श्रीमंत योगी....

युवा विवेक    16-Nov-2021   
Total Views |
श्रीमंत योगी....

श्रीमंत योगी_1   
 
समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हटलं आहे , की...
 
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी
 
श्रीमंत योगी..... अमर्याद वैभव जवळ असूनही त्याच्या उपभोगापासून अलिप्त असलेला असा तो श्रीमंत योगी !
 
आपल्यापैकी प्रत्येक जण जन्माला येताना बंद मुठीत काही ना काही वैभवसंचित घेऊनच आलेला असतो. काहींना या वैभवाची ओळख पटते, काही जण हातात सगळं काही असूनही भलत्याच गोष्टींत सुख शोधत भटकत राहतात.
 
बळवंत मोरेश्वर पुरंदरे नावाच्या माणसाला या वैभवाची जाणीव वयाच्या पंधराव्या वर्षीच झाली होती..... उभ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सगळ्या जगाला सांगणं, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे, हे वयाच्या पंधराव्या वर्षीच उमगणं. हा निव्वळ योगायोग नाही म्हणता येणार..... शिवचरित्राचा सांगोपांग अभ्यास करणारे त्यांच्याआधीही अनेक होते, त्यांच्यानंतरही बहु झाले, पण ‘शिवशाहीर’ हे बिरूद लाभलं ते फक्त ब.मो.पुरंदरे या शतायुषी तरुणाला....
महाराजांचं आयुष्य एकापेक्षा एक वादळी प्रसंगांनी भरलेलं.... त्या प्रत्येक प्रसंगात महाराजांचे विविध गुण बावनकशी सोन्यासारखे लखलखताना दिसतात. त्यांचं शौर्य, मुत्सद्दीपणा, धर्मनिष्ठा आणि रयतेबद्दलची अलोट माया, या आणि यांच्यासारख्या अनेक गुणांनी या तरुणाला अक्षरश: संमोहित केलं आणि त्यानंतरची तब्बल सात-आठ दशकं एकच ध्यास, एकच आस आणि एकच श्वास..... छत्रपती शिवाजी महाराज..... !
 
आपल्याला महाराज प्रथम भेटतात ते इतिहासाच्या पुस्तकातून.... क्रमिक पुस्तकाच्या परंपरेला साजेसं असं महाराजांचं थोडकं वर्णन, त्यांच्या चरित्राचा जुजबी आलेख आणि सगळ्यात शेवटी त्यांचं तेच मंदिल-जिरेटोपधारी दर्शन..... जोडीला पाठांतरासाठी भरघोस सनावळ्या, तहांची कलमं आणि गडकिल्ल्यांची अन मावळ्यांची नावं..... पुस्तकातून घोका आणि परीक्षेत फेका.... यासगळ्या गोंधळात महाराज फक्त चार टिपा, दोन जोड्या लावा आणि थोड्याफार थोडक्यात उत्तरे लिहाचे धनी होऊन राहतात..... क्रमिक पुस्तकातला इतिहास कात्रीत पकडतो; पण पुरंदरेंनी त्याच इतिहासाशी मैत्री जुळवून दिली..... महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले, तिथं तिथं पुरंदरे स्वत: जाऊन आले. सह्य्राद्रीच्या बारा मावळांचा नुसता राजकीयच नव्हे तर नैसर्गिक, संस्कृती आणि सामाजिक अभ्यास करून त्यांनी आपल्याला रुचलेला, पटलेला आणी गवसलेला इतिहास अतिशय प्रामाणिकपणे लोकांसमोर ठेवला. तो ठेवायची पद्धतही अत्यंत रसाळ-गोमटी..... मऱ्हाटदेशीच्या साऱ्या लोककलांना इतिहासात सामावून घेत त्यांनी मोठ्या खुबीनं प्रत्येक प्रसंगातलं नाट्य उलगडून सांगितलं; पण हे करताना मूळ घटनेच्या गाभ्याला मात्र कधीही धक्का लागू दिला नाही की कलेच्या नावाखाली सवंग मनोरंजनाची कास धरली नाही. आणि म्हणूनच त्यांना ‘शिवशाहीर’ ही यथार्थ उपाधी मिळाली. शिवशाहीर बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे..... आणि शिवशाहीर ही पदवी त्यांना कुठल्याही सरकारी फितीतून नाही, तर भद्रजनांच्या अलोट प्रीतीतून मिळाली.
 
बाबासाहेबांची अभ्यासपूर्ण व्याख्यानं हा एक वेगळा विषय आहे. ओजस्वी वक्तृत्व, ओघवती शब्दकळा आणि प्रगाढ अभ्यास या त्रिवेणी संगमातून त्यांनी शिवचरित्रावर असंख्य व्याख्यानं गाजवली. प्रत्येक व्याख्यान म्हणजे रसरसता अंगारच जणू..... शिवचरित्र पुस्तकांमधून आणि बखरीमधून मुक्त होऊन गावागावात, कानाकोपऱ्यात, जनाजनात, मनामनात, इतकंच नाही तर ज्या माताभगिनी गर्भवती असतील, त्यांच्या गर्भापर्यंत पोहोचावं, यासाठी अफाट परिश्रम घेणारा हा तपस्वी शेवटच्या श्वासापर्यंत शिवमय होता. वयाच्या नव्वदीपार पोचूनही ज्ञानाचं अपचन न झालेला हा खराखुरा ज्ञानयोगी होता.
 
बाबासाहेबांना तरुणाईबद्दल विलक्षण कौतुक होतं. वय, मान, शिक्षण यासगळ्यापलीकडे जाऊन ‘महाराज’ हा एकमेव धागा त्यांना कोणाशीही जोडून द्यायचा आणि ते तासनतास गप्पा मारू शकायचे. कुठं एखादा नवीन दगड सापडला, कुठं एखादं दुर्मिळ पत्र असल्याची खबर मिळाली किंवा कुठं एखाद्या जुन्या किल्ल्याचा शोध लागला की, स्वारी कसलीही पर्वा न करता सायकलवर बसून त्या दिशेस कूच करायची किंवा सामान्य माणसाप्रमाणे बसच्या तिकिटाच्या रांगेत उभी असलेली दिसायची. बरं, त्यात कुठंही इतिहास संवर्धनाचा आव नाही की आपकौतुकाचा ताव नाही..... एकच भाव, निस्सीम तळमळ..... ही वेडंही अजबच म्हणावी अशी !
 
पण अशी वेडीपिशी माणसंच इतिहास घडवतात, असं आपण नेहमीच ऐकतो. इथं तर साक्षात इतिहास यांचं बोट धरून चालत होता. ही माणसं कधीच इतिहासजमा होत नाहीत, ती खऱ्या अर्थानं ऐतिहासिक होतात..... महाराजांप्रमाणेच त्यांचा हा निस्सीम उपासकही 'श्रीमंत योगी' म्हणून जगला आणि तसाच महाराजांच्या चरणांशी आपली सेवा रूजू करण्यासाठी निघून गेला.
 
जगदंब जगदंब जगदंब....!!
लेखनसीमा !
- अक्षय संत