Primary tabs

मंगळ ग्रहावर उतरणार नासाचे पर्सीव्हरन्स रोव्हर  

share on:

आपल्या सूर्यमालेतील चवथा ग्रह आणि आकाराने पृथ्वीच्या साधारण अर्धा असणारा मंगळ हा ग्रह विविधतेने नटलेला आहे. परंतु मानवाची उत्कंठा जागरूक करण्यास एवढे एकच कारण पुरेसे नाही. मानवाने जेव्हा आपली अवकाश स्वारी सुरु केली तेव्हा मानवाला पडलेला मुलभूत प्रश्न म्हणजे ‘या विश्वात आपण एकटेच आहोत काय?’ हा होता. आपल्या अवकाश यानांच्या मदतीने मानवाने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु केला.

सूर्यमालेतील विविध घटकांसाठी विविध अंतराळ मोहिमा मानवाने यशस्वी करून दाखवल्या. यामध्ये प्रामुख्याने शुक्र ग्रहावर उतरवण्यात आलेले यान, ज्याने शुक्राचे फोटोज आपल्या पृथ्वीवर पाठवले. याच फोटोजचा अभ्यास करून शुक्र ग्रहाचा पृष्ठभाग कसा असावा आणि तिथले वातावरण कसे असावे ह्याचा अंदाज मानवाला मिळाला. जी गोष्ट शुक्र ग्रहाची तीच मंगळ या ग्रहाची. मंगळावर अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने अनेक याने पाठवली. ही सर्व याने प्रथमतः लँडर ह्या प्रकारची होती. या अवकाशयानांने मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटोज काढले आणि तिथल्या वातावरणाचा सुद्धा अभ्यास केला. या सर्व प्राथमिक अभ्यासावरून हे लक्षात आले की मंगळ हा ग्रह खऱ्या अर्थाने पृथ्वीचा लहान भाऊ असला पाहिजे. कारण मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान, तिथली माती, आणि इतर अनेक वैशिष्ठ्य ही पृथ्विसमानच होती. साहजिकच तिथून पुढील अनेक अवकाश मोहिमांचा कल हा मंगळ ग्रहाकडे जास्त झाला आणि मंगळ ग्रहावर अनेक मोहिमा आखल्या गेल्या. या सर्व मोहिमांमध्ये सर्वात महत्वाच्या चार मोहिमांचा उल्लेख करावा लागेल. या मोहिमा म्हणजे – पाथ फाईंडर, क्युरीऑसिटी, ऑपॅार्चूनीटी आणि स्पिरीट रोव्हर. या मोहिमांचे एक समान वैशिष्ठ्य म्हणजे या सर्व मोहिमांमध्ये एक लहान बग्गी सारखी गाडी होती. यान मंडळ ग्रहावर उतरल्यावर या यांमधून ही बग्गी बाहेर पडली आणि ती बग्गी ठरवलेल्या रस्त्याने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर मुक्त संचार करू लागली. या मोहिमांद्वारे मंगळ ग्रहाचा विस्तृत परिसर पालथा घालून, मंगळावरील विविध भूभागांचा अभ्यास करणे शक्य झाले. तसेच या यानांनी मंगळावरील वातावरणाचा सुद्धा सखोल अभ्यास केला. यातील काही महत्वाच्या नोंदी म्हणजे मंगळावर सापडलेले बर्फाचे अवशेष, तसेच मंगळावरील वातावरणात होणारी चक्रीवादळे, इत्यादि.

      मंगळाच्या भूभागाचा आणि एकंदरच मंगळाचा इतका विस्तृत अभ्यास केल्या नंतर आता नासाने एक मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे. तो प्रकल्प म्हणजे साधारण २०३० सालच्या सुमाराला मानवास मंगळावर उतरवणे ! या वेळी मानव मंगळावर नुसते पाउलच ठेवणार नाही तर २०३० च्या मोहिमेत मानव मंगळावर वस्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असेल. या सर्व बाबींचा अभ्यास म्हणून नासाने अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेली साधारण एका लहान चारचाकी गाडीच्या आकाराची एक बग्गी ही दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंगळ ग्रहावर उतरवण्याचे योजिले आहे. ही बग्गी म्हणजे चाकांवरील हलती फिरती एक अतिशय प्रगत अशी प्रयोगशाळाच आहे. या गाडी ला एक रोबोट हात आहे जो मंगळावरील माती मध्ये खोदकाम करेल आणि तिथल्या मातीचे नमुने अभ्यासेल. तसेच तिथले वातावरण, बर्फ , पाणी यांचे सुद्धा अवशेष शोधण्याचा ही बग्गी प्रयत्न करेल. या यानाने ३० जुलै २०२० साली अवकाशात उड्डाण केले आणि साधारण ८ महिन्यांचा प्रवास करून हे यान १८ फेब्रुवारी ला मंगळावर उतरेल. या यांचे उतरण्याचे ठिकाण हे जेझेरो विवर असे निश्चित करण्यात आलेले आहे. या विवराच्या परिसरात ही बग्गी उतरवण्यात येईल. या बग्गीची खासियत म्हणजे यावर अनेक कॅमेरे, २ मायक्रोफोन आणि एक लहान असे हेलीकॉप्टर आहे. या मोहिमेचे मुख्य उद्देश हा  मंगळ ग्रहावर वस्तीच्या दृष्टीने माहिती गोळा करणे, मंगळावर जीवसृष्टीचे अवशेष शोधणे, दगड आणि मातीचे नमुने गोळा करणे आणि मंगळावर ऑक्सिजन तयार करण्याचा प्रयत्न करणे असा आहे. या यानाचे मंगळावर उतरतानाचे थेट प्रक्षेपण आपण युट्यूब अथवा नासाच्या अधिकृत वेबसाईट वर पाहू शकाल. मंगळग्रहाविषयी आपल्या ज्ञानात ही मोहीम नक्कीच भर पाडेल तसेच मंगळावर मानवाच्या जाण्यासाठी योग्य अभ्यास सुद्धा ही मोहीम नक्की समोर आणेल आणि मानवाला मंगळ मोहिमेसाठी तयार करेल हे नक्की!

--अक्षय भिडे

8087690365

लेखक: 

No comment

Leave a Response