दिव्या दिव्या दीपत्कार...

युवा विवेक    02-Nov-2021   
Total Views |
दिव्या दिव्या दीपत्कार...

dipawali_1  H x 
आजपासून वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सणाचा शुभारंभ होतोय. दिवाळी.... दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा सण.... तसा प्रत्येक सण आनंदाचाच असतो; पण माझ्यासारख्या अनेकांच्या भावविश्वात दिवाळीचं स्थान फार वेगळं आहे.
साधारण दसऱ्यापासून थंडी आणि दिवाळीचे वेध एकदमच सुरु होतात. हवेतला उबदार गारवा आणि रस्त्याकडेला बांधलेले सुबक आकाशकंदील दिवाळीची द्वाही फिरवत येतात. घरांच्या खिडक्यांमधून भाजणी भाजल्याचे, खमंग रव्याचे आणि चिवड्याचे वास गल्लोगल्ली दरवळायला लागतात. पण दिवाळीची खरी चाहूल लागते ती कोजागिरी पौर्णिमेपासून..... आभाळातला पूर्ण चंद्र लक्ष्मीसोबत ‘को जागर्ति’ म्हणत अलगद जमिनीवर उतरतो आणि शरदाच्या टिपूर चांदण्यात दिवाळीच्या दीपांची पखरण करून जातो. हळूहळू पावलं बाजाराची वाट चालू लागतात. नवीन कपड्यांचा आणि दिवाळी अंकांच्या पानांचा कोरा गंध दिवाळीच्या आधीच त्या वातावरणात घेऊन जातो. फटाक्यांची दुकानं सजू लागतात, लहान मुलांचे गोड हट्ट ऐकू येतात, कळत नकळत एकमेकांत फटाक्यांची स्पर्धाही रंगू लागते. हा सगळा काळच बाकीच्या दिवसांपेक्षा खूप वेगळा असतो..... एखाद्या परीकथेतल्या मंतरलेल्या जगासारखा.....
माझ्या दिवाळीच्या आठवणी अशाच मंतरलेल्या आहेत. २००७-२००८ साली पुण्यात ‘एशियन फिल्म फेस्टिव्हल’ नावाचा आठ दिवसांचा सिनेमा महोत्सव चालायचा. दिवाळीच्या आधीचे आठ दिवस हा महोत्सव असायचा. इराणपासून जपानपर्यंत देशोदेशीच्या उत्तमोत्तम चित्रपटांची मेजवानी या महोत्सवात अनुभवायला मिळायची. मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी म्हणून आम्हाला कॉलेजकडूनच त्या महोत्सवाला पाठवलं जायचं..... ते आठ दिवस जाम भारी असायचे..... दिवसभर फक्त सिनेमा, सिनेमा आणि सिनेमा..... दिवसाला आठ आठ फिल्म्स बघून रात्री सिटी प्राईडच्या कट्ट्यावर मस्त दिवाळीची हवा अनुभवत गप्पा रंगायच्या. तिथून घरी चालत येताना आजूबाजूच्या घरांच्या बाल्कनीमधले, दुकानांच्या दारांवरचे आकाशकंदील डुलताना दिसायचे. दिवसभराच्या सिनेमांची धुंदी डोक्यात रेंगाळत असायची आणि दिवाळीचे वेध मनात घुमायला लागायचे.
त्याही आधी लहानपणी शाळेला वीस दिवसांची सुट्टी असायची.... मे महिना आणि दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे वर्षाच्या मैफिलीतले दोन बडे ख्याल.... शाळेच्या शेवटच्या दिवशी रिक्षावाले काका सगळ्या पोरांना आईस्क्रीम किंवा भेळ खायला न्यायचे आणि मग खाताखाता प्रत्येकाचे सुट्टीतले प्लान्स ठरायचे. यात अर्थातच, दिवाळी सुट्टीतल्या अभ्यासाचा आणि सहामाही परीक्षेसारख्या दुष्ट विषयांचा अजिबात उल्लेख नसायचा. घरी आल्याआल्या भरपूर कामं पडलेली असायची. किल्ल्यासाठी पोतं शोधायचं, माती आणायची, किल्ल्यातली चित्रं घेण्यासाठी आईबाबांकडे सेटिंग लावायची, सुट्टीत वाचायची म्हणून ठरवलेली पुस्तकं एकत्र करून ठेवायची, आईला फराळात छोटी-मोठी मदत करायची, काय लागेल ते छोटंछोटं सामान आणून द्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फटाक्यांची यादी बनवायची.... आता एवढ्या बिझी शेड्युलमधून दिवाळीच्या अभ्यासाला वगैरे वेळ काढायचा तरी कसा? अनेक कुशाग्र वर्गमित्र दिवाळीच्या आधीच सगळा अभ्यास उरकून घेत असत. ते नक्कीच पुढं जाऊन एमबीए किंवा इंजिनिअर होऊन ‘यूएस’ मध्ये ‘सेटल’ झाले असतील. आमची अभ्यासापेक्षाही महत्वाची प्रायोरिटी असायची ती संध्याकाळी ग्राउंडवर जागा मिळवायची.... बाकी अभ्यास वगैरे गोष्टी दिवाळी संपल्यावर त्या नॉस्टेल्जियामध्ये होऊन जायच्या.
दिवाळीच्या पहाटे पहिला फटाका कोणी लावायचा, हा एक स्वतंत्र स्पर्धेचा विषय असायचा आणि त्याला वर्गात पहिला नंबर येण्याइतकाच बहुमान होता. अर्थातच, ओव्यांच्या कवीप्रमाणे हा पहिला फटाकावीरही कायम अज्ञातच असायचा आणि त्यामुळे तो बहुमान प्रत्येक जण आपापल्या नावावर स्वतःहूनच लावून घ्यायचा. जी गोष्ट फटाक्यांची, तीच गोष्ट किल्ल्याची.... कोणी कुठला गड बांधला, यावर अनेक वाद-विवाद होऊनही प्रत्येकाची आपापल्या गडाबद्दलची थिअरी ठाम असायची.... त्यामुळे अख्ख्या वाड्यात तीन-चार रायगड, दोन-पाच सिंहगड आणि एखाद-दुसरा प्रतापगड सहज असायचा. पाण्याची कमी असल्यामुळे सिंधुदुर्ग किंवा जंजिऱ्याच्या भानगडीत फार कोणी पडत नसे; पण प्रत्येक किल्ल्यागणिक क्रिएटीव्हिटी शिगेला पोहोचलेली दिसायची. चिमूटभर अळीव टाकून केलेल्या जंगलातल्या गुहेतून बाहेर पडणारा वाघ जमिनीवरच फतकल मारून बसलेल्या भटजीबुवांकडे करुणेनं बघत असायचा, त्या दोघांच्या शेजारून एक गौळण निवांत चालत जात असायची आणि बुरूजावरचा मावळा वाघाऐवजी चुकून गौळणीवरच तोफ रोखून उभा असायचा. हे सगळं किल्ल्यावर बसलेले महाराज बघत नसायचे, कारण त्यांची नजर समोरच्या किल्ल्यावरच्या महाराजांवर रोखलेली असायची. कधी कधी तर वाटायचं, रात्री आम्ही झोपल्यावर दोन समोरासमोरच्या किल्ल्यांवरची मंडळी मधोमध बसून गप्पा मारत असतील.....!
वय वाढत गेलं तशी ही मंडळीही एकमेकांना भेटेनाशी झाली. मनातल्या स्वप्नांचे इमले इतके उंच होत गेले की, तो किल्ला त्यांच्यामागे कुठं दडून बसला, कळतही नाही..... आता ऑनलाइन दिवाळी अंक वाचता येतात, त्यामुळे तो गुळगुळीत कव्हरचा स्पर्श, आतल्या पानांचा वास आणि कव्हरवरची ती सुबक चित्रं, हे सगळं कमी झाल्यासारखं वाटतं..... रोज गाड्यांवरून फिरताना नाही आठवत, पण फटाके म्हटलं की, आता यादी न आठवता प्रदूषण आठवतं.... तरीही अजून तशीच उबदार थंडी पडते, अजूनही कोजागिरीला चांदण्याची पखरण होते, अजूनही भाजणीचे आणि रव्याचे हवेहवेसे वास दरवळतात आणि अजूनही ‘दिव्या दिव्या दीपत्कार’ ऐकलं की, हातात फुलबाज्या झुलवत ‘दिन दिन दिवाssssळी’ असं जोरात ओरडावंसं वाटतं.
आपणा सर्वांना दीपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा.....
- अक्षय संत