कडूगोड माणसांची हलकीफुलकी गोष्ट

युवा विवेक    11-May-2021   
Total Views |

bitter sweet_1   
'रामप्रसाद की तेरहवी' पाहताना 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाची आठवण होते. महेश एलकुंचवारांचं 'वाडा चिरेबंदी' नाटक आठवतं. 'गामक घर' हा चित्रपटही आठवतो. या सर्व कलाकृतींमधलं साम्यस्थळ म्हणजे मोठ्या कुटुंबातील लोकांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध. तरीही हे तिन्ही चित्रपट वेगळे ठरतात, ते अर्थातच कथेमुळे आणि शैलीमुळे. यातील इतर कलाकृतींचा स्वर गंभीर आहे. मात्र 'रामप्रसाद की तेरहवी' नर्मविनोदी शैलीत बरंच काही सांगून जातो.
चित्रपटाच्या शीर्षकानुसार ही कथा आहे रामप्रसाद आणि त्याच्या कुटुंबाची. चित्रपट सुरू होतो तोच रामप्रसादच्या मृत्यूच्या प्रसंगाने. त्यानंतर रामप्रसादची सगळी मुलं, त्यांच्या बायका आणि मुलं, इतर काही नातेवाईक, असा सगळा गोतावळा घरी जमतो. नवीन वर्ष जवळ येत असताना हे असं अघटित घडल्यामुळे त्यातील अनेकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. त्यात मृत्यूनंतरचं दिवसकार्यही नेमकं नववर्षाच्या पूर्वसंध्येला येत असल्याने ते एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वजण मिळून घेतात. या निर्णयातही स्वतःचं मानपान जपणारी काही मंडळी आहेत. घरातल्या तरुण मुलांना या दुःखाच्या प्रसंगातही सुट्टीचा आनंद उपभोगायचा आहे. वारंवार येणाऱ्या पाहुण्यांना रामप्रसादच्या मृत्यूचं कारण अम्मा एखादी अडकलेली रेकॉर्ड पुन:पुन्हा वाजावी त्याप्रमाणे सांगते, तेव्हा या तरुण मंडळींना हसू आवरत नाही. त्यांना दमदाटी करणारी घरातली मोठी मंडळीही रात्रीच्या अंधारात आपापला आनंद शोधताहेत. वरकरणी हे सर्वजण एकमेकांशी कितीही चांगलं वागत असल्याचं दाखवत असले, तरी खरं चित्र मात्र काहीतरी वेगळंच आहे.
चित्रपटाची सर्वसाधारण कथा ट्रेलरवरून स्पष्ट होत असली, तरी ती पडद्यावर पाहण्यात खरी गंमत आहे. 'उलझे हुए तार' या रूपकातून अगदी एका लहान लहानशा प्रसंगात या कुटुंबातील माणसांच्या क्वचित स्वार्थीपणाकडे झुकणाऱ्या स्वभावावर भाष्य केलं आहे. तीन पिढ्यांचं जगणं दाखवताना त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे गुणविशेष अगदी विस्ताराने समोर येतात. खूप पात्रांचा भरणा असलेल्या कथेत एक भीती असते ती ही की, प्रत्येक पात्राच्या कथेला योग्य न्याय मिळण्यासाठी तेवढीच बांधीव पटकथाही लागते. नाहीतर कथा भरकटत जाते. काही पात्रांच्या गोष्टी अपूर्णही राहतात. त्या तशाच अर्धवट सोडूनही दिल्या जातात. या चित्रपटात मात्र असाच खूप मोठा गोतावळा असूनही प्रत्येक व्यक्तिरेखा छान फुलवली आहे.
या चित्रपटातली गाणी ही त्याची आणखी एक जमेची बाजू. सर्वच गाणी श्रवणीय आहेत. त्यातही 'एक अधूरा काम' विशेष लक्षात राहतं, ते त्याच्या सुंदर चित्रीकरणामुळे. सगळ्या कुटुंबाचा गोड भूतकाळ या गाण्यातून फ्लॅशबॅकमधून सुंदररीत्या उलगडला आहे.
नसिरुद्दीन शहा, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, कोंकोना सेन शर्मा, विनय पाठक, विक्रांत मासी, निनाद कामत, परमब्रता चट्टोपाध्याय, दीपिका अमिन, सादिया सिद्दिकी या सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. इतर लहानसहान भूमिकांमधील कलाकारही आपली छाप सोडून जातात. या सर्वांच्या भूमिकांबद्दल जास्त काही सांगणं म्हणजेच स्पॉयलर देण्यासारखं ठरेल. मात्र चित्रपटाचं पोस्टरही इतकं नीटसपणे डिझाइन केलं गेलं आहे की, त्यातूनही चाणाक्ष प्रेक्षकाला चित्रपटात काय वाढून ठेवलं आहे याबद्दलच्या काही हिंट्स सहज मिळून जाव्यात.
मोठ्या कुटुंबात होणार्‍या मृत्यूनंतर त्या मेलेल्या माणसाच्या मागे राहिलेल्या साथीदाराच्या नजरेतून पाहिलं की, दु:खाची खरी व्याप्ती कळते. खरं दु:ख कुणाला झालंय, कोण फक्त तसं दाखवतंय, हे तर कळतंच. पण यानंतर वाद सुरु होतात ते मागे एकटं राहिलेल्या माणसाचा सांभाळ कुणी करायचा त्यावरून. त्या व्यक्तीला स्वत:चं असं काही मत उरलेलं नसतंच. असलं तरी ते कुणी विचारात घेणारं नसतं. अम्मीला रात्री एकांतात फुटलेला दु:खाचा उमाळा या सगळ्या भावनांचं मिश्रण म्हणून समोर येतो. वडिलांच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या मुलांना त्यांचे संसार आहेत. त्यामुळे या दु:खात बुडून राहणं त्यांना परवडणारं नाही, हे अम्मा जाणून आहे. मात्र निदान या दु:खाच्या प्रसंगी तरी सर्वांनी आपले स्वार्थ विसरून एकत्र यावं, एवढीच तिची माफक अपेक्षा आहे. कुटुंबियांना आपण किती गृहीत धरत असतो, हे सांगणारा एक अतिशय हृद्य आणि कथेला कलाटणी देणारा प्रसंग चित्रपटात आहे.
इथे कुणी एक विशिष्ट नायक नाही आणि खलनायकही नाही. घरातल्या इतर स्त्रिया जिला खलनायिका ठरवून मोकळ्या झाल्या आहेत, ती घरातली सर्वांत लहान सून - सीमाही खलनायिका नाही. उलट तीच मनाने सगळ्यांत शुध्द आहे. आपल्यावर आईवडिलांनी अन्याय केला, असं थोड्याफार प्रमाणात प्रत्येक भावंडाला वाटतं आहे. पण म्हणून ते वाईट ठरत नाहीत. स्वत:चं म्हणणं प्रत्येक बाबतीत खरं करू पाहणारा मामाही तसं पाहता खलनायक नाही. इथे दिसतात ती वास्तव जीवनात असतात, तशी माणसं. थोडी कडू. थोडी गोड. कधी स्वत:चा स्वाभिमान जपणारी. कधी इतरांना समजून घेणारी. त्यामुळेच सीमा पाहवा लिखित, दिग्दर्शित हा चित्रपट आपला वाटतो. प्रत्येकजण यातल्या कुठल्या ना कुठल्या पात्रात स्वत:ला नक्कीच शोधेल, हे जाणवत राहतं आणि अभिनेत्री म्हणून मोठा पडदा गाजवलेल्या सीमा पाहवा यांच्या या दिग्दर्शक म्हणून केलेल्या पदार्पणाचं कौतुक करावंसं वाटतं.
- संदेश कुडतरकर.