सामान्यत्वाचं भांडवल

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

freedom_1  H x
'मला एखादी गोष्ट जमत नाही,' आणि 'मला ती जमूच शकणार नाही,' या दोन विधानांमधला फरक आणि त्यांच्यातून होणाऱ्या कृतीचा परिणाम ज्या वेळी लक्षात येईल, त्या वेळी आपल्यातलं सामान्यत्व गळून पडेल. किमान त्या दिशेने आपण एक पाऊल उचललेलं असेल. अनेक लोकांकडून जेव्हा हेच एक वाक्य वारंवार येतं, तेव्हा खरंच आश्चर्य वाटतं. अनेक गोष्टी अशा असतात, ज्या जरा प्रयत्न केल्या किंवा स्वत:ला तशी सवय लावली, तर जमतात; पण जमणारच नाही म्हटलं तर?
काही मी जवळून पाहिलेली उदाहरणे देतो..
उदाहरण क्रमांक एक :
जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात राहणारे सदानंद भावसार आजोबा. हा माणूस निवृत्त शिक्षक. कधीतरी शाळेच्या स्टाफरूममध्ये समाजकार्य वगैरे असा विषय निघाला. कोणीतरी गंमतीत म्हटलं, अरे तू काय करतोस ते सांग? हे त्या संवेदनशील माणसाच्या मनाला लागलं. आपण बाकी काही करू शकत नाही; तर किमान समाजातील चांगल्या लोकांचं कौतुक करू शकतो, याची जाणीव त्यांना झाली आणि साध्या दहा पैशांच्या (तेव्हाची किंमत) पोस्टकार्डवर शुभेच्छा लिहून ते समाजातील विविध यशस्वी लोकांना पाठवू लागले. वृत्तपत्रातून अशा व्यक्तींचा शोध घेऊ लागले. कोणाचीही निवड झाली, एखादी स्पर्धा जिंकली, परीक्षेत यश आलं, पुरस्कार मिळाला, की आजोबा त्याला पत्र पाठवतात. सुरेख अक्षरात लाल-निळ्याशाईत लिहिलेलं त्यांचं पत्र यशस्वी व्यक्तीचा उत्साह वाढवतं. सांगायला आनंद वाटतो, अशी किमान पन्नास हजार पत्रे त्यांनी आजवर पाठवली आहेत. ज्यामध्ये 'मिसाईल मॅन' डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्यापासून प्रत्येक क्षेत्रातल्या अनेक नामवंतांचा समावेश आहे, तसंच अनेक सामान्य लोकांचाही समावेश आहे. मी वक्तृत्व स्पर्धा करायचो, तेव्हा कोणतीही स्पर्धा जिंकली की त्यांचं पत्र मलाही यायचं.
उदाहरण क्रमांक दोन:
जळगावमधले चंद्रकान्त भंडारी सर. या माणसाकडे स्वत:च्या संग्रहात आज पाच लाखांची पुस्तकं आहेत. वाचनाची आवड नाही वेड. किमान तीन हजार लेख विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले. कोणत्याही विषयावर अत्यंत कमी वेळात पण मुद्देसूद लिहिण्याचं सामर्थ्य. इतरांना वाचनाची गोडी लागावी, म्हणून त्यांनी आजवर लाखभर रुपयांची पुस्तके भेट स्वरूपात दिली आहेत आणि एवढं असूनही अत्यंत विनयशील व्यक्तिमत्त्व.
अशी खूप उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. अडचण ही आहे की, आपल्या ते ओळखीचे असल्याने आपण त्यांना 'हलक्यात' घेतो, किंवा छे छे आपल्याला कसं जमेल, असं जमेल असं म्हणून आपल्या सामान्यत्वाचं भांडवल करतो.
महापुरुषांच्या जीवनाकडे पाहतानादेखील हाच दृष्टिकोन ठेवून आपण पाहतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची मार्सेलिस बंदरावरची उडी आपण रंगवून सांगतो कारण, ती उडी मारायला आज कोणालाही जायचं नाहीये. मात्र, त्यांचं भाषा, जातिभेद, इतिहास, समाजकार्य आज आपण करू शकतोय, त्याचं काय? असं जवळपास प्रत्येक महापुरूषाबाबत घडतंय.
मुद्दा हा की, इतरांना असामान्यत्वाची 'फोटोफ्रेम' लावली, की आपण स्वत:ला सामान्यत्वच्या चौकटीत बसवायला मोकळे होतो. भगतसिंहांसारखा 'एल्गार' आज करणं अपेक्षित नसलं तरी त्यांच्याएवढं वाचन नक्कीच करता येईल. कारणं देणं बंद केल्याशिवाय परिणाम दिसत नाही. अर्थात, या प्रवासात तुम्हाला टोमणे मारणारे, तुमची कुचेष्टा करणारे 'सामान्य' तुमच्या जवळच असतात. मात्र, सामान्यत्वाची बंधने झुगारून त्यांना ठणकावून सांगा....
जिस दिन से चला हूँ, मेरी मंजिल पर नजर हैं,
ऑंखों ने कभी मिल का पत्थर नहीं देखा..!
हैरत की निगाहों से मुझे देखनेवालों,
लगता हैं कभी तुमने समंदर नहीं देखा...!
- मयूर भावे