नवे सूर, नवे तराणे

युवा विवेक    28-Dec-2021   
Total Views |
नवे सूर, नवे तराणे
 

nawe sur nawe tarane_1 
या वर्षातली आपली ही शेवटची भेट..... चारच दिवसांत नवीन वर्ष सुरू होतंय. नव्या वर्षाच्या डायऱ्या आणि दिनदर्शिका बाजारात केव्हाच दाखल झाल्या आहेत. एव्हाना जोडून आलेल्या सुट्ट्या, सणवार, लग्नामुंजीचे मुहूर्त आणि खिशावर पडणारे ताण यांची ताळेबंदी सुरू झाली असेल. काही लोक ‘ आम्ही नाही बुवा हे नवीन वर्ष वगैरे मानत....’ हे कधीपासून म्हणायला सुरुवात करायची, याही विवंचनेत असतील. थोडक्यात, एका क्षणात संपूर्ण वर्ष बदलणार, या गोष्टीची धुंदी कित्येक वर्षं सरली तरी उतरत नाही, उतरणारही नाही.
 
 
तारखांची भानगड नसताना ऋतुचक्राच्या फिरतीवरून नवीन वर्षाची हाळी ओळखली जायची. चैत्रपालवी फुलत येताना माणसाच्या चित्तवृत्तीही प्रफुल्लित व्हायच्या आणि याच आनंदात नव्या वर्षाला मोठ्या झोकात आरंभ व्हायचा. अजूनही गावखेड्याकडे ही अनुपम चैत्रपालवी अनंत हस्ते उधळत येताना दिसते. शहरीकरणाच्या आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या रेट्यात घरोघरी कॅलेंडर्सची पानं फडफडू लागली आणि तिथीनं येणारा वाढदिवसही तारखेच्या चौकटीत साजरा व्हायला लागला. ३१ डिसेंबरच्या गुलाबी थंडीत फटाक्यांचा आणि जल्लोषाचा आवाज कानांवर पडायला लागला की एका क्षणापुरती का होईना, सरत्या वर्षाच्या हिशोबाची वही उघडली जातेच..... प्रत्येक क्षणाचा ताळमेळ लागणं अशक्यच; पण काही स्पेशल क्षणांचे दुवे मात्र सरकन डोळ्यांशी आठवणींची भेट घडवून आणतात. त्यातही पुन्हा कशातून सुख मिळालं, कशातून दु:ख वाट्याला आलं, ही विभागणी वेगळीच..... सुखाचे जवापाडे क्षण धरून ठेवायची धडपड आणि दु:खाला कायम दूर ठेवायची दडदड यातच मागचं एकच काय, गेली अनेक वर्षं सरली आहेत, हे अशा वेळी ज्यांना जाणवतं, तेचि लोक भाग्याचे. गेल्या वर्षात कोणाशी भांडण झालं, कुठलं जुनं नातं गळून पडलं, कुठल्या नव्या नात्याचा कोंब फुटला, कुठली आठवण आगंतुक गळूसारखी अजूनही ठसठसतीय आणि कोणाच्या आठवणीनं डोळा नीर दाटते, हा प्रत्येकाचा हिशोब वेगळा..... ज्यातून दु:ख मिळालं त्यालाच चुका समजून त्या गोष्टी नवीन वर्षात टाळण्याचे संकल्प करणे हाही अशा लोकांचा आवडता छंद. त्यातून मानसिक समाधानापलीकडे नेमकं काय साधतं, हे ज्याचं त्यालाच ठाऊक !
 
 
‘नवीन वर्ष सुखाचे जावो’ असं ग्रीटिंग कार्डवर किंवा हल्ली व्हॉटसअप मेसेजवर लिहिलं की ‘विश’ केल्याचं एक आंतरिक सुख मनाच्या खातेवहीत जमा होतं, पण या सुखदु:खांचे संपूर्ण हिशोब खरंच कधी आपल्यला लागतात का हो..... ? मला तर मुळीच लागत नाहीत. म्हणजे बघा ना, ऑफिसमधून बाहेर पडताना ओव्हरटाईम करत असलेला आपला कलीग आपल्याकडे बघून, 'जा लेका घरी, सुखी आहेस, नाहीतर आम्ही.....' असं काही तरी म्हणतो, तेव्हा आपल्या डोक्यात 'आयला, याचं काय जातंय बोलायला, याला ओटीचा इन्सेन्टिव्ह मिळणार आहे.....' या चिंतेत असतो. प्रत्येकाचं सुखदु:ख एकाच पारड्यात कसं तोलता येईल? त्याचे काही नियम नसतात ना.... तरीही आपण दरवर्षी न चुकता म्हणतो, ‘नवीन वर्ष सुखात जावो....’ वाढती महागाई, मारुतीच्या शेपटासारखे लांबत जाणारे इएमआयचे हप्ते, औषधपाणी, लहानपणीच्या कपड्यांपेक्षाही आक्रसत चाललेले पगार, प्रदूषण, गर्दी, अवेळी येणारे पाहुणे, बिलांचे खर्च, पोरांच्या शाळा-परीक्षा अशा अनेक गोष्टींनी कावलेल्या जीवाला घटकाभराचा दिलासा मिळतो या चार शब्दांनी..... उगीचच ‘आता सगळं छान होईल’, अशी आशा वाटू लागते. येणारा सूर्य आपल्याचसाठी उगवलाय, असं उगीच स्वतःशीच वाटायला लागतं. एका क्षणापुरते का होईना, आपण सुखावतो आणि नकळतच म्हणून जातो, ‘हो, तुम्हाला पण.....’
 
 
ही आनंदाची, सुखाची क्षणिक देवाणघेवाण आपल्याला थोडी उभारी देते. सुखाच्या तळाशी दडलेल्या अनेक दु:खांचा विसर पाडायला मदत करते. तरी, काही शल्यं मात्र भाडं न देता घर बळकावलेल्या भाडेकरुंसारखी जाता जात नाहीत. सरत्या वर्षात काळानं हिरावून नेलेले सुहृद किंवा आप्तेष्ट, कोणा जिवलग व्यक्तीशी झालेला व्यावहारिक किंवा व्यक्तिगत मतभेद आणि त्यातून निर्माण झालेला दुरावा किंवा आपल्याच कोणीतरी दिलेल्या भळभळत्या जखमा, यांच्या सावल्या काही केल्या उतरत नाहीत. त्यावर उतारा म्हणून मग कुठल्या तरी वेगळ्या सुखाच्या शोधात भटकंती सुरू होते; पण आतली चरचर थांबत नाही.
वय वाढत जातं तशा कॅलेंडर्सच्या पानांवरच्या या नोंदीही पुसट होत जातात. मुद्दाम सुख शोधण्याची किंवा नसलेलं अथवा नासलेलं दु:ख कवटाळत बसण्याची वणवण पायातल्या चपलेइतकीच गुळगुळीत होते. ३१ डिसेंबरला सूर्य उगवला, मावळला तसाच तो १ जानेवारीलाही उगवणार आहे, मावळणार आहे, आपण इथं असताना आणि आपण इथं नसतानाही हे चक्र असंच चालू राहणार आहे, ही जाणीवच अशा वेळी फार वेगळा आनंद देऊन जाते. सगळे हिशोब संपतात, सगळे तराजू तुटतात, मन पुन्हा एकदा गंगेच्या पाण्यासारखं निवळशंख होतं आणि कोणी तरी ‘नवीन वर्ष सुखात जावो....’ म्हटल्यावर, पुन्हा एकदा एका क्षणापुरते का होईना, आपण सुखावतो आणि नकळतच म्हणून जातो, ‘हो, तुम्हालापण....!'
- अक्षय संत