एका कुटुंबातील भीषण रहस्य...

युवा विवेक    28-Oct-2021   
Total Views |

एका कुटुंबातील भीषण रहस्य...


house of secrets_1 & 

जुलै २०१८ मध्ये दिल्लीच्या बुरारी येथील संतनगर परिसरात एक घटना घडली. एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह एका घरात आढळले. या अकरा जणांमध्ये तीन पिढ्यांतील लोक होते. सत्तरीच्या घरातील म्हातारीपासून चौदा वर्षांच्या मुलापर्यंत वेगवेगळ्या वयोगटांतील स्त्री-पुरुष. हा खून होता की आत्महत्या, याचा तपास करताना पोलिसांच्या हाती ज्या गोष्टी लागत गेल्या, त्या चक्रावून टाकणाऱ्या होत्या. बुरारी येथील या सामूहिक आत्महत्येच्या घटनेवर आधारित माहितीपटाची लीना यादव यांनी दिग्दर्शित केलेली एक रंजक आणि विचारप्रवर्तक मालिका नेटफ्लिक्सवर 'हाऊस ऑफ सिक्रेट्स : द बुरारी डेथ्स' या नावाने नुकतीच प्रदर्शित झाली आहे. 'बुरारी डेथ्स' असं गुगलवर सर्च केलं की, या घटनेबद्दलचे पुष्कळ दुवे सहज हाती लागतात. तीन भागांचा हा माहितीपट त्या सगळ्या दुव्यांना जोडून या घटनेचं एक बऱ्यापैकी सुस्पष्ट आणि संपूर्ण चित्र आपल्यासमोर ठेवतो, त्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे.

टोहाणा, हरियाणा येथे राहणारे भोपाल सिंग यांची आठ एकर शेती होती. गायी-गुरे होती. मुलांच्या लग्नात वारेमाप खर्च करून ते कर्जबाजारी झाले आणि सगळी शेती विकून दिल्लीत राहायला आले. वीस वर्षे दिल्लीत या कुटुंबाच्या तीन पिढयांतील माणसं सुखाने नांदत होती. शेजार-पाजाऱ्यांना त्यांचा कसलाही त्रास नव्हता. उलट अशी चांगली माणसं शोधून सापडणार नाहीत, असंच त्यांचं म्हणणं होतं. मात्र, १ जुलै २०१८ रोजी त्यांचं दुकान सकाळी उघडलेलं दिसलं नाही, म्हणून त्यांचे शेजारी गुरुचरणसिंग काय झालं, ते पाहायला गेले. घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता आणि पायऱ्या चढून वर गेल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं, ते हादरवून टाकणारं होतं. घराच्या छताला असलेल्या लोखंडी सळ्यांच्या जाळीला ओढण्या बांधलेल्या होत्या आणि त्याला घरातील दहा जणांचे मृतदेह लटकले होते. खाली पाच टेबल्स होती. सर्व मृतदेह बांधलेल्या अवस्थेत होते. हात बांधलेले होते. डोळ्यांवर पट्टी होती. काही शरीरं वायरने बांधलेली होती. कानांमध्ये कापूस होता. घरातल्या सर्वांत वृद्ध व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या बेडरूममध्ये बेडजवळ सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. 'नवभारत टाईम्स'ने ही बातमी छापली आणि ती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. नेमकं काय झालंय, हे पाहण्यासाठी बघ्यांची तर गर्दी उसळलीच, पण पत्रकार आणि राजकारणीही जमू लागले. तर्कवितर्क केले जाऊ लागले आणि पोलिसांवर ते या घटनेचा नीट तपास करत नसल्याचे आरोप होऊ लागले. केस सीबीआयकडे गेली.

पुढच्या तपासात त्या घरात अकरा डायऱ्या आढळून आल्या. २००७ साली भोपालसिंग यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अकरा वर्षांनी ही घटना घडली. या अकरा वर्षांच्या काळात लिहिलेल्या या डायऱ्यांमधील नोंदींची या घटनेच्या मुळाशी पोहोचायला मदत झाली. ज्या पद्धतीने मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत मिळाले होते, त्याचंही वर्णन या डायऱ्यांमध्ये होतं. या डायऱ्यांचा या घटनेशी काय संबंध होता, दुसऱ्या पिढीतील सर्वांत लहान मुलगा ललित याचं या घटनेत काय महत्त्व होतं, या सगळ्या गोष्टी या माहितीपटात पुढे उलगडतात.

घरातल्या एका मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर चौदा दिवसांतच ही घटना घडते. वडिलांच्या मृत्यूनंतर घरातले सगळे निर्णय एक मुलगा घेऊ लागतो आणि इतर सर्व व्यक्ती त्याचा एकछत्री अंमल मान्य करत त्याला बिनबोभाट शरण जातात. त्याचं सगळं म्हणणं ऐकतात. या घटनेपूर्वी एक पूजा केली जाते आणि 'क्रिया' झाल्यानंतर आपण सगळे एकमेकांचे बांधलेले हातपाय सोडवू, असं सगळ्यांना सांगितलं जातं. म्हणजेच यात आपला मृत्यू होऊ शकतो, अशी शंकाही कुणाच्या मनात येत नाही, इथवर सर्वांनी त्या एका व्यक्तीचं म्हणणं मान्य केलेलं असतं. त्यामुळे या घटनेला आत्महत्या म्हणावं की खून, हेच बऱ्याच जणांना अजून उमगलेलं नाही. कारण सामान्यतः ज्या कारणांमुळे आत्महत्या होतात, तसं काही कारण इथे दिसत नाही. खून म्हणावा, तर तसा पुरावा नाही. कारण सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरही बाहेरची कुणी व्यक्ती या घटनेपूर्वी घरात आलेली दिसत नाही. जे घडलंय, ते सर्वांच्या मर्जीने, संगनमताने घडलंय. त्याबद्दल सांगू शकेल, असं कुणीच जिवंत नाही. घरातली सगळी गुपितं या अकरा माणसांसोबत संपली. त्यामुळे जे समोर आहे, त्यातूनच काय घडलं असेल, कसं घडलं असेल, हे शोधणं, एवढंच पोलिसांच्या आणि तपास करणाऱ्या इतरांच्या हाती उरतं.

हा माहितीपट या सगळ्या घटनेचा मागोवा घेताना अतिशय गंभीरपणे सगळ्या गोष्टी मांडतो. घटनेशी संबंधित डिटेलिंग करताना टाइमलाइनचा योग्य वापर करतो. माहितीपटात पोलिसांच्या, मानसोपचारतज्ज्ञांच्या, मृतांच्या नातेवाईकांच्या, शेजारीपाजार्‍यांच्या, मित्रांच्या, डॉक्टरांच्या, पत्रकारांच्या आणि इतर अनेकांच्या मुलाखती येतात. त्यातून या घटनेला किती वेगवेगळे कंगोरे आहेत, हे नव्याने उलगडते. इतकेच नाही, तर या मुलाखतींमधून पितृसत्ताक व्यवस्थेचा, कुटुंबव्यवस्थेचा, एकूणच समाजव्यवस्थेचा, समाजातील विचित्र पंथांचा विचार होण्याची, त्याबद्दल बोलण्याची किती नितांत गरज आहे, हे कळते. ललितच्या अपघाताबद्दल आणि त्यानिमित्ताने PTSD (Post Traumatic Stress Disorder) आणि सायकॉसिस याबद्दल चर्चा येते. मानसोपचारांबद्दल भाष्य करण्याची गरज उलगडते. या माहितीपटात बरखा दत्त यांसारख्या गाजलेल्या पत्रकारांची भाष्यं आहेत, ती केवळ ऐकून सोडून देण्यासारखी नाहीत. घटना घडल्यानंतर त्या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता ज्या पद्धतीने तिचं रिपोर्टिंग व्हायला हवं होतं, तसं ते झालं नाही, हे स्वतः पत्रकार मान्य करतात.

हा माहितीपट हिमनगाच्या पाण्याच्या वर असलेल्या केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या भागांवर चर्चा न करता अधिक खोलात शिरून काही सापडतं का, ते शोधतो. सर्व मृतांचे अंत्यसंस्कार करणारा दिनेश दु:खाच्या वेळीही सर्व मृतांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतो, ही गोष्ट एकाच कुटुंबातल्या माणसांमधल्या टोकाच्या फरकाबद्दल बरंच काही सांगून जाणारी आहे. हा माहितीपट ८ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. तीन ते नऊ ऑक्टोबर, २०२१ हा आठवडा यावर्षी 'मानसिक रोग जागरूकता आठवडा' म्हणून साजरा करण्यात येतोय. त्यानिमित्ताने हा माहितीपट जर लोकांनी पाहिला आणि निदान मानसिक आरोग्याबद्दल चर्चेला सुरुवात जरी झाली, तरी दिग्दर्शिकेचे प्रयत्न काही अंशी सफल झाले, असं म्हणता येईल.

- संदेश कुडतरकर.