खगोलशास्त्रामधील तेजस्वी तारका

युवा विवेक    12-May-2021   
Total Views |

astronomy_1  H  
नुकताच ८ मार्च रोजी जागतिक महिलादिन होऊन गेला. या निमित्ताने सांगायचे झाले म्हणजे, खगोलशास्त्र या विषयात सुद्धा इसवी सन पूर्वीपासून ते आजवर अनेक महिलांनी आपले योगदान दिले. अनेक महिला शास्त्रज्ञामुळेच खगोलशास्त्र या विषयाला कलाटणीदेखील मिळाली. अशाच काही महत्त्वाच्या आणि काही अनोळखी अशा महिला शास्त्रज्ञांविषयी माहिती घेऊ या.
प्रथम महिलेचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे साक्षात पायथागोरस या प्रसिद्ध शास्त्रज्ञाची बायको आणि त्याची सहचारी थीयानो हिचा. ती पायथागोरस याची शिष्या आणि त्याच्या अभ्यासात त्याची सहचारिणी होती. पायथागोरसच्या पश्चात त्याचे काम आणि त्याच्या विद्यालयाचे काम पुढे तिनेच पाहिले. पायथागोरस आणि त्याचा सिद्धांत याचा प्रसार तिने ग्रीस आणि इजिप्त या ठिकाणांपर्यंत केला. दुसरी महिला जिच्या कार्याची प्रत्यक्ष नोंद उपलब्ध आहे ती म्हणजे हायपाशिया ही. या संशोधिकेने टोलेमी आणि प्लाटो यांच्या सिद्धांताचा गहन अभ्यास केला. तिने ग्रह आणि तारे ह्यांच्या अवकाशातील हालचालींचे काही तक्ते तयार केले. तसेच ती एक शिक्षिका होती. तिने त्या वेळच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून खगोलविषयक अनेक उपकरणे केली. मात्र आकाशाच्या अभ्यासासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे उपकरण म्हणजे अॅस्ट्रोलेब हे तिने तयार केले. ह्या उपकरणाद्वारे आकाशातील तारे, ग्रह ह्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकत होते.
तिसरी मध्ययुगातील महिला शास्त्रज्ञ म्हणजे हेर्रड डे लान्सबर्ग. हिने तिचे खगोल शास्त्रातील योगदान म्हणून एक कॅलेंडर तयार केले. जे कॅलेंडर पुढे १७०० सालापर्यंत वापरले जात होते. यापुढील महत्त्वाची संशोधिका म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ टायको ब्राहे याची बहीण सोफी ब्राहे. तिने आपल्या अभ्यासाची संपूर्ण कारकीर्द ही आपल्या भावाबरोबर व्यतीत केली. तिने आपली सर्व निरीक्षणे ही एका अप्रकाशित नोंदवहीत टिपून ठेवलेली आहेत. असे सांगितले जाते की पुढे केप्लर या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने याचा नोंदींच्या आधारे ग्रहांच्या कक्षांचा अभ्यास केला. यापुढील महिला शास्त्रज्ञ म्हणजे मारिया कुनित्झ. हिने सुद्धा केप्लरच्या सिद्धांतावर आधारित काही खगोलीय तक्ते तयार केले. यानंतर सर्वात महत्त्वाची संशोधिका म्हणजे कॅरोलीन हर्शेल ही होय. ही सर्वात प्रथम खगोल या विषयात नोकरी मिळवलेली संशोधिका होय. हिने तिचा भाऊ म्हणजेच जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर विल्यम हर्शेल याच्या कामात प्रचंड मदत केली. पुढे विल्यम हर्शेलच्या सिद्धांतांने खगोलशास्त्र या विषयाला एक नवी दिशाच प्राप्त करून दिली.
आजच्या काळात देखील अनेक महिला शास्त्रज्ञ खगोलशास्त्र या विषयात आपले योगदान देत आहेत. त्यातील आपल्या सर्वांना ठाऊक असलेली एक शास्त्रज्ञ आणि अंतराळवीर म्हणजे कल्पना चावला. कल्पना चावला या पहिल्या भारतीय महिला अंतराळवीर आहेत. त्यांनी १९८८ साली नासा या संस्थेत संशोधन करायला सुरुवात केली आणि पुढे त्या प्रकल्पाच्या मुख्य देखील झाल्या. त्यानंतर त्या २ वेळा अंतराळात विविध प्रयोग करण्यासाठी स्पेस स्टेशनमध्ये जाऊन राहिल्या. तिथे त्यांनी अनेक असे वैज्ञानिक प्रयोग पार पाडले. त्यात कॅन्सर संबंधीचा सुद्धा अभ्यास सामाविष्ट होता. दुसरी महत्त्वाची महिला शास्त्रज्ञ म्हणजे सुनिता विल्यम्स. या देखील भारतीय वंशाच्या एक अंतराळवीर आहेत. त्यांच्या नावे सर्वात जास्त स्पेसवॉक (एकूण ७ वेळा) असे अनेक रेकॉर्डसुद्धा आहेत. त्यांनी अनेक अवकाश मोहिमांमध्ये भाग घेतलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मंगळ मोहिमेतील महत्त्वाच्या महिला शास्त्रज्ञ म्हणजे स्वाती मोहन या होय. यांनी २०१३ साली मंगळ मोहिमेचा ताबा घेतला आणि २०२० मध्ये जी मंगळ मोहीम आखली होती त्यामध्ये मंगळावर उतरवण्यात येणारी बग्गी ही तिथे सुरक्षित उतरावी याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. त्याप्रकारे सर्व मोहीम त्यांनी यशस्वी रीतीने पार पडली आणि १८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंगळावर ती बग्गी व्यवस्थित उतरल्याची खात्री सुद्धा केली. तर या आणि अशा अनेक महिलांनी खागोलशास्त्र या विषयात आपले योगदान दिलेले आहे. येत्या काळात या यादीत अनेक भारतीय महिलांची नावेदेखील समाविष्ट होतील हे मात्र नक्की!
- अक्षय भिडे