कृष्णविवराच्या छायाचित्राची गोष्ट

युवा विवेक    11-May-2021   
Total Views |

nasa_1  H x W:
 
खगोलशास्त्राविषयी आवड असणाऱ्या मंडळींनी कृष्णविवराबद्दल ऐकले नसेल असे क्वचितच घडेल. मुळातच खगोल या विषयातील गूढ गोष्टींची आवड असणाऱ्यांनी कदाचित स्वतः अनेक पुस्तके, मासिके धुंडाळून या गूढ आणि अजब खगोलीय वस्तूविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल. कृष्णविवर म्हटले की त्याच्या संबंधित अनेक विविध संज्ञा आपल्या समोर येतात जसे की ‘इव्हेंट होरायझन’, ‘गुरुत्व लहरी’, इत्यादी. प्रस्तुत लेखात आपण याच कृष्णविवराविषयी आणि त्याच्या पहिल्या छायाचित्राविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. हे छायाचित्र १० एप्रिल २०१९ साली घेण्यात आले.
मुळात आपल्याला पडणारा मुलभूत प्रश्न म्हणजे ‘कृष्णविवर म्हणजे काय?’ असा आहे. तर, कृष्णविवर म्हणजे अशी खगोलीय वस्तू जिचे गुरुत्वाकर्षण बळ इतके जास्त असते की त्या वस्तूमधून प्रकाशाची किरणे देखील बाहेर पडू शकत नाहीत. या कृष्णविवराचा जो पृष्ठभाग असतो त्यास ‘इव्हेंट होरायझन’ असे म्हणतात. या इव्हेंट होरायझनपासून बाहेर सुटून जाण्यास जो वेग लागतो तो वेग हा प्रकाशाच्या वेगाइतका असतो. म्हणजे अशी कल्पना करा की न्यूटनच्या क्रिया-प्रतिक्रिया सिद्धांताप्रमाणे आपण जितके बळ एका दिशेला लावू तितक्याच वेगाने आपण विरुद्ध दिशेला फेकले जाऊ. जसे की एखाद्या अग्निबाणातून बाहेर पडणारी उर्जा ही त्या अग्नीबाणाला विरुद्ध दिशेला तेवढ्याच वेगाने ढकलते. आता याच उदाहरणाप्रमाणे या कृष्णविवराच्या इव्हेंट होरायझनपासून जर आपल्याला पुढे जायचे असेल तर प्रकाशाच्या वेग इतकीच उर्जा लागेल आणि ह्यात मेख अशी आहे की प्रकाशाचा वेग हा या विश्वातला अंतिम वेग आहे. म्हणजे आपण या विश्वातला जर सर्वात जास्त वेग गाठण्याचा प्रयत्न केला तर आपण प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकू परंतु त्यापेक्षा वेगवान नाही. या कृष्णविवरांचे वर्गीकरण हे दोन प्रकाराने करता येते. एक म्हणजे ताऱ्यांच्या पटीमध्ये ज्यांचे वस्तुमान आहे अशी आणि त्यापेक्षा अतिविशाल अशी कृष्णविवरे ज्यांचे वस्तुमान हे आधीच्या कृष्णविवारांपेक्षा साधारण एक लाख पटीने जास्त आहे अशी कृष्णविवरे! आपण ज्या छायाचित्राची गोष्ट आज वाचणार आहोत ती द्वितीय प्रकारातील कृष्णविवराची आहे. या कृष्णविवराचे स्थान पृथ्वीवरून पाहता कन्या राशीतील लंबगोलाकार दीर्घिकेच्या (M८७) मध्यभागी आहे.
खरेतर काही वर्षांपासून या कृष्णविवराच्या अस्तित्वाबाबातीत शंका उपस्थित केल्या जात होत्या. खगोलीय अंतरे लक्षात घेता या खगोलीय वस्तू इतक्या दूर आहेत की त्यांचे अस्तित्व हे दूरदर्शकाच्या माध्यमातून सिद्ध करणे आजवर शक्य झालेले नव्हते. कृष्णविवरांचे अस्तित्व हे फक्त कागदावर मांडलेल्या गणितांच्या सहाय्यानेच सिद्ध केलेले होते. त्यामुळे जर या अजब खगोलीय वस्तूचे छायाचित्र घेता आले तर खरेच कृष्णविवरे आहेत ही सिद्ध करता येऊ शकेल या उद्देशाने या छायाचित्रामागे असणारे वैज्ञानिक प्रयत्न करू लागले. अंततः हे छायाचित्र मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर मात्र कृष्णविवर हा एक कागदावरील सिद्धांत नसून, ही एक खरोखर अस्तित्वात असणारी खगोलीय वस्तू आहे हे सिद्ध झाले. हे छायाचित्र म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याची कमाल आहे. साधारण काही पेटाबाईट्स इतका डेटा आणि त्यावर प्रक्रिया करून हे छायाचित्र तयार करण्यात आलेले आहे. हा सर्व डेटा हा इव्हेंट होरायझन दूरदर्शीच्या (EHT) सहाय्याने मिळवलेला आहे. ही खरेतर एक दूरदर्शी नसून हा जगभरात पसरलेल्या आठ दूरदर्शींचा एक समूह आहे. आता अजून एक प्रश्न म्हणजे M८७ याच ठिकाणी असणाऱ्या कृष्णविवराचे छायाचित्र घेण्याचा का प्रयत्न करण्यात आला? खरेतर आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागीसुद्धा एक कृष्णविवर आहे, मग हेच विवर का निवडले नाही आणि M८७ च का निवडण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की M८७ या कृष्णविवराचा आकार आणि वस्तुमान साधारण ०.७ कोटी सूर्यांच्या वास्तुमानाइतके आहे. साहजिकच याचे छायाचित्र काढणे हे परिणामतः सोपे आहे. आता तुम्ही विचार करा की रुमच्या समोर साधारण काही मीटर अंतरावर एक इमारत आहे आणि काही फूट अंतरावर एक टाचणी, तर मग कोणाचे छायाचित्र घेणे जास्त सुकर आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच M८७च का हे उत्तर दडलेलं आहे. हे छायाचित्र म्हणजे खगोलशास्त्रामधील एक मैलाचा दगडच ठरले आहे. कुणास ठाऊक येत्या काही दिवसात आपण आपल्या आकाशगंगेतील कृष्णविवराचेसुद्धा छायाचित्र पाहत असू!!!
- अक्षय भिडे