आवरण

युवा विवेक    13-Nov-2021   
Total Views |
#दुमडलेल्या_पानापाशी
#आवरण
awaran_1  H x W
 
डॉ. एस. एल. भैरप्पा नावाच्या साधकाने सिद्ध केलेल्या कादंबऱ्यापैकी एक म्हणजे 'आवरण'. मनोरंजनापेक्षाही माहिती आणि प्रबोधनावर भर देणारे भैरप्पा आपला तसाच लेखनधर्म आणि लेखनस्वभाव जपताना वाचकाला 'बोअर' होणार नाही किंवा बोजड वाटणार नाही न, याची काळजी मात्र नक्की घेतात.
 
भैरप्पांची कादंबरी वाचताना लक्षात येतं, त्यांची गोष्ट सुरू होते.. मग गोष्टीत गोष्ट येते.. मग गोष्टीतल्या गोष्टीत गोष्ट येते... असं करत करत शेवटी पुन्हा आधी गोष्टीतली गोष्ट संपते आणि मग गोष्ट. त्यामुळे भैरप्पा हा चक्रव्यूहात शिरणारा आणि ते भेदून बाहेर येणारा (आणि वाचकालाही आणणारा) अभिमन्यू आहे. वंशवृक्ष, तडा, काठ, पर्व या त्यांच्या कादंबऱ्या वाचताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.
 
'आवरण' ही त्यांची तुफान गाजलेली कादंबरी. चार वर्षांत ३६ आवृत्या पाहिलेल्या 'आवरण'ने लोकप्रिय शब्दाला लाजवलं आहे, असंच म्हणायला हवं. 'आवरण' म्हणजे नक्की काय? एका ओळीत सांगायचं म्हटलं, तर इस्लामी सत्तेने केलेल्या आक्रमणाची, त्यातून आणि त्यामुळे निर्माण झालेल्या स्वभाववैशिष्ट्यांची आणि तो स्वभाव घेऊन आता या काळात जगणाऱ्या लोकांची ही कहाणी आहे. अर्थात, मग हे काय हिंदू-मुस्लिम भांडण वगैरे आहे का? तर, असं अजिबात नाही. ही कथा आक्रमणाची आहे; परंतु, धर्मांधतेचा आणि कट्टरतेचा संयमाने, निष्ठेने केलेल्या पराभवाचीही कहाणी आहे.
 
इतिहासातील एका पाठोपाठ एक प्रसंग न लिहिता किंवा संदर्भांचा भडिमार करून लेखन अवघड न करता भैरप्पांनी इतिहास कथानकातून मांडला आहे. त्यामुळे साच्यासाठी म्हणून घेतलेले पात्र, कथानक वगैरे काल्पनिक असलं, तरी इतिहास मात्र खरा आणि सत्य आहे. भैरप्पांनी त्याचे संदर्भही दिले आहेत.
 
एका हिंदू प्रकांड पंडिताच्या लक्ष्मी नावाच्या मुलीचं तिच्यासोबत शिकणाऱ्या आमिर नावाच्या मुस्लिम मुलावर प्रेम असतं. ते दोघे चित्रपटाचं शिक्षण घेत असतात. वडिलांचा विरोध झुगारून 'लक्ष्मी' आमिरशी लग्न करते आणि तिची रझिया होते. नव्याची नवलाई संपल्यावर आमिरमधला लक्ष्मीला आवडलेला आमिर संपतो आणि कोणी वेगळाच आमिर निर्माण होतो. हा आमिर कट्टरता आणि रूढींना डोक्यावर घेणारा असतो. लक्ष्मीवर अनेक बाबतीत जबरदस्ती होऊ लागते. याचा अतिरेक होतो आणि लक्ष्मी त्याला सोडून तिच्या माहेरी परत येते. मधल्या काळात तिच्या वडिलांचं निधन होतं. घरी परत आल्यावर ती वडिलांच्या ग्रंथालयात जाते आणि तिला वडिलांची व्यापकता, अभ्यास आणि उंची समजते. तिच्या वडिलांनी हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा प्रदीर्घ आणि सखोल अभ्यास केलेला असतो. यामुळे भारावून गेलेली लक्ष्मी तो अभ्यास पुन्हा सुरू करते आणि इथे कादंबरीच्या विषयाचा प्रारंभ होतो. मग इस्लामी आक्रमणाचा इतिहास लक्ष्मीच्या वाचनाद्वारे भैरप्पांनी संदर्भासह वाचकांसमोर मांडला आहे. इथेही पुन्हा गोष्टीत गोष्ट आहेच.
 
भैरप्पांनी त्यांची भूमिका 'प्रवेश' (प्रस्तावना) मध्ये खूप सुंदरपणे मांडली आहे. ते म्हणतात, 'ऐतिहासिक विषयावर कलानिर्मिती करताना प्रत्येक तपशिलासाठी संशोधन गरजेचं असतं. साहित्यिकावर जबाबदारी असते, ती आपण लिहीत असलेल्या साहित्यकृतीमध्ये व्यक्त होणाऱ्या इतिहासाच्या सत्याची. सत्य आणि सौंदर्य यांची तुलना करता, साहित्यिकाची अंतिम निष्ठा सत्याकडेच असली पाहिजे. सत्याकडून सोयीनुसार उचलेगिरी करून मी केवळ एक कला-निर्माता आहे, असे म्हणून जबाबदारी झटकणं साहित्यिकाच्या दृष्टीने योग्य नाही.'
 
इतकी स्पष्ट भूमिका केवळ मांडली नाही; तर भैरप्पांनी ती जपलीदेखील आहे. इतिहास निर्विकार असतो, कठोर असतो आणि आरसाही असतो. त्यामुळे तो जे दाखवतो ते मांडण्याचं काम त्यांनी केलं आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर भैरप्पांनी जे लिहिलंय ते अफाट सुंदर आणि संतुलित आहे. ते लिहितात...
 
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला 'आवरण' असं म्हणतात. मला कळायला लागल्यापासून सत्य-असत्याचा प्रश्न हा छळणारा प्रश्न आहे. हीच समस्या 'आवरण'मध्ये समूह आणि राष्ट्रीय पातळीवर उफाळून आली आहे...
... मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे खरं; पण मागच्यांशी नातं जोडून 'आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारायला हवी.
इतिहासाकडून मिळवण्याइतकंच त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी ही गोष्ट आहे.....!!'
 
हे वाचल्यावर आपण उरतो ते फक्त भैरप्पा नावाच्या देहाला साष्टांग घालण्यासाठी....!! सतत ललित किंवा हलकंफुलकं वाचणाऱ्या मंडळींना कदाचित सुरुवातीला थोडं जड वाटेल; पण निग्रहाने वाचत रहा, हे 'आवरण' तुमच्यावर एक वेगळी 'माया' करेल, हे निश्चित..!
- मयूर भावे