अंतराळामधून येते तुमच्या घरातील धूळ… (वैश्विक धूळ)

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

dust_1  H x W:  
दिवाळी अथवा एखादा मोठा सण आला की, आपण घरात साफसफाई करायला लागतो. मग साफसफाई करत असताना कपाटाखालून किंवा कोणत्याही आडबाजूने प्रचंड धूळ निघते. मंडळी, यातील काही धूळ थेट अंतराळामधून आलेली असू शकते बरं का ! शास्त्रज्ञ या लहान कणांना सूक्ष्म उल्कापिंड असे म्हणतात. त्यांचा आकार परागकणा इतका लहान असतो. अजून एक गंमत म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरून येणाऱ्या एकूण गोष्टींपैकी काही टन हे उल्कापिंडच असतात. शास्त्रज्ञ साधारण १८९१ पासून या उल्कापिंडांचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समुद्राच्या तळाशी, वाळवंटात आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये या अशा उल्कांचे नमुने गोळा करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
या सूक्ष्म उल्का नक्की येतात कुठून, या प्रश्नाचे उत्तर शोधताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, गुरू ग्रहाच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे काही लहान आकाराचे धूमकेतूदेखील आकर्षिले जातात आणि ते पुढे सूर्याकडे खेचले जातात. ते पुढे जात असताना सूर्याजवळ त्यांना शेपटी तयार होते. ही शेपटी बर्फाचे कण आणि वाफ यांची असते. कदाचित यातीलच काही सूक्ष्म कण उल्का स्वरूपात पृथ्वीवर येत असावेत. दुसरे काही उल्का कण हे लघुग्रहांच्या पट्ट्यामधील लघुग्रहांच्या धुळीच्या उत्सर्जनामुळे येत असावेत. हे धूमकेतू अथवा सूक्ष्म उल्काकण अतिशय वेगाने म्हणजे बंदुकीच्या गोळीच्या १०० पटीने अधिक इतक्या वेगाने अवकाशात प्रवास करत असतात. अर्थातच पृथ्वीवर येण्याआधी ते अवकाशातून येत असताना मानवनिर्मित उपग्रह आणि अंतराळ स्थानकांस धोकादायक ठरू शकतात.
एका आधुनिक अभ्यासात हे समोर आले आहे की, सुमारे १५००० टन इतक्या प्रचंड प्रमाणात दर वर्षी हे सूक्ष्म उल्का कण पृथ्वीवर येत असतात. यातील बरेच कण पृथ्वीच्या वातावरणात शिरतानाच घर्षणाने नष्ट होतात. उर्वरित कण पृथ्वीच्या विविध भागांत आदळतात. यातीलच काही कण आपल्या घरात येऊ शकतात. म्हणूनच आपल्या घरातील धुळीत लहान उल्काकण असण्याची दाट शक्यता असते. यातील काही उल्कापिंड घर्षणाने विरघळून एखाद्या चेंडूप्रमाणे गोलाकार असू शकतात तर, काहींचे घटक पदार्थ उडून गेल्याने ते ओबड-धोबड आकाराचे असू शकतात. या कणांचा आकार आणि घटक हे या उल्कापिंडांचे आकार, त्यांचे घटक, पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याचा त्यांचा कोन आणि त्यांची गती यावर अवलंबून असतो. पृथ्वीवर सजीव जीवनाचा उगम हासुद्धा अशाच एखाद्या उल्कापिंडातील घटकांमुळे झाला असल्याचा सिद्धांतसुद्धा काही शास्त्रज्ञांनी मांडला आहे. तर, मंडळी अवकाशाचा आणि आपला संबंध हा किती घनिष्ट आहे हे आपल्या घरात असणाऱ्या या ‘वैश्विक धुळी’मुळेदेखील सहज स्पष्ट होते.
- अक्षय भिडे