विश्वाचे आर्त...

युवा विवेक    19-Oct-2021   
Total Views |

विश्वाचे आर्त...

 
vishwache aart1_1 &nसुमारे सातशे वर्षांपूर्वी समाजानं वाळीत टाकलेल्या एका संन्याशाच्या पोरानं त्याच समाजाला जीवनाचा नवा ज्ञानमार्ग दाखवला. तोही अवघ्या सोळाव्या वर्षी. संत ज्ञानेश्वर ही या पृथ्वीतलावरची एकमेव विभूती अशी आहे, जिला जन्मानं पुरुष असूनही 'माऊली' म्हटलं जातं. सोळाव्या वर्षी त्यांनी रचलेल्या अमृतानुभवामधले कितीतरी संदर्भ आज वयाची सत्तरी उलटून गेलेल्यांनाही उमजत नाहीत. इतकी अलौकिक म्हणावी अशी प्रतिभा लाभलेल्या या मुलांचं आयुष्य इतकं तापत्रयांचं का असावं, असा प्रश्न अनेकदा पडतो. असंही वाटतं की, या सततच्या अपमानांनी, त्रासानेच तर त्यांना मानवी स्वभावांचं विश्वरूप दर्शन नसेल ना घडवलं? पण मानवी इतिहासात लाखो लोकांनी याहीपेक्षा कठोर आणि अमानवी वेदना भोगलेल्या आहेत, त्यांच्यापैकी काही त्यातून तरले, काही विरले... जे गेले त्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, पण जे तरले त्यांच्या हातून अशी अजोड कलाकृती घडल्याचं कोणतंच उदाहरण दिसत नाही.

मला ज्ञानेश्वरांच्या संतत्वापेक्षा त्यांच्यातल्या कलाकाराबद्दल विलक्षण आकर्षण आणि कुतूहल आहे. ज्ञानेश्वर माऊली अंतर्बाह्य कवी होते. त्यांच्या कवितेला फक्त शब्दांचं बंधन नव्हतं. साधा फुललेला मोगरा बघतानाही त्यांना 'मनाचिये गुंती, गुंफियेला शेला' दिसायचा. कावळ्याच्या एरवी कर्कश वाटणाऱ्या ओरडण्यात त्यांना पाहुणे पंढरीराऊ घरास येणार असल्याची चाहूल लागायची किंवा ज्या जगानं त्यांचा आयुष्यभर छळ केला, त्याबद्दलच त्यांना अपार करुणा वाटत होती. कुठून येतो हा इतका अलौकिक क्षमाभाव, ही जगण्याची समज आणि ही अफाट प्रतिभा.... नाही, मी त्यांना संतम्हणून गृहीत धरून ही प्रश्न नाही विचारात, मुळात त्यांना तसं गृहीत धरलं की, पुढचे सगळेच प्रश्न खुंटतात, पण माणूस म्हणून, तेही सोळा-सतरा वर्षांच्या वयात, ही सगळं येतं कुठून?

आजही आळंदी हे पृथ्वीवरच्या सगळ्यात तीव्र रेडियो ॲक्टिव्ह लहरींचं केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि ही विज्ञानानं सिद्ध केलेली गोष्ट आहे, पण त्या लहरींचं मूळ कारण मात्र अजूनही अज्ञात आहे. असं काय आहे त्या वातावरणात, त्या वास्तूत जिथपर्यंत विज्ञानही पोहोचू शकत नाही?

असं म्हणतात की जिथं विज्ञानाची वेस संपते, तिथूनच आध्यात्माचा प्रांत सुरू होतो. प्रत्येक माणसामध्ये या दोन्हींचा वास असतो. काही माणसं मात्र या संगळ्याच्या पलीकडे जाऊन निखळ, नितळ सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. जमीन न सोडताही त्यांना विश्वाची ओढ लागलेली असते. ज्ञानेश्वरी हा फक्त शब्दच्छलाचा उथळ खेळ नाही किंवा नुसत्या उपमांखाली दाबलेलं भावकाव्यही नाही. ज्ञानेश्वरी तुम्हाला फक्त पाण्यापर्यंत नेते, तुमची तहान जागवते, पण आयती भागवत नाही. अनेक लोक वयाच्या साठीनंतर ज्ञानेश्वरी वाचायला घेतात, कारण त्यातल्या शब्दांना अनुभूती जोडायचा अट्टहास असतो. हिशोब नेहमीच जुळतो असं नाही, पण जिथं जुळतो ती ओवी आपलीशी होऊन जाते. माऊलींच्या प्रतिभेचं हेच तर सौंदर्य आहे.

माऊलींच्या शब्दांतच नाही तर सगळ्या जगण्यातच एक विचित्र काव्यन्याय दिसून येतो. संन्यास घेऊन परत संसारात परतलेल्या वडिलांच्या पोटी जन्म, वडिलांच्या संन्यासाचे चटके झेलत वणवण फिरण्यात आणि नाही नाही ते अपमान भोगण्यात गेलेलं बालपण, बंधूंच्या रुपानं मिळालेला सद्गुरू आणि त्यांच्याचकडून मिळालेलं ज्ञान पुनः त्यांनाच अर्पण करताना झालेली अमृतानुभवनिर्मिती.... विठ्ठलाच्या ओढीनं खांद्यावर घेतलेला झेंडा आणि शेवटी संजीवन समाधी.... एखाद्या फुलाचा अंकुरापासून कोमेजण्यापर्यंतचा प्रवास वाटावा, अशी जीवनगाथा! कदाचित म्हणूनच, आजही आळंदीमध्ये माऊली नाहीत, असं वाटतच नाही. आळंदीच्या पंचक्रोशीत आजही माऊली, त्यांची भावंडं, विठ्ठलपंत, रुक्मिणीबाई, सिधोपंत, इतकंच काय, महादेवभट्ट किंवा चांगदेवही चिरंतन निवासी आहेत.

काही वर्षांपूर्वी आळंदीला गेलो होतो, तेव्हा समाधीचं दर्शन घेऊन सुवर्णपिंपळाच्या समोर सहज बसलो होतो. समोरचा पिंपळ आपल्या पारंब्यांचा भार सावरत अजानुबाहू श्रीरामासारखा दिसत होता. अचानक काही क्षणांकरता मन सातशे वर्षांपूर्वीच्या काळात गेलं आणि वाटलं, पहाटेच्या वेळ रुक्मिणीबाई इथंच प्रदक्षिणेला येत असत. इथूनच पुढं इंद्रायणीच्या घाटावर बालयोगी विठ्ठलपंत ध्यानस्थ बसले असतील... विठ्ठलपंत संन्यास घेऊन गेल्यावर त्यांनी इथंच बसून त्यांची वाट पाहिली असेल.... आणखी काय काय पाहिलं असेल या पिंपळानं? नामदेवांचा आक्रोश, जनाईचे अभंग, मुक्ताईची पासष्टी, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिलेला गुरुमंत्र, सोपानांच्या बाललीला, सिद्धेश्वराच्या मंदिरातील घंटानाद आणि ब्रम्हवृंदाचा कठोर आघात, ‘संन्याशाला प्रायश्चित्त एकच.... देहान्त....

या सगळ्या प्रवाहात एखादी मंद लकेर हलकेच येऊन पोचली असेल का इथं? एखाद्या कोकिळानं ऐकलेली ती अमृतवाणी तो घेऊन आला असेल आपल्यासोबत? या पिंपळानं ऐकले असतील ते विश्वकरुणेचे शब्द..

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले

अवघेचि झाले, देह ब्रम्ह

कवीला नुसती वेदना जाणवून चालत नाही.... त्याला करुणाही तितकीच खोल नेणवावी लागते, हेच खरं.... माऊली तर विश्वकवी होते....

- अक्षय संत