तू तेव्हा तशी

युवा विवेक    12-May-2021   
Total Views |
 
That's _1  H x
कविता किंवा गाणं ऐकताना एक चित्र मनात तयार होतं जातं आणि मग कळतं कवितेमध्ये एक कविता आहे... कदाचित एखादी कथा आहे.. कदाचित एक आत्मनिवेदन आहे.. कदाचित काहीच नाहीय; पण काहीच नसण्याचं 'कोरेपण' मात्र नक्की असतं.. ती कविता किंवा ते गाणं तुम्हाला खुणावत असतं.. त्याला अपेक्षित असतं त्या कोरेपणावर तुम्ही तुमच्या जाणिवेने एक नवा राग उभा करावा.. तुम्ही करावी तुमची कविता.. जिला कदाचित वृत्त नसेल, पण वृत्ती असेल.. छंद नसेल, पण रेशमी बंध असेल... ताल नसेल; पण तरी ती मैफलीला समेवर नक्की आणेल ...!
असंच होतं जेव्हा तुम्ही ऐकता 'तू तेव्हा तशी.....' हे निवडुंग चित्रपटातलं गीत. आरती प्रभू यांचं लेखन आणि 'भाव' शब्दाचा मनुष्यावतार म्हणजे भावगंधर्व पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. आपल्यापैकी कोणालाही हे गाणं नवीन नाही.. किमान एकदा तरी नक्कीच ऐकलेलं असणार... माहीतच नाही किंवा ऐकलंच नाही, अशी संख्या बहुतेक नसेलच... नसेल ऐकलं तर आवर्जून ऐका आणि त्याहीपेक्षा बघा..!
तू तेव्हा तशी,
तू तेव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची.
तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.
तू तेव्हा तशी... ऐकताना एक प्रश्न कायम पडतो.. 'तेव्हा' म्हणजे 'केव्हा?' ती वेळ नक्की कोणती असेल? सकाळ दुपार संध्याकाळ या अर्थाने असेल का? भेटायला येताना किंवा भेट संपवताना अशी काही असेल का? पहिल्यांदा पाहणं... पहिल्यांदा हातात हात घेणं.. पहिला स्पर्श असं काही असेल का? यापैकी काहीही असू शकतं... पण मला वाटतं... 'तेव्हा' शब्द एवढ्यापुरतंच नसेल हो! हे सगळं तर शब्दांत मावणारं आहे.. ती वेळ अशीच होती, जिला शब्दांत सांगता येत तेव्हाही नव्हतं... आताही नाही, म्हणून लहान पोरं म्हणतं न जत्रेतल्या 'त्या' झोक्यासारखा मोठा झोका दे.... इथे 'त्या' झोक्याची व्याख्या करायची नसते. निरागसता आणि आनंद एवढ्यापुरताच मामला असतो... अगदी याच प्रमाणे... तू तेव्हा तशी आहेस... यातला 'तेव्हा'चा अर्थ आणि 'अशी'चा अर्थ फक्त त्या दोघांना कळलेला असतो. मात्र, आपल्यासारख्या म्हटलं तर त्रयस्थासमोर तिची मूर्ती उभी राहावी म्हणून असेल का.... बहरांच्या बाहुंची...!
बहरांच्या बाहुंची म्हणजे काय हो? हे वर्णन फक्त बाहुंचं असेल का? की तिच्या व्यक्तिमत्वाचं असेल... ?? बहरांच्या बाहुंची म्हणताना.. साक्षात एक संपूर्ण 'बहर' जी सामावून घेऊ शकते, अशी ती.. असं म्हणायचं असेल का, असा प्रश्न मनात घेऊन आपण त्या बाहुंचं कल्पनेतलं चित्र पाहताना मोहरून जातो. आपल्या मनाला बहर येतो...
असा एखादा ऋतूबहर.. ऐल राधा आणि पैल संध्याच असेल..! ती ऐल संध्या आणि पैल राधा कशी असेल... ऐल तिरावर कृष्णाची वाट पाहणारी राधा जेव्हा पलीकडे पाहत असते, तेव्हा तिला ठाऊक असतं.. त्याचं येणं म्हणजेही संध्याकाळ आणि न येणं म्हणजेही हीच ती केशरी संध्याकाळ ! म्हणून त्याच्या आठवणीत ती अजून चाफेकळीच आहे.. फुल नाही...!
तू नवीजुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या ग डोळ्यांची.
यातल्या नवीजुनी पेक्षाही कधी कुणी? या शब्दांपाशी थांबायला होतं. कधी कुणी? म्हणजे अनोळखी का? की कुणीच नाही या भावनेतून... की कधी एकातांत अत्यंत स्निग्ध मायेने वागणारी ती इतरांसमोर मात्र अत्यंत 'कुणी' भावनेने वागते...! तिची ही समज पुन्हा त्याच विचारात टाकते.. तोच प्रश्न उभा करते... तू तेव्हा अशी.... तर का अशी???
तू हिर्वीकच्‍ची,
तू पोक्त सच्‍ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची.
पोक्त सच्ची... इथे पोक्त शब्दाचा अर्थ वयाने मोठी असा नक्कीच नाही. तर, कधी दोघांमध्ये अत्यंत अल्लडतेने वागणारी ती जेव्हा एखाद्या संध्याकाळी खिडकीपाशी उभं राहून शून्यात नजर लावून उभी असते आणि नंतर काहीतरी मोठा निर्णय घेते तेव्हा किती पोक्त वाटते? तिच्या असण्यानेही त्याचा राग, त्याचा उरफोडेपणा शांत करण्याची ताकद तिने कमावलेली असते.. तेव्हा ती किती पोक्त असते? कोणतीही चूक झाली तरी तिची कूस पारखी होणार नाही... असा विश्वास त्याला वाटणं, यात ती किती पोक्त असते? या अर्थाने कदाचित असेल... पोक्त सच्ची..!
बाकी रसिकहो, खारीच्या डोळ्यांची आणि खट्ट्यामिठ्ठ्या ओठांची म्हणजे काय? हे तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये... त्याबद्दल मी सूचवावं आणि तुम्ही पाहावं.. निवडुंग चित्रपटातलं हे गीत पाहा. त्यात अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी केलेली डोळ्यांची उघडझाप आणि खट्टयामिठ्ठया ओठांची या वेळी कॅमेरा झूम इन-आऊट होणं.. हाच त्या शब्दांचा अर्थ....!
बाकी मी त्याला शब्दात मांडूच शकत नाही.. कारण ती अगदी 'तशी' दिसलीय, जशी 'तेव्हा' दिसली होती....!
- मयूर भावे