हुटहुटची हौस

युवा विवेक    12-May-2021   
Total Views |

Hustle_1  H x W 
हौसेला मोल नसतं; पण हौसेला 'हुटहुट' असू शकते. हुटहुट म्हणजे काय, तर 'बाई मी, बाई मी' असं करण्याची हौस असलेल्या मुलांना आमची एक मैत्रीण 'हुटहुट' म्हणायची. वर्गात पहिल्या बाकावर बसलेल्या, शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची हौस असलेल्या, गृहपाठ पूर्ण करून येणाऱ्या, '.... तर मुलांनो काल आपण कुठे होतो..' या प्रश्नावर पुस्तकाच्या पानासह ओळ क्रमांकसुद्धा सांगणाऱ्या हुशार आणि उत्साही पोरांना 'हुटहुट' म्हटलं जायचं. (कदाचित हा शब्द त्यांच्या वटवटीवरूनही पडला असावा.)
परवा शालेय मित्र विराजस भेटला आणि त्यावरून हे सगळं आठवलं. विराजस अगदी 'टिपिकल हुटहुट' होता. आज एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. हुशारी आणि नोकरीतून मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचं सुख दिसत होतं. अजूनही स्वभावातली 'हुटहुट' कमी झालीच नव्हती. 'मला सगळं येतं' आणि 'मला सगळंच येतं' यात एक अस्पष्ट रेषा असते. त्या रेषेची जाणीव अनेक पुस्तकी विद्वानांना होत नाही. एका पाठोपाठ एक परीक्षा देत राहणं, त्यात पटापट उत्तीर्ण होणं आणि सातत्याने 'मी हे हे केलं' याचा डंका मिरवत राहणं हेच मग जीवनव्रत म्हणून उरतं. यात वाईट काय? काहीच नाही... मग चूक काय? तर ती काही प्रमाणात वागण्यातून होते.
अपयशाचं दु:ख ज्या वेगाने डोक्यात जात नाही, त्याहून दुप्पट वेगात यशाचं सुख डोक्यात जातं. यश पचवणं हे सोपं नाही, ते यासाठीच म्हणतात. यशाची एक-एक पायरी चढण्यातला आनंद नंतर अतिरेकी आत्मविश्वासात बदलतो. पायरी चढून वर जाताना इतरांना चिरडल्याच्या आनंदाची हलकी झालर येऊ लागते. कालांतराने 'मी अमूक केलं...' याहीपेक्षा समोरचा कसा काहीच करत नाही, याकडेच लक्ष वेधण्यात ही मंडळी धन्यता मानतात. कष्ट, मेहनत, बुद्धिमत्ता, हुशारी, यश यातला निखळ भाव जाऊन ते 'इगो पॉइंट' होतात. अशा माणसांच्या जवळ राहणारे लोकही एका मर्यादेनंतर त्यांना काही सांगायला जात नाही. ही अवस्था म्हणजे 'हुटहुट'ची सर्वोच्च पातळी. 'मी कोणालाही काही सांगायला जात नाही... मग मलाही कोणीच काही सांगू नाही...' असा वरून व्यवहार वाटत असला, तरी आतला अहंकार डोकावत असतोच.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला बाक आलेला असतो... त्यावरची हुशार, विद्वान मंडळीही आलेली असतात आणि त्यांचा दुस्वास करणारी आम जनतासुद्धा असते. आपल्यापैकी काही जण कदाचित पहिल्या बाकाचे मानकरी असतीलसुद्धा; तर काहींना इच्छा असून तिथपर्यंत पोहोचता आलं नसेल. पहिल्या बाकावरचे सगळेच विद्यार्थी असे तिरसट असतात, असे नाही आणि मागचे सगळे मठ्ठ असतात, असेही नाही. मुळातच 'हुटहुट'ची व्याख्या पहिल्या बाकावरच्या मुलांसाठी केली गेली असली, तरी तिच्यात मागल्या बाकावरचे मुलेही अनेकदा सहजपणे आलेली असतात. याचं कारण वृत्ती, स्वभाव, वागण्याची पद्धत यापैकी काहीही स्थानावर अवलंबून नसतं.
उत्साही असणं ही जितकी जमेची बाजू आहे, त्याहून अधिक धोकादायक आहे. उत्साही माणसाला अनेकदा उगाचंच इतरांचा राग येतो. इतरांचं शांत असणं, स्वस्थ बसणं यालाच सहन होईनासं होतं आणि जर समोर उत्साहीच असेल कोणी, तर मग उत्साहाची उत्स्फूर्त स्पर्धाच सुरू होते. वर्गातले 'हुटहुट' परवडतात. कारण, ते विशिष्ट काळापुरते असतात. प्रत्यक्ष आयुष्यातले परवडत नाही. त्यातही ते नातेवाईक किंवा जवळच्या मित्रमंडळींमध्ये असतील तर अस्तनीतला निखाराच जपण्यासारखं असतं.
यावर उपाय काय? उपाय एकच.. कधीही त्याला किंवा तिला 'तू कसा हुटहुट आहेस, किती हुशार आहेस, तुझ्यामुळेच सगळं किती छान जुळून येतं,' याची जाणीव करून देऊ नाही. एकदा ही जाणीव झाली, की तो दंश ही मंडळी युद्धात छातीवर झेललेल्या गोळीप्रमाणे मिरवतात आणि येणाऱ्या-जाणाऱ्याला दाखवतात. व्यक्ती म्हणून कोणीही टोकाचं वाईट नसतं. वाईट असतात, त्या सवयी, पद्धती आणि जाणिवा. त्या बदलल्या की, गोष्टी बदलू शकतात. हुशारांचा तिरसटपणा आणि सुमार बुद्धिवंतांचा भोळेपणा कमी केला, तर 'हुटहुट'ची हौस कोणालाही राहणार नाही, हेच खरं....!
- मयूर भावे