Primary tabs

वर्णभेद संघर्षाचा आरसा - 'इन द हीट ऑफ द नाइट

share on:

'इन द हीट ऑफ द नाइट'मधला संघर्ष हा केवळ वर्णभेदाचा संघर्ष नाही, हा ‘आहे रे’ व ‘नाही रे’ यांच्यातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विषमतेचा संघर्ष आहे. याला देशाची सीमा नाही. हा नष्ट करण्यासाठी सहिष्णुतेची कास अधिक नेटाने धरावी लागेल, हा या चित्रपटाचा संदेश आहे.

पश्चिम युरोपमधून गोऱ्यांनी अमेरिकेत प्रथम स्थलांतर केल्यानंतर अमेरिकेतील मूळच्या स्थानिकांबरोबर संघर्ष करून वर्चस्व स्थापन केले. पुढे देशोदेशीच्या नागरिकांनी प्रगतीसाठी या देशात धाव घेतली. अमेरिकेने सर्वांना सामावून घेतले असे दिसत असले, तरीही आफ्रिकीवंशीयांना मात्र अमेरिकेत समतेसाठी मोठाच संघर्ष करावा लागला. सर्वप्रथम ब्रिटिशांनी व्हर्जिनियामध्ये आफ्रिकेतून माणसे आणली. ही माणसे वर्णाने आणि शरीराच्या ठेवणीने श्वेतवर्णीयांपेक्षा भिन्न. कृष्णवर्णीय उर्फ निग्रो हे गुलाम बनण्यासाठीच जन्माला येतात, असा भयंकर समज पसरवला गेला. त्यातूनच श्वेत आणि कृष्णवर्णीय यांच्यातील संघर्ष विकोपाला पोहोचला. १८६५ साली अब्राहम लिंकन यांनी गुलामी नष्ट करण्यासाठीचे स्तुत्य पाऊल उचलले. कायद्याने अमेरिकेतील गुलामी नष्ट झाली. समाजजीवनातील वंशवर्णभेद दूर व्हावा यासाठी विविध पातळ्यांवर नंतर बरेच प्रयत्न झाले. १९६४मध्ये अमेरिकेत नागरी हक्क कायदा अस्तित्वात आला. आफ्रिकीवंशीयांचे लढायचे दिवस संपले, पण अमेरिकेतील समाजजीवनात अजूनही श्वेतवर्णीयांचाच प्रभाव आहे. आफ्रिकी-अमेरिकन नागरिकांकडे कायमच अविश्वासाच्या नजरेतून बघितले जाते. अनेकानेक घटनांमध्ये त्यांच्यासाठी कडक शिक्षेचा अवलंब करण्यात येतो. कृष्णवर्णीयांत गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा असा संदेश अमेरिकेतील समाजजीवनात कळत नकळत दिला जात असतो.
वर्णभेद, वर्गभेद तसाही जगाच्या कानाकोपऱ्यात असतोच. कधी उघड, कधी सुप्त. स्थित्यंतराची प्रक्रिया मात्र चालू असते. या सर्वांचे वास्तव दर्शन घडवणारा चित्रपट होता १९६७मध्ये सर्वोत्कृष्ट अकॅडमी पुरस्काराने गौरवला गेलेला 'इन द हीट ऑफ द नाइट'. या चित्रपटाचे पोस्टरवरील थीम वाक्य होते, "या पोलिसाच्या वर्दीवर कदाचित एका सन्मानाचे मेडल लागेल, नाहीतर एका खुनाचा डाग."

चित्रपटाची सुरुवात होते मिसिसिपी राज्यातील स्पार्टा ह्या शहरात. दिवस - १३ सप्टेंबर १९६६. मध्यरात्री, भर रस्त्यात एका धनवान उद्योगपतीचा (फिलिप कॉलबर्टचा) खून होतो. बलदंड, च्युइंग गम चघळणारा, लालबुंद मानेचा शेरीफ गिलेस्पी (रॉड स्टिगर) तपासावर लक्ष ठेवून आहे. मृत शरीराजवळ ना ओळखपत्र आहे, ना पैशाचे पाकीट. या खुनाचे कुणी साक्षीदारही नाहीत. पैशासाठी खून झाला असावा अशी अटकळ बांधली जाते आणि खुन्याला शोधायची मोहीम सुरू होते.
 
आता कॅमेरा दुसरीकडे स्थिरावतो. स्थळ - रेल्वे स्टेशन. मध्यरात्र उलटून गेली आहे. निर्मनुष्य फलाटावर एक प्रवासी एकटाच बसलाय. गस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे त्याच्याकडे लक्ष जाते. ही व्यक्ती दिसण्यात सभ्य आहे. शांतपणे आपल्याच विचारात बेंचवर बसून गाडीची वाट पाहत आहे. संशय वाटावा असे या व्यक्तिमत्त्वात काहीही नाही. पण हा माणूस कृष्णवर्णीय आहे. “काहीही हालचाल न करता उभे राहा.“ अचानक ऑर्डर सोडली जाते. आपल्याला एखाद्या भुरट्या चोरासारखे वागवले जातेय ह्याचा धक्का बसतो खरा, पण काहीही प्रतिक्रिया न दर्शवता तो उभा राहतो. त्याची झडती घेताना त्याच्या जवळच्या पाकिटात भरपूर नोटा सापडतात. एक काळा माणूस एवढे पैसे कसे बाळगू शकतो! आता संशयाची सुई या व्यक्तीवर स्थिरावते. कसलीही चौकशी न करता मुख्य संशयित म्हणून याला पोलीस स्टेशनवर आणले जाते. त्याची कसून चौकशी केली जाते. मिळालेल्या पैशाचे स्पष्टीकरण देत असूनही, केवळ त्याच्या रंगामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही. शेवटी निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी ही व्यक्ती आपले ओळखपत्र दाखवते. ही व्यक्ती असते व्हर्जिल टिब्स (सिडने पॉयशर). फिलाडेल्फियामध्ये काम करणारा एका हुशार पोलीस अधिकारी.

शेरीफ येथील पोलीस स्टेशनला फोन करून खात्री पटवून घेतो आणि नाइलाजाने खुनाचा तपास लावण्यासाठी त्याची मदतसुद्धा घ्यायला तयार होतो. टिब्स आपल्याहून अनुभवी आणि चलाख आहे हे गिलेस्पी जाणून आहे, पण गोरेपणाचा अहंकार हे कबूल कसे करणार! “गोऱ्यांचे नाक कापायची संधी तू कशी काय सोडशील?" अशा तिरकस शब्दात तो टिब्सला आव्हान देतो.
इथे मृत शरीराचे पोस्ट मॉर्टेम करतानाच, टिब्सची अनुभवी नजर डॉक्टरांच्या नजरेतून सुटलेल्या अनेक गोष्टींची नोंद घेते. तेवढ्यात एक माणूस पळून जात असल्याची खबर गिलेस्पीला मिळते. आता पाठलाग सुरू होतो. पकडलेला माणूस असतो एक भुरटा चोर, हार्वी. दुर्दैवाने त्याच्याकडे मृत माणसाचे पैशाचे पाकीट सापडते. “मी खून केलेला नाही. खून आधीच झालेला होता, शेजारी पाकीट पडलेले होते, ते मी उचलले.” हार्वी कळवळून सांगतो, पण कुणाचाही विश्वास बसत नाही.

केलेल्या तपासणीत ज्या गोष्टी टिब्सच्या लक्षात आलेल्या असतात, त्यावरून हा खून हार्वीने केलेला नाही हे टिब्स सिद्ध करतो. टिब्सची हुशारी आता मात्र गिलेप्सीच्या लक्षात येते. याच वेळी मृत माणसाची विधवा टिब्सला ही केस न सोडण्याची विनंती करते. जर ही केस टिब्सच्या हातातून काढली, तर येथील कारखान्यातून आपली गुंतवणूक काढायची धमकी देते. परिस्थितीच अशी असते की श्वेतवर्णीय शेरीफला टिब्सबरोबर काम करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. त्याच्या हतबलतेला व्यवस्थित ओळखून असलेला टिब्स याचे वर्णन करताना म्हणतो, “इथे घडलेल्या गुन्ह्याची जबाबदारी कुणावर टाकावी हे समजत नसल्याने त्यांना फक्त बळीचा बकरा हवा आहे.“
 
आतापर्यंत उन्हे डोक्यावर येतात. शहराच्या नगरसेवकांची बैठक बसते. एक काळा माणूस ही केस हाताळतो आहे ही बातमी पोहोचलेली असते. लोक साशंक असतात. हा टिकणार नाही, कदाचित मारला जाईल अशी अभद्र शंका एक नगरसेवक बोलून दाखवतो. टिब्स मात्र आपली चौकशी चालू ठेवतो. त्याला समजते की कोलबर्ट खुनाच्या रात्री हॉटेलमधून अकरा वाजता बाहेर पडला होता. त्याच्या गाडीच्या पाठच्या सीटवर रक्ताचे डाग मिळतात. ब्रेकवर चिखलाचे डाग असतात आणि काही झाडांची मुळे सापडतात. श्रीमती कोलबर्टशी बोलल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतात. तिच्या नवऱ्याच्या विरोधात असलेल्या उद्धट, वर्णद्वेषी, प्रतिगामी, एरिक एंडीकॉट या कापसाची लागवड करणाऱ्या धनिक शेतकऱ्याची टिब्सला माहिती मिळते. याच्या शेतात काम करणारे सर्व मजूर कृष्णवर्णीय. समानतेचा कायदा येऊनसुद्धा जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, जोपर्यंत कायदा माणसाच्या संवेदनशीलतेची नीती बनत नाही, तोपर्यंत कायदा कधीही सर्वार्थाने लोकाभिमुख होतच नाही, याचे दर्शन एंडीकॉट या व्यक्तिरेखेत होते. काही पुरावे विरोधात गेले, तरीही आपल्याकडे चौकशी करण्यासाठी एक 'काळा' पोलीस अधिकारी येतो हे एंडीकॉटला सहन होत नाही. तो टिब्सला जीवे मारण्याची धमकी देतो, त्याच्या थोबाडीत मारतो. ह्यानंतर जे घडते, ते मात्र अनपेक्षित असते. आतापर्यंत स्वतःवर ठेवलेला संयम झुगारून टिब्स एंडीकॉटला जशास तसे उत्तर देतो. हे दृश्य केवळ तिथल्या निग्रो नोकरांना आणि प्रत्यक्ष गिलेस्पीलाच हादरवत नाही, तर पडद्यावर पाहताना आपलाही ठोका चुकतो, एवढे जिवंत वठले आहे.
एक गोष्ट नमूद करते - एंडीकॉट हा खुनी नाही, पण ह्या उद्धट माणसाबद्दल टिब्सलासुद्धा आकस आहे. गोऱ्यांबद्दलच त्याला अविश्वास आहे, पूर्वग्रह आहे, एक खदखदत असलेला संतापही आहे. नवल नाही की गिलेस्पी त्याच्यावर आरोप करताना म्हणतो, “तू काही आमच्यापेक्षा वेगळा नाहीस, आमच्याबद्दल असलेला पूर्वग्रह तुझ्याही नजरेत दिसतो आहेच.”
 
शहरात हा किस्सा गाजतो. टिब्सकडून अधिकार काढून घेण्यासाठी शेरीफवर दबाव आणला जातो. टिब्सवर शहरातल्या गुंडांकडून हल्ला होतो. शेरीफ टिब्सच्या मदतीला जातो, पण त्याला शहर सोडून जाण्याची धमकीवजा सूचना देतो. अर्थात टिब्स जायला नकार देतो. काही वेगळे पुरावे नजरेस येतात. शेरीफचा सहकारी सॅम वूड यांनी खुनाच्या दुसऱ्याच दिवशी बँकेत खूप मोठ्या रकमेचा भरणा केलेला असतो. ही रक्कम नक्की कुठून येते हे कोडे असते. त्याच वेळी सॅमवर एका सोळा वर्षाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केल्याचा आरोप ठेवला जातो. हा आरोप करणारा असतो पार्डी, ह्या मुलीचा भाऊ. गिलेस्पी जरी सॅमला अटक करतो, तरी टिब्स ह्या मुलीची खोदून चौकशी करतो. चौकशीत राल्फ नावाच्या एका माणसाचे नाव बाहेर येते. सॅम वूडची निर्दोष सुटका होते आणि या मुलीचे ऍबॉर्शन करण्यासाठी पैसे हवे असल्याने, राल्फकडून हा खून झाल्याचे टिब्सला समजते. खुनाचे कोडे उलगडते.

चित्रपटाची पार्श्वभूमी आणि विषय जरी एका खुनाची कथा असली, तरीही दोन व्यक्तिरेखांच्या मनात एकमेकांविषयी असलेला आकस, संशय, अविश्वास पूर्ण चित्रपटभर प्रेक्षकाला अस्वस्थ करतो. जगभरात अमेरिका मानवी हक्कांसाठी या ना त्या देशात काम करते. पण अमेरिकेमधील वर्णभेद, वंशभेद संपला आहे का? वर्णभेदाला गरिबीचाही शाप असल्याने ही बाब अधिकच गुंतागुंतीची बनलेली आहे. या चित्रपटात टिब्सचा हुद्दा वरचा आहे. त्याला मिळणारे वेतनसुद्धा श्वेतवर्णीय शेरीफपेक्षा तिपटीने जास्त आहे. ह्याचाही संताप आणि सूक्ष्म मत्सर शेरीफच्या वागण्यात दिसतोच. टिब्सची हुशारी वादातीत असूनही, ते मान्य असूनही, येथील बहुसंख्य लोक केवळ त्याच्या रंगामुळे त्याच्या विरुद्ध आहेत, येथे त्याच्या जिवाला धोका आहे हे थरकाप उडवणारे वास्तवसुद्धा सुजाण प्रेक्षकाला खटकते.
 
काही गोष्टी मुद्दाम घडल्या का घडवल्या गेल्या हे समजत नाही, पण अप्रतिम भूमिका साकारूनसुद्धा सिडने पॉयशरला अकॅडमी पारितोषिकासाठी नॉमिनेशनसुद्धा मिळाले नाही. अर्थात रॉड स्टिगरने गिलेस्पीच्या बाबतीत कमाल केली आहे. भरभर बोलणारा, सतत च्युइंग गम चघळणारा, कृष्णवर्णीय टिब्सचा अपमान करायची संधी न सोडणारा, तरीही तो आपल्या वरचढ ठरेल याची भीती बाळगणारा आणि नंतर त्याचे कर्तृत्व मनापासून मानून, नंतर त्याला प्रेमाने निरोप देणारा गिलेस्पी त्यांनी अतिशय अप्रतिम साकार केला. या वर्षीच्या उत्कृष्ट अभिनयाचे ऑस्कर रॉड स्टिगरच्या नावावर जमा झाले.
 
'इन द हीट ऑफ द नाइट'मधला संघर्ष हा केवळ वर्णभेदाचा संघर्ष नाही, हा ‘आहे रे’ व ‘नाही रे’ यांच्यातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विषमतेचा संघर्ष आहे. याला देशाची सीमा नाही. हा नष्ट करण्यासाठी सहिष्णुतेची कास अधिक नेटाने धरावी लागेल, हा या चित्रपटाचा संदेश आहे.

 

- प्रिया प्रभुदेसाई 

लेखक: 

No comment

Leave a Response