मी आणि संस्कृती....

युवा विवेक    21-Dec-2021   
Total Views |

मी आणि संस्कृती....


culture_1  H x  

सहावीच्या वर्गात असताना एक दिवस मराठीच्या ताई वर्गात आल्या. आम्ही दप्तरांमधून पुस्तकं काढण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी आल्या आल्या काही न बोलता फळ्यावर फक्त एक शब्द लिहिला. संस्कृती’..... सगळी मुलं गोंधळली. मराठीच्या ताई आज इतिहासाचा तास घेणार आहेत का, अशी कुजबुजही सुरु झाली. त्यातले चारदोन शब्द त्यांच्याही कानांवर गेले असावेत. कारण त्यांनी लगेच स्पष्ट केलं, तास मराठीचाच आहे, पण आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, पुस्तकं आत ठेवली तरी चालतील. लगेच पुस्तकं दप्तरांत परतली आणि संस्कृतीविषयाचा तास सुरू झाला. संस्कृती म्हणजे काय, त्यात कोणकोणत्या गोष्टी येतात, ती कशी तयार होते, कशी रूजते, कशी लय पावते आणि तरीही पूर्ण नष्ट न होता बदलत्या काळाला बदलत्या संदर्भांमधून पुन्हा पुन्हा कशी सामोरी येत राहते, यासगळ्याचा धांडोळा इयत्ता सहावीतली तेवीस मुलंमुली आणि एक ताई जवळजवळ वर्षभर घेत होतो. त्या वयात खूप गोष्टी कळत नव्हत्या, पण आपण काहीतरी वेगळं ऐकतोय, बघतोय, जगतोय, याचं पुसटसं भान येत होतं. त्याचाच एक भाग म्हणून सगळ्या वर्गानं मिळून चारही भिंतींना जोडणारी एक मोठ्ठी कालरेषा बनवली.... हो, अगदी हजारो वर्षांपासून ते तेव्हापर्यंत! इतिहासाचा मागोवा घेताना वर्तमान समोर दिसत होता आणि वर्तमानाशी इतिहास जोडताना भविष्याची दारं खुणावत होती. अर्थात, हे एवढं सगळं आपल्या आत घडतंय, हे समजण्याचं ते वयही नव्हतं, पण असंच काहीतरी घडत असावं का? किंवा आता मागे वळून पाहताना त्यावेळच्या भावनांना विचारांची कसोटी आल्यामुळे असं वाटत असेल? काहीही असो, पण संस्कृतीया माणसाच्या जगण्यातील अविभाज्य घटकानं तेव्हापासून आजपर्यंत अनेक कोडी घालून ठेवली आहेत.

 

बदलत्या काळात माणूस, त्याचं राहणीमान, त्याची विचारसरणी आणि अर्थातच, सामाजिक-आर्थिक परिस्थिती हे सगळं बदलत जातं, तसे संस्कृती या शब्दाचे संदर्भही बदलत असतातच. संस्कृती म्हणजे फक्त इतिहासाचा उदोउदो नाही. संस्कृती म्हणजे फक्त परंपरांचा जागर नाही किंवा संस्कृती म्हणजे फक्त बदलणाऱ्या पिढ्यानपिढ्या चिरंतन असलेला वादविषय तर मुळीच नाही. मुळात, संस्कृती म्हणजे वाद नाहीच, संस्कृती म्हणजे संवाद. अर्थपूर्ण संवादाला दिखाऊ वादाचं स्वरूप आलं की, संस्कृतीची विकृती व्हायला वेळ लागत नाही.

 

संस्कृती आणि विकृती या दोन्ही गोष्टी प्रत्येकानं आपआपल्या पिंडाला मानवतील इतपतच जपायच्या असतात. संस्कृतीचा संबंध इतिहास आणि भविष्य, दोन्हींशी असतो; पण तो जेवणातल्या मिठापुरताच. मिठानं जेवणाला चव येते म्हणून कोणी मिठान्नावर जगत नाही, तसंच आहे हे. इतिहासाने संस्कृतीची घडण होत असेल तर, भविष्याने तिचं कांडण करायचं असतं. तिच्यातली फोलफटं बाजूला फेकून फक्त रसरशीत दाणा तेवढा टिपायचा असतो; पण त्यासाठी फोलफट आणि दाणा यांचा नीरक्षीरविवेक असणारी नजर मात्र भक्कम हवी. नाही तर संस्कृतीचं विकृतीकरण किंवा विकृतीचं संस्कृतीकरण यांपैकी एक काही तरी किंवा दोन्ही होणं अटळ ठरतं. इतिहासाने आपल्याला काय दिलं याबरोबरच त्याने आपल्याकडून त्याबदल्यात काय नेलं, या दोन्हींचा डोळस हिशोब मांडणं गरजेचं असतं, तेव्हाच भविष्यात या देवघेवीत काहीतरी बदल संभवतो. ही देवघेव व्हायलाच हवी, त्याशिवाय वर्तमान संभवतच नाही, पण या देवघेवीचं स्वरूप कालानुरूप, अनुभवांनुरूप बदलायलाच हवं,. या सगळ्या प्रक्रियेत सर्वात मोठा अडसर तीनच शब्दांचा आहे. 'मी सांगतो/सांगते म्हणून....' पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींचे अर्थ जरी कालातीत असतील तरी त्यातल्या खाचाखोचा, त्यातले संदर्भ कालानुरूप बदलतातच ना..... कालानुरूप कशाला, व्यक्तीनुरूपही बदलतात. मग एकाचे अनुभव 'मी सांगतो/सांगते म्हणून...' दुसऱ्यानं घ्यायचे असतील तर दोन वेगळ्या जीवांच्या जन्माला अर्थच उरत नाही ना! प्रत्येक जीव जन्माला येतानाच त्याची संस्कृती आणि त्याची विकृती हे दोन्ही सोबतच घेऊन येत असतो. मनाची मशागत होईपर्यंतच्या काळात त्याला समाजातल्या विविध घटकांचा आधार आणि गाईडन्स मिळणं समजू शकतो, पण त्यानंतर प्रत्येकाचं जग हे त्याचं त्यानंच बांधलेलं असावं.आणि त्या जगात सगळंच आलं. कृती, संस्कृती, स्वीकृती, विकृती, सगळंच! सगळे घोडे एकाच तबेल्यात, एकाच पद्धतीनं वाढले तर, सगळेच रेस जिंकतील किंवा सगळेच हारतील. मग संस्कृती म्हणजे नियमांचा एक आंधळा साचा, इतकाच संकुचित अर्थ लावायला आपण मोकळे होतो का?

 

अजूनही तो सहावीचा वर्ग आठवतो तेव्हा कळतं, त्या वेळी शिकलेल्या संस्कृतीनं तेव्हाही आम्हाला विचार करायला शिकवलं, प्रश्न विचारायला शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, स्वतःची उत्तरं स्वतःलाच शोधायला लावली.

 

संस्कृती माणसाला राकट किंवा हेकट करत नाही, तो तिचा पिंडच नाही. तिचा पिंड नितळ मायेचा, आनंदाचा आणि अपार समृद्धीचा!

 

संस्कृतीनं आम्हाला काय दिलं? खूप काही!आम्ही तिला काय दिलं? आम्ही इतके मोठे नाही. काही ऋणं न फिटलेलीच बरी असतात!

- अक्षय संत