रात अकेली है.....

युवा विवेक    14-Dec-2021   
Total Views |

रात अकेली है.....

 
night_1  H x W:

शहरावर हळूहळू रात्र उतरू लागते. वाऱ्यानं आता वेग पकडलेला असतो. स्ट्रीटलाइट्सच्या प्रकाशात त्यांच्याच खांबांच्या सावल्या भुतांसारख्या पसरलेल्या असतात. अशा वेळी तो अजून जागाच असतो. झोप डोळ्यांत उतरत असते, पण त्यातही सलगता नसते. कदाचित, काही क्षणांची सलगी मात्र म्हणता येईल. तो खिडकीत येतो. आजूबाजूच्या घरांकडे नजर टाकतो. त्या सगळ्या मातीच्या खोक्यांमधले दिवे कधीच विझलेले असतात. उगीच कुठेतरी एखादा छोटासा दिवा अंधाराला खूप हलकासा छेद देत जळत असतो. तो आकाशाकडे बघतो. आता झोपेशी सलगीचा काळ दूर गेलेला असतो. तो ताऱ्यांकडे एकटक बघत राहातो. दिवसभरात ऐकलेले, कानात घुमणारे सगळे आवाज तो थांबवायला जातो. त्यावेळी खरं तर तो काहीच नसतो. फक्त अथांग काळाच्या रेषेवरचा एक छोटा बिंदू...!

 

त्याचा, भूत-वर्तमान-भविष्य या कालरेषेवर एक छोटासा प्रवास घडतो. काही वेळानं मन या कालरेषेलाही जुमानेनासं होतं. या कालरेषेच्या पलीकडे काय असेल? किंवा कालरेषा वगळल्यानंतर काय उरतं? तो स्वत:ला शोधायला लागतो. रात्रीच्या शांततेत तो काहीतरी अगम्य, अज्ञात शोधत असतो, जे इथल्या साऱ्या भावभावनांच्या पलिकडे आहे. दिवसभराची ओझी वाहून तो थकलेला असतो; पण आता मात्र त्याला त्या ओझ्यांमागेही नक्की काय लिहिलं असेल, हे हवं असतं. सुख, दु:ख, वेदना, द्वेष, मत्सर, संताप, चीड, करुणा, प्रेम, हे सगळे फक्त शब्द आहेत का? फक्त शब्द?? मग जगायचं कशासाठी?

 

हळूहळू रात्र चढत जाते. पुन्हा एकदा झोप मी म्हणत असते. तो रूममध्ये येतो. झोपायला जातो, पण आडवं होऊन झोपावंसं वाटत नाही. त्याला हे नक्की माहिती असतं की, एकदा आपण झोपलो तर सकाळशिवाय काही उठत नाही आणि त्याला ही रात्रीची शांतता हातातून जाऊ द्यायची नसते. तोच वेळ तर त्याचा स्वत:चा असतो. अचानक त्याच्या डोक्यात दुसऱ्या दिवशी सबमिट करायच्या प्रेझेंटेशनचा विचार येतो. खरं तर तो आज त्यासाठीच नाईट मारतोय, पण आता त्याला त्याबद्दल विचार करायचाही जाम कंटाळा आलेला आहे. इतक्या रात्री कोणाला फोन करणंही शक्य नसतं, मग तो तसाच जागत बसतो. खोलीतल्या एका खुर्चीत बसून राहातो. त्याला डोळे मिटावेसे वाटतात. जड झालेले डोळे तसेही मिटत असतात. तो हळूहळू डोळे मिटतो. पुन्हा एकदा सगळे आवाज बंद करायचा प्रयत्न करतो. एक दीर्घ श्वास घेउन स्वत:ला शांत करतो. तो श्वासही असा घेतो की, जणू काही त्या रात्रीची शांतताच तो श्वासावाटे शोषून घेतोय. अगदी खोल, आतमध्ये.... अजूनही अनेक आवाज चालू असतातच... कॉलेजमधल्या आठवणी, ऑफिसच्या पार्किंगमध्ये उभं राहून घातलेले पॉलिटिकल वाद, नुकत्याच पाहिलेल्या फिल्म्स, मित्रांबरोबर केलेल्या पार्टीज आणि त्यात चघळलेली गॉसिप्स... असे अनेक विषय डोकी वर काढत असतात; पण तो त्या विचारांकडे अलिप्तपणे, 'अनएडिटेड फिल्म' पाहिल्यासारखा पाहत बसतो. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवायला तो स्वत:ला सक्त मनाई करतो. थोडावेळ हे असंच चालू राहतं. नंतर कधीतरी तो या गुंत्यातून स्वत:ला अलगद सोडवून घेतो. रात्र आता त्याच्या शरीरात भिनू लागलीय. बाहेर थंड वारं सुटलंय; पण आता तो ती थंडीही अनुभवतोय. तिचीही मजा घेतोय. इतका वेळ तो झोप टाळायचा प्रयत्न करत असतो.... ती कधी येते तर, कधी त्याच्यापासून दूर पळते; पण आता मात्र, एका क्षणी ती त्याच्या पापण्यांवर त्याच्याही नकळत उतरते आणि तो स्वत:ला त्या रात्रीनंच त्याला बहाल केलेल्या अज्ञात समाधानात झोकून देतो. तोही एक रात्र होतो.... रात अकेली हैं....!

- अक्षय संत