लढणं आणि जगणं...

युवा विवेक    12-May-2021   
Total Views |

Fighting _1  H  
प्रिय,
मित्र/मैत्रीण
तू कोण आहेस, किती वर्षांचा आहेस, काय करतो, कुठे राहतोस, तुझी कौटुंबिक-आर्थिक-सामाजिक स्थिती काय याची मला काहीही कल्पना नाही... काहीच माहिती नाही. मी तुला पाहिलेलंसुद्धा नाही... तरीही मला तुझ्याशी बोलायचंय. तुला काही तरी सांगायचंय. अर्थात, ते ऐकायचं की नाही... स्वीकारायचं की नाही, याचा निर्णय तुझ्याच हातात आहे. मात्र, प्रयत्नच केला नाही. बोललो असतो तर.... असा कोणताही किंतू-परंतु नको म्हणून मी बोलतोय..!
दोस्ता, तुला आता जो त्रास होतोय. तो काय आहे, हेही मला ठाऊक नाही. मात्र, मला हे पक्क ठाऊक आहे, की त्रास होतोय कसला तरी...! मग करिअरची अडचण असेल, पैसे नसतील, नोकरी नसेल, गर्लफ्रेंड सोडून गेली असेल, व्यसन लागलं असेल, नवरा किंवा बायकोशी पटत नसेल, मुलांनी वृद्धापकाळात एकटं सोडलं असेल, प्रेमभंग झाला असेल, घर मिळत नसेल, कोणीतरी वाईट प्रकारे बदनामी किंवा विश्वासघात केला असेल, अगदी जवळच्याच एखाद्याने प्रकरणात अडकवलं असेल, कोर्ट-कचेरीची भीती असेल, नैराश्य आलं असेल किंवा आणखी काही.प्रश्नांची मालिका न सुटण्यासाठीच असते.. न थांबण्यासाठीच असते ! त्यांना कुठेतरी थांबवावं लागतं, तेही फक्त आपल्यालाच!
तर, मुद्दा हा की, यातला कोणताही प्रश्न असला, तरी तुझ्या जीव देण्याने किंवा जगातून निघून जाणारे तो प्रश्न सुटणारे का? उदाहरणार्थ, तू आत्महत्या केल्याने नोकरी मिळणारे? करिअर सेट होणारे? गर्लफ्रेंड परत येणारे? नैराश्य जाऊन यश हाती लागणारे? काय होणारे? काहीच नाही....!
उलट काय होईल ते हे की, नातेवाइकांना घोर लागेल... चर्चा होतील... आई-वडील स्वत:ला तुझे आरोपी समजतील.... ज्या पोरीसाठी तू रक्ताचं पाणी केलंस न जाणो तुझ्यासाठी तेवढाच जीव काढणारी आणखी कोणी असेल तिला धक्का बसेल... जवळचे मित्र हळहळतील.. बायको, पोरं किंवा नवरा, पोरं उघड्यावर पडतील... इतकं, इतकं आणि इतकंच होईल...! शिवाय वयाच्या ज्याही कोणत्या टप्प्यावर तू तुझं जीवन संपवलं, तिथून पुढे तुझ्या आयुष्यात काही तरी चांगलं होण्याची शक्यताच तू स्वत:च संपवलीस....!
बोअर झाला असशील न? म्हणशील हे तत्त्वज्ञान झाडणं खूप सोपं असतं वगैरे..! खरंय तत्त्वज्ञान झाडणं सोपं असतंही.. मात्र, ते झाडायलाही काही तरी जग पाहिलेलं असावं लागतंच न... आणि अगदी असंच तत्त्वज्ञान नव्हे नव्हे, तर सच्चे अनुभव लोकांच्या तोंडावर फेकण्याची संधी आताची ही स्थिती तुला देते दोस्ता.... तू तिचं सोनं का करत नाहीस?
अरे, 'मला नाकारलं....' असं आकाशवाणीतून बाहेर पडलेला एखादा उमेदवार सांगतो न तेव्हा त्याचं फार काही वाटत नाही. मात्र, हाच प्रसंग एकदम ३० वर्षांनी अमिताभ नावाचा उमेदवार एखाद्या मुलाखतीत सांगतो, तेव्हा त्याची प्रेरणा होते इतरांसाठी...! असे ढीगभर किस्से, प्रसंग, आठवणी तूही ऐकल्या असशील.... वाचल्या असशील... कधीकधी इतरांनाही सांगितल्या असशील.. मग आज तूच असं....???
राम, कृष्ण, पुराण वगैरे मधलं काही सांगत नाही... अगदी छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या काळातलंही काही सांगत नाही. कारण, शेवटी 'तो काळ वेगळा होता,' असं वाक्य तू फेकशीलच.... तरी अलीकडच्या काळातला एक माणूस सांगतो... १९६६ ला हा माणूस आपल्यातून गेला. त्याचं नाव होतं स्वातंत्र्यवीर सावरकर...! आता त्यांचा स्वातंत्र्याचा लढा, देशभक्ती वगैरे बाजूला ठेवू.... माणूस म्हणून विचार करू..... सावरकरांना अंदमानची ५० वर्षांची शिक्षा झाली होती; म्हणजे दोन जन्मठेप. त्याआधी त्यांची पूर्ण मालमत्ता आणि घर इंग्रजांनी जप्त केलं होतं. त्यांना बॅरस्टरची पदवीही दिली नाहीच आणि त्यांच्या मोठ्या व धाकट्या भावालाही अटक केली. काळ कोठडी म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत त्यांना ठेवलं. बाकी इतर शिक्षा भरपूर होत्या. अशा वातावरणात ते १४ वर्षे राहिले. अपमान, हाल सगळं सगळं सहन करत. एका जहाजाच्या तळमजल्यावर प्रचंड दाटीवाटीने गजबजलेल्या माणसांमध्ये त्यांना राहवं लागलं. समोर एखादा माणूस शौच करतोय आणि आपण तिथेच आहोत इथवर वाईट वेळ..... ते स्वत: म्हणाले आहेत, की आमच्यापैकी अनेकांच्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार यायचा. सावरकरांच्या मनातही तो अनेकदा आला. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. ते अशा वेळी मांडी घालून डोळे मिटून शांत बसायचे आणि विचार करायचे. (त्याला ते स्थिरासन म्हणत) या सकारात्मक विचारातून त्यांनी अंदमानातही मोठं कार्य केलं. ते स्वत:ला अनादी मी, अनंत मी... म्हणू शकलो...! तू 'माझी जन्मठेप' पुस्तक नक्कीच वाच...!
तात्पर्य : माझं हे प्रवचन वाचून तू बोअर झाला असशील तर होऊ दे. मात्र, पाच मिनिट शांतपणे बसून या सगळ्याचा विचार कर. याची दुसरी बाजू नक्की तुला दिसेल. लक्षात ठेव, 'मोक्ष' स्थिती येण्याआधी 'ग्रहण' लागावंच लागतं...!
या संवादाने तुझ्यात काही बदल घडलाच, तर मला आनंद आहे. तो घडेल, अशी मला आशा आहे. मी कोण, काय हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नकोस ! तो वेळ तू कोण आहेस, हे जाणून घेण्यात घालवला तर मला आवडेल..!
- तुझा,
अनोळखी मित्र.