स्त्रीप्रधान चित्रपटांची चौकट मोडणारा गोड 'झिम्मा'

युवा विवेक    02-Dec-2021   
Total Views |

स्त्रीप्रधान चित्रपटांची चौकट मोडणारा गोड 'झिम्मा'

 
jhimma_1  H x W

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा २००४ मध्ये 'अगं बाई.. अरेच्चा!' हा 'व्हॉट वीमेन वाँट' या हॉलिवूडपटावर साधारणपणे आधारित असलेला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. श्रीरंग देशमुखला देवीच्या आशीर्वादाने अचानक स्त्रियांच्या मनातलं ऐकू येऊ लागतं, ही भन्नाट संकल्पना या चित्रपटात होती. स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांवर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं होतं. कट टू २०२१. गेल्याच आठवड्यात हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला 'झिम्मा' हा मराठी चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. सुहास जोशी आणि क्षिती जोग यांनी दोन्ही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, ही एक गोष्ट वगळली तर, दोन्ही चित्रपटांत तसं पाहता साम्य काहीच नाही. मात्र, इतक्या वर्षांत स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहण्यात झालेले बदल या स्थित्यंतरातून सहज दिसतात.

 

कबीरची एक ट्रॅव्हल कंपनी आहे. त्याच्या पहिल्याच टूरमध्ये सर्व बायका आहेत. वेगवेगळ्या वयोगटांतल्या. वेगवेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या. वेगवेगळ्या समस्यांचा सामना करणार्‍या. रमा ही मूळची मराठी, पण लग्न करून एका मोठ्या गुजराती कुटुंबात आलेली आणि त्या कुटुंबाचाच भाग झालेली. मीता विधवा. नवरा तीन वर्षांपूर्वी गेलेला. त्या धक्क्यातून अजून न सावरलेली आणि आत्मविश्वास हरवून बसलेली. निर्मला कोंडे-पाटील ही पश्चिम महाराष्ट्रातील एका राजकारण्याची पत्नी. वैशाली आणि मैथिली ही आई आणि मुलीची जोडी. स्वतःचे सगळे निर्णय स्वतः घेणारी कृतिका. इंग्लंडमध्येच राहणाऱ्या मुलाला केदारनाथला जातेय, म्हणून खोटं सांगून आलेली इंदू. मैथिलीचा होणारा नवरा निखिल हाही इंग्लंडमध्येच राहतो आहे. मात्र, तिथे फिरायला येऊनही तिला त्याला भेटायचं नाहीये. यातल्या प्रत्येकीची एक वेगळी कहाणी आहे. एक वेगळं दुःख आहे, त्यातून मार्ग काढण्याचा त्या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. या सर्व जणी एकमेकींना भेटतात, तेव्हा त्यांच्यात जुळणारे ऋणानुबंध, मध्येच उडणारे खटके आणि त्यातूनच त्यांची फुलत जाणारी मैत्री, अशी सगळी धमाल या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

 

अनेक पात्रांच्या गोष्टी, त्यांनी एका वळणावर एकत्र येणं आणि या सगळ्या गोष्टींना बांधणारा एक समान धागा असणं, ही गोष्ट सांगण्याची पद्धत तशी नवीन नाही. मात्र मराठीत असे मोजकेच प्रयोग झाले आहेत. 'झिम्मा' हा याच प्रकारातला एक फक्कड जमून आलेला प्रयोग. तो पाहायचा अशासाठी की हा चित्रपट आपल्याला माणसांमधलं वेगळेपण समजून घेऊन ते शांतपणे स्वीकारायला सांगतो. चित्रपट गोड तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक आहे. कुठेही तो बेगडी किंवा खोटा वाटत नाही. यातल्या सर्व स्त्रिया आपण आपल्या घरात, नातेवाईकांत, मैत्रिणींमध्ये, कलीग्जमध्ये पाहिलेल्या आहेत. मात्र, त्यांचं अस्तित्त्व आणि वेगळेपण जाणवून देण्याची महत्त्वाची भूमिका हा चित्रपट पार पाडतो. स्त्रियांच्या भूमिका असलेला म्हणून तो स्त्रीप्रधान चित्रपट एवढाच मर्यादित न राहता त्यांचं माणूसपण अधोरेखित करणारं काहीतरी सांगू पाहतो. पात्रांच्या स्वातंत्र्याविषयी बोलतानाच त्यांच्या आपापल्या हळव्या जागा दाखवतो. मात्र, त्याचा बाऊ करत नाही. त्या स्वीकारून पुढे जायला शिकवतो.

 

इथल्या प्रत्येकीची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी आहे, हे विशेष. तशी ती असतेच. मात्र, स्त्रीप्रधान चित्रपट प्रचारकी होण्याचा जो धोका असतो किंवा पुरुषांना खलनायकी ठरवून स्त्रीस्वातंत्र्य अधोरेखित केलं जातं, तसं इथे अजिबात होत नाही. इथे कुणाला स्वतःचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा आहे, तर कुणाला नातेसंबंधांमधला तिढा सोडवायचा आहे. कुणाला ही टूर म्हणजे आपल्या मुक्त आयुष्याचं तिकीट वाटतंय. तर, कुणासाठी ती आयुष्यात जे काही म्हणून करून पाहायचं राहिलंय, ते करून पाहण्याची संधी. प्रत्येकीची ही वेगळी कथा आणि व्यथा या झिम्म्यात अधिक गंमत आणते.

 

काही प्रसंगांचा विशेष उल्लेख करावा लागेल. निर्मलाचा टूरसाठी नवऱ्याकडून परवानगी काढण्याचा प्रसंग, मध्यंतरापूर्वीचा मीताचा प्रसंग, कृतिकाने निर्मलाच्या 'बंगी जंपी'वर सुरुवातीला हसणं आणि शेवटी तिनेच निर्मला तिचा कम्फर्ट झोन मोडायला भाग पाडणं, इंदू आणि वैशालीमधला वाद, निखिल, कबीर आणि मैथिलीमधल्या संवादांचे प्रसंग उत्तमरीत्या जमून आले आहेत.

 

इरावती कर्णिक या सुप्रसिद्ध लेखिकेने लिहिलेली पटकथा आणि अप्रतिम संवाद आणि त्याला लाभलेली हेमंत ढोमे यांच्या बहारदार दिग्दर्शनाची जोड यांमुळे 'झिम्मा'चा ताल कुठेही चुकल्यासारखा वाटत नाही. संजय मेमाणे यांच्या कॅमेऱ्याने ही टूर अतिशय नेत्रसुखद केली आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव या सर्वांच्याच अभिनयाने चित्रपटाला 'चार चाँद' लावले आहेत. त्यांना सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे आणि अनंत जोग यांची तितकीच मोलाची साथ लाभली आहे. 'अगं बाई.. अरेच्चा!'मधल्या श्रीरंग देशमुखपासून 'झिम्मा'मधल्या कबीरपर्यंत येताना एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. बायकांच्या बडबडीला वैतागलेला पुरुष कित्येक योजने चालून आल्यासारखा वाटतो. त्यांना समजून घेण्याच्या वाटचालीत दोन पावलं पुढे टाकल्यासारखा वाटतो. हा प्रवास प्रेक्षणीय तर आहेच, पण माणूस म्हणून समृद्ध करणाराही आहे. म्हणूनच हा 'झिम्मा' चुकवून चालणार नाही.

 

- संदेश कुडतरकर.