कल्पवृक्ष

युवा विवेक    23-Nov-2021   
Total Views |

कल्पवृक्ष

 
kalpavruksha_1  

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला

लता मंगेशकर....

संगीतकार सज्जाद हुसेन त्यांच्या प्रतिभेइतकेच फटकळपणासाठीही प्रसिद्ध होते.... शिरीष कणेकरांनी त्यांना एकदा सहजच विचारलं, ते अमुक एक गाणं तुम्ही संध्या मुखर्जीकडून गाऊन घेतलंयत का हो? एका क्षणात उत्तर आलं, हम किसी संध्या या सुबह मुखर्जी को नही जानते, हम सिर्फ लता से गाना गँवाते है.....

आर.डी. बर्मन यांना लता मंगेशकर आणि आशा भोसलेंबद्दल विचारलं असता त्यांचं उत्तर होतं, लता मंगेशकर म्हणजे संगीतातल्या ब्रॅडमन आणि आशा भोसले म्हणजे सोबर्स....

बडे गुलाम अली खान हे भारतीय शास्त्रीय संगीतातलं एक मातबर प्रस्थ.... एकदा लतादीदींचीची रेकॉर्ड ऐकता ऐकता ते उत्स्फूर्तपणे ओरडले, अल्ला ने क्या आवाज दियी है, कंबख्त कभी बेसुरीही नही होती....

एक दिवस संगीतकार अनिल विश्वास आणि दीदी लोकलमधून गोरेगाव फिल्मसिटीला चालले होते..... बांद्रा स्टेशनवर दिलीपकुमार गाडीत चढले आणि या उभयतांना पाहून त्यांच्याच डब्यात येऊन बसले.... अनिलदा गप्पा मारता मारता दीदींच्या गाण्याची स्तुती करू लागले. दिलीपकुमारनं एकदा दीदींना आपादमस्तक न्याहाळलं आणि म्हणाले, 'ते सगळं ठीक आहे, पण या महाराष्ट्रीयांच्या उर्दूला नेहमी डाळभाताचा वास येतो....' दीदींना हा उपहास झोंबला, पण त्यातून तिनं योग्य तो धडा घेतला.... ताबडतोब एका मौलवींकडे उर्दूची शिकवणी सुरू केली. आजही त्यांच्या कोणत्याही गाण्यात, सुराइतकेच शब्दोच्चारही अस्सल असल्याचं जाणवतं.....

वयाच्या सहाव्या वर्षी लतादीदींनी पाहिलेला के.एल. सैगल यांचा पहिला चित्रपट : चंडीदास..... तो पाहून घरी आल्यावर त्यांनी लगेच जाहीर केलं, मोठी झाल्यावर मी सैगलशीच लग्न करणार....

त्यांनी आपकमाईमधून पहिला रेडिओ खरेदी केला... मोठ्या हौसेनं घरी आणून ऑन केला आणि पहिलीच बातमी आली सैगलच्या निधनाची.... तत्क्षणी त्यांनी रेडिओ बंद केला आणि दुसऱ्याच दिवशी बाजारात जाऊन तो अपशकुनी रेडिओ विकून टाकला.....

लतादीदी पाच सहा वर्षांच्या होत्या तेव्हाची गोष्ट.... त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर, त्या काळातल्या संगीत रंगभूमीवरचे सुपरस्टार होते.... एक दिवस ते आपल्या एका शिष्याला पूरिया धनश्री शिकवत होते..... त्याला गायला सांगून ते काही कामासाठी बाहेर गेले.... दीदी तिथंच शेजारी खेळत होत्या... शिष्य गाताना काहीतरी चुकत होता... एकदोनदा असा प्रकार झाल्यावर त्या खेळणं सोडून आत गेल्या आणि त्याला म्हणाल्या, हे असं नाही गायचं, थांबा, मी दाखवते, असं म्हणून गायलाच लागल्या... इतक्यात त्यांचे वडील घरी आले... त्यांचा त्यांच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता....

दुसऱ्या दिवशी पहाटेच वडिलांनी त्यांना उठवलं आणि तानपुरा घेऊन समोर बसवलं.... त्यांच्या शिक्षणाच्या श्रीकाराच्या वेळी वडिलांनी त्यांना एक मोलाचा गुरुमंत्र दिला, "जसा कवितेत शब्दाला अर्थ असतो, तसाच संगीतात सुराला.... कुठलंही गीत गाताना शब्द आणि सूर या दोन्हींमधल्या अर्थाचा आविष्कार झाला पाहिजे.... " दीदींनी आज्ञाधारकपणे मान डोलावली आणि वडिलांच्या संगीततपस्येतली एकेक ऋचा त्या शिष्याच्या नम्रतेनं आत्मसात करून घेऊ लागल्या.... पहाटेच्या प्रशांत वातावरणात, रात्र आणि दिवसाच्या सीमेवर उभा असणारा काळ त्यांच्या गळ्यातील पूरिया धनश्रीच्या स्वरांमधून बरसत होता....

आता दीदींचं संगीत शिक्षण जोरात सुरू झालं. रात्री तीन वाजता जरी नाटक संपलं तरीही वडील त्यांना पहाटे पाचच्या ठोक्याला उठवित असत. त्यांची सकाळची आन्हिके आणि देवपूजा आटपेपर्यंत ते दीदींना तानपुऱ्यावर सूर लावायला सांगत आणि त्यांची कामं उरकल्यावर स्वतः येऊन हार्मोनियम वाजवत त्याच्या तालावर एखादी चीज म्हणत असत.... सुरांच्या आवर्तनात दिवसांची प्रसन्न सुरुवात होत असे....

पण काळ बदलला.... त्यांच्या वडिलांची नाटक कंपनी फुटली, त्यांनी स्वतः सुरू केलेल्या कंपनीची नाटके पाठोपाठ अपयशी ठरू लागली.... त्याच काळात चित्रपट नावाचा चमत्कारिक खेळ बोलू लागला आणि साहजिकच या नव्या खेळाकडे लोक आकर्षित होऊ लागले.... अशा काळात वडील दीदींना गणेशोत्सवात किंवा छोट्यामोठ्या नाट्यसंगीताच्या जलशात आवर्जून घेऊन जात होते.... त्यांच्याकडून गाऊनही घेत होते.... नऊ वर्षांच्या एवढयाशा दीदी सराईतपणे वडिलांची गाजलेली पदं गाऊन दाद मिळवत होत्या....

पण अजून त्यांचं वय लहान होतं... आणि मास्टर दीनानाथांनी तिला व्यवसाय करण्यासाठी संगीत शिकवलं नव्हतं.... पण नियतीचे खेळ कोणाला कळतात हो.... एकेकाळी, जेव्हा सोन्याचा भाव वीस रुपये तोळे होता, त्या काळात आपल्या एकेका नाटकासाठी सत्तर हजार रुपये सहज खर्च करणारा आणि नागपूरपासून खानदेशपर्यंत जवळजवळ सर्व शहरांतल्या बँकांमध्ये खाती असलेला तो स्वरसूर्य आता अस्ताला जात होता. दहा पंधरा रुपयांसाठी आपलं गाणं गहाण ठेवायची वेळ त्या महान कलावंतावर आली होती, पण त्यांनी या गोष्टीची झळ आपल्या लाडक्या कन्येला कधीच लागू दिली नाही.... आपल्या कन्येसाठी लावलेला स्वरांचा कल्पवृक्ष सतत बहरत राहील, याकडेच त्यांनी कायम लक्ष दिलं...

अशाच निष्कांचन अवस्थेत वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.... त्यांच्या अंत्ययात्रेला फक्त सहाजण हजर होते.... ते गेले, परंतु जाण्याआधी लता मंगेशकर नावाच्या एका अजोड स्वरसम्राज्ञीला घडवून आपल्या अभिजात संगीताचा वारसा त्यांनी जपून ठेवला....

बाबांच्या पिंडाला कावळा शिवेना तेव्हा माईंनी म्हणजे दीदींच्या आईंनी, सगळ्या भावंडांना शपथ घ्यायला लावली, संगीताशिवाय आम्ही दुसरं काहीही करणार नाही.... ' माईंच्या श्रद्धेपोटी घेतलेला हा आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय पुढं सगळं आयुष्यच बदलून गेला.....

मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्स निर्मित बडी मां या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत पहिल्यांदा त्यांचं नाव झळकलं ते बालकलाकार म्हणून.... बेबी लता.... ज्येष्ठ गायिका नूरजहाँ तर तेव्हाच त्यांना म्हणाल्या होत्या, विनायकराव, मैं अभीसे बता रही हूँ, ये लता इक दिन बहौत बड़ी बनेगी....

ती संध्याकाळच विलक्षण होती.... संगीतातले सगळे अधिरथी महारथी त्या हॉलमध्ये एकत्र जमले होते..... वातावरणात एका अजिंक्य सम्राटाच्या स्वरमय आठवणींचा धूप रेंगाळत होता..... तेरा चौदा वर्षांच्या दीदी दोन वेण्या सावरत स्टेजवर आल्या आणि प्रेक्षागृहात हलकी कुजबुज सुरू झाली..... बाहेर अंगणात खेळत असताना कोणीतरी एकदम उचलून स्टेजवर उभं करावं, असे भाव दीदींच्या चेहऱ्यावर होते..... त्या शांतपणे माईकसमोर येऊन उभी राहिल्या... प्रेक्षकांमध्ये खसखस पिकली... ही गाणार?? या तांदळाएवढ्या चिमुरडीचं गाणं ऐकायला आलोय काय आम्ही? कोण आहे ही? दीदींच्या चेहऱ्यावर मात्र अबोध शांतता होती... डोळे मिटून त्यांनी क्षणभर आपल्या बाबांचं स्मरण केलं आणि पहिला सूर लावला... 'रवि मी... ' सारं प्रेक्षागृह क्षणार्धात स्तब्ध झालं... त्यांच्या एकाच सुरानं पूर्वसूरींच्या सगळ्या धुवट, चिकट कल्पनांना सुरुंग लावला... त्यांचा एकेक स्वर त्यांच्या बाबांची आठवण करून देत होता, पण त्यात कुठेही बाबांची नक्कल नव्हती... जे होतं ते स्वयंभू, त्यांचं स्वतःचं होतं... कापसाच्या ताग्यासारखी एकेक तान त्यांच्या गळ्यातून सरसरत जात होती आणि एका क्षणात समेची वीण जोडत होती... त्या संध्याकाळी भारतीय संगीतात एका ध्रुवचांदणीचा जन्म झाला...

लतादीदींनी आपलं पहिलं गीत गायलं त्याला आता सत्याहत्तर वर्ष होऊन गेली... सन १९४४... चित्रपट : गजाभाऊ..... मराठी चित्रपटातील एक देशभक्तीपर हिंदी गीत.... गीतकार : पंडित इंद्र, संगीतकार : दत्ता डावजेकर.... तसंच हिंदी चित्रपटातलं पहिलं गीत गायलं ते आप की सेवा में या चित्रपटासाठी.... साधारण त्याच काळात....

बघता बघता पाऊण शतक उलटलं.... आज लतादीदींच्या भूपाळीच्या सुरांनी सारा देश जागा होतो आणि त्यांच्याच भैरवीच्या अंगाईत अलगद विसावतो..... दिवसातल्या प्रत्येक क्षणाला आणि मनातल्या प्रत्येक भावभावनेला त्यांच्या सुरांचं अदृश्य कोंदण लाभलेलं आहे.... त्या सुरांची संगत गेली सत्याहत्तर वर्षं सावलीसारखी वावरतीय आपल्यापैकी प्रत्येकाच्या आसपास..... नक्षत्रांचं देणं नक्षत्रांनाच अर्पण करण्याचा संकल्प प्राजक्त बनून दरवळतोय अजूनही.....

आज वयाच्या नव्वदीतही त्या तशाच आहे..... त्याच त्या तेरा चौदा वर्षांच्या कोवळ्या चिमुरडीसारख्याच..... कोणी त्यांना गानकोकिळा म्हणतं, कोणी स्वरसम्राज्ञी तर कोणी फक्त लतादीदी... त्या अजून तशीच आहेत... मास्टर दीनानाथ नावाच्या आदिम महावृक्षाला बिलगून बसलेल्या स्वयंभू स्वरलतिकेसारख्या...

कल्पवृक्ष कन्येसाठी

लावुनिया बाबा गेला

अक्षय