स्वरभास्कर

युवा विवेक    07-Dec-2021   
Total Views |

स्वरभास्कर


bhimsen joshi_1 &nbs 

कट्यार काळजात घुसलीमध्ये सदाशिवचं एक स्वप्न आहे. रंगलेली मैफिल, लागलेले तंबोरे, ऐकायला इनेगिने दर्दी रसिक आणि समोर साक्षात गुरू ! पहिला स्वर लागण्याआधी तंबोऱ्याच्या तारा छेडल्या जातात, गुरूंना नमस्कार केला जातो आणि डोळे मिटून एक आर्त षड्ज लागतो..... त्या एका स्वरानं सगळं वातावरण संमोहित होतं..... एका कलावंताच्या मुक्तीचं स्वप्नं..... पण स्वप्नांच्या पायवाटेला अनेक जखमांचा शाप असतो. तरीही त्या वाटेवर चालण्याचा पिसाट हट्ट कुठलाच कलावंत सोडत नाही.

 

संध्याकाळची वेळ.... एक खोली अशीच स्वरांनी भरून येत होती. गुरू अडकित्त्यानं सुपारी कातरत आपल्या एका शिष्याला मारव्यातली एक तान शिकवत होते. शिष्य प्रयत्नपूर्वक त्या तानेतली एकेक जागा गळ्यात घोटून घेत होता, पण एक जागा मात्र त्याला काही केल्या घेता येत नव्हती. गुरू न थकता पुन्हा पुन्हा ती जागा घेत होते आणि शिष्यही जिद्दीनं गात होता. असाच काही वेळ गेला आणि शिष्य गात असताना आतून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. अगदी नकळतपणे शिष्याचं लक्ष त्याबाजूला गेलं, त्याची मान वळली आणि क्षणार्धात अडकित्त्याचा जोरदार तडाखा त्याच्या कपाळावर बसला. शिष्याच्या तोंडून किंकाळी उमटली, ती ऐकून काय झालं ते पाहायला गुरूंची पत्नी बाहेर आली, तेव्हा गुरू शांतपणे सुपारी कातरत होते. त्यांनी खुणेनंच आपल्या पत्नीला पुन्हा आत जायला सांगितलं. शिष्यानं कपाळावरून हात फिरवला. हात आणि कपाळ, दोन्ही रक्तानं माखले होते. तशाच अवस्थेत हात कपाळावर दाबून धरत शिष्यानं पुन्हा सूर लावला आणि इतका वेळ अडकलेली मारव्याची तान त्याच्या गळ्यातून चरख्यावरच्या सुतासारखी सरसरत बाहेर पडली. त्यानं गुरूंकडे पाहिलं गुरूंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. त्यांचा आनंद पाहून शिष्य आपली वेदना विसरून गेला. हे गुरू म्हणजे विश्वविख्यात शास्त्रीय गायक सवाई गंधर्व आणि त्यांचा हा शिष्य म्हणजे स्वरभास्कर पंडित भीमसेन गुरूराज जोशी!

 

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी भीमसेन जोशी गुरूच्या शोधात घरातून पळून गेले आणि त्यानंतरची तब्बल तीन वर्षं ते भारतभर फिरत होते. त्या आधीच्या वर्षी घरून शाळेत जातो, म्हणून निघायचं आणि शहरात येऊन नेहमीच्या हॉटेलमध्ये ग्रामोफोनवर गाणी ऐकायची, देवळांच्या कळसावर तर कधी पायरीवर बसून तासंतास रियाझ करायचा, हाच दिनक्रम होता. वडील मोठे संस्कृतपंडित, आपल्या मुलानंही आपल्यासारखंच खूप शिकावं आणि पंडित होऊन नाव कमवावं ही वडिलांची इच्छा.... मुलगा पंडित झालाही, पण वेगळ्या क्षेत्रात.... असो, तर एक दिवस वडील सहज म्हणून मुलाच्या शाळेत गेले तेव्हा त्यांना कळलं की आपला मुलगा वार्षिक परीक्षेत नापास झालाय, कारण तो वर्षभर शाळेत फिरकलाच नाहीये. त्या दिवशी संध्याकाळी वडिलांनी मुलाला चिंचेच्या फोकानं बडवून काढलं, वडील मारून थकले, पण मुलगा जागचा हलला नाही. शेवटी वडिलांनी हताशपणे मुलाला विचारलं, 'बाबा रे, तुला काय करायचंय आयुष्यात?' मुलगा उद्गारला, 'मी आयुष्यभर फक्त गाणार आहे, मला बाकी काहीही करण्यात रस नाही.' दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर मुलाचं अंथरूण रिकामं होतं, ते पुढची दोन वर्षं रिकामंच राहिलं.

 

या दोन वर्षांमध्ये भीमण्णा देशभर फिरले, निरनिराळ्या प्रांतांमध्ये राहिले, तिथली संस्कृती, तिथलं राहणीमान आणि अर्थातच. तिथलं संगीत यासगळ्याचा त्यांनी मनसोक्त अनुभव घेतला. अवघ्या नऊ वर्षे वयातली ती बंडखोरी पुढं आयुष्यभर सावलीसारखी त्यांच्या सोबत राहिली. नवव्या वर्षी कर्नाटकातल्या आपल्या गावामधून पळालेला हा मुलगा अकराव्या वर्षी शेवटी पंढरीच्या गावी सापडला. वडील त्यांना पंढरपूरातून पुन्हा घरी घेऊन आले आणि सवाई गंधर्वांच्या घरी गुरुकुल पद्धतीनं त्यांचं संगीत शिक्षण सरू झालं. पुढं जवळजवळ तीन वर्ष भीमण्णा आपल्या गुरूच्या घरी, बदामी येथे राहिले, त्यांची सेवा करत निष्ठेनं संगीत शिकत गेले.

 

भीमण्णा सवाई गंधर्वांकडे राहायला आल्यानंतर सहा महिन्यांतली गोष्ट..... एक दिवस त्यांचे वडील आणि काका भीमण्णांना भेटायला बदामीला आले. सवाई गंधर्व आपल्या घराबाहेर खाटेवर आरामात बसले होते. वडिलांनी त्यांच्याकडे आपल्या मुलाबद्दल विचारणा केली, पण ते काहीच बोलले नाहीत. इतक्यात समोरून भीमण्णा येताना दिसले. त्यांच्या दोन्ही खांद्यांवर दोन पाण्यानं भरलेल्या कळशा होत्या. हळूहळू चालत त्यांनी परसाजवळ कळश्या नेऊन खाली ठेवल्या आणि ते जागीच कोसळले. वडील आणि काका काळजीनं धावले, त्यांनी भीमण्णांच्या अंगाला हात लावला तर एकदम चटका बसला. भीमण्णा तापानं फणफणत होते. ते दृश्य पाहून काका अतिशय संतापले आणि सवाई गंधर्वांना म्हणाले, तुम्ही इतक्या कोवळ्या मुलांकडून अशी कामं कशी करवून घेता? आम्ही त्याला तुमच्याकडे संगीत शिकायला पाठवलंय, तुमचा पाणक्या म्हणून नाही. सवाई गंधर्व शांतपणे त्यांना म्हणाले, या क्षणी तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. भीमण्णांनी मात्र घरी यायला साफ नकार दिला. गुरूकुल पद्धतीत शिष्यानं गुरूची सेवा करतच ज्ञान मिळवायचं असतं, हे आपल्या वडिलांना आणि काकांना सांगून त्यांनी त्या दोघांना परत घरी पाठवलं.

 

याच भीमण्णांनी आपल्या गुरूच्या पहिल्या स्मृतिदिनाला त्यांच्याच नावानं एका अनुपम स्वरयज्ञाचा प्रारंभ केला. सवाई गंधर्व संगीत महोत्सव!

गेली अनेक वर्षं पुण्यात हा स्वरमहोत्सव दिमाखात सुरू आहे. अनेक दिग्गज कलावंत या महोत्सवात आपली कला रसिकांसमोर सादर करतात. एवढंच नाही तर, खुद्द भीमण्णा शेवटपर्यंत आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ या महोत्सवात गायन करत होते.

सच्चा कलावंत स्वप्न बघतानाही आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवत असतो. रंगलेली मैफिल, लागलेले तंबोरे, ऐकायला इनेगिने दर्दी रसिक आणि समोर साक्षात गुरू! पहिला स्वर लागण्याआधी तंबोऱ्याच्या तारा छेडल्या जातात, गुरूंना नमस्कार केला जातो आणि डोळे मिटून एक आर्ट षड्ज लागतो. त्या एका स्वरानं सगळं वातावरण संमोहित होतं. एका कलावंताच्या मुक्तीचं स्वप्नं!

 

स्वरभास्करानं आपल्या मुक्तीची पायवाट स्वत:च घडवली आणि आपल्या गुरूंच्या आशीर्वादानं आयुष्यभर तो त्या वाटेवर एखाद्या तपस्व्यासारखा चालत राहिला..... फरक इतकाच की, त्यांच्या मैफलीत इनेगिने दर्दी रसिक नव्हते. त्यांच्या प्रकाशानं अवघं विश्वच व्यापून टाकलं होतं. स्वरभास्कर पंडित भीमसेन गुरुराज जोशी....

- अक्षय संत