देव देव्हाऱ्यात नाही

युवा विवेक    26-Oct-2021   
Total Views |
देव देव्हाऱ्यात नाही

dev anand_1  H
एकशे पस्तीस कोटी लोकसंख्येच्या आपल्या या सुजलाम सुफलाम देशाला तीन गोष्टींचं जबरदस्त आकर्षण आहे..... क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा.... या तीन गोष्टी अशा आहेत, ज्यांनी हा प्रचंड विविधतेनं आणि विषमतेनं भरलेला देश एकत्र बांधून ठेवलाय. एखाद दिवशी सकाळी उठल्यावर भारतातून या तिन्हींपैकी एखादी गोष्ट गायब झाली तर काय होईल, याची कल्पनाही करवत नाही, इतक्या या गोष्टी इथल्या मातीत मुरल्यात.
भारतात सिनेमाचं आगमन होऊन एकशेआठ वर्षं झाली. क्रिकेट कदाचित त्याहीआधी आलं आणि राजकारण तर महाभारताच्या आधीपासून आहेच..... पण क्रिकेट आणि राजकारण आपण थोडं बाजूला ठेवूया. एकशे आठ वर्षांच्या या काळात भारतीयांच्या सुमारे पाच पिढ्या ‘सिनेमा’ नावाच्या वेताळानं आपल्यात बंदिस्त करून ठेवल्या.
आपल्या हवेत व्यक्तिपूजा ऑक्सिजनइतकीच अविभाज्य असल्यामुळे भारतातला प्रत्येक दुसरा सिनेमाप्रेमी कोणत्या ना कोणत्या स्टारचा चाहता असतोच.... राजेश खन्नाला मुली रक्तानं प्रेमपत्रं लिहायच्या म्हणे..... शाहरुख खानचा मन्नत बंगला मुंबईतलं एक महत्वाचं पर्यटन स्थळ मानला जातो आणि अमिताभच्या बंगल्यासमोर आजही लोक रात्रंदिवस ताटकळत उभे असतात. हे सगळं बघून ऐकून असं वाटतं की काहीतरी सुंदर पण आपल्या प्राप्तीपलीकडे असलेलं म्हणजे सिनेमा असेल का?
काळाप्रमाणे अप्राप्य शब्दाचे संदर्भ बदलत असतील कदाचित, पण माझ्या वडिलांच्या पिढीसाठी मात्र 'अप्राप्य' शब्दाची सुई दोनच आकड्यांवर अडकून पडलीय.... एखाद्या बंद पडलेल्या घड्याळासारखी.... मधुबालाचं आरस्पानी सौंदर्य आणि देव आनंदचं चिरतारुण्य....
भारतीय सिनेमातला पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्नाचं नाव घेतलं जातं. पण त्याच्या कित्येक वर्षं आधी दिलीप-देव-राज या त्रयीनं स्टारडम या शब्दाची व्याख्या घडवली. तिघांचाही उदय साधारण एकाच काळातला..... देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं. फाळणीमुळे झालेल्या हिंसाचारात अनेकजण जीव मुठीत धरून नशीब आजमावायला मुंबईची वाट पकडत होते. त्याग, देशभक्ती, सत्य ही मूल्यं फाळणी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या प्रचंड प्रलयांतही तग धरून होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळं छान होणार, आपण आपला देश घडवणार' हा आशावाद आणि आत्मविश्वास होता.
राज कपूरनं आपल्या चित्रपटांमधून हा आशावाद मांडायला सुरुवात केली होती. एकीकडे दिलीपकुमारही आपलं नाणं वाजवत होता. देव मात्र यासगळ्यापासून काहीसा लांब होता. इंग्रजी लिटरेचरमध्ये पदवी घेऊन पंजाबमधील गुरुदासपूरहून आलेला हा अत्यंत देखणा, उत्साही युवक तेव्हा पुण्याच्या ‘प्रभात’ कंपनीत ‘मोहन, 'हम एक है’ अशा सिनेमांमधून कामं करत होता.
धोब्याकडून कपड्यांची अदलाबदल होण्याचं निमित्त घडलं आणि एक जन्मभराचं मैत्र जुळलं. प्रभातमध्येच नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करणारा देवच्याच वयाचा तरुण, वसंतकुमार पदुकोन उर्फ गुरुदत्त! या मैत्रीत एक करार झाला. जो कोणी आधी पुढं जाईल, त्यानं दुसऱ्याला ब्रेक द्यायचा.... देव आनंद आपलं प्रभातचं कॉन्ट्रॅक्ट संपवून मुंबईला परतला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानं आपलं मैत्रीचं वचन निभावलं. याच मैत्रीनं पुढं १९५१ साली 'बाजी' च्या रूपानं 'नवकेतन फिल्म्स'ला आपलं पहिलं यश मिळवून दिलं...... तेवढंच नाही तर भारतीय सिनेमाला साहिर लुधियानवी, एस.डी.बर्मन, गीता दत्त, बलराज साहनी अशा एकापेक्षा एक उत्तुंग कलावंतांची नव्यानं ओळख करून दिली. बदलत्या काळानुसार गुरुदत्त आणि देव आनंद कलात्मक दृष्टीनं एकमेकांपासून दूर होत गेले, पण त्यांची मैत्री गुरुदत्तच्या आकस्मिक दुर्दैवी निधनापर्यंत अतूट राहिली.
देव आनंदच्या सिनेप्रवासाचे तीन मुख्य भाग करता येतात. पहिला ‘प्रभात’ मधला नवशिका, उत्साही युवक, दुसरा ‘नवकेतन’ आणि विजय आनंदबरोबर बहरत गेलेला उत्फुल्ल ‘यूथ आयकॉन’ आणि तिसरा दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणून नाही तरी आपल्या कमालीच्या एनर्जीसाठी आणि फिल्ममेकिंगच्या वेडासाठी ओळखला गेलेला सदाबहार नौजवान!
या तिन्ही फेजेसमधला कॉमन भाग एकच..... उत्साह, एनर्जी आणि झपाटलेपण! ‘प्रभात’ मध्ये दस्तुरखुद्द बाबुराव पेंटरांच्या देखरेखीत देव आनंदची जडणघडण झाली..... ‘प्रभात’चा शेर संपल्यावर ‘नवकेतन’च्या माध्यमातून त्यानं आपली रोमँटिक हिरोची इमेज सेट केली आणि दिग्दर्शक झाल्यावर पत्रकारितेपासून सेन्सॉरपर्यंत अनेकविध विषय हाताळले.....
पण हा झाला ‘स्टार’ देव आनंद’..... माणूस म्हणून तो कसा होता? स्वतःच्या तब्येतीला डोळ्यात प्राण आणून जपणारा हा माणूस ‘गाइड’च्या 'क्लायमॅक्स'साठी पंधरा दिवस नुसत्या फळांच्या ज्यूसवर राहिला होता. ‘गाईड’ हा अपवाद वगळता पडद्यावर कधीही शर्ट आउट ठेवून न दिसलेला देव आनंद शेवटपर्यंत स्टारडमचा कुठलाही तोरा न मिरवता फियाट गाडी वापरत होता. एका मराठी मासिकानं काढलेल्या देव आनंद विशेषांकाबद्दल स्वत: पत्र लिहून दखल घेणारा देव आनंद..... ‘गाइड’च्यावेळी दादा बर्मन आजारी असताना बाकीच्या अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट दुसऱ्या संगीतकारांकडे सोपवले तरीही फायदा-नुकसानाची पर्वा न करता दादा बरे होण्याची वाट पाहत थांबलेला देव आनंद.....
एखादा स्टार इतका साधा असतो? मुळात इतका साधा माणूस या मोहमयी चित्रसृष्टीत 'स्टार' म्हणवला जातो? हो ! कारण तो साधा माणूस असला तरी ‘देव आनंद’ असतो.....
ज्याला पडद्यावर मारामारी करताना बघूनही “यालाच कुठं तरी लागेल” असा आपल्या जीवाला घोर लागतो, तो देव आनंद..... “जो मिल गया, उसीको मुकद्दर समझ लिया, जो खो गया, मै उसको भुलाता चला गया’ असं म्हणत सुरैय्याच्या निधनाची बातमी ऐकून हळवा झालेला देव आनंद..... उमेदवारीच्या काळात गुरुदत्तला दिलेलं वचन स्वतःची चित्रसंस्था सुरु केल्यावरही पाळणारा देव आनंद.....
आणि या एकशे पस्तीस कोटींच्या जनतेसाठी अप्राप्य वाटणारं चिरतारुण्य लाभलेला देव आनंद.....
देव देव्हाऱ्यात नाही.... देव प्रत्येक चिरतरुण मनात आहे....
- अक्षय संत