पावलांना स्वप्नांचे पंख लाभतात तेव्हा

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

dreams_1  H x W 
रिअॅलिटी शोजमधून पुढे येणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचं आयुष्य एका रात्रीत प्रकाशझोतात येतं, पण शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचूनही न जिंकलेल्या किंवा अगदी सुरुवातीलाच स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या स्पर्धकांचं पुढे काय होतं? या स्पर्धांच्या जवळपासही न फिरकणाऱ्या, परंतु अंगी कलागुण असणाऱ्या मुलांचं, युवक-युवतींचं आयुष्य कसं असतं? त्यातही या अशा कलाकारांच्या आयुष्यात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल तर, त्यांना आपली स्वप्नं पूर्ण करता येतात का? अनंत अडचणींचा डोंगर पार करताना त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं? या प्रश्नांचा वेध घेणारे अनेक चित्रपट आजवर येऊन गेले. 'सिक्रेट सुपरस्टार', 'गली बॉय' हे त्यापैकीच काही. याच पठडीतला नेटफ्लिक्सवरचा एक चित्रपट म्हणजे सुनी तारापोरवाला दिग्दर्शित 'ये बॅले'.
सत्यघटनांवर आधारित ही गोष्ट आहे. आसिफ आणि निशूच्या स्वप्नांच्या प्रवासाची. निशू एका रिअॅलिटी शोमधून बाहेर पडलाय तर, आसिफ मित्रांच्या घोळक्यात ‘हिपहॉप’ करण्यात आनंद मानतोय. हे दोघे एका नृत्य प्रशिक्षण अकादमीत योगायोगाने भेटतात आणि आरॉन सॉल या जगप्रसिद्ध बॅले शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊ लागतात. त्यात त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, ते यशस्वी होतात का, सॉलचा रागीट स्वभाव या दोघांच्या संपर्कात आल्यावर कसा निवळत जातो, याची ही कथा. फक्त खिळवून ठेवणारी नव्हे तर, पापण्यांच्या कडा ओलावणारीही. उगाच खोटा आशावाद उगाळत न बसता विजेत्यांच्या खर्‍या आयुष्यात डोकावून पाहणारी.
या चित्रपटात दिसणारी मुंबई हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. आजवर अनेक चित्रपटांतून मुंबईतल्या झोपडपट्टीतलं जीवन दिसलं आहे, पण या चित्रपटात येणारी दृश्यं झोपडपट्टीचा, कोळीवाड्याचा, तिथे कधी वादांसकट तर, कधी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या मिश्र संस्कृतीचा खरा चेहरा दाखवतात. त्यात कसलाही वेगळं काही तरी दाखवत असल्याचा अभिनिवेश दिसत नाही. सगळ्या सणांचं एकजिनसी मिश्रण होऊनही अठरा पगड लोकांची मुंबईला लाभलेली सण-मिरवणुकीची संस्कृती या चित्रपटात ठळकपणे जाणवते.
आसिफ आणि निशूच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान, इतर धर्मांचा द्वेष वगैरे गोष्टींना कणभरही स्थान नाही. आसिफ एका दृश्यात साईबाबांच्या मूर्तीसमोर प्रार्थना करताना दिसतो. तो दहीहंडी फोडतो. दिवाळीही साजरी करतो. निशूही मशिदीसमोर हात जोडताना दिसतो. आसिफचे काका त्याला हिंदूंमध्ये मिसळायला मनाई करतात, तेव्हा तो विरोध करतो. निशूला स्वतःच्या घराच्या बेसमेंटमध्ये बॅलेचा सराव करायला देताना त्याच्या मैत्रिणीच्या मनात कसलाही स्वार्थ नसतो, पण तिचे आई-वडील निशूच्या हेतूबद्दल त्याच्या केवळ झोपडपट्टीत राहण्यावरून शंका घेतात आणि निशू तिच्यापासून दूर जातो. जाती-धर्माची, वर्गव्यवस्थेची तेढ कधीच जन्मतः कोणी सोबत घेऊन येत नाही, ती हळूहळू मनात पेरली जाते, हे अशा प्रकारे हा चित्रपट सहज सांगून जातो. हिंदू-मुस्लिम वादाला कंटाळून आपण आपला देश सोडून आलो, असं सांगताना सॉल सहज म्हणून जातो की, जगातल्या सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली तर, जग खूप सुंदर होईल.
आसिफच्या मैत्रिणीचं - आशाचं - पात्र हे रूपकात्मकच म्हणावं लागेल. अचानकपणे दिसून नाहीशी होणारी आशा म्हणजे आयुष्यातल्या आशेच्या मोजक्या किरणांचंच प्रतीक. बरोबर असताना अशक्य गोष्टीही शक्य करायला लावणारं. शेवटच्या दृश्यातून तर ते अधिकच स्पष्ट होतं.
संडासच्या रांगेत उभा असलेला आसिफ त्या तेवढ्या वेळातही बॅलेच्या स्टेप्स करताना दिसतो, तेव्हा आकाशाला गवसणी घालणारी स्वप्नं त्याला किती अस्वस्थ करतायत, ते कळतं. तीच अवस्था रात्रभर उकाड्याने झोप न लागूनही, सगळे विद्यार्थी यायच्या आधीच प्रॅक्टिस रूम स्वच्छ करायला लागत असूनही, हार न मानता एकांतात एकलव्यासारखा आपला सराव चालू ठेवणाऱ्या निशूची.
निशूला टीव्हीवर पाहिल्यानंतर आसिफने उगाचच वाकड्यात शिरणं, त्यावर निशूने चिडणं इथपासून त्या दोघांच्या मैत्रीचा, एकमेकांची काळजी घेत, एकमेकांना आधार देत पुढे जाण्याचा प्रवास विलक्षण आहे. एकीचं बळ सांगणाऱ्या गोष्टीची आठवण करून देणारा तर आहेच, पण दोघांचं कलाकार असणं त्यांच्या माणूसपणावर कळत-नकळत कसा प्रभाव टाकत जातं, हेही दाखवणारं आहे. सुरुवातीला गैरसोयींनी कंटाळलेला सॉलसारखी चिडचिड करत असताना शेवटी त्यालाही इथल्या माणसांत राहणं जमू लागतं. निशूची मैत्रीण नीना निशू तिच्यापासून दूर गेल्यावरही मनात कसलाही सल ठेवत नाही आणि माझं स्वप्न तू पूर्ण करतोयस म्हणून मला तुझा हेवा वाटतोय, हे प्रांजळपणे कबूल करते. बॅलेचे मोजे नसल्याने निशूची संधी हुकू नये, म्हणून त्याचा मित्र स्वत:चे मोजे त्याला देऊन टाकतो. हाच मित्र पुढे निशूने परदेशात जाण्याची संधी गमावू नये, म्हणूनही त्याला मदत करतो अगदी नि:स्वार्थ भावनेने. निशूची आजारी बहीणही त्याची साथ सोडत नाही. ऐन मोक्याच्या क्षणी आसिफचे आई-वडील घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या विरोधात आणि आसिफच्या पाठीशी उभे राहतात. सुरुवातीला चिडलेले निशूचे वडील त्याच्या लयबद्ध हालचाली पाहतात, तेव्हा त्याला म्हणतात, "आदमी है की हिरन?" या सगळ्या माणसांच्या स्वभावाचा लसावि काढायचा झाला तर, तो शेवटी माणसाच्या मनातल्या प्रेमाच्या झऱ्यालाच जाऊन मिळतो.
या चित्रपटातल्या सर्व नवख्या कलाकारांनी जो दमदार आणि सहज अभिनय केलाय, त्याला तोड नाही. पहिल्या फिल्ममध्येच सगळ्या यंग ब्रिगेडने आपण लंबी रेस के घोडे असल्याचं दाखवून दिलंय. त्याला जिम सर्भ, विजय मौर्य, कल्याणी मुळे, दानिश हुसेन, हिबा शाह अशा कसलेल्या कलाकारांची तितकीच मोलाची साथ लाभली आहे. ज्युलियन सँड्सने साकारलेला सॉल तर, एकमेवाव्दितीय. भूमिकेशी एकरूप होणं म्हणजे काय, हे या चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून लक्षात यावं. चित्रपटातील गाणीही ठेका धरायला लावणारी, मुंबईच्या भावविश्वाचं दर्शन घडवणारी आहेत.
गुरूशिष्य परंपरेवर भाष्य करणाऱ्या 'व्हिपलॅश' या चित्रपटाची 'ये बॅले' पाहताना वारंवार आठवण होत राहते. ड्रमर होण्यासाठी आपल्या विद्यार्थ्याला तयार करणारा 'व्हिपलॅश'मधला गुरू आणि बॅलेसाठी आपल्या दोन विद्यार्थ्यांकडून कसून मेहनत करून घेणारा 'ये बॅले'मधला गुरू वरवर पाहता सारखेच वाटतात. शिस्तीच्या बाबतीत ते तसे आहेतही, पण भारतीयांच्या परिप्रेक्ष्यातून पाहताना 'ये बॅले'ला किंचितशी मेलोड्रामाकडे झुकणारी भावनिक किनार लाभल्याने तो जास्त जवळचा वाटतो. बॅले नृत्याची गोष्ट असल्याने हा चित्रपट पाहताना 'ब्लॅक स्वान'चीही आठवण झाल्यावाचून राहत नाही.
नृत्य या विषयावर मुळात भारतीय चित्रपट कमी. त्यातही 'डान्स लाइक अ मॅन'सारखे हा विषय संयतपणे हाताळणारे चित्रपट तर, नगण्यच. त्यामुळे तर 'ये बॅले' महत्त्वाचा ठरतोच, पण त्याचबरोबर आसिफ आणि निशूच्या लयबद्ध, चपळ हालचाली टिपणारा कॅमेरा या देहांमधल्या कवितांमध्ये डोकावून पाहण्यास भाग पाडतो. शारीर सौंदर्याकडे वासनारहीत नजरेने पाहायला लावतो. पुलंनी 'अपूर्वाई'मध्ये एका देशातील पाण्यात कवायतीचे खेळ करणाऱ्या नग्न तरुण-तरुणींचं वर्णन करताना म्हटलं आहे की, ते पाहताना त्यांना ते कुठेही अश्लील किंवा भावना चेतवणारं वाटलं नाही. या चित्रपटातील नृत्यांची दृश्यं पाहताना तीच गोष्ट अनुभवास येते.
'ये बॅले'सारख्या उत्तम प्रकल्पांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. सिध्दार्थ रॉय कपूरसारखे निर्माते तो प्रयत्न करत आहेत, ही दाद देण्याजोगीच गोष्ट आहे. मात्र, नेटफ्लिक्सवर आलेल्या या अशा आशयघन कलाकृती पाहणं आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवणं ही प्रेक्षक म्हणून आपलीही जबाबदारी आहे. तरच स्वप्नं सत्यात उतरवता येतात, हा विश्वास आपल्या आसपासच्या असंख्य निशू आणि आसिफ यांना मिळू शकेल.
- संदेश कुडतरकर.