भावनांची बेरीज की लिखाणाची वजाबाकी?

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

emotions_1  H x 
लिखाण मनापासून व्हावं आणि मनासाठी व्हावं, हे कितीही खरं असलं, तरी भयंकर कौटुंबिक, अतिवात्सल्यपूर्ण, सात्विक, सोज्वळ आणि थोडक्यात रडकं, असं वगैरे लिखाण अंगावर येतं. त्यातून नक्की काय द्यायचं आहे, हे कळत नाही. लिखाणाचा हेतू रडवणं असा असू शकत नाही. ते वाचता-वाचता वाचकाला काही तरी आठवून मग त्याच्या डोळ्यांत सहज पाणी येणं वेगळं असतं. अतिभावनिक लिखाण आवडतं किंवा नाही, चांगलं की वाईट, योग्य की अयोग्य या वादात पडायलाच नको, कारण प्रत्येकाची अभिव्यक्ती स्वतंत्र आहे आणि त्याला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्यसुद्धा आहे..! मुद्दा इतकाच, की असं लिखाण अंगावर येतं..!
असं स्पष्टपणे बोलल्यावर किंवा लिहिल्यावर मात्र, मग तुमच्या भावना मेल्या आहेत का हो? तुम्हाला नात्यांविषयी काही वाटेनासं झालं आहे का? तुमच्यातली 'ओल' का काय म्हणतात ती संपली आहे का, असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर, याचंही उत्तर ठामपणाने 'नाही' असंच देता येतं. आपलं मन आणि बुद्धीसुद्धा आपल्याला तेच सांगत असतं. शांतपणे विचार केला, तर लक्षात येतं फक्त लिखाणच नाही, तर तशी नाटकं, चित्रपट, गाणीसुद्धा नको वाटतात.
एकीकडे आपण असं म्हणत असताना, दुसरीकडे, मात्र, श्यामची आई हा चित्रपट आपल्याला आवडत असतो. माझी जन्मठेप वाचताना आपण रडलेलो असतो. श्वास, इक्बालपासून ते अलीकडच्या दंगल, 'केसरी'पर्यंत अनेक चित्रपट पाहताना आपले डोळे पाणवलेले असतात. याचाच अर्थ, तुम्ही रूक्ष, कोरडे वगैरे झाला आहात का? पत्थरदिल वगैरे प्रकार आहे का? तर नाही..! तुम्हाला तुमच्या भावना जपायला, जतन करायला, मांडायला आणि व्यक्त करायला जमू लागलं आहे इतकंच..! तुम्ही 'स्ट्रॉंग' वगैरे झाला आहात असंही एखाद्याला वाटू शकतं..!
भावनिक लिखाण करताना आणि अशा पद्धतीचं लिखाण वाचताना एक गोष्ट लक्षात येते. ती अशी, की आपलं लिखाण खरंच एवढं भावनिक करण्याची गरज आहे का? आपण मांडत असलेल्या कथानकाची आणि मुळात त्या पात्रांची तशी गरज आहे का? एका वाक्यात, एका परिच्छेदातही प्रचंड भावनिक करता येतं किंबहुना तोच मुद्दा पोहोचवता येतो, जो ढीगभर वर्णनातून पोहोचणार आहे. मग कशासाठी?
'बुटाची लेस बांधत होतो मी, फाटक्या चपलेत आई चालली....' ही कवितेचे एक ओळ एक संपूर्ण लेख बोलते आहे. असंही होऊ शकतं न?? 'माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही होवो...' ही ओळ श्यामच्या आई या पुस्तकाचा शेवट आहे.. या एका ओळीपाशी न रडणारा माणूस सापडणं अवघड आहे. तरीही साने गुरुजींच्या लिखाणाला आणि संपूर्ण लिखाणाला 'रडकं' म्हणता येणार नाही.
'रडकं' आणि भावनाप्रधान यातली सूक्ष्म रेषा नकळतपणे ओलांडली जाते. पीठ सैल झालं की सुगरण लाडवाच्या वड्या करते. 'आम जनता' वाह वाह करत त्या वड्या खात असली, तरी घरातली एखादी म्हतारी हळूच विचारते, 'सारण जमलं नव्हतं न?' त्यामुळे आपल्या 'सारणा'ची सारवासरव करायला लागू नये, असं मला वाटतं.
रडवणं सोपं आहे, हसवणं कठीण असं म्हटलं जातं. ते मलाही मान्य आहे. परंतु, विचारहीन, फक्त भावनांशी खेळून रडवणं आहे की विचाराअंती आलेले अश्रू हवे आहेत. कलाकृतीच्या अविष्कारानंतर विचार घेऊन जाताना डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा हव्या, की नको नको रडकं आहे.. ही दाद हवी, हे ज्याने त्याने ठरवायचं..!
अंदमानच्या काळकोठडीत अनन्वित अत्याचार सोसलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या 'माझी जन्मठेप' नावाच्या पुस्तकाच्या शेवटी वाचकालाच असा सवाल करतात, की वाचका, तू माझ्या या कंटाळवाण्या आत्मकथनाला वाचून कंटाळलास का.. या ओळी वाचताना आपला अवघा देह फक्त अश्रू म्हणून उरतो. इथे आपण सावरकरांचा लेखक म्हणून विचार केला, तर लक्षात येतं की, त्यांनी लिखाण उगाचं रडकं व्हावं, भावनिक व्हावं म्हणून काहीही केलेलं नाही. ते फक्त मांडत गेले. मात्र, त्यात खरेपणा इतका होता, की वाचताना माणूस तात्यांरावांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहतच नाही.
तात्पर्य, असं की, भावनाशील शब्दांची बेरीज लेखकाच्या पदरात फार तर वाहवा किंवा अश्रूंचं दान टाकू शकेल; पण भावनिकतेला विचार जोडलेले असतील तर वजाबाकी होईल ती रडकथेची..! अतिरंजित बेरजेपेक्षा भावनांचा सुलभ निचरा करणारी वजाबाकी सरस असते, नाही का?
- मयूर भावे