मोहमयी दुर्बोध

युवा विवेक    12-May-2021   
Total Views |
जुन्या व्यथेला विकाऊ मूल्य कधीच नसतं. 'दर्द होना लेकिन नया होना,' हेच या बाजाराचं सूत्र आहे. रडकं कथानक सॉलिड चालतं; पण त्याची मांडणी नवीच हवी असते. निर्मात्यापासून रसिकांपर्यंत सर्वांनाच. माणसाचंही तसंच आहे. त्याला दु:खाचं आकर्षण आहेच. मात्र, सनसनाटी दु:खाला तो भाळतो. 'एक्सक्लुजिव्ह' हवं असतं.

Durbodh_1  H x  
अशा वेळी सामान्य मानवी मनाच्या पलीकडची संवेदनशीलता खांद्यावर खेळवणारा ग्रेसांसारखा कवी? लेखक? नव्हे नव्हे तर, भावनांचा सुबोध आलेख म्हणतो, की
विकायाला आज,
निघालो मी व्यथा
जुनी माझी कथा,
कोण घेई...!
एक प्रश्न सहज मनात येतो. विकायचं कशासाठी? आणि विकायचंच असेल तर, व्यथाच कशासाठी? मात्र, उत्तर सोपं आहे. विकायचं यासाठी कारण शेवटी व्यवहार संपत नसतोच.. अगदी भावनांचासुद्धा... तो फक्त इकडून तिकडे हस्तांतर होत जातो. 'एनर्जी'सारखा 'ट्रान्स्फर' होत जातो. म्हणून विकायचं आणि विकायला नवंच हवं हो, जुनं रडगाणं सुजाण ग्राहक घेत नसतात ना?
विकायला आलेला हा माणूस बाजाराच्या बाजारपणाला लगेच कंटाळतोसुद्धा. कारण, तो हाडाचा विक्रेता नाही. दलाल नाही. आडत्या नाही. त्याला कळतं इथले कायदे वेगळे, वायदे वेगळे आणि 'भाव'...? भाव तर इतके वेगळे की, भावहीन शब्द बाजाराच्या दरवाजावर तोरणासारखा लटकलेला असतो. तो लाचार हसतो तुमच्याकडे बघून.. अशा बाजारात जरी व्यथा विकल्या, तरी केवळ भार कमी होईल; पण घाव भरून निघणार नाहीतच.. म्हणून म्हटलंय...
तुझ्या बाजाराचे,
वेगळेच भाव,
कसे माझे घाव
संपतील?
मी विकायला आणलाय तो भारा गवताचा आहे. त्याची राखण मातीच्या घरात केलीय. मातीच्या ओलाव्याचा स्पर्श या माझ्या दु:खाला झालाय; पण तो भारा ज्या भिंतींना टेकवून ठेवला होता. त्या हाडांच्या भिंती होत्या... हाडं... तरुणपणी प्रचंड टणक आणि उतरत्या वयात ठिसूळ.. माझ्या घराच्या भिंतीही माझ्यासारख्याच आहेत.. मी वादळ होतो तेव्हा त्या मशाल होत्या.. मी शांत झुळूक झालो.. त्याही मंद ज्योत झाल्या... या अशा घरातलं दु:ख.. कोणी घेणार नाही.. म्हणून म्हटलंय...
हाडांच्या रे भिंती,
मातीच्या या घरा
दु:खाचा भारा,
कोण घेई?
या पुढच्या कडव्यापाशी मी कितीतरी वेळ थांबून होतो.. ग्रेस म्हणताय..
कोण घेई माझ्या,
ओसाडाचा भोग
त्याच्या घरा आग
लागायची!
मी थांबलो ते ओसाडाचा भोग इथे...! ओसाडाचा भोग म्हणजे नक्की काय असेल? ओसाड माळरान? ओसाड घर? आणि त्यावरचा भोग... असं काही?? पुढे आहे... 'त्याच्या घरा आग लागायची'... हा इशारा आहे की शाप? काळजी आहे की, सोडून दिल्याचा भाव...
मला वाटतं... हा स्वत:च्या दु:खाचा गौरव आहे. हे ओसाडभोगाला मिरवणं आहे. हे व्यथेला खेळवणं आहे. अग्नी खेळवतात ना अगदी तसं.. हात भाजले तरी, अग्नी खेळवणारा खेळवत असतो. कारण त्याच्या हातांना तेजाची आस असते. आच त्याला लागतच नाही. त्यामुळे असा समाजाच्या चौकटी मोडणाऱ्या ओसाडावरचा भोग.. मलाच झेपू शकतो. इतरांची घरे राख होतील त्याने.
हे सदैव असंच राहावं.. यासाठी विधात्या तू मला दु:ख दे... सुखाने मी सुखवस्तू होऊ शकतो. माझ्या नव्या व्यथेला जन्म देण्याआधीच्या प्रसवकळा दु:खच देऊ शकतं. दु:ख सुईण होतं माझ्या व्यथेसाठी. दु:ख होतं तेल लावून माझ्या व्यथेला लहान बाळाला अंघोळ घालणारी आई.... माझं आईपण दु:ख जपतं. म्हणूनच माझी दु:खावर माया आहे... या दु:खाकडे या देहातलं आईपण टाकून किंबहुना हा देह सोडून मला बघायचं आहे.. मला नवा देह दे, नवी काया दे, नवी व्यथा दे...!
मागणं हेच..
म्हणूनच माझी,
दु:खावर माया
वेगळीच काया,
हवी मला...!!
ही वेगळीच काय मागताना तिच्यासाठी लागणार संवेदनशील मन, तरल बुद्धी आणि एकूणच समृद्ध माणूस म्हणून मिरवता यावं, असं व्यक्तिमत्व नकळतपणे मागितलं जातंच. दु:ख मागितल्याने अशा अनेक वाटा फुटू लागतात. आहे त्याहून अधिकची आस लागते. नवनिर्मितीची ओढ खुणावू लागते. त्यामुळे मागितलंय ते दु:ख...
दे दु:ख तुझे मज राधे, मी युगे युगे मिरवीन...
या कवितेतल्या राधेकडे दु:ख मागणाऱ्या श्रीकृष्णाची आणि ग्रेसांची व्यथा, मागणं सारखंच ठरतं, ते याचमुळे.
- मयूर भावे.