Primary tabs

गीत रामायणगाणं १ - स्वयेश्री रामप्रभू ऐकती...

share on:

गीत रामायणगाणं १ - स्वयेश्री रामप्रभू ऐकती...

मराठी रसिकजनांच्या मनात मोरपिसासारखी जतन करून ठेवावी अशी एक अजरामर कलाकृती - "गीत रामायण". आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर आणि स्वरप्रभू बाबूजी अर्थातच सुधीर फडके यांच्या शब्द- सुर्व्युत्पत्तीमधून साकारलेली सुरांची मैफल म्हणजे गीत रामायण. संपूर्ण गीत रामायण सूरांच्या आणि शब्दांच्या सरितेत श्रोत्यांना चिंब भिजवत समाज, संस्कृती आणि संस्कार ह्या त्रिवेणी संगमावर आपल्याला कधी घेऊन जातात हे कळत नाही. शेकडोवेळा मी गीत रामायण ऐकत आलो आहे. मानवीय नात्यांच्या आणि मूल्यांच्या जितक्या खोल डोहात शिरायचा मी प्रयत्न केला तितकाच तळ अजून खोलवर आहे हे मला कळत आलंय.

जगातल्या अनेक वैश्विक आणि बोली भाषेत रामायणाचे अनुवाद झाले आहेत. मी देखील मराठी, इंग्रजी, हिंदी आणि बंगाली भाषेत काही संपूर्ण तर काही परिच्छेद अनुवाद म्हणून वाचले आहेत. त्यातून  गीत रामायण हे काव्य मनाच्या फार जवळ आहे, हे लक्षात येत गेलं. हे काव्य पूर्णतः फ्लॅश बॅकमध्ये चालतं. माझ्या मते गीत रामायणातील शेवटलं म्हणजे छप्पनावं गाणं म्हणजे खऱ्या गीत रामायणाची सुरुवात आहे. गा बाळांनो श्रीरामायण...इथून चक्र सुरू होतं.

आज ह्या काव्याउत्पत्तीचे मंगलाचरण म्हणजे गीत रामायणाचे प्रथम गीताचे विवेचन आपल्यासमोर मांडतो. 

श्री राम, श्री राम, श्री राम 

"स्वये श्रीरामप्रभु ऐकती

कुशलव रामायण गाती..." 

कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती बाबूजींनी ह्या काव्यातील मंगलाचारणाची सुरुवातच भूप रागाने केली आहे. भूप राग म्हणजे भक्ती रसात न्हाहलेला राग. कोणत्याही भक्तीरसातील काव्योउत्पत्तीला सुरुवात करण्यासाठी भूप रागाहून उत्तम राग नाही असं माझं मत आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी गाणाऱ्या रागाला बाबूजींनी मंगलाचारणाची जोड देऊन समस्त श्रोतृवृंदांवर भक्तिप्रधान गायिकेच्या बंदिशीने एक न खंडित होणारी मोहिनी घातली आहे. वरील चारी ओळींमध्ये शब्दांची विचारांची व्यापकता किती असावी हे आपल्याला पटतं. इवल्याशा दिव्याची मंद आचेवर पेटणारी इवलीशी ज्योत. त्या ज्योतीचे तेजोमय रूप म्हणजे प्रखर सूर्य! त्या ज्योतीने हिरण्यगर्भाची उपासना करण्याचा काळ म्हणजे हे मंगलाचरण गीत.. म्हणून गदिमा म्हणतात की ज्योतीने तेजाची आरती.. विचारांची व्यापकता काय आहे ह्य कडे मी आपले लक्ष केंद्रित करून इच्छितो.

राजस मुद्रा,

वेष मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे

वाल्मीकींच्या भाव मनीचे

मानवी रूपे आकारती.

काही शब्द दंतव्यं काही तालव्य तर काही ओष्टव्य असतात. ह्या व्याकरणातील प्रकाराच्या पलीकडे शब्दचित्राचे एक वेगळे विश्व आहे. गदिमांच्या शब्दचित्रांमार्फत संपूर्ण चित्र आपल्या समोर उभं राहतं. समोर श्रीरामाचा प्रासाद दिसू लागतो. समोर श्रीरामचंद्र बसले आहेत आणि त्यांच्यासमोर दोन्ही मुले रामचरित्र गायन करत आहेत. चेहऱ्यावर क्षत्रिय राजकुमाराचे प्रचुर तेज. वेष मुनीबालकांचे. ज्यांच्या गळ्यांत खुद्द सरस्वतीने सुरांचे शुभाशीर्वाद दिले असे ते तपोवनीचे गंधर्व. प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रती वाल्मिकींची भावना म्हणजे परमेश्वर आणि भाविकांची आहे.. हेच भाव वाल्मिकीने नेमकेपणाने लव-कुश यांच्या गाण्यातून आपल्याभोवती मांडले आहे. आपल्या मनातील भावना दुसऱ्यांच्या कृतीतून मांडणे किती अलौकिक आहे. 

ते प्रतिभेच्या आम्रवनातील

वसंत वैभव गाते कोकील

बालस्वरांनी करूनी किलबिल

गायनें ऋतुराजा भारिती 

एका कवीने आपल्या पंचेंद्रियांसोबत कलेची सहावी इंद्रिय फार तीक्ष्ण आणि उघडी ठेवायला हवी असं म्हणतात, मला असं वाटतं.  कविकुलगुरू कालिदास यांच्यानंतर उपमा देण्यासाठी कोणी अधिकृत साहित्यिक असेल तर ते गदिमा आहेत. आम्र वनराई ही प्रत्येक मौसमात बहरलेली असते, आम्रवनातील एकही वृक्षाला जर मोहोराचे संस्कार झाले तर त्यानंतर येणारे फळ म्हणजे एकूण घटनेची फलश्रुती असते. इतकी उच्च कोटीची प्रतिभा एका वृक्षाकडे आहे ह्या उपमेची सांगड गदिमा यांनी लवकुश यांच्याशी घातली आहे. दोन्ही कुमारांच्या प्रतिमांमध्ये त्या आम्रवनातील दर्जाच्या प्रतिभा आहे आणि नुसत्या प्रतिभा नसून त्या वसंतातील बहर आलेल्या मौसमाप्रमाणे बहरलेल्या आहे. कोकीळ ज्या मधुर स्वरांनी आपल्या भोवतालीचा परिसर सुरांनी उजळून टाकते त्याच प्रमाणे दोन्ही कुमारांचे बालस्वरांच्या गाण्याने समस्त ऋतूंचा राजा वसंत भारावून गेला आहे. ह्या ओव्यांना महत्त्व आली आहे, ती अतुलनीय उपमा आणि कवीचा निसर्गाकडे बघण्याच्या सौंदर्यदृष्टीमुळे.  

फुलापरी ते ओठ उमलती

सुगंधसे स्वर भुवनी झुलती

कर्णभूषणें कुंडल डुलती

संगती वीणा झंकारिती 

एक गायक ज्या वेळी सभेच्या केंद्रीय स्थानी गायला उभा ठाकतो त्या वेळी संपूर्ण सभेच्या नजरा त्यावर रोखलेल्या असतात. एक गुलाब हळूच लाजून अजूनच गुलाबी होऊन उमलणार असतं, आपल्या चारी बाजूला बघून तो आपली एक एक पाकळी हळूहळू सोलतो आणि त्यांच्या शृंगाराच्या त्या क्षणाने तो निसर्गाची कूस धन्य करतो. त्याच प्रमाणे लव-कुश आपल्या कोवळ्या गुलाबरास ओठांना हळूच हलण्याची चालना देतात आणि श्रीरामचंद्राच्या नावाचा स्पर्श ज्या वेळी प्रथमतः त्या ओठांना होतो त्या वेळी वातावरण भारावून जाते आणि त्या सुरमयी कौसल्ये नंदनाच्या नावाने तिथल्या माणसांसोबत तिथल्या वास्तू झुलू लागतात. वाऱ्यामध्ये त्या राजीव लोचनाच्या नावाचा कैफ असा पसरलेला असतो की त्या गीतांमुळे स्वतः लव - कुशदेखील डोलू लागतात. वेगळे वेगळे राग-ताना घेत असताना त्यांच्या कानातील रुद्राक्षजडीत कर्ण आभूषणे मंद मंद वाऱ्याच्या झुळकीमुळे डोलतात आहे. काय विलक्षण अनुभव आहे. स्वरप्रभू बाबूजी यांनी भूप रागात ह्या काव्याला फार अप्रतिम साज चढवला आहे, त्यातच ह्या ओळी गाताना बाबूजी त्यांच्या स्वरांना हळूहळू मंद वाऱ्याप्रमाणे डोलावतात... आठवा जरा बाबूजींचा आवाज.... कर्णभूषणे कुंडल डुलती... आसवे गाली ओघळती... (खास बाबूजी टच)... सोबत साथीला लवकुश यांच्या हातातील वीणा आपल्या मंजुळ सप्त तारकांनी श्रीरामाचे सुरभिषेक घालीत आहे... 

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी

नऊ रसांच्या, नऊ स्वरधुनी

यज्ञमंडपीं आल्या उतरूनी

संगमी श्रोतेजन नाहती 

कालिदासाच्या उर्वशी ह्या काव्यात स्वर्गातील अप्सरा धरेचे शृंगार रस बघण्यास आतुर झाल्या होत्या. त्या चक्क धरेवर उतरून शृंगाराच्या अमृताला आपल्या डोळ्यांत साठवण्यास आल्या होत्या नेमका तोच धागा धरून गदिमा म्हणतात की जानकीवल्लभाच्या चरित्रगायनाच्या शृंगारांनी तृप्त होण्यासाठी वीणावादिनीच्या वीणेतील सातही स्वर त्या हंसिनीच्या मुखकमलावरील नऊ रस स्वरांच्या राजणांमध्ये भिजून आले आहेत. सुरांच्या - रसांच्या आणि शृंगाराच्या ह्या संगीत सरितेच्या पवित्र अशा संगमतटावर येऊन श्रोतेजन चिंब भिजण्याचा धन्यता मानत आहे.   

पुरुषार्थाची चारी चौकट

त्यात पाहता निज जीवनपट

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट

प्रभुचे लोचन पाणावती.

राजारामाच्या आयुष्यातील चारी महत्त्वाचे टप्पे एक एक करून दोन्ही शैशव आपल्या अतुलनीय गायन कलेने  समस्त लोकांसमोर निरुपित करीत आहेत. आपल्याच आयुष्यातील निसटलेले क्षण पुन्हा ऐकताना एका तृप्तीची अनुभूती प्रभूरामचंद्राचा तेजस्वी मुखकमलावर स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रत्यक्ष सुकुमार मुलांचा पिता राजसिंहासनावर आरूढ आहे आणि समोर त्यांचीच मुलं पित्याचा जीवनपट उलगडून दाखवत आहेत. ह्या पिता पुत्राच्या अतिसंवेदनशील नात्याला गदिमांनी लेखणीतून आणि बाबूजींनी इतक्या सुंदर प्रकारे गायनाद्वारे खुलवून दाखवले आहे. दोन्ही तेजस्वी पुत्रांसमोर साक्षात अयोध्येचा राजा जो नात्याने त्यांचा पिता देखील आहे.. आसनारुढ आहे. तरी गायन प्रतिभेचे धनी असलेले दोन्ही बालके एक कलावंत म्हणून त्या राजाहून... त्या पित्याहून मोठे ठरले.... किती अलौकिक असा तो क्षण असावा.. काय सुंदर ओळ गदिमांनी चितारली आहे... प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट....  

शेवटल्या ओळीत जितेंद्रिय रामाची अवस्था झाली तीच अवस्था श्रोते म्हणून आपली देखील होते... प्रभुचे लोचन पाणावती... मुळात संपूर्ण रामायण मानवीय नात्यांच्या अवतीभवती फेर धरणारे काव्य आहे म्हणूनच ते महाकाव्य माणसांच्या दैनंदिन आयुष्याशी समरस झालेले आहे.

सामवेदसे बाळ बोलती

सर्गामागुन सर्ग चालती

सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती

आसवे गाली ओघळती 

सामवेद हा संगीत प्रधान वेद आहे.|| सामवेदश्च वेदानां यजुषां शतरुद्रीयम् || असं सामवेदाबद्दल म्हंटलं जातं. सामवेद ज्याप्रकारे संगीताने नटलेला आहे, सजलेला आहे; त्याप्रमाणे लव कुश रामचरित्राचं गायन सामवेदांच्या आधारे करतात. त्यांच्या गायनाने लुब्ध होऊन सचिव मुनिजन आणि स्त्रिया डोलतात आहे, श्री रामचरित्र गायनामुळे एकमेवाद्वितीय असा अनुभव ऐकताना आपसूक सगळ्यांच्या डोळ्यातून भावनांचा बांध फुटून आनंदाश्रूंनी अवघे वातावरण गहिवरून गेले आहे.   

सोडुनि आसन उठले राघव

उठुन कवळिती अपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव

परि तो उभया नच माहिती 

मंगलाचरणाच्या शेवटाकडे आपण आलेले आहोत. शब्दांचं प्रचंड लेणं असलेले गदिमा एक महाकवी म्हणून आपली ओळख इथे दाखवतात. आपल्या संपूर्ण जीवनाबद्दल इतकं सुंदर, सुरांना धरून दोन्ही वाल्मिकींच्या शिष्यांनी गाऊन दाखवले त्या सुरांच्या म्हणा किंवा आपल्या पुत्रांच्या म्हणा आकर्षणामुळे राजधर्माच्या नियमांना बगल देऊन खुद्द राजाराम उठले, सुकुमारांच्या जवळ जाऊन त्यांना आपल्या बाहुपाशात घेतलं. डोळ्यांमधून एकमेकांना प्रेमाचं वात्सल्य आनंदाश्रूमार्फत देण्याचा असा तो अवर्णनीय- तेजोमय क्षण होता. हाच महोत्सवाचा क्षण होता. पिता पुत्रांच्या मीलनाच्या महोत्सवाचा क्षण!! ते ही अशा वेळी जेंव्हा दोघांना हे नातं माहीत नसताना! गदिमांनी नात्यांच्या इतक्या संवेदनशील विषयाकडे आपल्याला विचार करायला भाग पाडलं आणि बाबूजींनी एक एक शब्दोच्चार- एक एक सूर ह्यात आपल्याला स्वर्गीय आनंद दिला आहे.. अशा अर्थाने गीत रामायणातील मंगलाचरण इथं संपतं... 

मृणाल जोशी

लेखक: 

No comment

Leave a Response