प्रेमाच्या सहा फ्लेव्हर्सचे घोट

युवा विवेक    12-May-2021   
Total Views |

flavour_1  H x  
ग्रंथ, महाकाव्यं, कविता, पत्रं या सगळ्यांतून भरभरून वर्णन करून झालं तरी काहीतरी सांगायचं राहूनच गेलंय, असं वाटायला लावणारं प्रेम. म्हटलं तर साध्या डोळ्यांनाही सहज दिसणारं, म्हटलं तर सूक्ष्मदर्शिकेखाली ठेवून बारकाईने पाहायला लागेल असं. चित्रपटांतून, मालिकांतून, वेब सिरीजमधून दर वर्षी कितीतरी प्रेमकथांचा रतीब घातला जातो. कथनाच्या शैलीत वेगवेगळे प्रयोग केले जातात. तरीही प्रेम, प्रेम जे म्हणतात ते ओंजळीतून निसटून जातंच. अमेझॉन प्राईमवरची 'लव्ह शॉट्स' ही सहा लघुपटांची मालिका म्हणूनच वेगळी आणि दखलपात्र ठरते. सहा ते नऊ मिनिटांच्या या सहा कथा अगदी कमी शब्दांत, मोजक्याच अवकाशात प्रेमाबद्दल खूप काही सांगून जातात. कसलाही गाजावाजा न करता. त्यातही हा प्रयोग वेगळा ठरतो तो त्याच्या फॉरमॅटमुळे. मूळ कथा सुरुवातीच्या काही मिनिटांत संपते आणि श्रेयनामावलीच्या जोडीला प्रत्येक कथेच्या मूडला अनुसरून एक रोमँटिक गाणं येतं.
पहिली कथा 'द रोड ट्रिप' - अर्चना आणि निखिलची. दोघे रोड ट्रिपला निघाले आहेत. त्यांच्या नात्यात कोणत्याही जोडप्यात असतील, असे वादविवाद आहेत. संशयकल्लोळ आहेत. तरीही एकमेकांवर प्रेम असल्याची खोलवर जपलेली भावनाही आहे. वाटेत त्यांची गाडी भरकटते, तेव्हा नेमकं काय होतं, हे या कथेतच पाहण्यासारखं आहे. प्रेम आणि गाढ विश्वास असूनही बऱ्याचदा एकमेकांना बरंच काही सांगायचं राहून जातं. ते वेळीच सांगितलं गेलं तर? या प्रश्नाचा तरल वेध घेत ही कथा एका अनपेक्षित वळणावर संपते. या कथेच्या शेवटी येणाऱ्या 'लाईफ चेंजेस एव्हरीडे' या गाण्यात एकत्र केलेल्या प्रवासातून दोन व्यक्तींमध्ये हळुवार फुलणारं प्रेम छोट्या छोट्या तुकड्यांतून सुंदररीत्या साकारलं आहे.
दुसरी कथा 'कोई देख लेगा' ही रुटीनमधून प्रेमाचे दोन क्षण चोरू पाहणाऱ्या एका जोडप्याची आहे. ते दोघेही वेळेवर न येणाऱ्या आपल्या बसची वाट पाहत स्टॉपवर बसले आहेत. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसलेला एकजण त्यांचा हा संवादातून एकमेकांना छेडणारा प्रणय पाहतोय आणि उगाचच अस्वस्थ होतोय. गर्दीत वावरत असताना आपल्यालाही असे लहानसहान क्षण जगणारी माणसं दिसतात आणि आपण त्यांच्याबद्दल आपले निष्कर्ष काढून मोकळे होतो. पण डोळ्यांना दिसणारं तेवढंच फक्त सत्य असतं का? त्याची आणि तिची प्रेमकहाणी ही त्यांच्यासाठी स्पेशलच असते नेहमी, इतरांना त्याचा फक्त एक तुकडा दिसत असतो, हेच या कथेतून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या कथेला जोडून येणारं 'फासलें' हे गाणं त्या दोघांमधील बसस्टॉपवरची नोकझोक दाखवताना गिटारच्या पार्श्वसंगीताचा आधार घेत एक सुरेल अनुभव देऊन जातं.
'टेक्स्टबुक' ही तिसरी कथा शाळेतल्या निरागस प्रेमाला साद घालणारी. प्रतिमा आणि कमल हे वर्गमित्र. एकाच बाकावर शेजारी बसणारे दोघे. हिंदीचा तास सुरू होण्यापूर्वी वर्गात मुलांचा दंगा चालू आहे. प्रतिमा कागदाचं विमान बनवून कमलकडे फेकतेय आणि खुद्कन हसतेय. अशात शिक्षक येतात आणि मुलांना व्याकरणाचं पुस्तक काढायला सांगतात. ज्यांनी आणलं नाहीये, त्यांना वर्गाबाहेर उभं राहून कोंबडा बनावं लागणार आहे. प्रतिमा पुस्तक विसरल्याचं कमलच्या लक्षात येतं आणि तो आपलं पुस्तक तिच्या बाजूला सरकवत स्वतः शिक्षा भोगायला तयार होतो. पण त्याबदल्यात त्याला प्रतिमाकडून एक अनपेक्षित गोड भेट मिळते. वहीच्या पानांत जपून ठेवावी अशी एक मोरपंखी आठवण. या कथेसोबत येणारं 'प्यार बबलगम' हे बबली मूडचं गोड गाणं कठपुतळ्यांच्या खेळासोबत शाळेतला निरागस रोमान्स आणखी खुलवतं. इतर सर्व गाण्यांमध्ये वेगळं उठून दिसणारं हे गाणं आहे.
शहराच्या बाहेर एकांत शोधायला आलेल्या जोडप्यांबरोबरच दोन निवांत क्षण शोधायला आलेल्या श्री व सौ चौधरींची कथा 'स्कँडल पॉईंट' म्हणजे भूतकाळातल्या रम्य आठवणींना साद घालणारं एक सुंदर पेंटिंग आहे. सगळं आयुष्य जागून झाल्यावर आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा एकदा दोन घोट चहा पीत गप्पा मारण्यासाठी ते दोघे इथे येतात, तेव्हा पोलीस त्यांनाही हटकतात. मात्र आता त्यांना भीती राहिलेली नाही. आता उरल्यात त्या फक्त संधिकाली धुंदलेल्या दिशा आणि तारुण्यातले एकमेकांसोबत साजरे केलेले क्षण पुन्हा जगत मारलेल्या गप्पा. या कथेनंतर येणाऱ्या 'बाबू मोशाय' या बंगाली साजाच्या गाण्यात एक वेगळीच नशा आहे. जॉईंटचे झुरके मारत येणाऱ्या या गाण्यातल्या शब्दांसारखीच.
आनंद आणि निधीची पाचवी कथा - 'फायर्ड' - एका सर्वस्वी वेगळ्या विषयाला हात घालणारी. निधीला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. आता घराचे हफ्ते कसे भरायचे या विवंचनेत ती आहे. तिचा नवरा आनंद एका हॉटेलमध्ये शेफचं काम करतोय. त्या संध्याकाळी तो निधीला भेटतो, तेव्हा त्याने तिला न सांगता एक निर्णय परस्पर घेतलाय. आपली नोकरी गेल्याचं सत्य अजूनही स्वीकारू न शकलेली निधी या धक्क्यातून सावरते का? नवीन स्वप्नं एकत्र पाहताना कुठे थांबायचं, हे आपण विसरत चाललो आहोत का? असे अनेक प्रश्न ही कथा प्रेक्षकांसमोर ठेवते. 'हो गये कूल' हे या कथेसह येणारं गाणं अॅनिमेशनच्या आधारे नोकरीत गुंतलेल्या जोडप्याचं आयुष्य मांडण्याचा छोटासा पण नीटस प्रयत्न करतं.
'द बिग डेट' या सहाव्या कथेत मालविका आणि प्रीती या दोन बहिणींचं प्रेमाचं नातं दाखवतानाच त्याला एक वेगळं वळण देण्याचा गोड प्रयत्न दिसतो. ज्या राहुलबरोबर डेटवर जायचंय, तो येण्याआधी या दोन बहिणींमधलं संभाषण आपल्याला दिसतं. दोघींच्या मनात फुटणारी कारंजं दिसतात. मात्र कथेने शेवटी जो सुखद धक्का दिला आहे, तो कथेच्या शीर्षकाला काव्यात्म न्याय देणारा आहे. 'मोरे पिया' हे या कथेनंतर येणारं सुरेल गाणं एखाद्या कँडललाईट डिनर डेटच्या मूडलाच साजेसं. हळुवार, तलम आणि गोड.
'वाय फिल्म्स'ची निर्मिती असलेल्या या लघुकथांचं दिग्दर्शन अंकुर तिवारी यांनी केलं आहे. सर्व कथांमधल्या कलाकारांचा अभिनय तर लाजवाब आहेच, पण प्रत्येक कथेला साजेसं वेगळं दृश्यचित्रण कथेचं सौंदर्य अधिकच खुलवतं. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे लघुपटाने कमीतकमी शब्दांत जास्तीत जास्त सांगणं जे अपेक्षित असतं, ते इथे नेमकं साध्य झालं आहे. मोजकेच संवाद, केवळ एक प्रसंग आणि मोजक्याच व्यक्तिरेखांच्या आधारावर फुलणाऱ्या प्रेमकथा पाहताना वेगवेगळ्या फुलांनी बहरलेल्या बागेत दोन क्षण निवांत बसल्यासारखं वाटतं. 'लव्ह शॉट्स' हे शीर्षकही तसंच समर्पक. शॉटचे ग्लासेस एका घोटात गळ्याखाली उतरवावेत आणि क्षणभरच त्याची झिंग अनुभवावी, मात्र त्या एका क्षणात काहीतरी वेगळं जगून यावं, तशाच या सहा वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या शॉट्सच्या प्रेमकथा. हलकंफुलकं काहीतरी पाहण्याची इच्छा असेल, तर नक्की पिऊन पाहाव्यात अशा.
- संदेश कुडतरकर