दुमडलेल्या पानापाशी

युवा विवेक    23-Oct-2021   
Total Views |
दुमडलेल्या पानापाशी

shelka saaj_1  
पुस्तकाचं नाव : शेलका साज
लेखक : शिवाजी सावंत
कलाकार आणि कलाकृती यातलं द्वैत आणि द्वंद्व सुरूच राहावं असं मला आता वाटतं..! पूर्वी माझं मत हे अद्वैत निर्माण व्हावं असं होतं..! मात्र, आता ते नाही..! कारण कलाकृती जरी कलाकारातून जन्माला येत असली, तरी शेवटी जन्मणाऱ्या प्रत्येक हाडामांसाच्या गोळ्यासारखं ती तिचा 'जीव' घेऊनच जन्माला येते..! कलाकार तिचा निर्माता ठरू शकतो, 'भाग्यविधाता' नक्कीच नाही..! हाच शाप घेऊन आजही अनेक कलाकार अश्वत्थाम्यासारखे वावरताना दिसतात...!!
नमनाला हे तेल घातलं ते यासाठी की, आजही रणजित देसाई म्हटलं की 'श्रीमान योगी' किंवा 'स्वामी', पू.ल. म्हटलं की बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली आणि असा मी असा मी, व.पू. म्हटलं की वपूर्झा अशी नेमकी उदाहरणं डोळ्यांसमोर आणि जिभेवर येतात...!! मात्र, कलाकार इथेच थांबतो का? त्याचं 'कलाकारपण' कोणत्याही एका कलाकृतीत ओतून त्याला संपूर्ण 'रितं' होता येत नाही..! खरं म्हणजे तसं होऊदेखील नाही...! यामध्ये गडबड होते ती इतकीच की लोकप्रियता आणि स्वतंत्र अविष्कार यात गल्लत सुरू होते...! लोकप्रिय अधिक खपत जातं आणि बाकी दुर्लक्षित होत जातं..!
याच यादीतलं अजून एक नाव म्हणजे...! शिवाजी सावंत...! युगंधर, छावा आणि मृत्युंजय या तीन कादंबऱ्या आणि सावंत हे समीकरण वाचकांनी एवढं पक्कं केलं की, यानंतर किंवा यापलीकडे काही असू शकतं हे 'गणित' या 'समीकरणा'ला झेपलंच नाही किंवा सांधलंच नाही...!
म्हणून मुद्दाम अशा लेखकांची वेगळी पुस्तकं वाचायचं ठरवलं... ! सध्या 'शेलका साज' हे शिवाजी सावंत यांचं ललित लेख असलेले पुस्तक वाचतो आहे...! शिवपुत्र संभाजी, मृत्युंजय कर्ण आणि युगंधर श्रीकृष्ण या तीनही झंझावातांना कागदावर उतरवून हजार एक पानांत सामावून घेणारे सावंत कसे असतील...??? हा प्रश्न वाळवीसारखा पोखरत असतानाच मी हे पुस्तक वाचलं...!
आणि लक्षात आलं..! लेखक कलाकृती 'हातावेगळी' करू शकतो, मनावेगळी नाही..! ललित लेखनामध्येही सावंतांचे संदर्भ छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांचे संदर्भ त्याच रसगर्भी भाषेतून देताये....! भल्या मोठ्या कादंबऱ्या लिहूनही जे सांगायचं 'उरलं' तो 'सुगंध' या अत्तरियाने या पुस्तकात 'कूपीबंद' करून दिला आहे...! सर्व लेख पुन्हा पुन्हा वाचावे आणि गजऱ्याचा सुगंध दिवसभर दरवळावा असे आहेत..! एका बैठकीत संपवून 'टाकण्याचं' हे पुस्तक नाहीच...!
विशेष म्हणजे, लेखक प्रतीकात्मक गोष्टींतून किती सहज बोलतो आणि अनेकदा ते तर्काच्या किती जवळ जाणारं असतं, याचं प्रत्यंतर येतं..!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेत स्फटीक शिवलिंग होतं ते त्याची पुजा करत असत आणि दुसरीकडे आलमगीर औरंगजेब त्याची 'तसबीह'ची म्हणजे जपाची माळ ओढायचा..! स्वहस्ते सुई-दोऱ्या टोप्या शिवून विकायचा...! याबद्दल सावंत किती सुरेख लिहितात पहा.. -
'जगातल्या कोणत्याही धर्मनिरपेक्ष माणसाने केवळ प्रतीक म्हणून शिवाजीराजांची कवड्यांची माळ, स्फटीक शिवलिंग आणि औरंगजेबाची तसहबी आणि सुई-दोरा समोर ठेवलं तरी, त्याला कळेल औरंगजेब काय 'टाचीत' आणि 'ओढत' होता. तर, छत्रपती शिवाजीराजे काहीतरी 'अर्पण' करताये.. 'होमून' टाकताये...!'
असे अनेक दागिने यात आहे. म्हणूनच याला म्हटलंये शेलका साज...!
©️ मयूर अनिल भावे.