संगीताच्या जादुगाराच्या पोतडीतल्या गोष्टी

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

music_1  H x W: 
नव्वदच्या दशकात शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या पिढीने इंडीपॉप संगीताचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. ती गाणी आजही कानावर पडली की, ही पिढी आपल्या उमलत्या वयाच्या आठवणीत हरवून जाते. चित्रपटबाह्य संगीत, तेही कर्णमधुर, कानात घोळत राहणारं, हा या गाण्यांचा ‘यूएसपी’ असला तरी, ही गाणी लक्षात राहायला आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे या गाण्यांचे तितकेच सुंदर व्हिडिओ. या व्हिडिओजमधून कधी प्रेमकथा दिसल्या, कधी विरह, कधी तरुणाईची स्वप्नं तर, कधी वयात येणाऱ्या तरुणींच्या मनातली फुलपाखरं दिसली. नंतर रीमिक्स गाण्यांची लाट आली आणि त्यात हे सगळं वाहून गेलं. तरीही, ही नॉनफिल्मी गाणी जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरू राहिले.
आजही असे जे मोजके स्तुत्य प्रयत्न होत आहेत, त्यांच्यापैकी एक गाजणारं नाव म्हणजे रित्विज श्रीवास्तव. २०२० मध्ये रित्विजच्या गाण्यांनी केवळ 'स्पॉटिफाय'वरच्या स्ट्रीमिंगव्दारे जवळजवळ तेवढेच पैसे कमावले आहेत, जेवढे २०१९मध्ये टूर्स करून कमावले. सांगण्याचा मुद्दा हा की, लॉकडाउनच्या काळातही रित्विजची गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. आजच्या तरुणाईला रित्विजची गाणी भुरळ का घालतात, हे पाहणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं.
बकार्डी हाऊस पार्टी सेशन्सचा विजेता झाल्यानंतर त्याच्या 'उड गये' गाण्याने तरुणाईला वेड लावलं. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर लहानपणापासून वाढलेल्या रित्विजचं इलेक्ट्रॉनिक संगीतातलं योगदान मोलाचं आहे. 'उड गये'नंतर 'सेज', 'जीत', 'बरसो', 'वेद', 'चलो चलें' आणि अलीकडचं 'लिग्गी' अशी सगळीच हिट गाणी त्याने दिली आहेत. यातल्या काही गाण्यांचे व्हिडिओज इंडीपॉप गाण्यांची आठवण करून देतात. मात्र, या व्हिडिओजचं वेगळेपण म्हणजे ते सरळसोट कथा न सांगता कल्पित आणि वास्तवाच्या सीमारेषेवर रेंगाळत राहतात.
'उड गये' सुरू होतं आणि पन्नाशी-साठीच्या घरातील सहा पुरुष स्टेजवर क्रमाने प्रवेश करतात. त्यातले दोघे तर, जबरदस्तीने ढकलून स्टेजवर आणल्यासारखे येतात. संगीताच्या तालावरच्या त्यांच्या लयबद्ध हालचाली तरुणांनाही लाजवतील अशा आहेत. सुरुवातीला थोडेसे गोंधळलेले हे सहाही जण एका क्षणी एकमेकांशी नीट मेळ साधून नाचू लागतात आणि काही वेळाने गाणं संपतं. कॅमेरा प्रेक्षागृहाकडे वळतो पण प्रेक्षकांत फक्त सहा बायका बसल्या आहेत. बाकीच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्याच आहेत. त्या सहा जणी म्हणजे अर्थातच या सहा पुरुषांच्या पत्नी. स्टेजच्या वरच्या बाजूला दिसणारं 'बकार्डी हाऊस पार्टी' हे नाव अशा प्रकारे सार्थ होतं.
ऐसी अजनबी थी आपसी, की हमसे ना कभी कोई आ फसी
या शब्दांतून तर हे स्पष्ट होतंच की ही सगळी जोडपी अरेंज्ड मॅरेज केलेली आहेत, पण या व्हिडिओमधून जगाच्या बरोबर धावताना जगणं सेलिब्रेट करायचं राहून गेलेल्या माणसांची गोष्ट आपल्याला दिसते. त्याबरोबरच आपण कसेही नाचलो तरी समोर बसलेल्या आपल्या पत्नीला आपलं कौतुकच आहे, हा नवऱ्यांना असणारा आत्मविश्वासही दिसतो. जुनाट, मातकट स्टेजच्या पार्श्वभूमीवर या सहा जणांनी घातलेले रंगीबेरंगी चित्रविचित्र कपडे एक वेगळं स्टाईल स्टेटमेंटही अप्रत्यक्षपणे मांडतात.
'जीत' या गाण्यात तीन मुली दिसतात. एक रिक्षा चालवणारी, दुसरी शहाळी विकणारी आणि तिसरी टेलरिंगचं काम करणारी. एका निवांत सकाळी रिक्षावाली आपली रिक्षा बाहेर काढते आणि बाकीच्या दोघींना बोलावते. त्या दोघीही आपली दुकानं बंद करून रिक्षात येऊन बसतात. ती रिक्षा सुसाट सोडते आणि त्यांना समुद्रकिनारी घेऊन जाते. तिथे या तिघी फुटबॉल खेळतात. चटई टाकून आराम करतात. तिथून थिएटरमध्ये जातात. स्क्रीनवर 'उड गये'चा व्हिडीओ दिसतो आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर या तिघी रित्विजच्या नवीन गाण्यावर म्हणजेच 'जीत'वर नाचतायेत. तिथून त्या रात्री उशिरा मंडईत जातात. तिथे नाचत, गात सकाळी घरी परततात. तेव्हा रित्विज रिक्षात येऊन बसतो. ती रिक्षा चालू करते. बाकीच्या दोघीही आपल्या कामांना लागतात आणि गाणं संपतं.
सेहनी हमें सजा है,
हम है बाज़ारो में।
सब की नज़र यहाँ है,
हर चीज़ राज़ है।
या शब्दांतून जे सांगायचंय, ते मात्र खूप वेगळं आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेले व्यवसाय या तिघी करताहेत. त्यामुळे रोज नव्या नजरांना त्यांना सामोरं जावं लागतंय. तसं आपल्याकडे पाहिलं जाऊ नये, याच विजयाचं स्वप्न आम्ही पाहतो आहोत, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांच्या आयुष्यातला जो दिवस आपल्याला गाण्यात दिसला तो त्या खरंच जगल्या आहेत की तेही एक स्वप्नच होतं, याचं स्पष्टीकरण मिळत नाही. प्रत्येकाने आपापला अर्थ शोधावा.
'सेज'मधील शब्दांचा आणि संगीताचा मिलाफ होऊन अशी काहीतरी नशा तयार होते की डोळे बांध फुटल्यासारखे अखंड झरू लागतात. तो ताडमाड उंच. एकटा. त्यामुळे लोक त्याला टाळताहेत. तो लोकांमध्ये मिसळू पाहतोय, पण लोकांनी तांदळातल्या खड्यासारखं त्याला वेगळं काढलंय. अशात त्याला ती भेटते. तीही एकटी. आणि हे दोन एकटे जीव मिळून आपलं एक जग तयार करतात. ती त्याची काळजी घेते. त्याला आरसा पुरत नाही, तेव्हा ती त्याच्यासाठी उंचावर वेगळा आरसा लावते. पलंगाच्या बाहेर येणार्‍या त्याच्या पायांना ती स्टूलचा आधार देते. त्याला समजून घेणारं कुणीतरी हवंय, हे ती पुरतं जाणून आहे. त्याच्या वाढदिवसाला ती सगळ्यांना बोलावते. त्याला ज्यांनी वाळीत टाकलं आहे, त्या सर्वांना. त्यांच्या बुटांना उंचवटा जोडत ती त्याचं जग विस्तारते. जणू ती सांगू पाहतेय, "त्याला वाकण्याची गरज नाहीये. तुम्हांला गरज आहे तुमच्या विचारांची उंची वाढवण्याची."
दिल की धड़कन से तो आए जाना
हमरी सब-सब के हो जाए आना
बिस्तर अधूरी तो कैसे सोए जाना
बिस्तर अधूरी लो-लो लोरी सुनाना
या अर्थपूर्ण शब्दांतून एका आउटसाईडरची प्रेमकथा अलगद साकारते. या व्हिडिओची एक उलटी आवृत्तीही युट्यूबवर आहे. ती पाहताना असं वाटतं की, हीच मुलगी त्याला सोडून गेलीय आणि त्यामुळे तो पूर्णपणे एकटा पडलाय.
'लिग्गी'च्या व्हिडिओमध्ये एक जोडपं दिसतं. त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र उलटून गेलीय आणि नववधू जागी झालीय झोपेतून. नवरा मुलगा अजून साखरझोपेतच आहे. सगळं डेकोरेशन काढलं जात आहे आणि ही मुलगी गाण्याच्या तालावर बेभान होऊन नाचायला लागते. लग्नाच्या दिवशीचे थोरामोठ्यांना केलेले नमस्कार, सगळ्यांचं हसून केलेलं स्वागत, त्यांनी आणलेली गिफ्ट्स स्वीकारणं या सगळ्या सोपस्कारांना ती कंटाळली आहे आणि खरं तर तोही.
देखो आने-जाने वाले सारे साथ खड़े हैं
कभी ना कभी मैंने भी तो ऐसे-वैसे ख्वाब देखे हैं
की हम तो आसपास साँस थामे
और रात साथ बात करें क्यूँ ना, रह लो ना
या त्याच्या भावना ती जगतेय. दोघांनाही गप्पा मारण्यासाठी दोन एकांताचे क्षण हवे आहेत. गाणं संपतं आणि ती परत झोपी जाते. तेव्हा तो जागा होतो. स्वप्नील प्रणय चितारणारं हे गाणं ऐकल्यावर पाय सहज थिरकू लागतात आणि त्यात शेवटी येणारं रित्विजचं खट्याळ, अवखळ हसणं या गाण्याला चार चाँद लावून जातं.
DAR GAI या युक्रेनियन दिग्दर्शिकेने या सर्व व्हिडिओजचं दिग्दर्शन केलं आहे. रित्विजच्या गाण्यांचं नेत्रसुखद चित्रीकरण आणि त्यातली नृत्यं, चमकदार रंगसंगती या सगळ्याचं श्रेय तिचंच.
'डान्स अॅज इफ नोबडी इज वॉचिंग यू' असं जीव तोडून नाचावं, असं आतून प्रत्येकाला कधीतरी वाटतंच. रित्विजच्या या सगळ्या व्हिडीओजमधली माणसं अशीच भान हरपून नाचताना दिसतात, आपल्या आयुष्यातला केऑस क्षणभर विसरून. म्हणूनच हे व्हिडीओज जगण्याचा उत्सव करत एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. जिथे हे संगीत बेधुंद करत, 'उड गये' म्हणत पंख लावून उडायला प्रवृत्त करतं.
- संदेश कुडतरकर.