अर्ज किया हैं...

युवा विवेक    11-May-2021   
Total Views |

applied_1  H x  
शायरों की बस्तीं में कदम रखा,
तो पता चला की दर्द भी कितना खुबसुरत होता हैं...
अत्ताउल्ला पठाण यांचा हा शेर आठवतो आणि मन मैफलीत जाऊन बसतं. मैफल व्यासपीठावर सुरू होण्याआधी मनात सुरू झालेली असते. 'अर्ज किया हैं...' असं कोणताही शायर किंवा कवी म्हणतो, तेव्हा त्याच्या मनात काय असेल? पूजेआधी हातात संकल्पासाठी पाणी घेऊन बसावं आणि 'मम, आत्मन:...' वगैरे म्हणत कार्य सिद्धीस जाऊ दे म्हणून पाणी सोडावं, असा कार्यसिद्ध भाव त्याच्या मनात येत असेल का...? संकल्पात म्हणतात तसं... 'शास्त्रोक्त, तंत्रोक्त...' असं मनातल्या मनात स्मरण करून श्रोत्यांच्या 'स्मृति' आणि 'श्रुतिं'ना समाधान, आनंद, चैतन्य देण्यासाठीच कवी तयार झालेला असतो. 'अर्ज किया हैं..' हा त्याचा संकल्प असतो आणि 'वाह, क्या बात हैं...' ही असते फलश्रुती...!
व. पु. काळे यांचं एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, 'कलाकाराने मैफलीत 'बेसूर' आणि मैफलीबाहेर 'असूर' असू नये.' खरंय.. 'अर्ज किया है...' असं लाघवी 'आर्जव' करणाऱ्याने असूर होऊन शोभणार नाही आणि बेसूर होणं, त्याला परवडणार नाही. लहानपणी शाळेत मुलांनी गडबड सुरू केली, की गुरूजी मध्येच 'बैठे बैठे सावधान...' असं म्हणत. एखाद्या पार्टीमध्ये, लग्नसोहळ्यात, समारंभात कोणीतरी उत्साही तरुण किंवा तरुणी अचानक व्यासपीठाचा ताबा घेऊन कविता सादर करते किंवा नृत्याविष्कार सुरू करते. त्या आधीचं तिचं किंवा त्याचं मनोगत म्हणजेच 'अर्ज किया हैं...' धीरगंभीर वातावरणात वक्ता मंचावर येतो. माइक लावतो आणि आपल्या शांत स्वरात 'रसिकजनहो नमस्कार..' असं म्हणतो, त्या वेळी असलेलं त्याचं 'अवधान' हे कवीपेक्षा वेगळं असतं का? निश्चितच नाही..!
कविता सादरीकरणापूर्वीचा कवी हा खळाखत्या झऱ्यासारख्या असतो. एक-एक कविता सादर होत जाते. लहान-लहान प्रवाह श्रोत्यांमध्ये मिसळत जातात आणि सादरीकरण संपतं, तेव्हा कवी आणि श्रोते यांची अवस्था एकच असते. शांत डोहासारखी. कवीचं देऊन संपलेलं असतं आणि श्रोत्यांचं घेऊन सरलेलं असतं. 'संपणं' आणि 'सरणं' यातला फरक म्हणजेच 'अर्ज किया हैं..' आणि 'वाह, क्या बात हैं...' यातला फरक..! दाद देणं आणि ती मिळवणं यातलं अंतर कमी झालेलं असतं. कवी आणि श्रोता यांच्यातलं द्वैत संपलेलं असतं. अद्वैताच्या वाटेवरचे ते दोघे प्रवासी असतात. फरक इतकाच, की ऐलतीरावर असतो, तर दुसरा पैलतीरावर. दोघांमधून वाहणारी नदी म्हणजेच जिवंत मैफल!
'प्रेम गली अति सांकरी,
तामे दो न समाय...'
असं कबीरांनी म्हटलं, ते प्रेमाचं वर्णन करण्यासाठी. प्रेमाची वाट इतकी छोटी, अरुंद आहे, की तिथे तू तू आहेस आणि मी मी आहे.. असा द्वैतभाव मनात असल्यास प्रवास होऊच शकत नाही. तूही मी आहे आणि मीसुद्धा मी आहे... असा अद्वैताचा भाव निर्माण झाला, फरक गळून पडला, तरच प्रवास सोपा होता. तात्पर्य, सादरीकरणानंतरचा 'या हृदयीचे त्या हृदयी घातले...' हा सार्थकता येण्याचा भाव उत्पन्न होण्यासाठी घातलेलं नमनाचं तेल म्हणजे 'अर्ज किया हैं...'
कविता बदलत नसते. शब्दरचना फिरत नसते. तरीसुद्धा, अमूक कविता अमूक कवीच्याच आवाजात ऐकताना जे वाटतं, ते इतर अनेकांनी प्रयत्न करून साध्य होऊ शकत नाही. गुलजार, जावेद अख्तर, पीयूष मिश्रा, सुरेश भट, ग्रेस, मंगेश पाडगावकर, सुनीताबाई, सौमित्र... अशा अनेकांनी आपल्या स्पर्शाने, सादरीकरणाच्या अफाट सामर्थ्याने अमर केलेल्या कविता अद्याप तशाच आहेत, तशाच राहणार आहेत. कारण त्यांना केलेलं 'आर्जव' हे एखाद्या कवीने नाही, तर साक्षात जिवंत कवितेने केलेलं आहे. एखादीच तान, एखादाच आलाप, एखादीच जागा ही त्या विशिष्ट गायकाशिवाय कोणीही घेऊच शकत नाही. बाकी करतात ते जवळपास जाण्याचे प्रयत्न. या अनेक प्रयत्नांचं आणि त्या मूळ सादरीकरणाचं अढळ अधिष्ठान म्हणजे 'अर्ज किया हैं...'
मैफल सरते तेव्हा मागे काय उरतं? खुर्च्या उचलण्याचे आवाज, माइक काढण्याची लगबग, कलाकाराला भेटून जाणारी गर्दी, हळूहळू रिता होत जाणारा कलाकार... मात्र हे वर वर झालं..! या पलीकडे उरते, ती अस्वस्थता... ओढ... हुरहूर... अतृप्ती...! श्रोत्यांना तृप्त करणं हे जसं कलाकाराचं कर्तव्य असतं, तसंच त्यांना सतत नव्याची आस लावून अतृप्त ठेवणं, हा त्याचा धर्म असतो. ही त्याची भूमिका असते. त्यासाठी तो मैफलीच्या रंगमंचावर परकायाप्रवेश करत असतो. त्याने साकारलेल्या भूमिकेचं पहिलं वाक्य असतं...
'अर्ज किया हैं..!'
- मयूर भावे.