आपल्या आकाशगंगेचा तुटलेला हात !

युवा विवेक    06-Oct-2021   
Total Views |

आपल्या आकाशगंगेचा तुटलेला हात !

 
galaxy_1  H x W

जरी आपण मंदाकिनी या आपल्या आकाशगंगेला घर म्हणत असलो तरीसुद्धा आपल्या आकाशगंगेविषयी अनेक गूढ आणि रहस्य कायम आहेत. खगोलशास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या निरीक्षणांच्या आधारे असे सिद्ध झालेले आहे की, आपल्या आकाशगंगेचा एक हात मोडलेला आहे! आपली आकाशगंगा म्हणजेच मंदाकिनी आकाशगंगा ही वर्तुळाकार आणि सर्पिलाकार आकाराची आहे. यातीलच एका भागातील ज्याला आपण आकाशगंगेचे हात म्हणतो तेथील ग्रह ताजऱ्यांचे समूह विखुरलेले असून, त्यांची रचना इतर हातांप्रमाणे न राहता बदलली आहे. सुमारे ३००० प्रकाशवर्ष आकाराची आपली आकाशगंगा आणि या आकाशगंगेतील, पृथ्वीवरून दिसणाऱ्या धनु राशीमधील तारे आणि ग्रहांचा मिळून बनलेला हात हा साधारण ४५ अंश अशा प्रकारात दिसतो. यालाच आकाशगंगेतील पिसे असेही म्हणतात. परंतु, या वेळी केलेल्या निरीक्षणावरून असे समोर आलेले आहे की, हा आकार आता बदलला आहे आणि त्याचा आकार एकसंध न राहता विखुरलेला आहे.

पृथ्वीच्या आकाशगंगेमधील स्थानामुळे संपूर्ण आकाशगंगेचा वेध घेणे हे केवळ अशक्य आहे. नासाच्या स्पिटझर या निवृत्त करण्यात आलेल्या टेलिस्कोपच्या साह्याने ही निश्चिती करण्यात आली की खरोखरच आपल्या मंदाकिनी आकाशगंगेचा एक भाग विखुरलेला आहे. या भागात ताऱ्यांची विविध जन्मास्थाने आहेत जसे की, लगून नेब्युला, इगल नेब्युला, त्रीफिड नेब्युला इत्यादी. या सर्व भागांमध्ये ताऱ्यांचा जन्म होत असतो आणि हे सर्व भाग हे आपल्या मंदाकिनी आकाशगंगेच्या अशा भागात आहेत की, जेथील ताराकासमुहांचा आकार हा बिघडत चाललेला आहे.

वैज्ञानिकांनी निरीक्षणाच्या साह्याने असा दावा केलेला आहे की, आपल्या आकाशगंगेच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगामुळे आणि त्यामुळे येणाऱ्या ताणामुळे हा आकार बदलत चाललेला आहे. नव्या दूरदर्शकांच्या साह्याने भविष्यकाळात आपल्या आकाशगंगेमधील जर असेच काही विखुरलेले भाग शास्त्रज्ञांना उपलब्ध झाले तर, त्यांना यावर अधिक सखोलपणे अभ्यास करता येईल आणि या घटनेचा कार्यकारण भाव समजून घेण्यास मदत होईल. अवकाशात असणाऱ्या डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी या दोन घटकांचादेखील परिणाम म्हणून आपल्या आकाशगंगेतील हा भाग विखुरलेला असण्याची शक्यता आहे. भविष्यकाळात जेव्हा प्रगत यानांच्या साह्याने मानव प्रकाशवर्ष प्रमाणात प्रवास करू लागेल तेव्हा कदाचित या भागात प्रत्यक्ष जाऊन आणि या भागाचा सखोल अभ्यास करून आपल्याला सर्व उत्तरे मिळवता येऊ शकतील !