Primary tabs

सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट

share on:

सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट इन्सिनरेशन (Incineration), बायोकन्व्हर्जन (Bioconversion) या दोन पद्धतींनी होऊ शकते.

इन्सिनरेशन (Incineration) : कचरा भट्टीमध्ये नियंत्रित उच्च तापमानास जाळला जाऊन, त्याचे राखेत रूपांतर होते. ज्या उपकरणात ही कचरा जाळण्याची क्रिया केली जाते, त्यास इन्सिनरेशन (Incineration) असे म्हणतात. इन्सिनरेशन दोन प्रकारचे आहेत.

*कमी खर्चीक, मानव संचलित विजेशिवाय चालणारे इन्सिनरेटर : तामिळनाडूच्या ग्रामीण भागातील मुलींच्या शाळांत मासिक पाळीच्या काळात वापरलेले कापड, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादींच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटरचे हे मॉडेल विकसित करण्यात आले व अनेक शाळांत ते बसवलेही गेले. मासिक पाळीमुळे मुलींची शाळेतील गैरहजेरी वा गळती रोखण्यासाठी ही योजना खूपच उपयुक्त ठरली. या इन्सिनरेटरमध्ये शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहांच्या मागच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूस एक भट्टी बांधली जाते. या भट्टीला एकाखाली एक दोन चेंबर्स असून, दोन्ही चेंबर्सच्या मध्ये धातूची जाळी असते. खालच्या चेंबरला दरवाजा असतो. स्वच्छतागृहाच्या मागच्या भिंतीवर आतल्या बाजूने सॅनिटरी नॅपकिन्स टाकण्यासाठी खिडकीसारखी व्यवस्था केलेली असते. त्यातून टाकलेले नॅपकिन्स वा कापड वरच्या चेंबरमध्ये जाळीवर पडतात व ठरावीक कालावधीने खालच्या चेंबरचे दार उघडून आग पेटवून ते जाळले जातात. त्यांचे राखेत रूपांतर होऊन त्याच दरवाजातून ती राख बाहेर काढली जाते. धूर जाण्यासाठी धुरांड्याची सोय केलेली असते. या प्रकारच्या इन्सिनरेटर्सचा उपयोग तामिळनाडूसह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत व महाराष्ट्रात सोलापूर येथेही एका ठिकाणी केला गेला आहे.

*विजेवर चालणारे इन्सिनरेटर्स : पाश्‍चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडेही आता गेल्या काही वर्षांपासून विजेवर चालणारे, ऑटोमॅटिक इन्सिनरेटर्स उपलब्ध आहेत. मोकळ्या जागेत बसवता येणारे (Outdoor Installation) व स्वच्छतागृहात अथवा स्वच्छता संकुलात (Toilet Blocks) बसवता येणारे (Indoor Installation) अशा दोन्ही प्रकारांत ते उपलब्ध आहेत. स्वच्छता संकुलात बसवल्या जाणार्‍या इन्सिनरेटर्सची सॅनिटरी नॅपकिन्स नष्ट करण्याची क्षमता 5 ते 7 सॅ.नॅ/तास ते 12 ते 15 सॅ.नॅ./ तास अशी त्यांच्या मॉडेलनुसार आहे, तर मोकळ्या जागेत बसवल्या जाणार्‍या इन्सिनरेटर्सची क्षमता 100 सॅ.नॅ./प्रती तास अशी आहे. ‘पुणे मनपा’तर्फे इस्पितळातील कचरा (Hospital Waste) नष्ट करण्यासाठी बसवलेल्या महाकाय इन्सिनरेटर्सची क्षमता 150 कि. सॅ.नॅ./प्रती तास (1700 ते 1800 कि./ दिवस) एवढी प्रचंड आहे. हा इन्सिनरेटर अत्याधुनिक आहे.

दोन्ही प्रकारच्या इन्सिनरेटर्समध्ये वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स उच्च तापमानास जाळले जाऊन त्यांचे निर्जंतुक राखेमध्ये (Sterile ash) रूपांतर होते. दोहोंमध्ये उच्च तापमान निर्माण करण्यासाठी Heating Element ची रचना केली असून, तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी Control Panel ची सोय केलेली आहे. या प्रक्रियेमध्ये तयार होणारा धूर व वायू निघून जाण्यासाठी मोकळ्या जागेत बसवायच्या इन्सिनरेटर्समध्ये चिमणीची व्यवस्था केलेली आहे. स्वच्छता संकुलात बसवण्याच्या इन्सिनरेटर्समध्येही छोट्या चिमणीची सोय केलेली आहे. तसेच, निर्माण झालेली राख काढण्यासाठीही सोय केलेली आहे. कमी क्षमतेच्या या दोन्ही प्रकारच्या इन्सिनरेटर्समधून बाहेर पडणारा धूर व वायू खूपच मर्यादित प्रमाणात असतो, तसेच त्यातून निर्माण झालेली राख बागेत वापरता येते. आय.आय.टी. सरकारी शाळांसह विविध मुलींच्या शाळा, केंद्रीय विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृहांत दोन्ही प्रकारचे इन्सिनरेटर्स बसवले आहेत. यात तामिळनाडू राज्याने आघाडी घेतलेली असली, तरी कर्नाटक, उडिशा, सिक्किम या राज्यांतही इन्सिनरेटर्स बसवण्यात सुरुवात झालेली आहे. पुण्यातही दोन वसतिगृहांत हे इन्सिनरेटर्स बसवलेले आहेत.

बायोकन्व्हर्जन

(Bioconversion) :

सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीसाठी उपलब्ध असणारा दुसरा पर्याय म्हणजे बायोकन्व्हर्जन या तत्त्वावर आधारित असणारे पर्यावरणस्नेही तंत्र! या तंत्राद्वारे प्रदूषित अशा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सबरोबर अन्य विघटनशील कचर्‍याचाही (उदा., घरगुती ओला कचरा, बागेतील कचरा इ.) विल्हेवाट लावली जाते व या कचर्‍याचे रूपांतर खतात होते. हे रूपांतर प्रभावीपणे होण्यासाठी बायोसॅनिटायझर (Biosanitiser) हे एन्झाइम साहाय्यक (Catalyst) म्हणून वापरले जाते. ही ‘Vermi + Sanitiser Powder’ प्रकल्पास सुरुवात करताना फक्त एकदाच योग्य प्रमाणात घालावी लागते.

या तंत्रानुसार कुंपण भिंतीलगत सपाट जमिनीवर 7 खणांचे विटांचे बांधकाम केले जाते. प्लॅस्टरिंगची गरज आतल्या बाजूस नाही व बाहेरील बाजूस ऐच्छिक. या खणांच्या वरील बाजूस लोखंडी जाळीचे झाकण असते. हे 7 खण 7 दिवसांच्या कचर्‍यासाठी आहेत. त्याचा आकार कचर्‍याच्या प्रमाणानुसार बदलू शकतो. हे बांधकाम अनिवार्य नाही. गच्चीत प्लास्टिकच्या कापडांवर विटांचे नुसतेच वाफे करून अथवा उपलब्ध जागेनुसार, कचर्‍याच्या प्रमाणानुसार लहान मोठ्या कुड्यांमध्येही हा प्रकल्प अगदी बाल्कनीतसुद्धा आकार घेऊ शकतो. त्यात झाडेही लावू शकतो. म्हणजेच, हा प्रकल्प वैयक्तिक किंवा सार्वजनिक कोणत्याही प्रकारे करण्यासारखा आहे. 7 खण/7 कुंड्या ही आदर्श रचना आहे. उपलब्ध जागा/कचर्‍याचे प्रमाण यानुसार कमी खणही असू शकतात.

  प्रत्येक खणात सर्वांत तळाशी विटांचे तुकडे पसरून त्यावर नारळाच्या शेंड्या, पाला-पाचोळ्याचा प्रथम थर देऊन, त्यावर सॅनिटरी नॅपकिन्ससह कचरा टाकला जातो (बेबी, अॅडल्ट डायपर्ससुद्धा टाकता येतील). त्यावर Vermi ++ Biosanitiser मिसळलेली माती पसरून तो खण पाला-पाचोळ्याने झाकला जातो. या कचर्‍यावर रोज योग्य प्रमाणात पाणी शिंपडणे गरजेचे आहे. तयार झालेले खत 6 महिन्यांनंतर काढू शकतो. कुंड्यांतील अथवा वाफ्यांतील झाडांना ते आपोआप मिळते. बायोसॅनिटायझरमुळे उपद्रवी Pathogens चा नाश होत असल्यामुळे कचर्‍यात सॅनिटरी नॅपकिन्स असूनही; दुर्गंधी, डास, माशा, चिलटे इत्यादींचा प्रादुर्भाव होत नाही; तसेच धूर, वायू, उष्णताही निर्माण होत नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही पद्धत अधिक उजवी व इंधन लागत नसल्यामुळे अत्यंत कमी खर्चीकही आहे.

- भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्था

 

लेखक: 

No comment

Leave a Response