खोली

युवा विवेक    30-Nov-2021   
Total Views |
खोली
 

kholi_1  H x W: 
परवा घरी पुस्तकं ठेवायला म्हणून नवीन कपाट घेतलं. एकेक पुस्तक लावत असताना ते कितीही जुनं असलं तरी, उघडून पानांचा वास घ्यायची सवय त्या पुस्तकाइतकीच जुनी, अशी खूप नवीजुनी पुस्तकं हाताला लागत होती आणि बघता बघता लहानपणीच्या आठवणीत नेत होती.... आमच्या वाड्यातल्या दोन खणी घरामधल्या माळ्यावरच्या खोलीची आठवण !
नुकताच मी तिसरीतून चौथीत गेलो होतो. स्कॉलरशिप परीक्षेसाठीच्या वर्गात माझी निवड झाली होती. त्यावेळी माझ्या अभ्यासासाठी म्हणून घरातल्या माळ्यावरचं सामान कमी करून एक स्वतंत्र खोली बनवण्यात आली आणि पुढची सहा वर्षं म्हणजे आम्ही ते घर सोडेपर्यंत ती खोली माझ्या बालपणाचा एक अतूट साथीदार बनली. उतरत्या छपराची, बाजूला भंगारसामान असलेली, मध्ये लाकडी पार्टिशन टाकून बनवलेली आणि जाळीच्या छोट्याशा खिडकीचा कोनाडा असलेली ती बुटकीशी खोली मी आजतागायत विसरू शकत नाही. त्या खोलीत जायला एक काळा, लोखंडी जिना बनवला होता. त्याच्या पायऱ्या म्हणजे घरातली माझी बसायची सगळ्यात आवडती जागा..... कारण त्या पायऱ्यांच्या शेजारीच एका कोनाड्यात आमचा टेपरेकॉर्डर होता. तिथं बसून मी तासनतास कॅसेट्स ऐकायचो. आमच्याकडे तेव्हा कॅसेट्सचं मोठ्ठं कलेक्शन होतं. गदिमांचं मंतरलेल्या चैत्रबनात, पुलंचं असा मी असामी, बाबासाहेबांचं जाणता राजा, शिरीष कणेकरांचं माझी फिल्लमबाजी एवढंच नाही तर बाबांनी कुठून कुठून रेकॉर्ड करून आणलेल्या शास्त्रीय संगीताच्या अनेक कॅसेट्सही तिथंच बसून ऐकल्या. आताचे सुप्रसिध्द गायक आनंद भाटे यांच्या त्यावेळच्या मैफिलींच्या (अर्थातच, त्यावेळी ते आजच्याइतके प्रसिध्द नव्हते....) कॅसेट्सही तेव्हाच ऐकायला मिळाल्या. संपूर्ण पुलं किंवा फिल्लमबाजी आजही मला तोंडपाठ असण्यात त्या पायऱ्यांचा फार मोठा वाटा आहे. काही काही जागाच अशा अविस्मरणीय असतात आपल्या आयुष्यात.
 
 
माझ्यासाठी तो काळा जिना आणि वरची खोली या दोन्ही जागा खूप स्पेशल आहेत. जिना चढून वर गेलं की समोर ती खोली दिसायची. एका बाजूला भिंतीवर खिळे ठोकून बसवलेलं एक मोठ्ठं लाकडी कपाट होतं. माझ्या वह्यापुस्तकांचं कपाट.... कपाटाच्या आतल्या बाजूला दारावर दोन फोटोज होते. एक किशोरकुमारचा आणि एक ज्युलिया रॉबर्ट्सचा. त्यांच्या कॅसेट्सच्या कव्हर्सवरून कापून चिकटवलेले..... हो, त्यावेळी माझ्याकडे 'माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग’च्या गाण्यांचीसुद्धा कॅसेट होती.
 
 
कपाटाच्या आतल्या बाजूला माझी सगळी पुस्तकं नीट लावून ठेवलेली असायची. कपाट उघडलं की पुस्तकांचा, लाकडाचा आणि कपाटाला दिलेल्या रंगाचा, असा संमिश्र वास एकदम नाकात शिरायचा. मला तो वास त्या खोलीचाच वाटायचा, अजूनही वाटतो. पुस्तकांमध्ये सगळ्यात वरती असायचं ते शांता शेळकेंनी अनुवाद केलेलं 'चौघीजणी'... मी ‘चौघीजणी’ पहिल्यांदा वाचलं ते त्याच खोलीत बसून, अभ्यासाच्या पुस्तकात लपवून! आणि मी ‘चौघीजणी’ च्या आकंठ प्रेमात पडलो. विशेषत: त्यातल्या ज्यो च्या.... तिच्याकडेही माझ्यासारखीच एक माळ्यावरची खोली असते आणि तिलाही लिहायला-वाचायला खूप आवडतं, हे कळल्यावर तर ती अजूनच भारी वाटायला लागली मला, असं वाटायचं की,त्या खोलीत मी असताना ती सतत माझ्या आसपास कुठंतरी आहे असे खूप काय काय होतं! प्रत्यक्ष नसतानाही त्या खोलीत माझ्या अवतीभोवती रेंगाळत राहणारं.... ‘चौघीजणी’ तली ज्यो, ‘बखर बिम्मची’ मधले बिम्म, बेम्म आणि बूम्म, ‘वनवास’ चा म्याड लंपन आणि त्याची ‘कित्ती छान, पिकलं पान’ म्हणणारी सुमी, गोर्कीच्या ‘आई’ मधला पावेल ब्लासोव्ह आणि त्याची आई, तोत्तोचान, गोट्या, चिंगी, बोक्या सातबंडे, फास्टर फेणे आणि असे कितीतरी जण आणि कितीतरी क्षण. त्याच खोलीत बसून वहीच्या मागच्या पानांवर कविता लिहिणं सुरु झालं. 'ज्यो'सारखं त्या कविता लाल रिबिनीत गुंडाळून कपाटात ठेवून देण्याची सुरुवातही तेव्हाच झाली..... कधी कधी मी अभ्यासाला म्हणून वर जायचो आणि वहीत एखादं पुस्तक लपवून वाचत बसायचो. वाचतावाचता तंद्री लागायची आणि एकदम ‘जरा वही वर उचल’ असा आईचा आवाज ऐकू आला की, पुस्तक लपवताना जाम तंतरायची. मला आजही आठवतंय, त्याच खोलीत बसून पहिल्यांदा ‘स्वामी’ वाचताना शेवटच्या सतीच्या प्रसंगाला मी रडलो होतो.
 
बघता बघता काही वर्षं गेली. त्या वेळी आमच्या समोर राहणाऱ्या कुटुंबातला मुलगा आमच्याकडे अभ्यासाला म्हणून यायला लागला होता. तोही माझ्याचबरोबर माळ्यावर बसायचा. एक दोन वर्षांनी मोठा होता माझ्यापेक्षा तो! त्याचा अभ्यास कमी आणि बडबडच जास्त चालायची. त्यामुळे हळूहळू माझंही वाचनात लक्ष लागेनासं व्हायचं, म्हणून तो असताना मी पुस्तकं वाचणंच बंद केलं. बोलता बोलता मध्येच तो गोविंदाची गाणी घोगऱ्या आवाजात म्हणायला लागायचा किंवा अमक्याला कसा हाणला आणि तमक्याच्या कानाखाली कसा जाळ काढला, अशा हिरोगिरीच्या गोष्टी सांगायचा. सगळ्याचं भरतवाक्य ठरलेलं असायचं, ‘मुंबई कं किंग कौन? भिकू म्हात्रे....’ त्या वेळी ‘सत्या’ बघितला नसला तरी त्याचं ते भरतवाक्य मलाच इतकं पाठ झालं होतं की, पुढेपुढे त्यानं चितळे मास्तरांसारखा प्रश्न विचारला की, मीच ‘भिकू म्हात्रे’ म्हणून ओरडायला लागलो होतो. एक दिवस त्यानं त्याचं दप्तर पुढं ओढलं आणि ‘तुला एक गंमत दाखवतो, पण कोणाला सांगू नको हां....’ असं म्हणत आतून एक लांबलचक, चकाकती गुप्तीच बाहेर काढली आणि माझ्यापुढे नाचवत म्हणाला, ‘काय? कडक आहे की नाही.... कशी आहे??” भीतीनं माझी दातखीळ बसली होती आणि हा महाभाग ती गुप्ती हातात चिमटा धरल्यासारखी धरून वर मलाच विचारत होता, 'तुला हवी का एखादी?'
 
 
तोपर्यंत असं काही कधीच त्या खोलीत घडलं नव्हतं. त्या खोलीनं, त्या घरानंच असं काही कधी पाहिलं नव्हतं, ऐकलं नव्हतं. आजवर गीतरामायण किंवा वपु-पुलंच्या आवाजाला सरावलेलं ते घर एकदम ‘मुंबई का किंग कौन?’ ऐकत होतं आणि एका पंधरा-सोळा वर्षांच्या मुलाच्या हातात चकाकती गुप्ती आलेली बघत होतं. आता त्या खोलीत वेगळेच वास, वेगळेच श्वास भिनले होते. त्या खोलीतच नाही तर बाहेर खूप काही बदलत होतं.... बदलणार होतं. ही फक्त एक झलक होती.
  
पुढं काही वर्षांनी आम्ही ते घर सोडलं. घरातलं सगळं सामान हलवलं होतं. सगळं घर भकास, रिकामं दिसत होतं. मी एकटाच त्या खोलीत गेलो. पूर्ण रिकामी खोली; पण अनेक आवाजांनी भरलेली! ज्योच्या, बिम्मच्या, रमामाधवांच्या, बिम्मच्या. लंपन-सुमीच्या, किशोरच्या, पुलंच्या आणि माझ्यासुद्धा! समोर उघडं कपाट होतं. आतमध्ये किशोर आणि ज्युलिया होते फक्त! बाकी सगळं रिकामं! मी दोन्ही फोटोज काढून खिशात ठेवले आणि माझ्या नेहमीच्या जागेवर बसलो. खूप रडायला येत होतं, पण डोळ्यांत पाणीच नव्हतं. आतून नुसते कढ उठत होते. ती माझी आणि त्या खोलीची शेवटची भेट! त्यानंतर आम्ही भेटत गेलो, ते फक्त पुस्तकांच्या वासात, आठवणींत आणि स्वप्नांत; पण आज त्या खोलीची आठवण आली की, दोन स्मृतिचित्रं डोळ्यांसमोर कायम तरळतात. पुस्तकांनी भरलेलं कपाट आणि गुप्तीचं चमकणारं पातं.
- अक्षय संत