'शाम ए अवध' : विखुरलेली रंगकथा

युवा विवेक    09-Nov-2021   
Total Views |
'शाम ए अवध' : विखुरलेली रंगकथा

sham e awadh_1  
अमीरजादा खोलीतून बाहेर आला आणि जिन्यावरून खाली उतरू लागला. बाजूच्या भिंतीवर जुन्या मैफिलींची मोठमोठी पेंटिंग्ज लावलेली होती. रिहानाजानच्या तारुण्यातली..... अमीरजादा एकेक पेंटिंग पाहात खाली उतरत होता. इतक्यात त्याची नजर एका पेटिंगवर स्थिरावली. काही वेळ तो त्या पेंटिंगकडे एकटक पाहात राहिला. खालच्या बाजूनं सारंगीचे स्वर ऐकू येत होते. तंबोरयाच्या तारा छेडल्या जात होत्या. रिहानाजानचा पहिला षडज हवेलीभर घुमला, त्यावेळी अमीरजादा पेंटिंगमध्ये पूर्ण बुडून गेला होता.
 
भडक काळा रंग..... त्यावर ढग उतरल्यासारखे काही पांढरे पुंजके...... कोसळता पाऊस..... झाडांचे वारयानं आणि पावसानं थरथरणारे बुंधे चित्रातही स्पष्ट दिसत होते. वादळी रात्रीची भयाण अस्वस्थता सगळ्या चित्रावर आपली सावली पसस्न बसली होती. अशा कराल वादळातून आपली वाट शोधत जाणारा तो. अंगरखा, तुमान, शाल, काठी आणि लांब, त्रिकोणी टोपी..... त्याचे पाय मात्र दिसत नव्हते.... अंधारात बुझ्न गेले होते..... त्याचा चेहरा..... त्या चित्रात चेहरा नव्हता..... हात नव्हते.... त्या आकृतीला शरीरच नव्हतं..... सगळंच अधांतरी होतं.....
 
वादळ भेदत चालणारी, पायांना कोणतीच दिशा नसलेली मिर्झा गालिबची ती शरीरहीन आकृती पाहून अमीरजादा स्तब्ध झाला.....
 
रिहानाजानच्या भिजल्या स्वरातून मिर्झासाहेबांचा दर्द
चित्रातल्या पावसासारखा कोसळत होता.....
 
आये है बेकसी इ इश्क पे रोना, गालिब
किसके घर जायेगा सैलाब इ बला मेरे बाद......
 
अमीरजादा हळूहळू पायऱ्या उतरत खाली आला. दिवाणखान्यात मैफिल रंगली होती. गावातले ओळखीचे रईस चेहरे हातांवर बांधलेले गजरे हुंगत आणि हुक्क्याच्या धुराचे लोट हवेत सोडत रिहानाजानची गझल ऐकण्यात तल्लीन झाले होते. तिची मुलगी, शब्बो तिला तंबोरयावर साथ करत होती. अमीरजादा शांतपणे पावलं टाकत दाराकडे जाऊ लागला. इतक्यात मागून रिहानाजानचा आवाज त्याच्यावर येऊन आदळला.
 
रंज ओ गम को कभी अपना भी पता देते चलो
हम भी तो है बेसब्र तेरी महफिल में समाने को
किस मुँह से जाओगे, ज़रा हम भी तो सुने, जालिम
क्या कद्र तेरी है, तू ही बता, उस मैखार जमाने को.....
 
अमीरजादानं एकदा मागे वळून पाहिलं. सगळी मैफिल स्तब्ध झाली होती. फक्त शब्बोच्या तंबोरयाच्या तारा मंद झंकारत होत्या. रिहानाजान त्याच्याकडे पाहात होती..... एकटक..... क्षणभर अमीरजादाचं पाऊल अडखळलं, पण पुढच्याच क्षणी मैफिलीकडे पाठ फिरवून तो हवेलीच्या बाहेर निघून गेला.
 
रिहानाजान स्वतःशीच हसली आणि तिनं पुढच्या ठुमरीचा स्वर लावला. दिव्यांच्या प्रकाशात रिहानाजानची हवेली लखलखत होती. अमीरजादा हवेलीकडे पाठ फिरवून अंधाऱ्या वाटेनं टेकडी उतरत गाडीकडे जात होता..... मनात मात्र रेंगाळत होता तोच बिनचेहऱ्याचा माणूस!
 
चेहरा..... प्रत्येक चेहऱ्याची ठेवण वेगळी, लय वेगळी, लिहाज वेगळा..... लहानपणी एकदाच आपण प्रयत्न केला होता तिचा चेहरा पाहायचा.... हिज हायनेस सोबत घेउन गेले होते आपल्याला पहिल्यांदा तिच्या रंगमहालात..... ती रिहानाजान नव्हती.... खरं तर तिचं नावही आठवत नाही याक्षणी.... आठवतोय तो फक्त तिचा रंगमहाल!
 
रंगमहाल! कारंजाला वळसा मारून पुढं गेल्यावर दिसणारा हवेलीचा भव्य दिवाणखाना, मोठमोठी झुंबरं आणि
मखमली गालिचा..... 'हिज हायनेस'शेजारी आपणही बसलो होतो त्या आलिशान दिवाणखान्यात..... जाळीच्या ओढणीआडून खूप अंधुक दिसत होता तिचा चेहरा!
 
गोल, गोरापान, आरस्पानी.... बाकदार नाक, किंचित झुकलेली नजर..... तिनं ओढणीच्या आडूनच नजर वर उचलली आणि हिज हायनेसकडे पाहिलं.... सुरमई अंधाराच्या मधोमध दोन जळत्या शमा ठेवल्या होत्या..... पापण्यांचे पडदे फडफडताच त्या शमाही थरथरल्या आणि मंद हसण्याची किणकिण ऐकू आली.
पाठोपाठ रुणझुणत्या पैजणांसारखी एक झंकार....
 
"आज छोटे नवाब भी तशरीफ लाये है. लगता है, महफ़िल रंग लायेगी.... कनीज़ आपकी इजाजत चाहती है, अमीरजादा...."
 
शेवटचं वाक्य ती आपल्याकडे पाहात म्हणाली....
अमीरजादा! आपल्याला अर्थही माहित नव्हता त्या शब्दाचा आणि त्या क्षणापासून ती आपली पहचान बनली. आपलं नाव तयार झालं ते अमीरजादा! मैफलभर आपल्या मनात तोच एक शब्द रेंगाळत होता.... अमीरजादा..... त्याच नादात डोळे कधी मिटले गेले, कळलंही नाही.
 
अमीरजादा..... तो पुन्हा पुन्हा स्वतःचंच नाव गुणगुणत होता. रात्रीचा दुसरा प्रहर सुरु झाला तरी तो अजून तसाच बसून होता बुद्धीबळाच्या पटासमोर! पटावरची प्यादीही आता पेंगुळली होती, पण त्याला मात्र अजूनही झोपायचं नव्हतं. आपण झोपलो की पुन्हा ते स्वप्न दिसणार. तेच पेंटिंग. पुन्हा आपली झोप उडणार, पुन्हा आपण असेच अस्वस्थ होऊन इथेच येऊन बसणार. नकोच ते, पण का दिसतं ते पेंटिंग आपल्याला सतत स्वप्नात? काय अर्थ आहे त्याचा? एखाद्या वादळाची सुरुवात? की आपणच स्वत:पासून तुटत जात असल्याचा इशारा? का तुटतोय आपण? आणि हे आपल्याला जागेपणी कसं जाणवत नाही? अनेक प्रश्नांचं काहूर त्याच्या डोक्यात उठलं होतं, पण सगळेच प्रश्न त्या वेळी तरी अनुतरित होते.
 
तो उठला आणि मंद पावलांनी चालत आरशासमोर जाऊन उभा राहिला. आरशाशेजारची मेणबत्ती अजून जळत होती. त्याच प्रकाशात तो आपलं प्रतिबिंब पाहू लागला. आपलाच चेहरा! मानेपर्यंत रुळलेले केस, काळेभोर डोळे, किंचित अपरं नाक, केसांच्या मागे लपलेले छोटेसे कान, नाजूक ओठ, हनुवटीवरची दाढी आणि खुरट्या केसांनी झाकलेले गाल, चाळीशी मागे पडल्याच्या खूपच विरळ खुणा होत्या चेहऱ्यावर. नाही म्हणायला असतील काही चंदेरी केस, पण आता अंधारात ते शोधूनही सापडले नसते.
त्यानं आरशातल्या आपल्या डोळ्यांत डोळे मिसळले आणि तो एकटक पाहात राहिला.
एक अनोळखी परकेपणा दिसत होता त्याला स्वत:च्याच डोळ्यांत स्वत:बद्दल! जणू काही तो आरशात दुसऱ्याच कोणाचं तरी प्रतिबिंब पाहात होता. क्षणभर तो दचकला आणि अर्धे पाऊल मागे सरकला. त्यानं मागे वळून पाहिलं.
अंधाऱ्या खोलीत ते दोघेच होते. तो आणि त्याचं त्यालाच अनोळखी भासणारं प्रतिबिंब! आरशातला अमीरजादा त्या रंगमहालातल्या अमीरजादापासून खूप लांब आला होता.
- अक्षय संत