पथ प्रदीप - ओशो

युवा विवेक    25-Dec-2021   
Total Views |

दुमडलेल्या पानापाशी


osho_1 

पथ प्रदीप - ओशो

'ओशो'... या शब्दाचा अर्थ ज्याच्यावर देवांनी पुष्पवृष्टी केली असा होतो. म्हणूनच की काय त्यांना ऐकताना, वाचताना त्यांचे शब्द जणू आपल्यावर बरसताय, असा भास होतो..! 'ओशो रजनीश' या नावाला काय चिकटलेलं नाही? लोकांच्या अतीव प्रेमापासून निंदेपर्यंत, आदरापासून तिरस्कारापर्यंत, अभ्यासकांनी डोक्यावर उचलून घेण्यापासून अनेकांनी डोक्यातूनच काढून टाकण्यापर्यंत अनेक भिन्न-भिन्न बाबी या नावामागे आहेत...!

 

अनेक पुस्तकांचे लेखन, शेकडो प्रवचने, विविध विषयांवर विवेचन करणाऱ्या या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाला विषयांचं वावडं कधीच नव्हतं आणि कदाचित हीच बाब टीकेचा विषय झाली. संभोग, लैंगिक जीवन याबाबतचे ओशोंचे विचार प्रत्येकाला पटतीलच असं नाही; मात्र त्यामुळे संपूर्ण ओशो साहित्याकडे विचित्र नजरेने पाहणारे लोकच मला 'विचित्र' वाटतात. कारण, श्रीकृष्णापासून मीरेपर्यंत, रामायणापासून महाभारतापर्यंत, महावीरांपासून कबीरांपर्यंत, प्रेमापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपासून अमरत्वापर्यंतच्या अनेक विषयांवरचे ओशो त्यांनी वाचलेले नसतात. व. पु. काळेंसारखा लेखक ओशोंची प्रवचने ऐकून मुळापासून हादरला आणि त्यानंतर त्यांनी जे लिखाण केलं, ते एका वेगळ्याच उंचीवर गेलं..!

 

'पथ-प्रदीप' हे ओशोंचं असंचं एक पुस्तक.. हे पुस्तक म्हणजे ओशो यांनी मा योग सोहन यांना लिहिलेली शंभर बोधपद पत्रे आहेत. पावणे दोनशे पानाचं हे पुस्तक एका बैठकीत मात्र अजिबात संपवू नका. हळूहळू ते पचवा. कारण, ही एखादी कादंबरी किंवा कथा नाही. हे विचारमंथन आहे. घुसळून वर आलेलं लोणी आहे.. जे असं एकाच बैठकीत जिरवायचं नसतंच. ओशोंचे हे क्रांतिकारी विचार अनेकदा पटणारही नाहीत तुम्हाला, मात्र नंतर कळतं ही नाण्याची दुसरी बाजू आहे. आता हेच बघा न, 'मी अतृप्ती शिकवतो' या पत्रात ते म्हणतात.. 'मनुष्याने स्वत:वर असंतुष्ट व्हावयास हवे, तेव्हाच त्याची पावले परमेश्वराच्या दिशेने चालू लागतील. स्वत:वर संतुष्ट राहिला, तो नष्ट झाला.' 'आपण पशुत्वाला मागे टाकले आहे. यापुढे परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. पशू आणि परमेश्वर या दोन टोकांमधला क्ल्यू म्हणजे माणूस.'

 

'आदर्शविहीन व्यवहार भयावह होय' या पत्रांत ओशो लिहितात... श्वाइत्झरने ते म्हटले आहे, 'आदर्शांचे सामर्थ मोजता येत नाही. पाण्याच्या थेंबात आपल्याला कसलेही सामर्थ्य दिसून येत नाही; पण एखाद्या खडकाच्या चिरेत तोच थेंब साठून त्याचा बर्फ होऊ द्या. तो त्या खडकाला फोडल्याशिवाय राहणार नाही. आदर्शांचे असेच आहे. जोपर्यंत ते केवळ विचारांच्या स्वरूपात असतात, तोपर्यंत त्यांचे सामर्थ्य कळतच नाही. तेच विचार एखाद्याच्या कृतीतून उतरले, की भरीव स्वरूप धारण करतात.'

 

'क्षणभंगुर सुख' या पत्रात ओशोंनी रवींद्रनाथ टागोर यांचा दाखला देऊन म्हटलंय, रवींद्रनाथ लिहितात.. 'वर्षाबिंदू चमेलीच्या कानात कुजबुजला, 'प्रिये, मला सदैव आपल्या ह्रदयात ठेव.' चमेली काही बोलणार, तोच ती जमिनीवर गळून पडली.

 

असं वाचताना आपण खूप शांत आणि खूप गंभीर होत जातो हो! सुधीर मोघे आठवतात.. जे मनाला विचारतात, की तुझ्यासारखे गूढ सोपे होणे मज जमेल का? आता जे गूढ आहे ते सोपे कसं असेल न... पण यहीं तो बात हैं... म्हणजे अजून सोपं करून सांगू का... पेला अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा हे आपण पाहत असतोच... मात्र, पेल्यात पाणी आहे.. पाण्याला प्रवाह आहे.. प्रवाहाला वेग आहे.. तो कधी अल्याड, तर कधी पल्याड आहे.. हे सांगणारे ओशो असतात...!!

- मयूर भावे

© मयूर अनिल भावे.