गीतांजली

युवा विवेक    11-Dec-2021   
Total Views |
गीतांजली
 

gitanjali_1  H  
भारताला पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली'बद्द्ल आपण कोणीही काहीही बोलू, लिहू शकत नाही...! नदीच्या प्रवाहाबद्द्ल आपण काय बोलावं? आपण नदीच्या पाण्याबद्दल बोलू शकतो.. नदीबद्द्ल बोलू शकतो... नदीच्या उगमाबद्द्ल बोलू शकतो.. नदीच्या काठांबद्दलही बोलू शकतो.. मात्र, आपण नदीच्या प्रवाहाबद्द्ल बोलू शकत नाही..!
 
बोलावं तरी काय? लिहावं तरी काय? सांगावं तरी काय? आणि ऐकावं तरी काय? वाचलेलं पचलंय असं वाटून आपण बोलायला जावं, तर बोलताना नवीन काहीतरी चिंतन सुरू होतं. लिहितानाही काही जुने संदर्भ नव्याने समोर येतात. 'आई'चा हात सतत पाठीवरून फिरत राहावा, असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. मात्र, घरापासून लांब राहणाऱ्या मुलाला ते शक्य नसेल, तर असं असताना 'गीतांजली' वाचताना त्याला एखाद्या वाक्यापाशी.. एखाद्या कवितेतून तेवढीच माया, ममता त्याला जाणवू शकते... त्याच वेळी 'विरह' म्हणजे काय हो? याचं उत्तर एखादा प्रियकर जसा देऊ शकतो.. तसा 'गीतांजली'चं मनन करणारा साधकही देऊ शकतो... देशप्रेम म्हणजे काय? हे जसं एखादा क्रांतिकारक सांगू शकेल, तसाच एखादा गीतांजलीचा वाचकही.. आणि परमेश्वर म्हणजे काय? हे जसं एखादा आध्यात्मातील साधक सांगू शकतो, अगदी तसंच 'गीतांजली'च्या वाटेवरून चालणारा एखादा ध्यानस्थही...!
 
प्राचार्य शिवाजीराव भोसले लिहितात, टागोर जीवनाचे उपासक होते. जीवन हेच त्यांचे दैवत होते. राम, कृष्ण, हरि, ब्रह्मा, अल्लाह, गॉड या परंपरागात शब्दसंहितेचा त्याग करून टागोरांनी 'जीवनदेवता' हे नाव आपल्या उपास्य दैवतासाठी निवडले. परमेश्वर म्हणजे तरी काय? आपले अपूर्णत्व असह्य झाल्यामुळे मनात आणि जीवनात आकारास येणारी परिपूर्णतेची प्रतिमा. 'God ia a primary datum of experience. We feel god as we feel ligt.'
'गीतांजली' हे रवींद्रनाथांनी केलेलं लिखाण नाहीच. रवींद्रनाथांचं हे चिंतनही नाही... 'रवींद्रनाथ' नावाच्या जीवनपद्धतीचं हे प्रकटीकरण आहे..! हा अमोघ वक्तृत्वाचा झरा आहे..! असं वक्तृत्व जे रवींद्रनाथांनी मौनात केलं..! आता मौनात वक्तृत्व कसं होऊ शकतं? याचं उत्तर तुम्हाला गीतांजलीतच मिळेल..!
 
जाता जाता 'गीतांजली'तलं एक रत्न...
आनंदाच्या सर्व छटा माझ्या शेवटच्या गाण्यात गुंफू दे - आनंद - जो अमर्याद विस्तारलेल्या गवताच्या कुरणातून पृथ्वीला प्रवाहित करतो.
आनंद - जो जन्म आणि मृत्यू या दोन जुळ्या भावांना या अफाट विश्वात नाचायला लावतो,'
आनंद, - 'जो वादळासारखा सर्व प्राणिमात्रांना जागे करतो आणि गदगदून हसायला लावतो.
आनंद - जो वेदनारूपी रक्त-कमलावर अश्रूंच्या समवेत स्तब्ध बसतो.
आनंद- जो नकळत नि:शब्दपणे स्वत:चे सर्वस्व धुळीत लोटून देतो.'
 
- मयूर, पुणे