response