Primary tabs

उगा कां काळीज माझे उले : मृणाल जोशी

share on:

उगा कां काळीज माझे उले ?
पाहुनी वेलीवरची फुले 

 

गदिमांनी केलेल्या काव्याचा अद्भुत शब्दविष्काराला बाबूजींनी हिंदुस्थानी रागांमध्ये बंदिस्त केले आहे. एका आईचं हृदय संतती नाही म्ह्णून पिळवटून निघतंय ह्या राणी कौसल्येच्या भावनेला गदिमांनी इतक्या अलवार नाजूक पद्धतीने मांडलं आहे, ज्याला खरोखर तोड नाही. आई मुलांचं नातं हे फार खास असतं त्यात भावनेची प्रगाढता असते व्यापकता असते, त्याचसोबत एक खोली देखील असते. नेमका हाच धागा धरत बाबूजींनी ह्या गीताला "मिश्र काफी" रागात ओवलं आहे. होरी, टप्पा दादरा, कीर्तन, भजनाचे प्रकार म्हणजे मिश्र काफीची ठळक उदाहरणे. मुळात लोकसंगीताचा वारसा लाभलेला हा राग श्रीपाद कृष्णराव कोल्हटकरांनी 'उगीच गं कांता' मध्ये साक्षात उभा केला आहे. 'शब्दवाचून कळले सारे' आणि 'झाला महार पंढरीनाथ' हे देखील ह्याच पठडीतले गीते!! मिश्र काफीमध्ये सोज्वळ कौसल्येचं दुःख किती प्रखर आहे हे आपल्याला गाण्यातील प्रत्येक ओळ ऐकताना जाणवतं. संपूर्ण निसर्गात स्त्रीचं वात्सल्य, ममत्व भरून राहिलेलं असताना कौसल्येच्या घरात पाळणा हळू नये? कौसल्येचा प्रश्न गदिमा मांडतात की - चहूबाजूला निसर्ग आपल्या स्त्री तत्त्वाने सगळीकडे चैतन्य पसरवीत असताना माझी कांती अशी मालिन का? फुलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. भोवताली फुलणाऱ्या फुलांनी सर्वांचं मन कसं आनंददायी होऊन जातं. मनामध्ये आनंदलहरी निर्माण होतात आणि मोठं आल्हादायक वाटतं. हे सगळं माझ्या वाट्याला का येऊ नये? इतकी का मी रुक्ष? निसर्गात जिकडे बघते तिकडे प्रत्येक जीवसृष्टीत मातृत्व दिसून येतंय. मात्र त्या नियंत्याने कटाक्षाने मला ह्या साऱ्या सुखापासून मैलोनमैल लांब का ठेवावे ह्या प्रश्नाने माझं हृदय आतल्या आत फाटून जाईल असाच सारखा भास होतोय.

 

कधी नव्हे ते मळले अंतर 
कधी न शिवला सवतीमत्सर 
आज का लतिकावैभव सले ?

 

कौसल्येचा मनातली मातृत्वाची हुरहूर गदिमांनी तंतोतंत मांडली आहे. एका स्त्रीची मानसिक अवस्था आणि तिची चलबिचल अधोरेखित करत गदिमा पुढे वर्णन करतात की आजपर्यंत कौसल्येचा मनात कधीही कोणाच्या प्रति द्वेषभाव उमटला नाही. दोन्हीही राण्यांप्रती सवतींसाठी असतो असा मद-मत्सर कधी ही ठेवला नाही त्याचप्रमाणे कैकयी आणि सुमित्रेप्रती असूयेला मनात क्षणभरासाठी ही थारा दिला नाही. ह्या उलट त्या माझ्या धाकट्या भगिनी आहे हाच भाव माझ्या मनात त्यांच्या प्रति मी जपत आले आहे. महाराजांच्या चरणांशी कायम बांधील राहिले. इतकं सगळं असून आज माझ्या मनामध्ये विषाद का निर्माण होत आहे? आज सगळे राज वैभव मलाच का सलत आहे. माझ्या प्रासादाच्या भिंतींवर, गवाक्षांवर छोटी छोटी वेली मातृत्वाच्या संस्कारांचं लेणं लेऊन हिरव्या गाssssर होऊन बहरल्या आहे, त्या वेलींवर इवल्या इवल्याश्या कळ्या उमलल्या आहे. कधी तरी त्या कळ्यांचं रूपांतरण एक सुंदरश्या नाजुकश्या रंगीत मखमली फुलांमध्ये  होणार आहेच ह्या आत्मिक सुखाने त्या लघुवेली किती नखरेलपणाने त्या गवाक्षांतून लपून छपून माझ्याकडे बघतायेत... त्यांच्या नजरेला नजर देण्या इतपत धीर माझ्याकडे नाही. त्या वेलींच्या पानांवरच्या मातृत्वाच्या वैभवासमोर माझे राजविलासिय वैभव किती अल्प आणि क्षुद्र भासतायेत.          

 

काय मना हे भलते धाडस ?
तुला नावडे हरिणी पाडस 
पापणी वृथा भिजे का अले ?

 

वनक्रीडा हे स्त्रियांच्या रममाण होण्याचे महत्त्वाचे साधन आहे ह्याकडे गदिमा आपलं लक्ष केंद्रित करतात. त्या वनक्रीडेमध्ये समोर टेकडीवर अनेक श्वापदे पळताना दिसतायेत त्या श्वापदांमागे त्यांचे इवलेशे पावलं सांभाळत त्यांची पिल्ले इकडून तिकडे अडखळत आपल्या मातांच्या जवळ घिरट्या घालताना दिसतायेत. आजपर्यंत अनेकवेळा ह्या वनक्रीडेच्या खेळासाठी महाराज दशरथांसोबत आपण ह्या काननी आलो. कैक वेळा आपण त्यांच्या श्वापदीय क्रीडा बघण्यात इतके रममाण झालो की आपल्या महालाकडे परतायची आपल्याला विस्मृती झाली. हे सगळं बघितल्यावर आज पुन्हा तेच सारे दृश्य मला वेगळे का भासू लागले? त्याच आवर्ती गवताळ प्रदेशाच्या काननी मधुगंधाच्या सुगंधाने  सुवासिक असलेले हिरवे - हिरवे तृषार्त गवत मला बाभळीच्या काट्यांप्रमाणे का टोचतंय? समोर दिसणारे आणि सदैव आपलेसे वाटणारे कत्थई रंगानी सुशोभित असणारे चपळ - चंचळ हरीण आणि त्यांचे पाडस मला एकाएकी नावडते कसे बरे वाटू लागले? माझ्या मनामध्ये नेमक्या कुठल्या रिपुंनी वास केला आहे? हरीण-पाडसाच्या मातृत्वाच्या प्रेमाने माझ्या मनामध्ये ईर्ष्या कशी काय उत्पन्न झाली? त्या ईर्षेच्या प्रखरतेने आपली परिणीती माझ्या डोळ्यांतील अश्रूंमध्ये कधी केली? ह्या अश्रुंमधून द्वेष का ओघळत आहे? मला काहीच समजेनासे जाहले आहे.   

 

गोवत्सांतील पाहून भावा 
काय वाटतो तुजसी हेवा ?
चिडे का मौन तरी आंतले ?

 

त्रिवेणी काव्यप्रकारात गदिमांचा विशेष हातखंडा होता, तीन ओळींमध्ये संपूर्ण भावविश्व ते आपल्या समोर उभं करतात. कौसल्या स्वतःच्या दुःखामध्ये पार भिजून गेली आहे, तिला इतर जगाचे सोयर सुतक उरले नाही. तिला मातृत्वाचे वेद लागले आहे अश्या विस्मयकारक परिस्थितीत कौसल्या ज्या ज्या स्थळी जाते आहे तिथे तिथे निसर्गात लपलेले मातृत्व तिला लक्खपणे तिच्या दृष्टिपथास पडतात. सहज फिरत फिरत किंवा मन रमावण्यासाठी कौसल्या गोशाळेत जाते तिथे देखील गाय - वासरू आपल्या वात्सल्याच्या प्रेमांच्या तुषारांनी निसर्गाला भिजवत होते. त्या गाय वासरुंना बघून हेवा वाटावा इतकं अलौकिक आणि मनोहारी दृश्य होतं तरी ते दृश्य नयनात किंवा मनात टिपून घेण्याजागी कौसल्येच्या मनामध्ये चिड - द्वेष - राग - मत्सर सारखे रिपु कोठून आश्रयास आले? ते ही मनाच्या तावदानांवर मौनांचे काटेरी कुंपण असताना.    

 

कुणी पक्षिणी पिला भरविते 
दृश्य तुला ते व्याकुळ करिते 
काय हे विपरीत रे जाहले 

 

मनातली व्यथा कौसल्या, महाराजांना सांगायला जाणार तोच तिला वाटेमध्ये एका वृक्षावर पक्ष्यांचं घरटं दिसलं त्यात अनेक पिल्लांचे संगोपन त्यांच्या पक्षिणी माता करताना दिसल्या, सुरुवातीला मोठा हेवा वाटला तो प्रसंग बघून नंतर आपसूक राणीचे लक्ष आपल्या रिक्त असलेल्या हातांकडे गेले आणि सत्य समजले की विधात्याने जे सुख ह्या पक्षिणीला दिले आहे त्याहून त्याने आपल्याला वंचित ठेवले आहे. डोळ्यांमध्ये अश्रू आणि मनामध्ये टोचणारे दुःख आपल्या हृदयाशी कवटाळून ते दृश्य कौसल्या बघत आहे. पक्षिणी आपल्या पिल्लांच्या चोंचीमध्ये जलधारेचे थेंब अल्वाररित्या सोडत आहे. डोळ्यांमध्ये आंसू आणि चेहऱ्यावर हासू आणायचा केविलवाणा प्रयत्न कौसल्या करत होती त्यात ती अयशस्वी होत होती आणि तो अयशस्वी प्रयत्न तिच्या मनातली व्याकुळता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट पणे रेखांकित करत होता. शेवटल्या क्षणी तहानेल्याला पाणी मिळू नये एवढं ते विपरीत होत होतं. कौसल्याची हतबलता तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

 

सतःस्वतःशी कशास चोरी ?
वात्सल्याविण अपूर्ण नारी 
कळाले सार्थक जन्मातले

 

एका स्त्रीने कितीही लपवलं तरी एक सत्य तिला मान्य करावंच लागतं की तिच्यातील स्त्रीतत्वाला त्या वेळींच पूर्णत्व येतं, ज्यावेळी तिच्या अंगा-खांद्यावर मातृत्व खेळतं. एक माता आपल्या मुलांना दुग्धपान करवते, पक्षिणी आपल्या पिल्लांना जलधारेने तृप्त करते, मृदुगंधावर पहुडलेली हरितः ज्या प्रमाणे दवबिंदुना आपल्या शिरांवर धारण करतात, गाय आपल्या वासरांना पाजते, वेली आपल्या कळ्यांना झोपाळा म्हणून वाऱ्यांवर झुलवते, ह्या सगळ्यांमध्ये स्त्री तत्त्वासोबतच मातृत्वाचा अंश कुठे तरी विद्यमान आहे ह्याचंच हे सूचक आहे. हे सगळे माता - संततीच्या स्नेहाचे निसर्गात दिसणारे आरसे आहे. ह्या आरश्यांमध्ये कौसल्या ज्या वेळीं स्वतःची दूषित आभा बघते त्या वेळीं तिला तिच्या असण्याची ग्लानी येते. तिला तिच्या अपूर्णतेची जाणीव होते. मातृत्व पद म्हणजे काय हे तिला उमगलं आहे. राजवैभव - विलासपूर्ण जीवन,एक स्त्री, एक राजपुत्री, एक महाराणी ह्या साऱ्यांच्या पलीकडे कौसल्या गेली आहे. तिला तिच्या आयुष्यातील सार्थकता वात्सल्याच्या रूपात आहे हे तिला कळलं आहे..       

 

मूर्त जन्मते पाषाणातून 
कौसल्या का हीन शिळेतून ?
विचारे मस्तक या व्यापिले 

 

एक कोरडी - पाझर न फुटलेली पाषाण ज्यावर कधीही तृणांकूर जन्मास येणार नाही असं वाटत असताना त्या कोरड्या खणखणीत पाषाणाला एक मूर्तिकार एका मातेचे स्वरूप प्रदान करतो आणि बघता बघता तृणांकूर न फुटणाऱ्या पाषाणाला आणि सभोवतालीच्या परिसराला मातृतीर्थाने अलंकरित करतो. तिथली भूमी त्या पाषाणासाठी मातृभूमी होते, तिथले सरोवर मातृकाकुंड होते आणि त्या पाषाणाच्या कडेवर असलेले इवल्याश्या मुलाचे गोत्र हे मातृकागोत्र होते. गदिमांनी पाषाण आणि शिळा ह्या दोन एकाच जातकुळातील असणाऱ्या शब्दांची मोठी विलक्षण फोड केली आहे. एका पाषाणात इतकं सगळं आहे म्हणजे त्या पाषाणाचे  भाग्य किती उज्वल असायला हवं. कौसल्या स्वतःला त्या शिळेहूनही हीन समजत आहे. एका शिळेतून निर्मित झालेल्या पाषाणाला इतकं सगळं मिळावं आणि एका जिवंत असलेल्या स्त्रीला एक संतती मिळू नये? माझ्या मातृत्वाचं फलित लिहिताना सटवाईने इतक्या पातकी हातांनी असं भवितव्य का लिहिलं असावं? ह्या विचारांनी मेंदू पोखरला जातोय? बुद्धीला आणि मनाला दुर्दैवाचा सर्पदंश व्हावा तशी माझी गत आज झाली आहे...  

 

गगन अम्हांहूनि वृद्ध नाही का ?
त्यात जन्मती किती तारका !
अकारण जीवन हे वाटले 

 

आजपर्यंत अनेक वैद्यांना दाखवले, अनंत उपास केले, शूलपाणीला स्मरले, गौरीला विनवले, श्रीहरीची उपासना केली, कुलदैवताची साधना केली, ऋषींची - संतांची सेवा केली... तरी हे सगळं कवडीमोल व्हावं तसं आज काही झालं आहे. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे संतती मिळवण्यासाठी सगळं काही केलं पण हाती काहीही आलं नाही उलट त्यामुळे मीच गलितगात्र झाले. संतती मिळवण्याचे वय निघाले असे अनेक वैद्यांनी ऋषींनी सांगितले. माझा त्या सगळ्यांना एकच प्रश्न आहे..आमच्या डोक्यावर छत्राप्रमाणे आपले आजानुबाहू परसलेला आकाश किती वृद्ध आहे... त्यात अनेक तारकांचा जन्म होतो. एक वृद्ध आकाश जर आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. त्याला तारकांच्या मातृत्वाचा पितृत्वाचा मान मिळू शकतो तर आमच्या हातून असं कोणतं पातक झालं ज्याचं प्रायश्चित आम्हाला ठाऊक नाही आणि जेणेकरून आम्हाला संतती प्राप्त होऊ शकत नाही? जर मला कोणाची माता होण्याचं सौभाग्य प्राप्त नाही झालं तर... नुसतं स्त्रीत्व मिळून ह्या आयुष्याचा उपयोग काहीच नाही. 

हे ईश्वरा!! जर तुला माझ्या झोळीत मातृत्व द्यायचं नसेल तर तू राजवैभव - विलासाधीन सत्ता, राजयोग, महाराणी पद आणि तुझं दिलेलं हे आयुष्य तुझं तू परत घे...मला ह्या साऱ्यांची काहीच गरज नाही... 

गदिमांनी कौसल्येचं दुःख ह्या गाण्यात गुंफलं आहे आणि त्यात बाबूजींचा स्वर्गीय आवाज म्हणजे खरोखर एका मातेचं दुःख किती पराकोटीचं असेल ह्याची आपल्याला कल्पना येते. माता म्हणजे तिच्या मुलांसाठी एक सावली, एक आश्रय, त्यांची सुरक्षा आणि त्यांची जीवनदात्री... एवढं असते. कौसल्येचं दुःख अजून समरसून समजून घ्यायला मला स्कंद पुराणातील ह्या श्लोकाचा आधार घ्यावा लागतोय...   

नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रपा॥   

मृणाल जोशी 
९३२०१४१२८४ 
joshimrunal14@gmail.com

लेखक: 

No comment

Leave a Response