Primary tabs

चलबिचल : मुग्धा मणेरीकर

share on:

अनघानं भाजी, आमटी आणि कोशिंबिरीवर कोथिंबीर भुरभूरवली, फ्रीजमध्ये ठेवलेलं कस्टर्ड सेट होत आलंय का ते बघितलं आणि एकदा ओट्यावरून हात फिरवून घेतला. आज तिने मोठाच घाट घातला होता, कारणही तसंच होतं. काल समीरची, तिच्या नवऱ्याची बोर्ड मीटिंग संपली होती. काल ऑफिसच्या लोकांबरोबर जेवण ठरलं होतं,पण आज संध्याकाळी मुद्दामच अनघाने हा स्पेशल बेतफक्त त्या दोघांसाठीच ठरवला होता. गेले जवळजवळ दोन महिने प्रचंड तणावात गेले होते. समीरवर खूप मोठी जबाबदारी होती. त्याला दिवसभर ऑफिसमधून अनघाला मेसेज करायला तर, वेळ होत नव्हताच पण घरी आल्यावरसुद्धा नीट बोलणं होत नव्हतं. अनघासुद्धा दिवसभर स्वतःच्या ऑफिसमध्ये असायची त्यामुळे दिवस निघून जायचा, पण संध्याकाळी घरी आल्यावर फार कंटाळा यायचा. ती ६ वाजताच फ्री व्हायची, पण १०-११ कधीकधी १२ वाजेपर्यंतसुद्धा समीरचा पत्ता नसायचा.

अनघा-समीरचं लग्न होऊन एकच वर्ष झालं होतं. नवीन घरात सेटल होण्यात अनघाचे पहिले २-३ महिने गेले, त्यानंतर तिनं नोकरी बदलली मग त्यात स्थिरावण्यात पुढचे २-३ महिने गेले. पहिल्या वर्षाचे उपवास, सण सगळे होतेच. या सगळ्यात वर्ष कसं संपलं याचा पत्ताच लागला नाही. लग्नाला वर्ष होणार तेवढ्यात समीरचं हे काम सुरु झालं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला कुठे बाहेरसुद्धा जाता आलं होतं. पुढे दोन महिने असेच गेले. काल एकदाची ती मिटिंग संपल्यावर अनघानेच सुटकेचा श्वास सोडला होता. आतातरी समीर तिला वेळ देऊ शकणार होता. म्हणून आज हे खास जेवण आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये बसून मनसोक्त गप्पा.. लग्नानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यात व्हायच्या अगदी तशा.. असा तिचा बेत होता. 

जेवणाची मांडामांड मनासारखी करून, एकदा समाधानानं सगळीकडे नजर फिरवून तिनं एक गिरकी स्वतः भोवतीच घेतली आणि मग स्वतःचं आवरायला गेली. आज तिच्या उत्साहाला उधाणच आलं होतं. तिला खूप दिवसांनी समीरचा निवांतसहवास लाभणार होता. कपाटातून तिचा आवडता फिकट निळ्या रंगाचा स्लीव्हलेस कुर्ता तिने निवडला.त्याखाली तशीच चुडीदार आणि त्यावर पांढरी, चमकी लावलेली सिल्कची ओढणी. माफक मेकअप करून आवरून झाल्यावर तिनं स्वतःच्या हातावरून दंडापासून हात फिरवला आणि तीच शहारली. आता स्वप्नरंजन करणार इतक्यात तिचा फोन वाजला. 

“हाय, काय चाललं आहे?” राहुलचा मेसेज होता. 

“काही नाही, जेवणाची तयारी तू बोल?” 

राहुल तिचा शाळेपासूनचा मित्र होता. कॉलेजमध्येसुद्धा दोघे एकत्रच होते. दोघे इतके अखंड एकत्र असायचे की, कॉलेजमधल्या प्रोफेसर्स बरोबर त्यांच्या आई-बाबांनासुद्धा ते एकमेकांच्या प्रेमात आहेत की काय असंच वाटत होतं. पण त्यांच्यात होती ती निखळ मैत्री. एकमेकांच्या घरी जाणं-येणं, कॉलेजला एकत्र जाणं, बरेच मित्रमैत्रिणी कॉमन असणं असं अगदी टिपिकल सगळं होतं. फक्त तो मुलगा होता आणि ती मुलगी होती एवढाच काय तो फरक. पण हा फरक सुद्धा त्यांच्या मैत्रीत आड फारसा येत नव्हता. दोघं एकमेकांशी मोकळ्या मनानं सगळं बोलू शकत होते. अगदी एकमेकांना आवडणाऱ्या मुला-मुलींपासून ते घरच्या कटकटींबद्दल. मुलांच्या एरवी इतर मुलींना समजू शकणार नाहीत अशा समस्या अनघाला समजायच्या आणि तिच्या पण छोट्या-छोट्या कुरकुरी, अपेक्षाभंग राहुल समजून ऐकून घ्यायचा. शाळेपासूनची ही मैत्री अतूटच होती, पण कॉलेजनंतर सगळीच समीकरणं बदलतात तसं हेही बदललं. राहुल पुढे शिकायला परदेशात गेला आणि अनघा नोकरीला लागली. इतरही मित्रमैत्रिणी पांगली.  सुरुवातीची एकदोन वर्ष दोघं बोलायचे, दोन वर्षात राहुल एकदा भारतात आला होता तेव्हा दोघं भेटली देखील होती, भरपूर गप्पा झाल्या होत्या. पण मग हळूहळू फोन बंद झाले, मेसेज कमी होत गेले. दोघेही कामात गुंतले गेले. अनघाच्या घरी लग्नाची बोलणी सुरु व्हायला लागली. फोटो, पत्रिका, भेटीगाठी यात शनिवारी-रविवार जाऊ लागले. राहुलचं तिथेच त्याच्या ऑफिसमध्येच असलेल्या गुजराती मुलीशी जमलं. अनघानं चार-पाच मुलं बघितली पण कधी तिला कुणी आवडायचं नाही, कधी समोरून नकार यायचा तर कधी पत्रिकेतले ग्रह आड यायचे. मग एकदा मावशीनं तिच्या नणंदेच्या मुलाचं, समीरचं स्थळ आणलं. मावशीच्या घरच्या कार्यक्रमांना तिनं समीरला आणि समीरनं तिला बघितलं होतंच. दोघांची पसंती झाली, पत्रिका बघून घरच्यांचं समाधान झालं, प्रश्न होता तो फक्त वयाचा. समीर अनघाहून आठ वर्षांनी मोठा होता. जुन्या काळात ठीक होतं पण आत्ता एवढा फरक नसतो असं अनघाच्या घरी वाटत होतं. पण इतर सगळंच जुळून येत होतं, अनघाला पसंत होतं आणि ओळखीतच ठरत होतं म्हणून हा मुद्दा मागे  पडला. समीरचा धीरगंभीरपणा, फोनवर कनिष्ठ सहकार्यांशी बोलणं अशा कितीतरी गोष्टींनी तिच्या मनाला भुरळ पाडली. आतापर्यंत ती सहवासात होती ते तिच्या मित्रांच्या आणिकाही ऑफिसमधल्या मुलांच्या. तेदेखील तिच्याप्रमाणेच अल्लड होते. समीर तसा नव्हता त्याच्या उठण्या-बसण्यात, वागण्या-बोलण्यात परिपक्वता होती आणि अनघाला ती प्रचंड भावली होती. लग्न ठरल्यावर तीन महिन्यात पारसुद्धा पडलं. 

लग्नाआधी दोघं फिरायला जायचे तेव्हाच अनघाला समजलं होतं. समीर मोजकंच बोलायचा, पण छान बोलायचा, बोलण्यापेक्षा त्याचा कृती करण्यात जास्त कल असायचा. लग्नानंतर तर तिच्या या मतावर शिक्कामोर्तबचं झालं. ती उत्साहाचा झरा असेल तर समीर शांत, डोहातलं पाणी. पण वर्षभर या विरोधाभासातूनच प्रेम फुलू लागलं होतं. 

“अबे तू बोल बे… झाली का तयारी?आज काय स्पेशल बेत?” राहुलचा मेसेज आला होता. 

खरंतर लग्नानंतर अनघाचा कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क पूर्वीसारखा राहिला नव्हता, राहुलशीसुद्धा नाही. जो तो आपल्या आयुष्यात गुंतला होता. त्यात राहुल अमेरिकेतम्हणजे वेळेचा मेळ घालणं अवघडच व्हायचं, पण गेल्या तीन-चार महिन्यांत मात्र अनघा-राहुल पूर्वीसारखे गप्पा मारू लागले होते. 

अनघा संध्याकाळी ऑफिसमधून फ्री झाली की अक्षरशः कंटाळून जायची. आठवड्यातून किती वेळा मित्र-मैत्रिणी जमवून बाहेर जाणार? आईकडे किती वेळा जाऊन बसणार? चारेक महिन्यांपूर्वी समीरचं ऑफिसमधून उशिरा येणं सुरू झालं. सुरुवातीला त्याचं काही इतकं वाटलं नाही, पण मग घरी आल्यावर जेवून परत काम घेऊन समीर बसायला लागला. अनघाच्या ऑफिसमध्ये मुळात कामाचं एवढं प्रेशरचं नव्हतं. एकतर ती आयटीत नव्हती आणि नवीन होती त्यामुळे ऑफिसमध्ये काम करून आल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाईपर्यंत कामाचा विषय तिला शिवायचासुद्धा नाही. पण समीरच्या या वाढलेल्या कामाच्या ताणामुळे ती कंटाळू लागली. एकटीने टीव्ही बघणं, पुस्तक वाचणं चालू असायचं. बऱ्याचदा रात्री जेवण झाल्यावर समीर काम करत असतानाच ती झोपून जायची. हळूहळू मग एकत्र जेवणंही होईनाशी झाली. समीरला यायला अजूनच उशीर व्हायला लागला. कधीकधी शनिवारी रात्री अनघा झोप आवरून त्याच्यासाठी आतुरतेनं जागीसुद्धा राहायची, पण दमलेला समीर बऱ्याचदा याची दखल न घेता झोपून जायचा. दमलेली तीसुद्धा असायचीच, पण समीरच्या अशा वागण्यानं नात्यातला स्पार्क कुठेतरी हरवू लागला होता. समीरशी एकदा बोलावं असं तिला वाटायचं, पण आधीच त्याच्यावरचा ताण तिला बघवत नव्हता. मनावरचा ताण  हलका करण्याचे उपाय अनघाकडे होते, पण ते समीरला पटवून देण्यासाठीसुद्धा त्यांची भेट होत नव्हती. 

दोघं एका घरात होते पण तरीही आपलं स्वतंत्र आयुष्य जगत होते. समीर तरी काय करणार होता? ही मीटिंगयेत्या वर्षभरात होणारे प्रमोशन्स त्याच्यासाठी फार महत्वाचे होते. त्यात अनघाच्या काहीतरी बालिश संकल्पनांसाठी त्याला सवड नव्हती. बरं, त्याला असं वाटायचं की त्यानं तिला थोडा वेळ दिला, प्रेमानं जवळ घेतलं की, तिच्या अपेक्षा वाढतच जातात. तिच्या रोमान्स करण्याच्यासुद्धा नवीननवीन तऱ्हा आता समीरला नकोशा वाटायला लागल्या होत्या. त्यामुळे त्या दृष्टीनंसुद्धा तो तिला टाळायलाच बघत होता. त्यापेक्षा झोप आलीये, दमलोय, ताण आहे अशा सबबी पुढे करणं त्याला बरं वाटत होतं.  

एका वेगळ्याच प्रकारचा, शब्दात न सांगता येण्यासारखा एकटेपणा तिला जाणवू लागला.अशातच एका संध्याकाळी फोन घेऊन तिनं सरळ फारशा संपर्कात नसणाऱ्या जुन्या मित्र-मैत्रिणींना मेसेज केला. राहुल तिचा खास मित्र होताच. मैत्रिणीचं काहीतरी बिनसलं आहे हे त्याच्या लगेच लक्षात आलं. त्याबद्दल त्यानं आपल्या बायकोशी चर्चा सुद्धा केली. अनघाशी बोलत राहा, तिला फार काही विचारू नकोस.. ऐकून घेत चल.. असा अत्यंत मोलाचा सल्ला तिनं आपल्या नवऱ्याला दिला. अनघाला साहजिकच यातलं काही माहीत नव्हतं. कधीतरी ती सुद्धा बोलायची अनघाशी, किंवा राहुल अनघाशी चॅटिंग करतोय हे समजल्यावर कोणतीतरी मराठी रेसिपी विचारायला सांगायची. पण या पलीकडे तिनं दोघांमध्ये फार लक्ष घातलं नाही. अनघाला त्यांचा थोडा हेवाच वाटायचा, मित्राच्या संसाराबद्दल असूया नाही, पण आपल्या संसारातून जे निसटत चाललं होतं त्याची हळहळ मात्र होती कारण अनघा फोन घेऊन काय करते, कुणाशी बोलत असते याची समीरला काहीच पर्वा नसायची. 

अनघा आणि राहुलचं बोलणं वाढत गेलं. बोलण्यातली इंटेन्सिटीसुद्धा वाढत गेली. अनघाच्या मनावरचा ताण मोकळा होऊ लागला. तिच्याशी बोलताना, तिला काही समजवायचं असल्यास राहुलने एकदा-दोनदा बायकोचा सल्लासुद्धा घेतला होता. राहुलची काही महिने नाइट शिफ्ट सुरू झाली होती त्यामुळे तो पाहते ऑफिसमधून घरी येताना भारतातली संध्याकाळ असायची. अशावेळेला दोघांच्या खूप छान गप्पा व्हायच्या. अनघाचा संध्याकाळचा कंटाळा थोडा कमी होऊ लागला होता. जेवतानासुद्धा तिला मेसेज करत असणाऱ्या राहुलची सोबत असायची. सासरघरातल्या काही गोष्टी, ऑफिसमधल्या गंमती, राजकारण, करिअरबद्दल पुढचा विचार, जुन्या मित्रमैत्रिणींचे विषय अशा कितीतरी गप्पा रोज व्हायच्या. एकीकडे समीरला समजून घ्यायचा प्रयत्नतीकरत होती संवाद नसला तरी त्याच्या वागण्यावरून भांडणं झालीच होती. एकत्र वेळ घालवणं नाही, प्रेमानं जवळ घेणं नाही.. अगदी रविवारीसुद्धा रात्री तिच्याकडे पाठ करून झोपायचा समीर तेव्हा तिला इतकं असहाय्य वाटायचं, की ते कुणाजवळ बोलू हेसुद्धा तिला समजायचं नाही. अशाच एका नाजूक क्षणी तिनं तो विषय राहुलकडे काढला खरा, पण दुसऱ्या क्षणाला त्याबद्दल तिच्या मनात अपराधीपणाची भावना आली. भावनिक व्याभिचाराची ही सुरुवात तर नाही न हा विचार तिच्या मनाला शिवून गेला. मात्र, राहुलनेवेळ सांभाळून घेतली. मीटिंग होऊनदेमग बघ ताणलेलं रबर कसं सैल होतं अगदी तसंच होईल. हे वाक्य जसच्या तसं राहुलनंच तिला ऐकवलं होतं. समीरजवळ मन मोकळ करून तिला चारेक महिने सहज होऊन गेले होते. आज तिला पूर्णपणेच मोकळं व्हायचं होतं. 

“खूप एक्साइटमेंट आहे रे आजची… फायनली, फायनली ती मीटिंग एकदाची काल संपली. आज माझा नवरा फक्त माझा असणार..” तिनं त्याच उत्साहात रिप्लाय केला आणि बरोबर सगळ्या तयारीचे आणि तिचाही फोटो पाठवला. 

“खल्लास! आज काही खरं नाही हा.. मस्त दिसतेस!” 

मित्राच्या दिलखुलास कॉम्प्लिमेंटने ती खुश झाली आणि नवऱ्याची वाट बघत बाहेर जाऊन बसली. मन मोकळ करायची जागा राहुलची असली तरी, आज दोन महिन्यांनी तिच्या शरीराला मात्र तिच्या नवऱ्याचीच गरज होती. पण ती अगदी तेवढ्यापुरतीच मर्यादित होती असंही नाही. त्यापलीकडे जाऊनसुद्धा तिला समीरची भावनिक गुंतवणूक हवीच होती. तिथपर्यंत पोहोचायचा मार्ग मात्र हाच असावा असं तिला वाटत होतं आणि नेमक्या याच कारणामुळे आज दिवसभर समीर बैचेन होता. 

गेले काही दिवस त्याला जाणवत होतं ते अनघाचं सतत जवळ येण्यासाठीचे प्रयत्न. त्याचा मानसिक ताण, शारीरिक थकवा कशाचा विचार न करता ती बऱ्याचदा त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायची. त्याला ते खटकत होतं. म्हणूनच तो शक्य त्या पद्धतीने तिच्यापासून या एका गोष्टीसाठी दूर राहायचा प्रयत्न करत होता. त्यात हे कामाचं निमित्त झालंच होतं. नातं केवळ याच गोष्टीवर अवलंबून नसावं असं त्याला वाटायला लागलं होतं. याचमुळे की काय त्याला तिचा हात धरावा, कधी तिला जवळ घ्यावं असं वाटणंच पूर्णपणे बंद होऊन गेलं होतं. बरं, या सगळ्याबद्दल तिच्याशी मोकळेपणानं बोलावं का नाही याबद्दलसुद्धा त्याच्या मनात संभ्रमच होता. आज आता एकदाची ही मिटिंग संपत आहे त्यामुळे अनघा आतुर असणार याची त्याला पूर्ण कल्पना होतीच आणि शिवाय संध्याकाळी तिनं “मी वाट बघतेय, लवकर ये..” असा मेसेज सुद्धा केला होता.

घरी पोहोचल्यावर खोलीत लावलेल्या मेणबत्या, बेडवर घातलेलं कोरं करकरीत बेडशीट, अनघाचा ड्रेस, जेवणाची सरबराई यावरून तर त्याची खात्रीच झाली की,अनघाच्या मनात काय आहे. ही सगळी तयारी केवळ रात्रीसाठी नाही तर त्याधीच्या संध्याकाळसाठी आहे हे त्यालाही कळलं नाही आणि अनघाला पटवून ही देता आलं नाही.

घरी येऊन कपडे बदलून, फ्रेश होऊन जेवायला येईपर्यंतच्या समीरच्या वागण्यावरून त्याच्या मनात काहीतरी विचार सुरु आहेत याचा तिला अंदाज आलाच होता. एवढी मनाची आणि इतर तयारी करूनसुद्धा आज तिनं एक गोष्ट ठरवली होती.. ती म्हणजे आज पुढाकार घ्यायचा नाही, पण जेवण, गप्पा, प्रेम मात्र मनापासून करायचं.प्रेम असतं तिथे ओढही असतेच हे राहुलनंच तिला कधीतरी बोलताना सांगितलं होतं. आज दिवसभर तिच्या मनात तेच वाक्य होतं. त्याच वाक्यावर मनापासून विश्वास ठेवून तिनं स्वतःची तयारी केली होती. 

समीर जेवायला बसला आणि तिनं वाढायला सुरुवात केली. एकत्र जेवताना मिटिंगविषयी चर्चा, जेवणाचं कौतुक अशा माफक गप्पा झाल्या. जेवणं आटोपल्यावर समीरनं तिला झाकपाक करायला मदतसुद्धा केली. 

“बाहेर गप्पा मारत बसू या?का छान कॉफी प्यायला लांब जाऊया?” तिनं समीरच्या जवळ जात विचारलं. 

“उद्या जाऊया?छान जेवण झालंय आज. लवकर झोपूया..” समीरनं तिला अलगद दूर केलं. 

समीर खोलीत गेला, घरातले इतर सगळे दिवे मालवून ती त्याच्या मागे गेली. बेडवर पडलेल्या समीरच्या जवळ झोपली. हातानंच तिनं खोलीतला दिवा बंद केला आणि तो हात समीरच्या हाताजवळ नेला. दोनेक मिनिटं वाट बघूनसुद्धा जेव्हा समीरनं तिच्या हातात हात दिला नाही तेव्हा तिनं तोच हात वाकडा करून उशीखालचा फोन काढला.

शरीर नाही तरी निदान आज मन तरी तिला मोकळं करायचंच होतं.. आणि ते करायचं पूर्ण स्वातंत्र आज तिनं स्वतःला दिलं होतं.. नाही म्हणायला मेसेज करायच्या आधी क्षणभर तिचे हात थांबले पण क्षणभरच.. तिचं मन जास्त जोरात धावत होतं.. वैचारिक आणि मानसिक व्यभिचाराच्या व्याख्या तशाही कुठे स्पष्ट आहेत? 

लेखक: 

No comment

Leave a Response