Primary tabs

क्षण तो क्षणात गेला....

share on:

क्षण एकच असतो आणि तोही एका क्षणासाठीच आलेला असतो. असं असताना त्या एकाच क्षणाचा अगदी एका क्षणात विचका करणारे 'विघ्नसंतोषी' लोक आपल्या आजूबाजूला हमखास वावरत असतात. कधी कधी त्यांना टाळता येतं. मात्र, प्रत्येक वेळी ते जमेल असं नाही. कारण अगदी हटकून यांच्यापैकी एखादा नातेवाईक असतो किंवा मित्रांच्या वर्तुळातील किंवा सहकारी मंडळींच्या टोळीतला किंवा  अगदी तुमच्या कार्यालयातील 'साहेब' लोकांपैकी एखादं व्यक्तिमत्व! अशा वेळी काय करणार! कोण आणि काय बोलणार! त्यामुळे दरवेळी होणारा विचका, मूड ऑफ, निमूटपणे सहन करावा लागतो... 

 

उदाहरणार्थ काही प्रसंग बघू... 

 

प्रसंग क्र. १ -

एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला मस्त भरपेट जेवण झाल्यावर निवांत वामकुक्षीही झालीये. घरातील सगळे गप्पांमध्ये रंगले. लहानपणीच्या आठवणी निघताहेत. चेष्टा-मस्करी वगैरे सुरू आहे. एखादा पुरुष कार्यकर्ता उत्साहाने म्हणतो, 'मी करतो सर्वांसाठी चहा..' त्यावर दोन-चार जणं 'हो, चालेल.. बघू बरं जमतो का ते..' असं म्हणत पाठिंबाही देतात! आणि त्याच क्षणी भासकन त्या घरातली कोणीतरी व्यक्ती चहा उतू जावा तशी किंचाळते, 'नको, मागच्या वेळी केला, तेव्हा केवढा केला होता.. नंतर फेकावा लागला...' किंवा 'नको, मागच्या वेळी सगळा उतू गेला. मग गॅस मीच साफ केला...' वगैरे वगैरे. पुरुष कार्यकर्ता निमूटपणे खाली बसतो.

 

प्रसंग क्र. २- 

ऑफिसमध्ये काम करून ढेपाळलेले असतात लोक. कोणीतरी विचारतं, 'चला, जरा पाय मोकळे करून येऊ या का?' बहुमताने हा ठराव पासही होतो आणि तेवढ्यात कोणी तरी 'सीनियर' त्याची अक्कल पाजळत बोलतोच, की 'कशाला बाहेर जाताय... इथेच दोन गाणी ऐका. बरं वाटेल...' आणि हा स्वत: नुकताच बाहेर फिरून आलेला असतो. 

 

प्रसंग क्र. ३- 

'आज माझा वाढदिवसय. आज मी हा ड्रेस घालू?' चिमुरडा उत्साहात विचारत असतो. 'समजुतदार' म्हणवणारा बाप म्हणतो, 'नाही... नाही... तो आपण आणलाय न एवढा छान नवीन विकत. तोच घाल...' पोरगं भोकाड पसरतं. 

 

प्रसंग क्र. ४- 

पोरं पार्किंगमध्ये खेळत असतात आणि त्यांच्या आया समोर बाकड्यावर गप्पा हाणत असतात. मध्येच एखादं कार्ट पडतं. त्याची आई त्याला उचलायचं सोडून... काय-कुठे लागलं हे विचारायचं सोडून तिथूनच सुरू करते... 'तरी, मी सांगत होते... इथे खेळू नकोस.. पडलास न... जा पळ अजून... वगैरे वगैरे...'

 

प्रसंग क्र. ५- 

त्याला कधीपासून खूप मनातलं तिला सांगायचं असतं. एक दिवस शांतपणे तो सगळं खरं खरं सांगतो. कानात शिसाचा रस ओतावा, तसं ती म्हणते, 'हे बघ, मला प्रेम वगैरे काही वाटू शकत नाही. तू माझा मित्र आहेस......' वगैरे वगैरे

 

ही काही प्रातिनिधिक उदाहरणे झाली. आता शांतपणे विचार केला तर, लक्षात येतं की या सर्व प्रसंगांमध्ये त्या-त्या वेळी ते लोक जसे 'रिॲक्ट' झाले ते साहजिक नव्हतं का? अर्थातच होतं! मग त्यांचं काय चुकलं? तर त्यांचं हे चुकलं, की 'त्या' वेळी, त्या क्षणाला 'तसं' सोडून वागता-बोलता आलं असतं. म्हणजे... चहा ठेवण्यास उत्सुक असणाऱ्याचा अपमान करण्यापेक्षा आत जाऊन त्याला मदत करता आली असती किंवा तशी कल्पना देता आली असती. 'आता हा ड्रेस घाल. संध्याकाळी नवा घाल...' अशी लहान बाळाची समजूत काढता आलीच असती. मुलाला काय आणि किती लागलंय ते बघून, त्यावर औषधोपचार करून मग त्याची चूक काय, हे सांगणं अधिक इष्ट होतं. तिने त्याचं म्हणणं समजून घेऊन, त्यावर विचार करून मग स्वत:चं मत दिलं असतं, तर आभाळ कोसळलं नसतं. 

 

तात्पर्य, हे आहे की 'क्षण' एकच असतो. त्याचा सोहळा करण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी. फुलं एका क्षणी कोमेजतात. अत्तरिया त्या क्षणाचं अत्तर करतो... पुजारी निर्माल्य आणि झाडुवाला कचरा..! आपण काय करतो, ते आपण ठरवायला हवं. व. पु. काळे यांचं फार सुंदर वाक्य देण्याचा मोह इथे होतोय. ते म्हणतात, 'विजेला धरतीचा मोह झाला, की त्याच क्षणी ती आकाशाचा त्याग करते.' असं का होतं? कारण तिला माहितीये, क्षण एकच असतो आणि तो क्षणात जातो. 

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 

"शत जन्म शोधिताना, शत आर्ती व्यर्थ झाल्या

शत सूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या...."

असं म्हटलं. संन्यस्तखड्ग नाटकातली वीरपत्नी तिच्या पतीची वाट बघताना त्या वेळेचं वर्णन करताना हे म्हणते आहे. ती सांगते, की तो विरहाचा कालावधी 'शतजन्म' एवढा वाटतो. मात्र, यानंतर एका क्षणी जेव्हा तो भेटतो, तेव्हा तो क्षण मात्र अवघ्या एकाच क्षणात जातोसुद्धा... 

म्हणूनच पुढे ओळ आली... 

'क्षण तो क्षणात गेला.... सखी हातचा सुटोनी' 

 

'शतजन्म' नाही; पण एकाच जन्मात पुन्हा पुन्हा येणार नाही, असे अनेक क्षण आपल्याही आयुष्यात येतातच. आपण त्या क्षणबिंदूची 'रांगोळी' करतो, की 'राखरांगोळी', याचा विचार ज्याने-त्याने करावा....!

 

- मयूर भावे. 

९५५२४१६४५९

mayurbhave28@gamil.com

लेखक: 

No comment

Leave a Response